Saturday, October 27, 2018

मुलँ रूज - ८०

पिस्सारो पॅरीसला कंटाळून जवळच्या एका खेडेगावात राहायला गेल्यापासून हेन्री त्याला भेटला नव्हता. एप्रिल महिन्यातल्या एके दिवशी तो मिरीयमला घेऊन त्याला भेटायला गेला. पिस्सारो त्याला घ्यायला स्टेशनवर आला होता. त्याची लांब दाढी व पायघोळ पोशाखात तो बायबलच्या काळातल्या एखाद्या मेंढपाळासारखा दिसत होता. पिस्सारोच्या कुटुंबीयांसमवेत सगळ्यांनी एका प्रचंड डेरेदार चेस्टनटच्या सावलीत बसून भोजन घेतले. मुले वाढण्याचे काम करीत होती. मोठी मंडळी वारुणीचे घुटके घेत गप्पा मारीत होती. डेझर्ट आल्यावर त्या बुजुर्ग कलाकाराने आपला भला मोठा पाईप शिलगावला आणि मग गप्पा मारताना इंप्रेशनिझिमच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी एक एक करून निघू लागल्या. मोने, देगास, झोला, सेझान, रेन्वा, व्हिसलर यांच्याबरोबर कॅफे गुर्बामध्ये बसून तासन्‌तास घातलेले वितंडवाद, चित्रातल्या मोकळ्या जागा, निळ्या सावल्या वगैरे जुन्या आठवणींची पुन्हा एकदा उजळणी झाली. ऐन उमेदीत ओढगस्तीच्या परिस्थितीमुळे सोसाव्या लागलेल्या चटक्यांच्या आठवणी सांगताना त्याचे डोळे पाणावले. आयुष्यात बरेच चढउतार पाहूनही कडवटपणाचा लवलेश त्याच्या बोलण्यात दिसून येत नव्हता.
‘‘अरे, त्या पॉल गोगँचे पत्र मला आलंय. सध्या तो मार्क्वेज बेटावर आहे. बिचारा! आपण होऊन ओढवून घेतलेली परिस्थिती. त्यामुळे कोणाला बोलून करणार काय. आयुष्यात तडजोड करायला त्याला जमलीच नाही. हिन्सेंटसुद्धा तसाच होता.’’
‘‘देगास भेटला तर त्याला विचारलंय म्हणून सांग. त्या ड्रेफ्युस प्रकरणानंतर आमची भेटच नाहीय. तोसुद्धा एकटाच असतो. एका क्षुल्लक गोष्टीवरून एवढी जुनी दोस्ती तोडून टाकायची हे काही खरं नाही. सर्व ज्यू जर्मनांचे छुपे हस्तक असतात असं त्याचं अगदी ठाम मत आहे. ज्यू म्हटलं की ज्याचा सारासार विवेक सोडून जातो त्याच्याशी काय वाद घालणार?’’
लंडनला जायचा दिवस जसा जवळ येऊ लागला तसा हेन्रीचा अस्वस्थपणा वाढू लागला. मिरीयमला पॅरीसमध्ये सोडून जायची कल्पना त्याला सहन होईना. शेवटी जायला तीन दिवस राहिले असताना त्याने मॉरीसला मी लंडनला जाणार नाही म्हणून सांगितले तेव्हा मॉरीस खवळला.
‘‘तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? आयत्या वेळी तू नाही म्हणतोस म्हणजे काय.’’
‘‘मी स्वतः प्रत्यक्ष येण्याची काय गरज आहे. माझी पेंटिंग तर मी पाठवतोय ना?’’
‘‘तू न जाऊन कसं चालेल? गेले वर्षभर मी या शोची तयारी करतोय. तुझा लंडनमधला सगळा कार्यक्रम तपशीलवार नक्की केला आहे. वर्तमानपत्रातून तुझ्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे. तुझ्या सन्मानाखातर एक मेजवानी ठेवलीय. त्याची आमंत्रणे पाठवून झालीयत. प्रिन्स ऑफ वेल्सनी खास तुझ्यासाठी म्हणून ...’’
‘‘मी विसरलोच होतो. हे महाशय माझ्या शोचे उद्‌घाटन करणार आहेत नाही का?’’
‘‘अरे बाबा, यात तुझा केवढा बहुमान आहे हे तुझ्या लक्षात आलंय का?’’
बहुमानाचा विषय काढताच हेन्री उसळला. ‘‘हे बघ मॉरीस, प्रिन्सने प्रदर्शनाला माझा मित्र म्हणून भेट द्यावी इतपत ठीक आहे. पण तू मानाच्या गोष्टी करशील तर यात कोण कोणाचा मान राखतोय ते जरा मला कृपा करून सांगशील काय? मी कोण आहे हे तू विसरलास की काय? अरे, मी कॉम्ते द तुलूझ लोत्रेकांचा वंशज आहे. तुलूझ. जे कॉन्स्टँटिनोपलच्या पहिल्या धर्मयुद्धात तुर्कांविरुद्ध लढताना सेनापती होते. आमच्या व इंग्लंडच्या राजघराण्यात रक्ताचे नातेसंबंध आहेत. आमचा एक चुलता जेव्हा इंग्लंडच्या सिंहासनावर बसून राज्य करीत होता तेव्हा आताच्या या प्रिन्स ऑफ वेल्सचे पूर्वज, सॅक्स-कॉबर्गस्‌ मंडळी शेतात नांगर धरून फिरत होती हे तुला ठाऊक नसेल.’’

मॉरीस, मिसीया आणि मिरीयम या तिघांच्या समजावण्याने हेन्री एकदाचा लंडनला जायला तयार झाला. लंडन शहरातील नीटनेटकेपणा, टापटीप, ऐतहासिक स्थळांची भव्यता व शान, गर्दीतील शिस्त यासाठी त्याला ते शहर खूप आवडायचे. विशेष करून पिकॅडलीमधून चक्कर मारायला. ट्रॅफल्गार स्क्वेअरमधील नेल्सनचा पुतळा पाहून त्याला पॅरीसमधील कर्नल व्हेंदोमच्या पुतळ्याची आठवण झाली. रीजंट स्ट्रीटवरील ग्युपिलची आर्ट गॅलरी मात्र त्याला फारशी आवडली नाही. बंदिस्त, काळोखी आणि गंभीर. तेथील वातावरण आत शिरताक्षणी जांभया याव्यात असे होते. तेथे व्हायचा तो फक्त धंदा. कुजबुजणाऱ्या आवाजात तेथील सौदे होत. पेंटिंग आवडले म्हणून नव्हे तर दुसऱ्यांनी हेवा करावा म्हणून खरेदी केले जाई. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हौसेपेक्षा व्यापारी मूल्याचा विचार जास्त होई. तेथे चेक लिहिले जात व पावत्या फाडल्या जात. या असल्या ठिकाणी आपल्या पेंटिंगचे प्रदर्शन होणार आहे हे बघून हेन्रीचा उत्साह मावळला. त्यातच त्याच्या मनात सारखा मिरीयमचा विचार चालू होता. वार्ताहरांनी घेतलेल्या मुलाखती, चेल्सी क्लबमधील जेवणानंतरचे भाषण या सगळ्यांत त्याची पार तारांबळ उडाली. कधी एकदा पॅरीसला जाऊन मिरीयमला भेटतोय असे त्याला होऊन गेले. त्यातच त्याची पेंटिंग बघून काही विक्रेत्यांनी नाके मुरडली. लंडनमधील उच्चभ्रू वर्गाच्या पसंतीला ती पेंटिंग कितपत उतरतील अशी शंका त्यांनी व्यत्त केली. प्रदर्शन रद्द करण्यासंबंधानेही विचार करून झाला. पण राजेसाहेबांना आमंत्रण दिलेले असल्याने तेही शक्य नव्हते.
शेवटी एकदाचा उद्‌घाटनाचा दिवस उगवला. रात्रभर त्याला झोप लागली नव्हती. उशीर होऊ नये म्हणून तो तासभर अगोदरच जाऊन पोचला. इतका वेळ काय करायचे या विचारात तो एका खोलीतील कोचावर जाऊन बसला होता त्यातच त्याचा डोळा लागला. राजेसाहेबांच्या आगमनानंतर हेन्रीसाठी शोधाशोध झाल्यावर तो बाजूच्या खोलीतील सोफ्यावर गाढ झोपलेला आढळला. हेन्री आपल्या स्वागताला पुढे आला नाही. फ्रेंच आहे म्हणजे पिऊन तर्रच असणार अशा समजुतीमुळे त्याला उठवून जागे करेपर्यंत राजेसाहेब आले तसे निघून गेले. एवढा फजितवाडा उडाल्यानंतर हेन्रीनेही तिथून काढता पाय घेतला.
मिरीयमची ओळख झाल्यानंतर तिची भेट झाली नाही असा फार तर एखादा दिवस गेला असेल. आता चक्क एक आठवडा झाला होता. त्याला कधी एकदा ती भेटते असे झाले होते. गाडीत बसल्यापासून त्याच्या मनात सतत तिचाच विचार होता. त्या दिवशी आपले थोडे चुकलेच. तिला आपल्या संपत्तीचे आमिष दाखवायला नको होते. मी तिला एखाद्या रखेलीसारखे तर वागवले नसेल? उगाच नाही तिने त्रागा करून आपल्या व्यंगाचे उणे काढले. तशी ती अगदी सालस म्हणता येईल अशी आहे. तिला स्पष्टपणे लग्नाची मागणी घालायला पाहिजे होती. मी उगाच धरून चाललो होतो की ती लग्नाला तयार होणार नाही. लग्नाने तिला एक नाव मिळेल. आणि तेच तर तिला हवे असेल. आता भेटल्याबरोबर ताबडतोब तिला लग्नाविषयी सूतोवाच केले पाहिजे. गाडी पॅरीसमध्ये शिरेपर्यंत त्याचा निश्चय पक्का झाला.
पॅरीसच्या दर्शनाने त्याच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या. त्याने एक दीर्घ श्वास घेऊन पॅरीसची हवा छातीत भरून घेतली. रस्त्यात गस्त घालणारे मिशाळ हवालदार, तुरूतुरू चालणाऱ्या यौवना, रस्त्याच्या कोपऱ्यावर फुले विकत बसलेल्या मुली, कॅफेची फुटपाथवर आलेली पट्ट्यापट्ट्यांच्या कापडांची छप्परे. मधेच एखाद्या भिंतीवर कॅलेताचे गिलोटीनखाली शिरच्छेद होतानाचे त्याने केलेले पोस्टर लागलेले होते पण त्याकडे त्याचे लक्ष नव्हते.
घोडागाडी २१ रू कलॅनकूंर समोर येऊन उभी राहिली. तो घाईघाईने जिना चढून वर गेला. स्टुडिओत येऊन श्वास घेतोय तेवढ्यात मादाम ल्युबेत दरवाजात येऊन उभी राहिली. तिला तसे उभे असलेले पाहताच त्याला काहीतरी चुकल्यासारखे वाटले. तिचा चेहराच सांगत होता. त्याचे पाय जमिनीला खिळले. एका अनामिक भीतीने तो थरथरू लागला. जशी त्या दिवशी मारी त्याच्यासमोर थरथरत उभी होती.
‘‘काय आहे त्यात?’’ त्याने तिच्या हातातल्या लिफाफ्याकडे पाहून विचारले.
‘‘मस्य तुलूझ. जरा बसाल तर खरे.’’
त्याने त्या दिवशी मारीला असेच बसायला सांगितले होते. मारी जिथे बसली होती त्या रिकाम्या कोचाकडे त्याने पाहिले. त्याच्या अंगातले सगळे त्राण गेले. तो तसाच पांढऱ्याफटक नजरेने शून्यात बघत असल्यासारखा तिच्या हातातल्या लिफाफ्याकडे बघत राहिला.
‘‘मादम्वाझेलने हे आणून दिलं. तुम्ही ज्या दिवशी लंडनला गेलात त्या दिवशी.’’
त्याने तो लिफाफा थरथरत्या हाताने उघडला व आतला कागद आपल्या अधू डोळ्यांच्या अगदी जवळ नेऊन वाचू लागला.
मी आज रात्री मस्य ज्युल्स ड्युप्रे बरोबर जात आहे. शेरी, कदाचित हेच आपल्या दोघांच्या हिताचे असेल.

(द जॉकी – चार रंगातील लिथोग्राफ, ५१x३६ सेमी, १८९९, खाजगी संग्राहक, लंडन)
(लोत्रेकने स्थिरचित्रात गतीचा आभास करण्यासाठी घोडेस्वार, सायकल शर्यत, सर्कस वगैरे चित्रात एक खास तंत्र वापरले. लोत्रेकने वापरलेले तंत्र आणि त्यावेळी नुकत्याच विकसित होत असलेल्या चलतचित्रणाच्या तंत्र यांचा परस्परांवर दाट प्रभाव होता. हे लोत्रेकचे मोठे योगदान.)



No comments:

Post a Comment