Sunday, October 7, 2018

मुलँ रूज - ३२

‘‘मस्य तुलूझ!’’
घोडागाडी दरवाजात थांबलेली पाहताच मादाम ल्युबेत अचंबित होऊन मोठ्या आनंदाने उद्‌गारली. दोन हातांत स्कर्ट किंचित उचलून धरत ती जवळपास धावतच बाहेर आली. तार हातात पडल्यापासून काळजीने तिचा जीव सारखा वरखाली होत होता. मोंमार्त्रमध्ये परतण्यामागे निश्चितच तसे काहीतरी कारण घडले असले पाहिजे. नाहीतर एवढ्या मोठ्या घरातला मुलगा परत या दरिद्री बकाल वस्तीत कशाला पाऊल टाकेल? नक्कीच काहीतरी घडले असेल. आई-वडिलांशी भांडण तर नाही ना? कारण काही का असेना. पण हेन्री परत येतोय या विचाराने तिचा जीव सुखावला होता खरा. आज सकाळपासून लॉजमध्ये तिची उगाचच धावपळ चालू होती. रोजचे वर्तमानपत्र वाचताना तिची नजर सारखी दरवाजाकडे वळत होती. गेल्या तासाभरात एक ओळही वाचून झाली नसेल.
‘‘तुम्ही गेल्यापासून तुमच्या स्टुडिओतली एक काडीसुद्धा जागची हलली नसेल. तुम्ही येणार म्हणून आज झाडून पुसून ठेवलाय एवढंच. स्टोव्हसुद्धा पेटवून ठेवलाय म्हणजे...’’ बोलताना ती अचानक थांबली. लक्षण काही ठीक दिसत नव्हते. तसा तब्येतीत काही फारसा फरक पडलेला वाटत नव्हता पण डोळे मात्र थोडे वेगळे दिसत होते. खोल आणि शुष्क. खोडकर बालिशपणा कुठल्या कुठे लोपला होता.
‘‘तब्येत वगैरे ठीक आहे ना?’’
‘‘थँक्यू मादाम ल्युबेत. मी अगदी टुणटुणीत आहे,’’ तो तिच्याकडे बघून मोठ्या आपुलकीने हसला खरा पण त्या हसण्यामागचा विषाद काही लपत नव्हता. ‘‘परत रहायला आलो ते चांगलं झालं की नाही. अहो, तुमच्याशिवाय घरी चुकल्याचुकल्यासारखं वाटायचं.’’
चौथ्या मजल्यावरील आपल्या स्टुडिओचे दार उघडताच त्याने तडक खिडकी गाठली. हातातल्या काठीवर भार देत तो उभा राहिला. एकमेकांना खेटून असल्यासारखी वाटणारी घरांची छपरे, त्यातून डोकावणारी धुरांडी हे खिडकीतून दिसणारे परिचित दृश्य त्याने डोळे भरून पाहून घेतले. हवेत शरद ऋतूतला सौम्य गारठा होता. त्याला डेनिसबरोबर मारलेल्या सायंकालीन फेरफटक्यांची आठवण झाली आणि तो किंचित उदास झाला. त्याने खिडकीकडे पाठ फिरवली व चौफेर नजर टाकली. स्टुडिओत रेंगाळणाऱ्या टर्पेंटाइनचा वास त्याच्या नाकात शिरला. भिंतीवर टांगलेले कॅनव्हास, इझल, वेताच्या खुर्च्या, ढेरपोट्या स्टोव्ह, व्हीनसचा अवजड पुतळा सगळ्या गोष्टी अगदी तिथल्या तिथे होत्या. त्याच्या जानी दोस्तांप्रमाणे, त्याच्या गोतावळ्याचा एक भाग असल्यासारख्या.
दरवाजात उभ्या असलेल्या मादाम ल्युबेतकडे पाहून तो म्हणाला, ‘‘आता मी इथेच मुक्काम ठोकणार आहे. नुसता कामापुरता नव्हे. कायमचा. आता हाच माझा स्टुडिओ आणि हेच माझे घर.’’
लोखंडी कठड्याची बाल्कनी, मोठ्या खिडक्या आणि पांढऱ्या-पिवळ्या डेझीच्या फुलांचा नवा वॉलपेपर यामुळे जागा प्रशस्त वाटत होती. आईचा एक डेग्युरोटाइप फोटो त्याने झोपण्याच्या पलंगाजवळ उशाशी ठेवला. काही स्केचेस्‌ त्याने भिंतीवर चिकटवली. टेबलावर एक मॉरीसबरोबर काढलेला त्याचा लहानपणचा अर्ध्या चड्डीतला एक जुना फोटो होता. फोटोत त्याचे उघडे पाय किती निरोगी दिसत होते. त्याने फोटोकडे एकवार डोळे भरून पाहिले.
दोन दिवसांनी त्याच्या सामानाच्या पेट्या आल्या. मादाम ल्युबेतने त्याचे शर्ट, सूट व इतर कपडे वॉर्डरोबमध्ये व्यवस्थित लावून दिले. त्याचे पायमोजे, हातमोजे, दाढीच्या सामानाचा चांदीचा टॉयलेट सेट, महागड्या पर्फ्युम्सच्या बाटल्या, कोपऱ्यात नावाच्या आद्याक्षरांचे नाजूक भरतकाम केलेले टॉवेल आणि हातरुमाल वगैरे बारीकसारीक गोष्टी जागच्या जागी लागल्यामुळे त्याला घरच्यासारखे वाटू लागले.
सगळे घर मनासारखे लागल्यावर तो रॅचोला भेटायला गेला. त्याला वाटले होते की एक तर तो पेंटिंग करताना सापडेल, नाही तर मेंडोलीन वाजवताना किंवा आलतूफालतू मित्रांना गोळा करून बीअर ढोसताना. कदाचित एखाद्या प्रियपात्राच्या बाहुपाशात. परंतु हेन्रीने त्याच्या स्टुडिओत पाऊल टाकले तेव्हा त्याला धक्काच बसला. महाशयांच्या हातात तेव्हा कलेचा इतिहास नामक प्रचंड मोठा ग्रंथराज होता.
‘‘च्यायला. म्युझियमच्या क्युरेटरच्या या टुकार जागेसाठी अर्ज करण्याचं ठरवल्याबरोबर माझे दिवस फिरलेयत बघ. तुला कल्पना नाहीये काय काय अभ्यास करावा लागतो याची. एवढी परीक्षा घेऊन जागा कोणती तर कन्सर्जची. म्युझियमचा का होईना पण शेवटी दरवानच की.’’
रॅचोच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे हास्य कुठल्या कुठे गेले होते. त्याने बहुढंगी बोहेमियन जीवन पद्धतीला तिलांजली दिली होती. त्याच्यातील मध्यमवर्गीय बुर्झ्वा आता सुरक्षिततेच्या शोधात होता. ल एलीसमधील नाच, ला नुव्हेलमधील बीअरपान यात त्याला रस वाटेनासा झाला होता. थोडा वेळ त्यांनी इकडच्यातिकडच्या गप्पा मारल्या. जुन्या दिवसांच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न केला. पण आता गप्पागोष्टींत पहिल्यासारखी जान भरत नव्हती.
‘‘तुला कळलं का. ग्रेनीयेने लग्न केलं. ल्युकास नॉर्मंडीला परत गेला.’’
‘‘हो. तू पत्रात लिहिलं होतंस. व्हिन्सेंटचं कसं काय चाललंय.’’
अरे हो. व्हिन्सेंट मात्र अजून इथेच आहे. त्याच्या डोक्यात सध्या चित्रकारांचा भ्रातृभाव व सहजीवन याचं खूळ शिरलंय. मोंमार्त्रमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ॲबसिंथ ढोसत लंब्याचवड्या बाता मारत आपली मतं ऐकवून वात आणतो. गेल्या वर्षी उन्हाळ्यात त्याने प्रदर्शन भरवलं होतं. ओग्युस्तिनाच्या कॅफेमध्ये. पार बोजवारा उडाला. प्रदर्शन संपल्यावर त्याने ओग्युस्तिनाला लग्न करशील का म्हणून विचारलं. त्याचा एकूण अवतार पाहून ती जी हसायला लागली म्हणून सांगू. ती सरळ म्हणाली की, हे काय खूळ घेतलंयस डोक्यात. आधी स्वतःचं पोट भरायला शिक. मग लग्नाचं बघ. तुला माहीतच आहे ती कशी फटकळ आहे ती. आपला व्हिन्सेंट तसा चांगला आहे रे, पण तुला खरं सांगू. त्याचा स्क्रू थोडा ढिलाच आहे.रॅचो आपल्या डोक्यावर बोटाने दाखवत म्हणाला.
‘‘गोझी आणि आँक्तां इथे मोंमार्त्रमध्येच आहेत. नक्की काय करतात माहीत नाही. पण खूप कामात आहेत असं ऐकून आहे.’’
‘‘काय काम करतायत?’’ हेन्रीने मोठ्या उत्सुकतेने विचारले.
‘‘काम कसलं डोंबलाचं. दोन घास पोटात ढकलायला मिळावेत या माफक अपेक्षेने काय मिळेल ते काम मान खाली घालून निमूटपणे करणे ह्या मोठ्या उद्योगात दिवसभर ते मग्न असतात. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. कसली कला आणि कसली मूल्ये. काय पेशा आहे नाही चित्रकाराचा.’’

No comments:

Post a Comment