Saturday, October 20, 2018

मुलँ रूज - ६४

पोस्टरची छपाई चालू असल्याच्या दरम्यान आर्टिस्ट इंडिपेंडंटसच्या उन्हाळी प्रदर्शनाची तयारी जोरात चालू होती. हेन्री कमिटी एक्झीक्युतीफच्या बैठकीला मोठ्या गंभीरतेने गेला. ही बैठक मोंमार्त्रमधल्या एका कॅफेच्या मागच्या एका कोंदट खोलीमध्ये होती. खोली धुराने भरली होती. अध्यक्ष महाराज आपल्या ॲबसिंथच्या ग्लासावर चमचा आपटून मोठ्याने ओरडून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात होते.
‘‘खामोश. बैठक चालू असताना अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कोणालाही बोलता येत नाही. कृपा करून शांत बसा. त्याशिवाय काम सुरू करता येणे शक्य नाही.’’
अध्यक्षांच्या आरडाओरडीकडे कोणाही सभासदाने लक्ष दिले नाही. सर्वजण एकमेकांशी बोलण्यात गुंतले होते. सर्वांचे लक्ष काडेपेटी शोधण्यात, पाईप शिलगावण्यात किंवा दारू मागवण्यात होते. अध्यक्षांनीसुद्धा शांतता प्रस्थापित करण्याचा आपला प्रयत्न सोडून दिला व ॲबसिंथचे घुटके घेत शेजारच्या सभासदाशी गप्पा मारण्यास सुरुवात केली.
हेन्री जॉर्ज सुराच्या शेजारी जाऊन बसला.
‘‘असं आणखी तासभर चालेल. शेवटी सगळे शांत झाल्यावर कामकाजाला सुरुवात होईल.’’
हेन्रीने डबल कोनॅक मागवली. जेवण झाल्यावर त्याने जॉर्ज सुराला विचारले, ‘‘तुझे ते ठिपक्यांचे काम कसं काय चाललंय?’’
‘‘या सर्कसने माझ्या नाकी दम आणलाय. एक तर याचे कंपोझिशन भयंकर गुंतागुंतीचे आहे. त्यात सर्कस म्हणजे परावर्तित प्रकाशातील काम. सूर्यप्रकाशातील काम त्या मानाने खूप सोपं असतं. या सर्कससमोर माझं ग्रँड जेट म्हणजे अगदी पोरखेळ वाटेल. ही बैठक संपल्यावर माझ्याकडे ये. तुला गंमत दाखवतो.’’
‘‘नॉम दे दियू. आता गप्प बसायला काय घ्याल? ह्यापुढे जो कोणी माझ्या परवानगीशिवाय बोलेल त्याला दंड करण्यात येईल.’’ अचानक अध्यक्ष महाराज गर्जले. त्यांच्या संयमाची जागा संतापाने घेतली होती. दोन मिनिटांत सगळा गोंधळ शांत झाला. अध्यक्ष एका जाडजूड बांध्याच्या गबाळ्यासारखे कपडे केलेल्या माणसाकडे वळून म्हणाले, ‘‘रुसॉ, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते थोडक्यात सांगा. उगाच लांबण लावू नका.’’
‘‘मस्य प्रेसिडेंट,’’ नम्र अभिवादन करीत त्याने भाषण सुरू केले, ‘‘मस्य अँड डीयर कलीग्ज. सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या त्या देदीप्यमान...’’
‘‘तुमची जी काही तक्रार असेल ती सरळ सांगा. आम्हाला रात्रभर येथे थांबायची इच्छा नाहीय.’’
रुसॉ थोडासा दुखावला गेला. तो म्हणाला, ‘‘मागच्या वर्षीच्या प्रदर्शनातील पेंटिंगबद्दल खूप तक्रारी आहेत. मुख्यतः ती ज्या प्रकारे टांगली होती त्याबद्दल. पेंटिंग लावताना त्यांच्या रंगात्मक मूल्यांचा नीट विचार करूनच ती लावली पाहिजेत. आपल्या चित्रांबद्दल आपणच इतके बेफिकीर राहून कसे चालेल? माझ्या पेंटिंगचेच उदाहरण घ्या ना...’’
‘‘आता गप्प बसा.’’ त्याला मधेच तोडत अध्यक्ष म्हणाले, ‘‘या वर्षी पेंटिंग लावण्याचे काम तुम्हीच करा. मग तर तुमची तक्रार नाही ना? आता आपले खजिनदार हिशेब सादर करणार आहेत.’’
एका सुतकी चेहऱ्याच्या इसमाने खिशातून चोपडे काढून जमाखर्चाची आकडेमोड वाचायला सुरुवात करताच सभासदांमधील अस्वस्थता वाढू लागली.
‘‘मला सांगायला अतिशय वाईट वाटतंय की आपला खर्च वाढत चाललाय, पण आवक मात्र शून्यच आहे. आपली देणी एवढी वाढलीयत की आता सर्वांनी आपली वर्गणी मागील सर्व थकबाकीसकट तात्काळ भरली नाही तर आपल्याला ताबडतोब गाशा गुंडाळावा लागेल.’’
आर्थिक बाब थोडी नाजूक होती. वर्गणीचा विषय काढताच सर्वांची परिस्थिती अवघडल्यासारखी झाली. अध्यक्षांनी एक सुंदर भाषण ठोकले. त्यात त्यांनी चित्रकारांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल हळहळ व्यत्त केली. कळ सोसून सर्वांनी आपापली वर्गणी ताबडतोब भरावी असे आवाहन केले. यानंतर अध्यक्षांनी हेन्रीला कॅटलॉगच्या कामाविषयी माहिती सांगण्यास सांगितले. हेन्रीकडे सांगण्यासारखे काही नव्हतेच. कारण छापखानेवाला मागच्या वर्षाची थकबाकी मिळाल्याशिवाय पुढच्या कामाविषयी काही ऐकूनसुद्धा घ्यायला तयार नव्हता. बहुधा आपल्याला कलेविषयी चाड असलेला दुसरा एखादा छापखाना शोधावा लागेल असे दिसतेय.
लुच्चे कुठले. सगळेजण पैशांच्या मागे लागलेयत. आपल्या सोसायटीचा कॅटलॉग छापण्यातला बहुमान कोणीच लक्षात घेत नाही. ठीक आहे. मस्य तुलूझ लोत्रेक यांनी सुचवल्याप्रमाणे दुसरा छापखाना शोधूया. जरा लांबचा एखाद्या खेड्यातला पाहावा लागेल इतकेच. खेड्यातील लोक शहरातील लोकांइतके लोभी नसतात.
वार्षिर्क प्रदर्शनासाठी ज्युरींची निवड करण्याच्या विषयावरून जंगी खडाजंगी माजली. अगदी सोसायटी फुटण्यापर्यंत पाळी आली. ज्युरी असावेत की नसावे हा सदोदित वादाचा मुद्दा होता. अकादमीच्या सॅलूनसाठी पेंटिंगची निवड ज्युरी करीत. हवश्या, गवश्या व नवश्या चित्रकारांना तिथे प्रवेश नसे.
रुसॉने ज्युरींची निवड करण्याच्या सूचनेला पाठिंबा दिला. आपले प्रदर्शन म्हणजे एक टिंगलीचा विषय होत चालला आहे. कोणाही येरागबाळ्याची पेंटिंग आपण स्वीकारतो. त्यामुळे गुदस्ताचे आपले प्रदर्शन टिंगलीचा विषय झाले होते. आता दर्जा राखायचा म्हणजे काही तरी मानदंड, निकष ठेवायला पाहिजेत, असा विचार व्यत्त करीत हळूहळू बहुतेकांनी त्याला पाठिंबा दिला.
यातील गमतीचा विरोधाभास म्हणजे अशा प्रकारे पूर्वनिश्चित निकषांनुसार निवड करण्याच्या पद्धतीला आता पाठिंबा देणारे लोक काही वर्षांपूर्वी याच मुद्द्यावरून अकादमीच्या विरोधात ठामपणे उभे राहिले होते. ह्याच लोकांनी व्यवस्था व राजमान्यता यांची पूर्वी टिंगल उडविली होती. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या क्रांतिकारकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशानेच आर्टिस्ट इंडिपेंडंटसची स्थापना झाली होती. आता त्याच क्रांतिकारकांना सत्ता, व्यवस्था व त्याच्या जोडीने येणारे मानमरातब व प्रतिष्ठा हवी होती.
‘‘माझा या सूचनेला विरोध आहे.’’ हेन्री आपली काठी आपटत म्हणाला.
‘‘माझासुद्धा.’’ जॉर्ज सुराने त्याच्या सुरात सूर मिळवला.
‘‘लोक आपल्या पेंटिंगना हसतात हे मान्य आहे. त्याने कलाकृतीचे बाजारातील मूल्य ठरत असेल, पण पेंटिंगच्या कलात्मक मूल्यात त्या हसण्याने काही फरक पडतो का? रेम्ब्रांदचे नाईटवॉच, मानेचे ऑलिंपिया पाहून लोक एकेकाळी हसलेच होते. हसणे हे मूर्खपणाचे पहिले लक्षण आहे. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी साकल्याने विचार करावा लागतो. त्यापेक्षा हसणे फार सोपे असते. ठीक आहे आपण काही सामान्य दर्जाची पेंटिंग प्रदर्शनात लावली होती. पण त्याचबरोबर काळाच्या ओघात पुढे महान कलाकृती होण्याची क्षमता असलेलीही काही पेंटिंग त्यात होतीच की. त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे श्रेष्ठ काय व कनिष्ठ काय याचा निवाडा करणारे आपण कोण? असे काही निकष ठरवता येतात का? आपल्या सहकाऱ्यांची टिंगल करण्यात कलाकारांचा हात कोणीही धरू शकणार नाही. मायकेल अँजेलो लिओनार्दोला कमी लेखायचा, डेव्हिड वॉत्तोला तर इंग्रेस दलाक्रवाला. इंप्रेशनिस्टांना तर सेझानची लाज वाटायची आणि सेझानला वाटतं की तो सोडून दुसऱ्या कोणाला पेंटिंग म्हणजे काय ते समजलेलंसुद्धा नाहीय. त्यामुळे या विषयावर वादविवाद करणं व्यर्थ आहे. प्रत्येकाला संधी मिळू दे. काळाच्या ओघात जो टिकेल तोच खरा.’’
ज्युरींच्या निवडीचा ठराव किंचित फरकाने नामंजूर झाला. त्यानंतर सभेचे इतर कामकाज, अहवाल वाचणे, ठराव वगैरे संमत करणे चुटकीसरशी उरकून घेण्यात आले. व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या पेंटिंगसाठी या वर्षी एक खोली राखून ठेवण्याचा ठराव एकमताने संमत झला. बैठक संपता संपता व्हिन्सेंट व तेओ या गॉग बंधूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठक संपली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. हेन्री जॉर्ज सुराबरोबर त्याची पेंटिंग बघण्यासाठी त्याच्या स्टुडिओवर गेला.

No comments:

Post a Comment