Saturday, September 29, 2018

मुलँ रूज - १२


ऑक्टोबरमध्ये हेन्रीने प्रोफेसर कोर्मोनच्या वर्गात नाव घातले. हे हेन्रीचे कलाशिक्षणाचे दुसरे वर्ष होते. दररोज सकाळी तो आपल्या आईच्या घरातून मोंमार्त्रमध्ये जाण्यासाठी घोडागाडीतून निघायचा. पण ॲतलिएच्या वाटेवर थोडे अलीकडेच उतरायचा. आपली गाडी, गणवेशधारी गाडीवान कोणाच्या नजरेला पडू नये म्हणून ही काळजी. ठीक नऊ वाजता वर्गात शिरल्याबरोबर सर्वजण आपापल्या इझलकडे जाऊन कामाला सुरुवात करीत. व्हीनस, डायना, लेडा किंवा त्या आठवड्याची जी देवता असे तिच्या पुतळ्यावरून काम चालू होई. कित्येक वेळा प्रत्यक्ष मॉडेल असायची. मुले वर्गात येऊ लागली की मॉडेलची बाई एक एक करून सर्व कपडे उतरवायला सुरुवात करी. मॉडेलचा हळूहळू अनावृत्त होणारा देह बघून नव्याने आलेली मुले सुरुवातीला थोडी उत्तेजित व्हायची. पण एकदा का ती संपूर्ण नग्न होऊन आपल्या स्टुलावर जाऊन बसली की लगेच मुले डोळे बारीक करून, अंगठ्याने, पेन्सिलने माप घेत समोरचा कॅनव्हास पुरा करायच्या मागे लागत.
आठवड्यातून एकदा प्रोफेसर महाशय येत. ते बऱ्याच देशी-परदेशी अकादमी व म्युझियमच्या सल्लागार मंडळांवरचे सन्माननीय सदस्य होते. त्यांच्याकडे नेहमी बरेच काम असे. बँका, नगरपालिका, चर्च वगैरेंसाठी म्युरल, समाजातल्या बड्या धेंडांची पोर्ट्रेटस्‌ वगैरे. थोडक्यात ते एक प्रथितयश चित्रकार होते. पण वर्गातल्या मुलांच्या दृष्टीने सर्वांत महत्वाची बाब म्हणजे सॅलूनच्या निवड समितीवरचे ते एक ज्युरी होते. वर्गात ते दोन-तीन फेऱ्या मारत. प्रत्येकाच्या इझलकडे जाऊन पाचएक मिनिट डोळे किलकिले करून बघत. मग आपल्या नागरी, अतिशय हळुवार आवाजात सौम्यपणे पण किंचित आढ्यतेने काही सूचना करत. ब्रशने एक-दोन फटकारे मारून दाखवीत. प्रोफेसरांच्या अशा या फेऱ्यांमधून हेन्रीला लवकरच मोठा बोध झाला तो असा की सुंदर गोष्टींची सुंदर सुंदर चित्र काढणे हीच कलेतील सर्वात महत्वाची बाब आहे. रंगकाम अगदी हलक्या हाताने ब्रशने घोटून घोटून गुळगुळीत केले पाहिजे. चित्ररचना त्रिकोणात्मकच असली पाहिजे.
पोर्ट्रेट, मेझ अमिस, माझ्या मित्रांने, खास करून स्त्रियांचं पोर्ट्रेट म्हणजे,” प्रोफेसर कोर्मोन म्हणाले, “चित्रकलेचा सर्वोच्च आविष्कार. त्यासाठी केवढं कौशल्य, केवढी मेहनत लागते याची कल्पना नसेल तुम्हाला. बरं नुसत्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर एक वेळ दुसऱ्या कोणाचं पोर्ट्रेट जमेल पण स्त्रीचं. शक्यच नाही. कोणत्याही स्त्रीचं पोर्ट्रेट करायला कौशल्य आणि मेहनतीच्या जोडीला अंतःदृष्टीची आवश्यकता असते. आता असं पहा. पोर्ट्रेट करून घ्यायला आलेल्या स्त्रिया बहुधा प्रौढत्वाकडे झुकलेल्या असतात. कारण तेवढी ऐपत येईपर्यंत तारुण्य ओसरू लागलेलं असतं. या वयात साधारणतः आपण आहोत त्यापेक्षा जास्त सुंदर विशेषतः तरुण दिसावं अशी अपेक्षा असते. आपल्या सध्याच्या वयापेक्षा दहा पंधरा वर्षांनी लहान. यामुळे चित्रकाराला पोर्ट्रेट काढायला म्हणून आपल्याकडे आलेल्या स्त्रीच्या स्वत:च्या सौंदर्याबद्दल नक्की काय कल्पना आहेत हे प्रथम जाणून घेतलं पाहिजे.
एकदा हे नक्की केलं की मग कुठे नाक थोडं सरळ करा, चेहऱ्यावर थोडा गुलाबी रंग फासा, डोळे थोडे मोठे करा, कांतीचा रंग अगदी घासूनपुसून नितळ गुळगुळीत करा. मान थोडीशी लांब, खांदे गोल, हात नाजूक करा. या वयात स्त्रिया थोड्या सुटायला लागलेल्या असतात. स्केच करतानाच जरा काळजी घेतली की झालं. स्तनांची उभारी थोडी वाढवायची तर कटिप्रदेश थोडा कृश करायचा. चेहऱ्यावरची एकही सुरकुती, एखादा डाग, चामखीळ तर चुकूनही चित्रात दिसता कामा नये. छबी रंगवण्यापेक्षा जास्त मेहनत घ्यायची ती कपडे व दागदागिने रंगवताना. अंगठी, ब्रेसलेट, ब्रूच वगैरे हिरेजडित दागिन्यांवर जेवढं जास्त लक्ष पुरवावं तेवढं कमीच. मग पाहा तुमचा चित्रविषय कसा खूश होईल तो. स्त्रियांची स्तुती करायला मुळीच मागे-पुढे बघू नका. मग पाहातच रहा पैशांचा कसा वर्षाव होतो ते तुमच्यावर. मानसन्मानांचे ते काय. ते तर पैश्यापाठोपाठ चालत येतातच.
कोणी थोडे जरी वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली किंवा कोणाच्या कामात तिळमात्र जरी स्वतंत्र बाणा दिसू कागला तर लगेच प्रोफेसरांचे इतका वेळचे सौजन्य, संयम संपून त्यांचे खरे रूप दिसू लागे.
तुमच्या अशा कामाने कलेचा उपमर्द होतोय, हे तुमच्या लक्षात येत नाहीसं दिसतंय. तुमची चित्रं अजून सॅलूनमध्ये लागायचीयत. निवड समितीवर कोण कोण आहेत ठाऊक आहे ना.
हेन्रीचे निसर्गदत्त कलागुण कलेच्या दृष्टीने नुसते कुचकामीच नव्हेत तर घातकही आहेत. ही प्रवृत्ती वेळीच निपटून टाकली तरच तुमची प्रगती होईल हे पुन्हा एकदा हेन्रीला बजावून सांगण्यात आले. बिचारा मुकाट्याने आपल्या प्रायमरी शॅडोज्‌ रॉ अंबरने रंगवायचा, ब्रशचा फटकारा दिसू नये म्हणून घोटून घोटून गुळगुळीत करायचा. इतका की एक-दोनदा खुद्द कोर्मोनने त्याची पाठ थोपटली.
हे पाहा. निसर्गदत्त गुणवत्ता काय सगळ्यांनाच लाभते असं नाही. पण त्याची भरपाई चिकाटीने करता येते. ती तुमच्यात भरपूर आहे. माझ्या सूचनाबरहुकूम काम करत राहिलात तर एक दिवस तुम्हाला पेंटिंग बऱ्यापैकी जमू लागेलही. अंगी गुणवत्ता नाही म्हणून असे निराश होऊ नका. लक्षात ठेवा. अशीच ढोर मेहनत करत राहिलात तर एखाद्या दिवशी त्या परमेश्वराला तुमची दया येईल आणि कोणी सांगावं कदाचित तुमचं एखादं चित्र सॅलूनच्या वार्षिक प्रदर्शनासाठी निवडलंही जाईल.कोर्मोनच्या अशा शब्दांनी हेन्रीला धन्यता वाटे आणि धीर येई.

(फोटो - प्रोफेसर कोर्मोनच्या स्टुडियोत हेन्री तुलूझ लोत्रेक)



मुलँ रूज - ११


दुपारचे जेवण रॅचोबरोबर घेणे हा हेन्रीचा नित्याचा कार्यक्रम झाला. नंतर संध्याकाळी रॅचोच्या स्टुडिओवर कधी पेंटिंग करा नाहीतर कधी मेंडोलीनवर रॅचोच्या साथीने गाणी गा. कित्येक वेळा खिडकीतून अंत्यविधी बघण्यात वेळ जाई. अंत्यविधीचे साहाय्यक, शववाहिनीचे ड्रायव्हर्स, कबरी खणणारे स्मशानातले कामगार वगैरे मंडळी कधीतरी स्टुडिओत येऊन पोर्ट्रेटसाठी पोज देत. मग त्यांच्या बरोबरीने गप्पा करत मद्यपान करण्यात वेळ कसा छान निघून जाई ते कळतच नसे.
हेन्रीएके दिवशी रॅचो त्याला मोठ्या गांभीर्याने म्हणाला, “मी गेल्या कित्येक दिवसांपासून बघतोय. तुमच्यामध्ये कसलंही वैगुण्य नाहीय. असलंच तर ते फक्त तुमचं मन. ते तेवढं अगदी लहान मुलासारखं आहे. निरागस. त्यामुळे काय होतं की कोणाशी काय बोलावं, कसं वागावं ते तुम्हाला कळतच नाही. तुमची चित्रकला तर अगदी उत्तम आहे. मग कशाला तुम्ही एवढं मनाला लावून घेता. त्या बॉन्नाला काय बकबक करायची ती करू दे.
रॅचोच्या बोलण्याने हेन्रीच्या मनावरील सावट थोडे दूर झाले. कृतज्ञता व्यत्त करण्याच्या उद्देशाने तो म्हणाला, “थँक्यू. तुमच्यासारखा मित्र मला मिळालाय म्हणून माझा...
शट अप,” सहा फुटी अगडबंब देहातून तोफेसारखी गर्जना झाली. आपल्या भावनांचे नाजूकपणे प्रदर्शन करणाऱ्यांची बंडखोर तरुणांच्या गटात नेहमी टिंगल केली जाई. त्यांच्या मैत्रीची भाषा रांगडी असायची. तुझं काम मोठं कठीण दिसतंय. रॅचो मुद्दाम एकेरीवर येत म्हणाला.
रॅचोच्या ओरडण्याने हेन्री अगदी केविलवाणा दिसू लागला. त्याकडे दुर्लक्ष करून रॅचो पुढे म्हणाला, “तू अगदी सभ्य आहेस. तुझं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे. पण त्यामुळेच तू एकदम शामळू झाला आहेस. तुझी हाताची नखंसुद्धा बघ किती स्वच्छ आहेत ती. अरे कलाकाराचे हात आपले. थोडासा मळ, थोडासा रंग अडकलेला असला नखात म्हणून काही बिघडत नाही. तुझं बोलणंसुद्धा किती मिळमिळीत आहे. तुझ्यापेक्षा त्या ओग्युस्तिनाची भाषा जास्त तिखट असेल. उठता बसता सारखं मी तुझ्या तोंडावर थुंकेन अशी आव्हानात्मक भाषा बोलण्यात आली पाहिजे तरच तुझा येथे निभाव लागेल. नाही तर तुझ्या या सभ्यपणाला लोक बावळटपणा समजतील.
पॅरीसमधल्या तरुण कलाविद्यार्थ्यांचे जग, त्यांचे वागणे, बोलणे, वगैरे बारीकसारीक गोष्टींची माहिती रॅचोने हेन्रीला समजावून सांगितली. मोंमार्त्रच्या कलाविश्वात हेन्रीचा शिरकाव विनासायास व्हावा म्हणून रॅचो त्याची पद्धतशीर तयारी करून घ्यायच्या मागे लागला.
समज बोलता बोलता कोणी सहज रूबेन्सचा विषय काढला आणि म्हणायला लागला की रूबेन्स हा जगातला महान चित्रकार आहे तर यावर तू काय म्हणशील?”
असते एकेकाची आवड. मी काय बोलणार त्यावर.
वादात असं गुळमुळीत बोलून चालत नसतं. आपलं मत कसं जोरकसपणे मांडायचं असतं. नॉम द दियू. देवाच्यान. मेर द लोर. ओह शिट. मी तुझ्या तोंडावर थुंकतो. हे शब्द वारंवार आपल्या बोलण्यात आले पाहिजेत. कोण तो. रूबेन्स गेला तेल लावत. त्याचे कॅनव्हास मी गांड पुसायला वापरतो. असं काहीतरी बोललास तरच लोकांचं तुझ्याकडे थोडंतरी लक्ष जाईल.
प्लास पिगालवरील ला नुव्हेल हे कॅफे मोंमार्त्रमधील नवचित्रकारांचा गप्पा मारायचा एक अड्डा होता. तिथे नेहमी येणाऱ्या कलाविद्यार्थ्यांच्या एका गटाशी ओळख करून द्यायला म्हणून रॅचो एक दिवस हेन्रीला घेऊन ला नुव्हेलमध्ये गेला. रॅचोच्या या श्रीमंत, गुलहौशी मित्राला भेटण्यासाठी त्याचे मोंमार्त्रमधील मित्र अगोदरपासून तेथे हजर होते. फ्रँक्वा गोझी, लुई अँक्तां व रेने ग्रॅनीए.
हेन्रीचे त्यांनी अगदी थंडे स्वागत केले. बऱ्याच जणांनी त्याच्याकडे पाहिल्या न पाहिल्यासारखे करून आपल्या गप्पा पुढे चालू ठेवल्या. हेन्री बिचारा मुकाट्याने सावकाश बीअरचे घुटके घेत बसला. हेन्री एक चांगला श्रोता होता. विद्यार्थ्यांचे बोलण्याचे विषय, त्यांना पडलेले प्रश्न बहुधा आर्थिक असत. त्यांचे प्रश्न सहानभूतीपूर्वक ऐकणारा एक श्रोता त्यांना हेन्रीच्या रूपाने लाभला. हेन्रीच्या या गुणामुळे त्यांची हेन्रीविषयीची अढी पहिल्याच बैठकीत नाहीशी झाली. त्याहून महत्वाचे म्हणजे अडल्या-नडल्या गरजेला हेन्रीकडे पैसे उसने मागायची एक हक्काची सोय झाली. पण थोड्याच दिवसांत आर्थिक संबंधांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. हेन्रीला त्याच्या एकाकी शुष्क आयुष्यात मैत्रीचा ओलावा मिळाला.
प्रत्येक जण आपले सुखदुःख हेन्रीजवळ व्यत्त करत असे. गोझीने आपण नवी मैत्रीण कशी पटवली त्याची गोष्ट मोठ्या मिटक्या मारत सांगितली. तर लुई अँक्तांने आपण कशी गमावली त्याची. लुई अँक्तां दिसायला तसा देखणा होता. सुंदर स्त्रिया त्याच्याकडे चटकन आकर्षित होत. पण त्यांचा मूर्खपणा व अज्ञान त्याला सहन होत नसे. आपल्या नव्या मैत्रिणीचे अज्ञान दूर करण्याचा तो त्याच्यापराने प्रामाणिक प्रयत्न करे. आणि तिथेच त्याचा घात होई. जिथे गप्प बसायला हवे तिथे तो आपले ज्ञान पाजळायला जाई. चित्रकलेतील नव्या प्रवाहांविषयीच्या बौध्दिक बडबडीने तो आपल्या मैत्रिणींना वात आणी. एकदा तो त्याच्या मैत्रिणीला घेऊन लुव्हरला गेला. प्रत्येक पेंटिंगसमोर उभे राहून कलास्वाद कसा घ्यावा ते समजावून सांगत असताना फ्लेमिश पेंटिंगच्या दालनातून त्याची मैत्रीण जी गायब झाली ती त्याला नंतर संपूर्ण पॅरीस शोधूनही सापडली नाही.
ॲतलियेमधल्या चित्रकलावर्गाच्या शेवटच्या दिवशी त्या सगळ्यांनी एकच धमाल उडवून दिली. वर्गातून हसत-खेळत, जोरजोरात आरडाओरडा करत ते बाहेर पडले. प्लेस व्हिशी येथे आल्यावर गॉझी एका दिव्याच्या खांबावर चढला व जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे बघून उडते चुंबन देऊ लागला. अँक्तांने हार्मोनिका वाजवायला सुरुवात केली. त्या तालावर रॅचोने दोन्ही हात एकात एक गुंफून डोक्याच्या मागे घेत ढुंगण हलवत डान्स द व्हेन्‌त्रे इतका अप्रतिम केला की त्यांच्याभोवती एकच गर्दी जमली. तेवढ्यात पोलीस आले. त्यांनी त्या टोळक्यावर अश्लील हावभाव करून नृत्य करणे आणि गर्दी जमवून रहदारीला अडथळा आणणे असे दोन आरोप ठेवले. पण नशिबाने वाईनच्या एकेका ग्लासवरच निभावले. दुपारी ओग्युस्तिनाच्या कॅफेमध्ये चालू झालेला जल्लोष पहाटे ला नुवेलच्या गल्ल्यावर बसलेल्या खडूस कॅशियर मुलीचा मुका घेऊन संपला.
(फोटो- मोंमार्त्र मधील मित्रांसोबत – डावीकडून उजवीकडे  रेने ग्रॅनीअर, हेन्री रॅचो, लुई आँक्ताँ, लीली ग्रॅनीअर आणि हेन्री तुलूझ लोत्रेक)

Friday, September 28, 2018

मुलँ रूज - १०


प्रोफेसर बॉन्नाच्या हेटाळणीमुळे हेन्रीचे डोळे अश्रूंनी डबडबले. डोळ्यात आलेले पाणी पुसण्यासाठी रुमाल काढणार तेवढ्यात आपल्यामागे कोणीतरी उभे आहे अशी चाहूल त्याला लागली. त्याने मागे वळून पाहिले. एक ताडमाड उंच तरुण त्याच्याकडे सहानुभूतीने बघत उभा होता. कपडे अगदी गबाळे आणि कुठे कुठे फाटलेलेसुद्धा होते. दाढी व केस अस्ताव्यस्त.
त्या भडव्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही फी भरलीयत ना. मग कशाला एवढं ऐकून घेता त्यांचं. पुन्हा असं काही बोलायला लागले तर सरळ त्यांच्या तोंडावर थुंका. काही झ्याटसुद्धा वाकडं करू शकणार नाही तुमचं. बाय द वे, माझं नाव हेन्री रॅचो. आज दुपारी आपण जेवायला दोघं बरोबरच जाऊ. ओग्युस्तिनाच्या कॅफेमध्ये. नंतर तुम्हाला वेळ असेल तर माझा स्टुडिओ बघायला या. इथे जवळच आहे मोंमार्त्रमध्ये. जागा काही एवढी खास नाहीये. पण खिडकीतून समोरच्या स्मशानचं दृश्य काय छान दिसतं म्हणून सांगू.
हेन्री जेव्हा ओग्युस्तिनाच्या कॅफेमध्ये जाऊन पोहचला तेव्हा तिथला गोंगाट अगदी टिपेला जाऊन पोहचला होता. मोंमार्त्रमधील चित्रकार मंडळी काळ्या कॉर्दुरॉयच्या सुटात डोक्यावर भल्याथोरल्या हॅट घालून गप्पा मारत बसली होती. सगळा मिळून एवढा गोंधळ चालू होता की एकमेकांशी बोलताना जवळपास ओरडावेच लागत होते. वातावरण तंबाखूच्या धुराने व लसणीच्या वासाने भरले होते. टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची एक कृष्णकेशी हसतमुख स्त्री त्या गर्दी-गोंधळातून हातातल्या प्लेट सावरीत, ऑर्डर घेत सराईतपणे इकडे तिकडे फिरत होती. या सगळ्या धावपळीत अधूनमधून तिची गिऱ्हाईकांशी चेष्टामस्करी अव्याहतपणे चालू होती. तिचे हसणे मोठे लाघवी होते.
ती ओग्युस्तिना. ती पूर्वी मॉडेल म्हणून काम करीत असे.रॅचो म्हणाला.
वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षातच ओग्युस्तिना मोंमार्त्रमधली एक आख्यायिका झाली होती. सोळाव्या वर्षी ती सिसिलीमधून पोटाची खळगी भरायला म्हणून पॅरीसमध्ये आली होती. अनवाणी, अंगावर मळक्या कपड्यांची लत्तरे, जवळ एक कवडीही नाही. पण तिच्याकडे होते बांधेसूद शरीर व मादक सौंदर्याचा खजिना. अवघ्या सहा महिन्यांत पॅरीसमधील सर्वांत लोकप्रिय मॉडेल अशी ख्याती तिने मिळवली. मोठमोठ्या व्यक्ति तिच्या नजरेच्या एका कटाक्षासाठी जीव टाकू लागल्या. तिच्या पुष्ट वक्षस्थळांचा उठाव आपल्या कॅनव्हासवर साकार करण्यासाठी चित्रकार ब्रश घेउन इझलसमोर तिची तासन्‌तास वाट बघत. तिच्या नितंबांची गोलाई समोरच्या पत्थरात बद्ध करण्यासाठी शिल्पकार आपल्या छिन्नीने नव्या जोमाने घाव घालू लागत. जवळपास दोन दशके सॅलूनच्या वार्षिक प्रदर्शनातील बहुतेक पेंटिंग व शिल्प तिचा कमनीय देह समोर ठेवून साकारलेली असत. डायना, डेमॉक्रसी, स्पिरीट ऑफ मार्सेलीज्‌चे चौकाचौकांतील पुतळे तिच्या प्रमाणबद्ध बांध्याची आजही साक्ष आहेत. तिने ज्या स्टुडिओत पोज दिल्या त्यातल्या काही ठिकाणी तिच्याबद्दल रोमँटिक कथा ऐकायला मिळत. नैराश्याने ग्रासलेल्या कलाकारांना तिने सहानुभूतीच्या शब्दांनी धीर दिला होता. कित्येक कलाकारांना त्यांच्या पडत्या काळात तिने आधार दिला होता. तीनएक वर्षांपूर्वी तिने हे कॅफे चालू केले तेव्हा बऱ्याच कलाकारांनी तिच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा दर्शवली. एवढे जण पुढे आले की सगळ्यांकडून घेणार तरी काय. शेवटी तिच्या मित्रांनी एका भिंतीवर चित्रे रंगविली व खाली आपल्या सह्या ठोकल्या. एकदोघांनी तर तिला आपली ताम्बुरीन भेट म्हणून दिली. ती तिने एका भिंतीवर लटकविली.
(मोंमार्त्रमधील ल ताम्बुरीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या कॅफेच्या भिंतीवर लटकवलेली ताम्बुरीन पहायला पॅरीसला भेट देणारे पर्यटक आजही गर्दी करतात.)
हेन्री ओग्युस्तिनाकडे कुतूहलाने पाहत होता. ती गिऱ्हाईकांची मोठ्या आस्थेने विचारपूस करीत होती. मधेच एका दाढीवाल्या चित्रकाराच्या फिरक्या घ्यायची तिला लहर आली. त्याचे नुकतेच लग्न झालेले असावे. ती विचारत होती, “आता तुझं लग्न झालंय. तुझी आवडती रिसोते खायचं आता बंद कर. त्यात लसूण जास्त असते. बायको रात्री जवळ यायला देणार नाही. त्यापेक्षा ही पेपरोनी एकदा खाऊन बघ. तुझ्यासारख्या नवीन लग्न झालेल्यांसाठी खास बनवलीय. अंगात रक्त असे काही सळसळू लागेल की मग बघच बायको कशी खूश होईल ते.
ओऽह, बाम्बीनी.तिने रॅचोकडे लक्ष जाताच त्याला हाक मारली. तिच्या गिऱ्हाईकांमधल्या सर्व विद्यार्थ्यांना ती नेहमी लाडाने बाम्बीनी म्हणून हाक मारायची. मग तो वयाने किंवा देहाने केवढा का मोठा असेना.
तुला जे काही योग्य वाटेल ते आण. आम्हाला काहीही चालेल.जेवण चालू असताना रॅचो गप्प होता. पण हेन्री मात्र खूप उत्तेजित झाला होता. ती जागा, तिथली गर्दी, तो गोंगाट, ओग्युस्तिना, ते जेवण, सगळ्यांवर तो अगदी बेहद्द खूश होता. त्याचे कौतुक भरले डोळे इकडे तिकडे भिरभिरत होते. कोपऱ्यातल्या एका टेबलावर बसलेला एक वयस्कर माणूस एका तरुणाशी तावातावाने काहीतरी बोलत होता.
ते लांब पांढरी दाढीवाले गृहस्थ पाहिलेत का. त्यांचे नाव कमील पिस्सारो. ते इंप्रेशनिस्ट आहेत. आणि त्यांच्यासमोर जे बसलेयत त्याचं नाव आहे तेओ व्हॅन गॉग. बुलेव्हार मोंमार्त्रवरील एका कलावस्तू विकण्याच्या दुकानात ते काम करतात.
हेन्रीच्या पुढ्यातली प्लेट अजून तशीच भरलेली आहे हे लक्षात येताच रॅचो म्हणाला, “काय विचार कसला चाललाय. तुम्हाला रिसोते आवडो वा न आवडो ते संपवल्याशिवाय ती ओग्युस्तिना काही तुम्हाला येथून बाहेर जाऊ देणार नाही.
जेवण झाल्यावर ते दोघे रमतगमत रॅचोच्या स्टुडिओवर गेले. रॅचोने स्टुडिओत आल्याबरोबर खिडकी उघडली. समोरच स्मशानाचे दृश्य होते. जिकडे तिकडे क्रॉस, थडगी, अश्रूपात करीत विलाप करणाऱ्या देवदूतांचे पुतळे, अस्ताव्यस्त वाढलेली झाडे वगैरे गोष्टींची गच्च गर्दी होती.
काय सुंदर दृश्य आहे नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. स्त्रियांवर या दृश्याचा अगदी विलक्षण परिणाम होतो. आधी जाम टरकतात पण नंतर अशा काही उत्तेजित होतात म्हणून सांगू. तुमचा विश्वास बसणार नाही. तो कोच पाहिलात. तिथे मुद्दामच ठेवलाय. तिथून खिडकीतलं दृश्य छान दिसतं. आलेल्या पोरीला घेऊन सरळ कोचावर बसायचं. समोरचं स्मशानाचं दृश्य दाखवलं की टरकून कुशीत शिरलीच म्हणून समजा. जरा थोपटल्यासारखं केलं की तिची मिठी अधिकच घट्ट होते. मग कोचावर आडवं व्हायला कितीसा वेळ.
बोलता बोलता त्याने भिंतीवर लटकावलेले मेंडोलीन काढले व त्या काळी मोंमार्त्रमध्ये लोकप्रिय असलेले बॅलड गायला सुरुवात केली.
आह, क त्यु फे बीयाँ लामोर ... आह, दॅट यू डू गुड लव्ह.

(व्हॅन गॉगची आणि ऑग्युस्तिनाची खास मैत्री होती. जेवणाचे बिल देण्यासाठी कित्येक वेळा व्हॅन गॉगच्या खिशात पैसे नसत. तेव्हा तो त्याच्या बदल्यात आपले एखादे पेंटींग देत असे. ऑग्युस्तिना ती पेंटींग मोठ्आ अभिमानाने आपल्या कॅफेमध्ये टांगून ठेवी. दुर्दैवाने तिच्या कॅपेचे दिवाळे वाजल्यावर देणेकरी ती सर्व पेंटींग घेऊन गेली. खालिल पेंटींगमध्ये ऑग्युस्तिना बीअर पित बसलेली दाखवला आहे. तिचा हा दुसरा ग्लास आहे हे खाली ठेवलेल्या दोन बशांवरून दिसून येते. या पेंटींगवर इंप्रेशनिस्ट शैलीचा प्रभाव दिसून येतो.)


(ऑग्युस्तिना सिटींग इन कॅफे तांबोरीन – व्हॅन गॉग – तैलरंग, कॅनव्हास, ५५.५x४६.५ सेमी. १८८७, व्हॅन गॉग म्युझियम, अमेस्टरडॅम)



मुलँ रूज - ९


नाताळच्या थोडे आधी प्रँस्तो आजारी पडला. त्याने काउंटेसला तो पॅरीस सोडून जात असल्याचे कळविले. जाताना हेन्रीचे नाव पोर्ट्रेट पेंटिंग शिकवणाऱ्या प्रोफेसर बॉन्नासारख्या एखाद्या नामांकित चित्रकाराच्या ॲतलिएमध्ये घालण्याची शिफारस केली.
आईने घरीच कोणाची तरी शिकवणी ठेवण्याचा आग्रह धरला. पण हेन्री ॲतलिएमध्ये जायला खूप उत्सुक होता. तेथील वातावरण. झालेच तर कोणाशीतरी मैत्री. हेन्री अगदी काकुळतीला येऊन विनवत होता. त्याच्या आवाजातल्या आर्जवाने आईच्या डोळ्यांत पाणी तरारले.
बरं. एकदा तुमच्या मनासारखं होऊ दे. पण ॲतलिएमध्ये सांभाळून वागा. तरुण मुलं आपापला एक गट करून असतात. टर्म केव्हाच सुरू झालेली आहे. मधेच आलेल्या तुमच्यासारख्याला कोणी आपल्या गटात घेणार नाहीत. आणखी एक महत्वाची गोष्ट. तिथे येणारी मुलं अगदी खालच्या वर्गातली असतात. त्यांच्यात मिसळणं तुम्हाला शक्य होणार नाही. तुम्हाला कोणी समजून घेणारा भेटला तर ठीक. पण तशी शक्यता कमीच दिसतेय.
मला कल्पना आहे, तुम्हांला कशाची काळजी वाटतेय ती.त्याचे गडद तपकिरी डोळे खिन्नतेने भरून आले. मी करू तरी काय ममा? मी काही जन्मभर घरात लपून बसू शकत नाही.                
बऱ्याच ऊहापोहानंतर हेन्री एकदाचा ॲतलिएमध्ये दाखल झाला. प्रोफेसर बॉन्ना हात पाठीमागे बांधून वर्गात येरझाऱ्या घालत होते. मधेच थांबून मुलांपुढील कॅनव्हासवर एक दृष्टिक्षेप टाकीत फिरत होते.
पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे चित्रकलेतला सर्वोत्कृष्ट कलाप्रकार. फक्त आविष्काराच्या दृष्टीने नव्हे तर अर्थप्राप्तीचे एक साधन म्हणूनसुद्धा. पैसा काय तसा इतर कसलीही रंगरंगोटी करून कसाबसा मिळत असतो. पण पोर्ट्रेट पेंटिंग जर जमायला लागलं तर जरा सुस्थिर जीवन जगण्याची आशा धरायला हरकत नाही.
एक यशस्वी पोर्ट्रेट पेंटर होण्यासाठी काही प्राथमिक नियमांचे ज्ञान असणं आवश्यक आहे. एखाद्या मोठ्या कर्तृत्ववान पुरुषाचं चित्रण कसं करायचं. उदाहरणार्थ, तुमचा चित्रविषय एखादा सरदार, सेनापती, उद्योगपती नाहीतर एखादा राजकारणी असेल तर त्याला ताठ उभा, कपाळावर किंचित आठी, हाताची दोन बोटं वेस्टकोटमध्ये असाच दाखवला पाहिजे. नेपोलियनचं पोर्ट्रेट डोळ्यांसमोर आणा. याच्या उलट तुम्ही जर एखाद्या विचारवंताचं पोर्ट्रेट करत असाल उदाहरणार्थ, शास्त्रज्ञ, लेखक, कार्डिनल वगैरे तर त्याला बसलेला दाखवा. उजवा हात हुनवटीवर. चेहऱ्यावर जगाच्या चिंतेचे भाव.
हेन्री एका कोपऱ्यातल्या स्टुलावर घाबरून अंग आक्रसून बसला होता. समोरच्या इझलवर थरथरत्या हाताने चित्र काढत होता. प्रोफेसरांनी आपले चित्र पाहिले तर ते काय म्हणतील, आपण काढलेले चित्र त्यांच्या पसंतीला उतरेल की ते आपली नेहमीसारखी चेष्टा करतील या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला होता.
विषय कोणताही असला तरी तंत्र मात्र तेच. तुमच्या फिगरचे चार भाग करा. प्राथमिक रेखाटन करून घ्या. ठळक छाया प्रदेश रॉ अँबरने दाखवा. रॉ अँबर. मी काय म्हणतोय इकडे लक्ष आहे ना.अचानक त्यांचा आवाज चढला, “त्या इंप्रेशनिस्ट आणि इंडिपेंडन्सच्या पोरांना काय हवा तो रंग वापरू दे. जांभळा नाहीतर निळासुद्धा. आपण तिकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही. माझ्याकडे असले थेर मुळीच चालणार नाहीत. इथे फक्त रॉ अँबरच. दुसऱ्या रंगाला चुकूनही हात लागता कामा नये. काय समजलात.
फिरत फिरत तो हेन्रीकडे येऊन पोहचला. त्याच्या कॅनव्हासकडे डोळे किलकिले करून त्याने एकवार पाहिले. सगळ्या वर्गात टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता पसरली.
काय गिरमिटलंयत हे राजेसाहेब. हे पोर्ट्रेट पेंटिंग चाललंय का मस्करी. रंग आणि कॅनव्हासचा नुसता नाश चालवला आहात आपण.त्यांच्या या बोलण्याने सर्व वर्गात हास्याची एक लाट उसळली. त्याने त्याला अधिकच चेव आला. तुम्हाला कल्पना नसेल इथे येणाऱ्या कित्येक मुलांना रंग आणि कॅनव्हास विकत घेण्यासाठी एक वेळ उपास काढावा लागतो. पण उद्या पोटाची खळगी भरता यावी म्हणून आज ते पोटाला चिमटा घेत असतात. तुमचं काय. तुम्हाला कशाचीही ददात नाहीये. तुम्ही येथे कशाला येता आहात. स्वतःच्या या कारागिरीकडे बघून तुम्हाला वाटतं का की कधी काळी तरी आपण चित्रकार होऊ म्हणून. उगाच कशाला कॅनव्हास, रंग वगैरे फुकट घालवताय. त्यापेक्षा एखाद्या गुणी गरिबाला द्या. त्याला त्यातून काही करायला जमलंच तर त्याच्या दोन घासांची सोय केल्याबद्दल तो तुम्हाला आयुष्यभर दुवा देईल.
तुम्हाला किती वेळा मी समजावून सांगितलंय. तुमच्यात कोणतेही कलागुण नाहीयेत. अगदी नावालासुद्धा. आपण चित्रकार बनू शकू अशी फक्त ऊर्मी आहे तुमच्या जवळ. अशा नुसत्या ऊर्मीचा काही उपयोग नसतो. त्यासाठी सौंदर्यदृष्टी असावी लागते. ती तुमच्याकडे औषधालासुद्धा नाही. तुम्हाला सगळीकडे दिसते ती फक्त कुरूपता. स्वतःवरून तुम्ही जगाची कल्पना करता. तुम्हाला चित्रकला येणे कालत्रयी शक्य नाही. आमच्यावर कृपा करा आणि आपल्या घरी स्वस्थ बसा. दुसरं काही काय वाट्टेल ते करा. पण कृपा करून चित्रकलेच्या वाटेला पुन्हा जाऊ नका. म्हणजे असले हे रंगांचे फरांटे बघण्याची पाळी आमच्यावर येणार नाही. मोठे उपकार होतील आमच्यावर.
प्रोफेसरांनी टाळी वाजवून हॉलच्या मध्यभागी बसलेल्या मॉडेलचे लक्ष वेधून घेतले आणि पाच मिनिटांची सुट्टी जाहीर केली. इतका वेळ पुतळ्याप्रमाणे स्तब्ध बसलेल्या मॉडेलमध्ये टाळीचा आवाज ऐकताच जीव आला आणि तिने चटकन बाजूला पडलेली जुनी मळकट चादर उचलून आपल्या नग्न देहाभोवती गुंडाळून घेतली. काडीने दात कोरत पेपर वाचत ती तेथेच बसून राहिली. सर्वांनी आपापले ब्रश पॅलेटवर ठेवून दिले. तरी हेन्रीचे पेंटिंग चालूच होते. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. आठवड्यातून एकदा तरी त्याला अशी चेष्टा ऐकून घ्यावी लागे. आईचे म्हणणे बरोबर होते. वर्गातील इतर मुलांनी त्याला खड्यासारखा दूर ठेवला होता. त्यांच्या दृष्टीने तो एक श्रीमंत, खुशालचेंडू, आईचा लाडावलेला एकुलता एक लेक. वेळ घालवायला म्हणून ॲतलिएमध्ये नाव घातलेला. त्यात हेन्रीचे शारीरिक व्यंग. उपेक्षा आणि कुचेष्टा अशीच चालू राहिली तर आई म्हणत होती तशी सरळ मास्टर्स डिग्री करावी हे उत्तम.

Thursday, September 27, 2018

मुलँ रूज - ८


पहिल्या दिवसापासूनच त्या मूक-बधिर चित्रकाराचे आणि सतरा वर्षांच्या हेन्रीचे चांगले सूत जमले. एकमेकांच्या मनातले ओळखायला खाणाखुणांच्या भाषेची कधीच अडचण भासली नाही. प्रँस्तो काही स्वतः फारसा मोठ्या दर्जाचा चित्रकार नव्हता. पण आपल्या विद्यार्थ्याला लाभलेली असामान्य प्रतिभेची देणगी त्याच्या लवकरच लक्षात आली आणि तो अचंबित झाला. चित्रकलेचे कोणतीही शिक्षण न घेतलेल्या या लहान मुलाला इंम्प्रेशनिझमसारख्या चित्रकलेतील नव्या प्रवाहाबद्दल काहीही माहिती असण्याची शक्यता नव्हती. तरीही त्याची चित्रशैली आणि इंप्रेशनीझम यात असलेलं साम्य लपून रहात नव्हते. सरळ जोरकस रेखाटन, रंगांची निवड, स्वतंत्र स्वयंभू शैली. छे. हे चलणार नाही. ही शैली ग्राहकांच्या पसंतीला उतरली नसती. चमकदार थेट रंगांपेक्षा गडद करड्या रंगात, नजाकतदार शैलीत, बारीकसारीक कलाकुसरीने नटलेल्या आणि रंग घोटून गुळगुळीत केलेल्या पेंटिंग्जवर लोकांच्या उड्या पडत. तो स्वतः तशीच चित्रे रंगवायचा. त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला या मुलाची स्वतंत्र शैली दडपणे, त्यात सुधारणा करणे भाग होते. सुरुवात रंगांपासून. मुळात रंग फारसे वापरायचेच नाहीत. अगदी वापरलाच तर फक्त एकच रंग पॅलेटवर घ्यायचा. काळा.
एके दिवशी सकाळी चौखूर दौडणाऱ्या घोड्याचा प्लॅस्टरमधला पुतळा हेन्रीला आपल्या टेबलावर ठेवलेला आढळला. बाजूला भरपूर इन्ग्रेस पेपर व टोक केलेल्या चारकोल स्टिक्स. त्याने इझलवर कागद लावला व भराभर स्केच पुरे केले आणि मास्तरांना दाखविले. मास्तर चेहऱ्यावरची सुरकुतीसुद्धा न हलवता शांतपणे आपल्या जागेवरून उठले व घोड्याचा कोन काही अंशाने बदलला. आणखी एक स्केच. दुपारपर्यंत तब्बल सत्तावीस स्केचेस पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी नवा पुतळा व कोऱ्या कागदांचा नवा गठ्ठा. हेन्रीच्या मनात पोर्ट्रेट शिकायचे होते. पण इथे फक्त रोज घोड्यांची स्केचेस काढणे चालू होते. तो लवकरच कंटाळला. त्यात भर म्हणजे नुसते रेखाटन करायचे. रंगवायचे नाही. तरी तो नेटाने स्टुडिओत जाई. एके दिवशी सकाळी टेबलावर नवी रंगपेटी ठेवलेली होती. समोर इझलवर कोरा कॅनव्हास लावलेला होता. आज आपल्याला रंगवायला मिळणार या कल्पनेने तो अगदी हुरळून गेला. घाईघाईत त्याने ट्युबमधील रंग पॅलेटवर पिळायला सुरुवात केली. ते रंग पाहून त्याला थोडे विचित्र वाटू लागले. त्याला पिवळा रंग कुठे मिळेना. हिरवा, निळा आणि भडक लालसुद्धा.
मस्य प्रँस्तो!तो आश्चर्याने उद्‌गारला. त्याने भराभर ट्युबवरील रंगांची नावं वाचायला सुरुवात केली. टोबॅको ब्राउन, ममी ब्राउन, महॉगनी रेड, बर्न्ट अंबर, रॉ सायना, ऑकर, टेर व्हर्ट आणि ब्लॅक. आयव्हरी ब्लॅक, लॅम्प ब्लॅक, चारकोल ब्लॅक. एखादे कोळशाचे अख्खे इंजिन रंगवायला पुरून उरेल एवढा ब्लॅक.
मस्य. नुसत्या ममी ब्राउन आणि लॅम्प ब्लॅकमध्ये कसे काय रंगवायचे हो. मला सगळे रंग हवे आहेत.प्रँस्तो बहिरा आणि मुका आहे हे तो क्षणभर विसरूनच गेला.
थोड्या वेळाने एक कागदाचे चिटोरे त्याच्यासमोर आले.
ब्राइट कलर्स फसवे असतात. ते फार जपून वापरावे लागतात. रेब्रांद गडद रंगांमधूनच प्रकाश दाखवीत असे. आदर्श ठेवायचा तर त्याचा ठेव. उगाच त्या इंप्रेशनिस्ट लोकांच्या नादी लागू नका.
पण मी काही रेम्ब्रांद नाहीय.हेन्री स्वतःशीच पुटपुटला. एक क्षणभर विचार करून चिठीच्या उलट्या बाजूवर त्याने लिहिले, ‘मला लोकांनी रेब्रांद म्हणून ओळखायला नकोय. त्याचा जमाना केव्हाच गेलाय.
एक मोठा उसासा टाकून प्रँस्तो आपल्या इझलकडे गेला आणि इकडे हेन्रीने तोंड वाकडे करीत व्हॅन डाइक पॅलेटवर पिळला. कधी नव्हे ती रंगवायची संधी मिळतेय तर रंगवून घ्या. मग समोर ममी ब्राउन, व्हॅन डाइक, टेर व्हर्ट का असेनात. थोडासा पिवळा रंग जर वापरावासा वाटला तर अगोदर झालेले काम दाखवून प्रँस्तोकडून तोंड वेंगाडत मागून घ्यावा लागे. मग अगदी मिळालाच तर एखादा ठिपका क्रोम यलो मिळायचा.
पिवळा रंग हा एकदम खतरनाक आहे. त्याचा वापर खूप जपून करावा. ऑर्केस्ट्रामधल्या सिंबलसारखा.इति प्रँस्तोची चिठी.

(प्रँस्तोने कागदावर केलेले रेखाटन - काउंट आल्फान्सो, हेन्री, प्रँस्तो)



मुलँ रूज - ७


मोंमार्त्र
आय ॲम प्राउड ऑफ यू हेन्री.
खरंच ममा?”
येस रिरी. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या लवकर ग्रॅज्युएट व्हाल म्हणून.आई त्याचा हात धरून फायरप्लेसकडे नेत म्हणाली.
म्हणूनच मी इतका जोरात अभ्यास करत होतो.
पॅरीसला येताच हेन्रीने धडाक्याने अभ्यास करीत शाळेची शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली. त्याचा आज निकाल लागला होता.
पुढे मास्टर्स डिग्री करा. अभ्यासही होईल आणि वेळही चांगला जाईल.
अभ्यासात गाडून घेतल्याने गेल्या दीड-दोन वर्षांचा काळ कसा भुर्रकन उडून गेला ते हेन्रीला कळलेच नाही. वेळ जायला पुस्तके आणि अभ्यास हेच एक साधन होते हे खरेच. शाळेतल्या सगळ्या जुन्या सवंगड्यांच्या मैत्रीत एवढ्या वर्षांच्या खंडानंतर अंतर पडले होते. त्यातच मॉरीस पॅरीस सोडून गेला होता. त्याच्या प्रकृतीमुळे त्याला इकडेतिकडे हिंडणे शक्य नव्हते. आता चाकांच्या खुर्चीची तशी गरज भासत नव्हती. काठीच्या आधाराने चालायला जमत असे, पण ते अगदी जेवढ्यास तेवढे. याहून जास्त प्रगती करता येणे आपल्याला शक्य नाही, हे त्याला मनोमन उमगले होते.
तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण आता बस झाला अभ्यास. नुसती पुस्तकं वाचत बसायला कंटाळा येतो.
मग काही लेखन वगैरे तरी करून बघा.
बघू या. काय करायचं ते अजून मी काही नीट ठरवलं नाही.
हेन्री. तुम्ही तुमच्या प्रार्थना वगैरे नीट म्हणता की नाही.
थोडा वेळ निःशब्द शांतता पसरली. हेन्रीची जीवनावर आसक्ती होती, प्रेमासाठी तो आसुसलेला होता. त्याचे जीवन उमलू लागण्यापूर्वीच कोवळ्या वयात त्याच्यावर दुर्दैवाचा आघात झाला होता. ह्याचा पुढील आयुष्यात त्याच्यावर किती घोर परिणाम होणार आहे याची कल्पना त्याला अनुभवाचे टक्के-टोणपे खाल्ल्याशिवाय येणार नव्हती.
नाही,” हेन्री मान खाली घालून फायरप्लेसमधल्या विस्तवाकडे पाहत म्हणाला. आपण नीसमध्ये असताना मी एकदा प्रार्थना केली होती ती शेवटची. त्या दिवशी तुम्हाला रडताना पाहिलं आणि देवावरचा माझा विश्वासच उडाला. देव असता तर निष्पाप लोकांच्या वाट्याला दुःख आलं नसतं आणि पापी लोक सुखात लोळताना दिसले नसते.
ममा प्लीज मला समजून घ्या,” मान वर करत तो म्हणाला. ज्याच्यापाशी दया, क्षमा, शांती यांना स्थान नाही, अशा देवाची प्रार्थना करणं मला जमणार नाही.
तिने हेन्रीकडे मोठ्या करुणेने पाहिले. तो पांगळा, बुटका, कुरूप व एकाकी होता. त्याचे शैशव अजून संपले नव्हते. रंगीबेरंगी गुलाबी स्वप्ने पाहण्याच्या त्या वयात वास्तवाची कल्पना येणे कठीण होते. पुढचा प्रवास खडतर होता. देवावरच्या श्रद्धेलाच तडा गेल्याने एरवी प्रार्थनेच्या रूपाने जो दिलासा त्याला मिळाला असता तोसुद्धा आता त्याला मिळणार नव्हता.
ठीक आहे,” मोठा उसासा सोडीत आई निर्जीव आवाजात म्हणाली. देव दयाळू असतो यावर विश्वास ठेवणं कठीण असतं हे खरंय, पण विश्वास न ठेवता जगणं त्याहून कठीण असतं हे लक्षात घे.
शेकोटीतल्या विस्तवाचा जाळ जास्त झाला होता. तिने आपली खुर्ची थोडी मागे ओढली आणि हेन्रीची खुर्ची मागे ओढायला म्हणून ती उठून त्याच्या खुर्चीमागे गेली.
ममा. मी चित्रकार व्हायचं ठरवलंय.
चित्रकार!तिच्या तोंडातून आश्चर्योद्‌गार बाहेर पडला.
त्या काळी चित्रकार हा काही फारसा सन्माननीय पेशा समजला जात नसे. हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही सन्माननीय अपवाद सोडले तर बहुतेक चित्रकारांची जीवनपद्धती खा-प्या, मौज करा अशी बोहेमियन शैलीची असे. शहराच्या बाहेर वसलेल्या मोंमार्त्रर्र् येथे ते राहत. नग्न स्त्रियांची पेंटिंग, विवाहबाह्य संबंध, दिवसभर दारू ढोसत कॅफेत बसून चकाट्या पिटणे अशा प्रच्छन्न आयुष्यक्रमामुळे कोणीही सभ्य प्रतिष्ठित मंडळी त्यांच्या वाटेस जात नसत. त्यांच्याशी कोणीही फारसे संबंध ठेवत नसे. त्या काळी लेखक, कवी, संगीतकार, नट व चित्रकार अशा कलाकार मंडळींची समाजातील उच्चभ्रू वर्गांत गणना होत नसे. सभ्य नागर लोक या व्यवसायांपासून दोन हात दूरच राहत. एक वेळ एखाद्या दुकानदाराच्या मुलाने चित्रकार होण्याची इच्छा बाळगली असती तर ते चालले असते पण एका घरंदाज उमरावाच्या मुलाने, त्यात तुलूझ लोत्रेकांच्या एकुलत्या एका वंशजाने. छे. कदापि शक्य नाही.
हेन्री, चित्रकार म्हणजे...
मला कल्पना आहे तुम्ही काय म्हणणार आहात त्याची,” हेन्री तिला अडवत म्हणाला, “पण मी करू तरी काय? तुम्हाला माहितीय, मला चित्रकला बऱ्यापैकी जमते. त्यात माझं मनही रमतं. तुम्हाला आठवतंय, शॅतोमध्ये असताना मी काढलेली चित्रं व पोर्ट्रेट्स. आपण त्या मस्य प्रँस्तोंची शिकवणी ठेवू या. ते म्हातारेसे बहिरे-मुके चित्रकार. त्यांनी मला त्यांची वही दिली होती.
खिडकीतून शरद ऋतूतील काळ्याभोर आकाशात चांदणे चमचमताना दिसत होते. नुसती शिकवणी ठेवल्याने फारसे काही बिघडत नाही. तिने मोठ्या कष्टाने परवानगी दिली.


(कॉम्ते अल्फान्सो द तुलूझ द फाल्कनर – हेन्री तुलूझ लोत्रेक – तैलरंग – लाकडी पृष्ठभाग २३.४x१४ से.मी., १८८१. तुलूझ लोत्रेक म्युझियम, आल्बी)
(वरील पोर्ट्रेट लोत्रेकने वयाच्या केवळ सतराव्या वर्षी केलेले आहे. त्याच्या वडिलांचा स्कॉट वेषातील एक फोटो उपलब्ध आहे. या पेंटींगसाठी कदाचित त्याने त्या फोटोचा आधार घेतला असावा. फोटोत डावीकडे बघत असलेल्या वडिलांचे उजवीकडे बघत शिकारीवर बघत शिकारीवर निघालेल्या घोडेस्वारात रूपांतर करताना लोत्रेकने विलक्षण कौशल्या दाखवलं आहे. पोर्टेट घोडेस्वाराचे असल्याने चित्रचौकट खूपच लांबट घ्यावी लागली आहे. घोडेस्वाराची दौड हळूवार फटकाऱ्यात अलगद पकडल्यामुळे चित्राला जिवंतपणा आला आहे. रेखाटनात अचूकता यावी म्हणून आर्टस्कूलमध्ये सुरवातीला मॉडेलवरून स्थिरचित्रणा करण्यावर भर दिला जातो. पण लोत्रेकने मात्र अगदी लहान वयातच निसर्गातील गतिमान दृष्यांची निवड करत असे. गडद छटांत केलेल्या झटपट रंगकामातून त्याच्यावरील सुरवातीचा दलाक्रवाचा प्रभाव दिसून येतो.)



मुलँ रूज - ६


नीसमध्ये मुक्काम असताना एक चमत्कार घडला. त्या वेळी ती दोघे ग्रँड हॉटेल द सिमेझमध्ये राहत होती. एके दिवशी उठल्याबरोबर हेन्रीला काहीतरी वेगळेच वाटले. रोजच्यासारखी तापाची कडवट चव आज तोंडात नव्हती. त्याने श्वास घेतला. त्याला मिमोसाच्या फुलांचा ओळखीचा वास आला. बागेत मिमोसाला मोसमातला पहिला बहर आला होता. त्याने आनंदाने आईला हाक मारली.
ममा, ममा. काल रात्री माझे पाय दुखले नाहीत. आतासुद्धा दुखत नाहीयेत. आणि बघितलेत का. मला आज ताप नाही आलाय.त्याने एका दमात सगळे सांगून टाकले.
ताप नाही आला. तुम्हाला कसं कळलं?” आईने कपाळाला हात लावून पाहिला.
तिने जेव्हा थर्मामीटर लावून पहिला तेव्हा तिला आपले आनंदाश्रू लपवता आले नाहीत. गेल्या दोन वर्षांत सकाळी ताप आला नाही असे पहिल्यांदाच घडत होते. त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा ताप आला नाही. थोड्या दिवसांनी डॉक्टरांनी निश्चित स्वरूपाची सुधारणा होतेय हे मान्य केले. त्याची मोडलेली हाडेसुद्धा जुळून यायला लागली होती. निराशेच्या खोल गर्तेत पडलेल्या मायलेकरांना आशेचा किरण दिसतोय हे कबूल करायला भीती वाटत होती.
शेवटी तो सुदिन एकदाचा उगवला. हेन्रीच्या पायांचे प्लॅस्टर डॉक्टरांनी काढून टाकले. पायांची हाडे इतक्या ठिकाणी सांधली होती की त्यांची वाढ पहिल्यासारखी होणे कठीण होते. पण हेन्रीला कुबड्या घेऊन चालणे शक्य होणार होते. सुधारणा अशाच वेगाने चालू राहिली तर काय सांगावे. हेन्री कदाचित आपल्या पायांनी चालू शकणार होता. फक्त आधाराला एखादी काठी लागली असती इतकेच. हेन्री आता पौगंडावस्थेत प्रवेश करत होता आणि त्या वयाचा त्याच्या शरीरावर जादूई परिणाम व्हायला लागला होता.
डॉक्टर गेल्यावर त्या मायलेकरांनी एकमेकांच्या कुशीत तोंड लपवून मनसोक्त रडून घेतले.
दिवस भराभर उलटत होते. आई त्याला पुस्तक वाचून दाखवे. बिछान्यावर पट ठेवून ती दोघे चेकर्स खेळत. कधी कधी उशांची फेकाफेक. आजारपणात करपून गेलेल्या बालपणातल्या दिवसांची जणू भरपाईच चालू होती. कित्येक वेळा हसण्या-खिदळण्याला इतका ऊत येई की मायलेकरांचे ते खेळणे बघून नोकरचाकरांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहत. जेवताना हेन्रीला कोंबडीचा एखादा तुकडा नाहीतर पावाची एखादी काप किंवा चमचाभर कस्टर्ड यांचा आग्रह व्हायचा. आईने त्याला चित्रकलेचे सर्व साहित्य नव्याने आणून दिले. हेन्रीला तर कानात वारे शिरलेल्या शिंगरासारखे झाले होते. आपल्याला पुन्हा चालता येईल, चित्रे काढता येतील या सर्वांपेक्षा त्याला आनंद व्हायचा तो आईला आनंदी बघून.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची आजारपणामुळे तीन-चार वर्षं खुंटलेली वाढ चालू झाली खरी, पण फक्त कंबरेच्या वरील शरीराची. छाती रुंदावली, खांदे भरले, पण पाय मात्र होते तसेच राहिले. किडकिडीत, लहानखुरे. त्याच्या चेहऱ्यावरील बाल्याचा नाजूकपणा एखाद्या मुखवट्यासारखा गळून पडला. आवाज फाटला. चाफेकळीसारख्या नाजूक नाकाचे रूपांतर फताड्या नाकात झाले. ओठ बाहेरच्या अंगाला वळल्याने बटबटीत दिसू लागले. डोळ्यांना जाड भिंगांचा चष्मा लागला. चेहऱ्यावर, हातांवर आणि छातीवर दाट काळेभोर केस उगवू लागले. वर्षभरातच हेन्री एखाद्या मोठ्या पुरुषासारखा बाप्या दिसू लागला. इतके दिवस थांबलेल्या निसर्गाने घाईघाईत शैशवातील एका कोवळ्या मुलाचे मोठ्या पुरुषात रूपांतर केले. पण त्या घाईत पौगंडावस्थेची पायरी गळून गेली होती.
अशा रीतीने थोड्याच दिवसात त्याच्या कंबरेच्या वरचे शरीर एका मोठ्या दांडग्या पुरुषासारखे दिसू लागले. पण कंबरेच्या खालचा भाग मात्र एखाद्या किडकिडीत लहान मुलाचा राहिला. त्याच्या शरीरात झपाट्याने होत असलेला हा विचित्र बदल पाहून त्याची आई घाबरून गेली. तिने डॉक्टरांना विचारले. त्यांनी कोणत्यातरी ग्रंथींच्या स्रावात काहीतरी बिघाड झाला असावा असे निदान केले. पण त्यावर काही इलाज नव्हता. हा नवा आघात, नवे सत्य तिला स्वीकारणे खूप कठीण गेले. अंथरुणाला खिळलेला एक पांगळा लहान मुलगा पत्करायची तिच्या मनाची तयारी होती. पण खाली लहानखुरे आखूड पाय आणि वर मात्र बटबटीत चेहऱ्याचे बेंगरूळ शरीर असे विचित्र मूल स्वीकारायला तिचे मन तयार होईना. हाच का आपला लहानगा रिरी. तिने काउंटना पत्र लिहून बोलावून घेतले.
काउंटसाहेब जेव्हा हेन्रीच्या खोलीत शिरले तेव्हा त्यांनी त्याला ओळखलेच नाही.
पपा,” पलंगावर पडलेल्या हेन्रीने हाक मारून त्यांचे लक्ष वेधले. आता मला चालता यायला लागलं बरं का.पांघरूण उडवून मोठ्या उत्साहाने तो पलंगावर उठून बसला. हा कोण अनोळखी इसम, दाढीदीक्षित, बुटबैंगण, खुरट्या पायांचा, खुजा, जाड भिंगांच्या चष्म्यामधून आपल्याकडे बघत हसतोय. हा आपला एकुलता एक मुलगा, तुलूझ लोत्रेकांच्या घराण्याचा वंशज. छे. शक्यच नाही. काउंट त्याच्या दिशेने दोन पावले सरकले. ते धेडगुजरे रूप पाहताना त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
तोंडाने चुकचुक असा आवाज करत ते गरकन मागे वळले आणि ताडकन चालते झाले. पाठोपाठ आई धावत खोलीत आली.
पपा असे अचानक निघून का गेले?” हेन्रीने आईला विचारले.
तुला माहितेय ना त्यांना नेहमी किती काम असतं ते,” उशी सारखी करायचे नाटक करीत ती म्हणाली. ‘‘ते काम संपलं की लगेच परत येणारेत.’’
आई आपल्याला बनवतेय हे त्याच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी आईने सांगितले की काउंटना एका महत्वाच्या कामासाठी पॅरीसवरून तातडीचा निरोप आला होता म्हणून त्यांना असे अचानक जावे लागले, तेव्हा तो मोठ्या समंजसपणे म्हणाला, “आपल्या पपांच्या मागे किती कामं असतात नाही.
थोड्याच दिवसांत त्याला हॉटेलच्या परिसरात फिरण्याची परवानगी मिळाली. स्वच्छ ऊन पडले होते. बागेत पक्षी कुजन करीत होते. हेन्री कुबड्यांचा आधार घेत घेत बागेत फिरत होता आणि आई त्या दृश्याकडे टक लावून पाहत होती.
आई म्हणाली, “डॉक्टर म्हणतायेत की आपल्यालासुद्धा थोड्या दिवसांत घोडागाडीतून फिरायला हरकत नाही. पण त्याच्या आधी आपल्याला नवीन कपडे शिवायला हवेत.
शिंप्याला मापे घ्यायला जाण्यापूर्वी सगळे नीट समजावून सांगितले होते. म्हणूनच तो अगदी ठरवून कोऱ्या चेहऱ्याने हेन्रीच्या खोलीत गेला. इतके असूनही हेन्रीला पाहिल्यावर तो क्षणभर दचकलाच. फक्त अगोदर पूर्वकल्पना दिली असल्याकारणाने त्याने स्वतःला सावरून घेतले आणि चेहरा असा काही मख्ख ठेवला की जणू काही हेन्रीला तो रोजच बघत होता.
कपडे शिवून आल्यानंतर ते दोघे रोज संध्याकाळी घोडागाडीतून फेरफटका मारायला बाहेर पडू लागले. हेन्रीला अगदी नव्याने जन्म झाल्यासारखे वाटत होते. त्याचा उत्साह उतू जात होता. योगायोगाने इंग्लंडची राणी व्हिक्टोरियासुद्धा त्याच हॉटेलात मुक्कामाला होती. मोठ्या लवाजम्यासह घोडागाडीतून तिचा संध्याकाळचा फेरफटका चालला होता. एकदा सहज त्यांची गाठ पडली असता त्यांनी हवापाण्यावर गप्पा मारल्या.
असे थोडे दिवस अगदी मजेत, आनंदात गेले. एके दिवशी रात्री झोपताना आई हेन्रीला म्हणाली, “रिरी, मों पेती, डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्ही आता चांगले बरे झाला आहात. आता आपल्याला अगदी हवं तिकडे जाता येईल. तुम्हाला हवं असेल तर अगदी पॅरीसलासुद्धा जायला हरकत नाही.
हेन्रीने आपल्या आईकडे पाहिले. ती अगदी पार गळून गेल्यासारखी वाटत होती. केसांची सोनेरी झळाळी गेल्याने ते कोरडे तपकिरी दिसत होते. सततच्या जागरणांमुळे तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती. भोगलेल्या दुःखाच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. इतके दिवस महत्‌प्रयासाने दाबून ठेवलेल्या भावना अचानक अनावर झाल्या आणि तिला हुंदका आवरला नाही. तिने तोंड उशीत खुपसले. त्या रात्री खूप उशिरापर्यंत तिच्या शयनगृहातून हुंदक्यांचे दबके आवाज ऐकू येत होते.

(प्रोमोनेद दी अँग्लीस, नीस – तुलूझ लोत्रेक, तैलरंग लाकडी पृष्ठभाग, लोत्रेक म्युझियम, आल्बी)

(फोटो – तारूण्याच्या उंबरठ्यावरील हेन्री)