Sunday, October 21, 2018

मुलँ रूज - ६७

गेली कित्येक वर्षे हेन्रीचे त्याच्या वडिलांशी असलेले संबंध ताणलेले होते. आईच्या आग्रहाखातर तो अधूनमधून त्यांना भेटायला जाई. भेटीत दोघेही आपला अवघडलेपणा लपविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत. पोस्टर प्रसिद्ध झाल्यावर थोड्याच दिवसांत एके दिवशी सकाळीच त्याचे वडील धाडकन त्याच्या स्टुडिओत येऊन दाखल झाले.
‘‘तुमची हिंमत तरी कशी झाली?’’ काउंट महाशय रागाने थरथर कापत होते, ‘‘त्या फालतू नाच्या पोरींच्या घाणेरड्या अश्लील पोस्टरखाली लोत्रेक म्हणून सही करायची? तुम्ही असे आजारी, विकलांग नसता तर चाबकाने फोडून काढलं असतं तुम्हाला.’’
हेन्री भीतीने पांढराफटक पडला. वडिलांच्या संतापाचा त्याला अनुभव होता. त्यांच्या मुठीतील गरगर फिरणाऱ्या सोनेरी मुठीच्या वेताच्या छडीकडे तो काही क्षण पाहत राहिला. अचानक त्याची भीती पार नाहीशी झाली. हा भंपक काउंट मला चाबकाने फोडण्याची धमकी देतो काय. पांगळा असलो म्हणून काय झाले. माझ्या धमन्यातसुद्धा तुलूझ लोत्रेकांचे रक्त वाहातेय. माझा असा अपमान करण्याची छाती कशी होते यांची. त्याने मान वर करून पाहिले व बर्फासारख्या थंडगार आवाजात तो म्हणाला,
‘‘माझं पोस्टर तुम्हाला आवडलेलं दिसत नाहीय? पण त्याला माझा नाइलाज आहे. तुमच्याबरोबर शाँझ्‌ एलिझेवरून घोड्याची रपेट मला करता येत नाही याचं मला वाईट वाटतं. माझ्या या व्यंगामुळे तुम्हाला किती घोर मनस्ताप होत असेल याची मला कल्पना आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही मला जन्माला घातलंयत याचा मलाही तेवढाच मनस्ताप होतो. मी काही तुमच्या पोटी जन्म मागितला नव्हता. मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे व तुलूझ लोत्रेक घराण्याचा शेवटचा वारसदार. मला हेही माहितेय की माझे वर्तन तुम्हाला पसंत नाही. तुमचे वर्तनसुद्धा मला कितपत आवडतं सांगता येत नाही. एकेकाळी मी तुम्हाला खूप मानायचो, तुमच्याबद्दल आदर वाटायचा, पण आता तसा वाटत नाही. प्रेम तर जाऊ दे पण तुमचा सहवाससुद्धा माझ्या आईला आणि तुमच्या मुलाला कधी मिळाला नाही.’’
‘‘तुमची हरकत नसेल तर हा तमाशा आपण इथेच थांबवू या. यापुढे मी कधीही तुमच्या वाटेला जाणार नाही. तुम्हीही माझ्या वाटेत येऊ नका. आता राहिलं माझ्या चित्रांबद्दल. माझी सही माझ्या मर्जीप्रमाणे मला वाटेल तशी मी करेन. हे काम माझे आहे आणि हेन्री द तुलूझ लोत्रेक हे नावसुद्धा माझेच आहे. एक लक्षात ठेवा. मी आता सज्ञान झालो आहे आणि माझे नाव बदलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. या नावाची तुम्हाला जर एवढी लाज वाटत असेल तर तुमचे नाव बदलून घेण्यास तुम्ही मुखत्यार आहातच.’’
‘‘कला? या तुझ्या पेंटिंगना तू कला म्हणतोस.’’ भिंतीवरच्या कॅनव्हासकडे आपल्या हातातील काठीने निर्देश करीत उपहासाने हसत काउंट म्हणाला, ‘‘ही घाणेरडी आणि अश्लील पेंटिंग्ज. त्या निमित्ताने दारू प्यायला आणि वेश्यांची माडी चढायला मिळते म्हणून कॅनव्हासवर काहीतरी फराटे मारले की झालं. याला काय कलाकृती म्हणायचं.’’
‘‘होय. माझ्या दृष्टीने ही सगळी पेंटिंग माझ्या कलेचा आविष्कारच आहेत. माझ्या कलेचा दर्जा ठरविणारे तुम्ही कोण? तुमचा आणि कलेचा काय संबंध? तुमच्यासारख्यांचा अशा कामाशी किंवा कसल्याही प्रकारच्या शारीरिक श्रमाच्या किंवा कौशल्याच्या कामाशी कधी संबंध आलाय? श्रम हे कनिष्ठवर्गीयांनी करायचे. कलाकौशल्याचे काम करायला बुर्झ्वा मध्यमवर्ग. आपण श्रीमंत सरदार. कष्टाची कामे आपली नव्हेत. आपण तलवार गाजवायची. लोक अजून आपल्याला मान देतात, पण हा मान फुकाचा आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपण उच्च कुलीन. शुद्ध रक्ताचे. घराण्याचा सात पिढ्यांचा इतिहास, मानमरातब, उच्चकुलीन रीतिरिवाज या खोट्या बेगडी वेष्टनात तुम्ही एवढे गुरफटून गेला आहात की आपले अस्तित्व आता कालविसंगत झाले आहे हे आपल्या लक्षात आलं नाहीय. आपले सर्व जीवन अर्थशून्य झाले आहे. काही अर्थ उरला असेल तर तो फक्त घोड्यावरून केलेल्या रपेटीत आणि प्रतिकारहीन जनावरांच्या शिकार नामक केलेल्या कत्तलीत. नशिबात असेल तर कधीकाळी एखादे युद्ध होईल आणि त्यात रणांगणावर मृत्यू आला तर या अर्थशून्य जगण्याचे झाले तर तेवढेच सार्थक होईल. नाही तर आपल्या नावाची झूल एखाद्या भरजरी वस्त्राप्रमाणे पांघरून लोत्रेक या नावाने जन्म घेतला यातच धन्यता मानून गतवैभवाच्या अफूच्या नशेत दिवस कंठायचे.’’
‘‘पाले द व्हेर्साय आणि मारी अंतोनेतबरोबरच आपले जग संपलंय. आपलासुद्धा राणीबरोबरच गिलोटीनखाली शिरच्छेद व्हायला हवा होता. सध्याच्या जगातील आपले अस्तित्व अश्मीभूत झालेल्या अवशेषांसारखं झालंय. डायनोसॉरच्या हाडांना जेवढं महत्त्व असतं तेवढेच महत्त्व आपल्याला आहे. तुमचं म्हणणं आहे की, मी वेश्यांच्या संगतीत असतो. होय. खरं आहे ते आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. दुसऱ्या कोणत्या स्त्रीच्या सहवास मला मिळाला असता? तुम्ही म्हणता मी दारू पितो. होय. मी पितो. मी दारू का पितो म्हणून कधी विचारपूस केलीत? मी जेव्हा पितो तेव्हा माझी ही कुरूपता, व्यंग, एकाकीपणा, या खुरट्या पायातील वेदना थोडा वेळ का होईना मी विसरतो म्हणून मी पितो. माझ्या जागी तुम्ही आहात अशी जरा कल्पना तरी करून पाहा. असं पाय फरफटत कुबड्याघेऊन चालणं कसं वाटलं असतं तुम्हाला? मी पितो. माझ्या जागी तुम्ही असतात तर तुम्हीही असेच प्याला असता किंवा स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली असतीत. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. आईला तिच्या देवाची प्रार्थना, तुम्हाला घोडे आणि ससाणे आणि मला माझा ब्रश आणि कोनॅक. मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? आरामखुर्चीत बसून दिवस कंठावेत. मी तसं करून पाहिलंय. फार कंटाळा येतो. तुम्हालासुद्धा आला असता.’’
हेन्रीने वडिलांकडे पाहिले. ते एका पुतळ्यासारखे स्तब्ध उभे होते. त्यांच्या नजरेतील अंगार विझला होता, पण ताठा कायम होता. वृद्धत्वाची किंचित झाक दिसू लागलेल्या करारी मुद्रेवर एकाकीपणा दिसत होता. एक क्षणभर त्यांच्या सरदारकीच्या वस्त्रांची रेशमी झिलई फिकुटल्यासारखी वाटली आणि त्या जागी त्याला दिसू लागला अंगात चिलखत घातलेला, सोनेरी शिरस्त्राणधारी, कंबरेला तलवार, हातात रेमंड द फोर कॉम्ते द तुलूझ यांची ढाल घेतलेला वीरपुरुष. पार्श्वभूमीला फडकणारे क्रुसेडर्सचे ध्वज, उन्हात तळपणाऱ्या नागव्या तलवारी, खिंकाळणारे घोडे. ड्रमचा ताल व बिगुलाचा निनाद. पुन्हा त्या जागी आला पांढरी तुमान व ॲस्कॉट टाय परिधान केलेला पॅरीसमधील एक खुशालचेंडू काउंट. हेन्रीला त्या उध्वस्त झालेल्या उन्मत्त उमरावाची कीव आली. त्या उमरावाला या जगात यायला तब्बल पाच शतकांचा उशीर झाला होता. त्याला वाटले की त्यांचा हात आपल्या हातात घ्यावा आणि सांगावे की तुमचा दुखावलेला अहंकार, गतकाळाचा अभिमान सगळे मला समजते आहे. लंगडा असलो तरी मीसुद्धा या नष्टप्राय होत चाललेल्या उमरावांच्या गोतावळ्यापैकीच एक आहे. कदाचित अखेरचा तुलूझ लोत्रेक.
‘‘हेन्री.’’ काउंट रुद्ध आवाजात म्हणाले, ‘‘आपली ही भेट शेवटचीच समजा. तुम्हाला हवे ते करायला तुम्ही समर्थ आहात. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो. माझ्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा करू नका. मागितलीत तरी मिळणार नाही हे पक्के लक्षात असू दे.’’
‘‘तुम्ही यापूर्वीही कधी मदत केलेली नव्हती. पुढेही तुमच्याकडून तशी अपेक्षा नाही.’’ हेन्री कडवटपणे म्हणाला. काउंटनी हॅट उचलली व निरोपाचा एकही शब्द न उच्चारता ताडकन बाहेर पडले. दरवाजातून थंड हवेचा झोत आत आला. हेन्रीने आपल्या ग्लासात थोडी कोनॅक ओतून घेतली व प्यायला सुरुवात केली.

No comments:

Post a Comment