Tuesday, October 30, 2018

मुलँ रूज - ८८

दुसऱ्या मजल्यावरील हेन्रीच्या खोलीतून येणारा उजेड सोडला तर मार्लोम येथील घर अंधारात बुडून गेले होते.
‘‘मला वाटतं आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल.’’ लोत्रेक कुटुंबीयांचे वृद्ध डॉक्टर हेन्रीची नाडी तपासत म्हणाले. त्यांच्या बाजूला काउंटेस उभ्या होत्या.
‘‘पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांना यापुढे फारशा वेदना होणार नाहीत. एका परीने झालं ते बऱ्यासाठीच झालं असं म्हणायचं.’’
नाडी तपासून झाल्यावर त्यांनी त्याचा कृश हात अलगद बिछान्यावर ठेवला.
‘‘मादम्वाझेल कॉम्ते. तुम्ही जरा तुमच्या खोलीत जाऊन पडा. मला वाटतं तुम्हाला विश्रांतीची खूप गरज आहे.’’
म्हातारा नोकर जोसेफ खाली दरवाजात त्यांची वाट बघत उभा होता. डॉक्टरांना मॅकिंटॉश घालायला मदत करताना त्याने हेन्रीच्या प्रकृतीची चौकशी केली.
‘‘फारशी सुधारणा म्हणता येणार नाही. या झटक्यातून वाचले हेच मोठे आश्चर्य आहे. पण आता काही फार दिवस उरलेयत असं मला वाटत नाही. काउंट साहेबांची काही बातमी?’’
जोसेफने मान हलवली.
‘‘जेवढ्या लवकर येतील तेवढं बरं.’’ गाडीत चढता चढता वृद्ध डॉक्टर म्हणाले.
काउंटेस हेन्रीकडे टक लावून त्याचे शेवटचे रूप आपल्या स्मृतीत साठवून घेत होत्या. फिकुटलेला चेहेरा, करडे पडलेले केस, विस्कटलेल्या दाढीखाली लपलेले आत गेलेले गाल, डोळ्यांखाली पडलेली काळी वर्तुळे, पांघरुणाबाहेर आलेला कृश हात, हाडांवर ताणून बसवलेल्या एखाद्या रबरी हातमोजासारखी दिसणारी त्वचा. नाकपुड्यातून चाललेला अनियमित, मंद श्वास. सगळी लक्षणे मृत्यू अगदी समीप आल्याचे दाखवीत होती.
हेन्री परत आला होता. आपल्या शेवटच्या दिवसांत हेन्रीने आपल्या भावनाशील स्वभावानुसार आईवरील प्रेम व्यत्त करण्याचा परोपरीने प्रयत्न केला होता. त्याच्या प्रत्येक शब्दातून, हास्यातून, नजरेतून त्याला वाटणारा पश्चाताप व्यत्त होत होता. विझण्यापूर्वी ज्योत जशी मोठी होते तसे हेन्रीचे आईवरील प्रेम अत्यंत उत्कटपणे उफाळून येत होते.
अजून काउंट अल्फान्सो का आले नाहीत? हेन्री फार तर दोन किंवा तीन दिवस काढेल. वडिलांच्या भेटीशिवायच हा देवाघरी जाईल का?
कसा एखाद्या लहान मुलासारखा दिसतोय. तो वरवर निराश झाल्यासारखा वाटतोय पण शेवट जवळ आला तरी आतून त्याचे अंतःकरण एखाद्या लहान मुलासारखे निर्मळ आणि कोमल आहे. बिचारा रिरी. तो प्रेमाचा भुकेला होता. पण दैव असे क्रूर की त्याच्या वाटेला प्रेमाचा ओलावा कधी आलाच नाही. त्याने या जगात कोणाला त्रास दिला असेल तो स्वतःलाच.
हेन्रीने डोळे उघडले तेव्हा उजाडायला खूप अवकाश होता. खिडकीतून दिसणारे जांभळट रंगाचे आकाश रात्र संपत आल्याचे दर्शवीत होते. ताऱ्यांचा प्रकाश मंद झाला होता. पूर्वी अशा वेळेला तो गाडीवानाला सांगायचा, ‘चलो. २१ रू कुलँकूर. वाटेत लागणाऱ्या पहिल्या बिस्ट्रोकडे थोडा थांब.या वेळी गुत्ते बंद व्हायला येत. रस्त्यावरची रात्रीची वर्दळ ओसरलेली असे. सर्वजण घरी परतून झोपायच्या बेतात असत. त्याच वेळी दुसरीकडे दिवसाच्या व्यवहारांना सुरुवात झालेली असे. भाजी विक्रेत्यांच्या ढकलगाड्या लेझ हॉल्सच्या दिशेने खडखड करीत धावू लागलेल्या असत. मारीसुद्धा अशीच एखादी ढकलगाडी ढकलत बाजाराच्या दिशेने चालली असेल. कदाचित अजूनही तिला जाग आली नसेल आणि एखाद्या बाकड्यावर अंगाचे मुटकुळे करून झोपली असेल. कदाचित... कदाचित एव्हाना या जगातून गेलेली असेल. अकरा वर्षांच्या काळात काहीही घडू शकते.
जोसेफला खुर्चीत बसल्या बसल्या झोप लागली होती. या वयात त्याला असे जागायला लागायला नको होते. काउंटेस एक परिचारक ठेवत होती. पण आपले इमान दाखवण्यासाठी त्याने परिचारक ठेवू दिला नाही. जणू काही सर्व आयुष्य लोत्रेकांच्या सेवेत घालवल्यावर त्याच्या इमानदारीवर कोणाला शंका येणार होती. आईच्या अंगात तर कसलेही त्राण राहिले नव्हते. तिचा चेहेराच मूकपणे सगळे काही सांगत होता. एवढे दुःख, शारीरिक व मानसिक थकवा क्वचितच कोणी भोगला असेल.
आपल्या मरणामुळे आपल्या भोवतालच्या सर्व व्यक्तींना त्रास होतोय हीच मरण्यातील सर्वात दुःखद गोष्ट असते. मी माझ्या कृतीमुळे अंथरुणावर खिळून आहे. मी यातून बरा होण्याची कोणतीही शक्यता नाही. तुम्ही माझ्यासाठी घेतलात तेवढा त्रास पुरे आहे. आणखी कोणताही त्रास तुम्ही घेऊ नका, असे सांगूनही फायदा नव्हता. त्यापेक्षा पक्षाघाताच्या पहिल्या झटक्यातच मृत्यू आला असता तर किती बरे झाले असते. तेव्हा नाही तर आज अगदी या क्षणी मरण आले तर किती बरे. बिचारी आई. तीही एकदाची सुटेल. आपल्या लाडक्या लेकाच्या मृत्यूचे दुःख कमी व्हायला थोडा अवधी लागेल. पण मनावरचा ताण तरी ढिला होईल. शिवाय जोसेफला असे अवघडल्या स्थितीत खुर्चीत बसून झोपावे लागणार नाही.
सततच्या प्रतीक्षेमुळे मृत्यूची भीती त्याला वाटत नव्हती. तो शांतपणे पडून वाट बघत होता. देवाशी त्याने समझोता केला. आईला सुखी ठेव. तिने त्याच्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या, प्रार्थना केल्या होत्या की त्यातून उतराई होणे त्याला शक्य नव्हते. तिचे उर्वरित आयुष्य शांततेत जावो एवढी एकच मागणी त्याने देवाकडे केली.
मृत्यू दिसू लागला की काही गोष्टी नव्याने उमगू लागतात. सत्याच्या ज्ञानापेक्षा आता गरज असते ती शांततेची. बुद्धिवादाने थकून जायला होते. बुद्धीची कास धरल्याने जीवनातील काव्य हरवून बसते. बुद्धीने सगळ्या गोष्टी जाणता येतातच असे नाही. शिवाय ज्या गोष्टी कळतात त्या गोष्टी न कळल्या तरी त्यात बिघडण्यासारखे फारसे काही नसते. आयुष्यातील सर्वच गोष्टींचा निव्वळ बुद्धीच्या निकषांवर खुलासा करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पायाच्या चवड्यांवर उभे राहण्यासारखे असते. जेव्हा आपण तरुण असतो, अंगात रग असते तेव्हा ते शक्य असते, पण जेव्हा माणूस गलितगात्र होऊन अंथरुणाला खिळतो तेव्हा विश्वासाच्या बिछान्याची मऊशार ऊब हवीशी वाटू लागते. पैलतीरी जाण्यासाठी मदतीच्या हाताची गरज भासू लागते.
पक्षाघाताचा झटका येण्याच्या दोन दिवस अगोदर हेन्रीने पाद्र्याकडे कबुलीजबाब दिला. रात्रीचे जेवण झाले होते आणि गच्चीवर सर्वजण गप्पा मारीत बसले होते. स्वच्छ चांदणे पडले होते. त्या चंदेरी प्रकाशात पॉपलर वृक्ष चमचमताना दिसत होते. मंद उन्हाळी वारा वाहत होता. कीटकांची किर्रकिर्र चालू होती. हेन्रीने पाद्री ॲबे सुलॉकला हळूच आपल्या बाजूला बोलावून घेतले व आपली सर्व जीवनकहाणी त्याच्यासमोर उघड केली. अर्थात त्याने ती लपवून कधीच ठेवली नव्हती. आयुष्यात आलेल्या स्त्रिया, बिस्ट्रोमधील बेताल मद्यपान, वेश्याघर. गंमत म्हणजे ह्या गोष्टी सांगताना त्यात आपण काही पापकृत्य केल्याची भावना नसल्यामुळे त्या अगदी क्षुल्लक व किरकोळ वाटू लागल्या.

No comments:

Post a Comment