Friday, September 28, 2018

मुलँ रूज - ९


नाताळच्या थोडे आधी प्रँस्तो आजारी पडला. त्याने काउंटेसला तो पॅरीस सोडून जात असल्याचे कळविले. जाताना हेन्रीचे नाव पोर्ट्रेट पेंटिंग शिकवणाऱ्या प्रोफेसर बॉन्नासारख्या एखाद्या नामांकित चित्रकाराच्या ॲतलिएमध्ये घालण्याची शिफारस केली.
आईने घरीच कोणाची तरी शिकवणी ठेवण्याचा आग्रह धरला. पण हेन्री ॲतलिएमध्ये जायला खूप उत्सुक होता. तेथील वातावरण. झालेच तर कोणाशीतरी मैत्री. हेन्री अगदी काकुळतीला येऊन विनवत होता. त्याच्या आवाजातल्या आर्जवाने आईच्या डोळ्यांत पाणी तरारले.
बरं. एकदा तुमच्या मनासारखं होऊ दे. पण ॲतलिएमध्ये सांभाळून वागा. तरुण मुलं आपापला एक गट करून असतात. टर्म केव्हाच सुरू झालेली आहे. मधेच आलेल्या तुमच्यासारख्याला कोणी आपल्या गटात घेणार नाहीत. आणखी एक महत्वाची गोष्ट. तिथे येणारी मुलं अगदी खालच्या वर्गातली असतात. त्यांच्यात मिसळणं तुम्हाला शक्य होणार नाही. तुम्हाला कोणी समजून घेणारा भेटला तर ठीक. पण तशी शक्यता कमीच दिसतेय.
मला कल्पना आहे, तुम्हांला कशाची काळजी वाटतेय ती.त्याचे गडद तपकिरी डोळे खिन्नतेने भरून आले. मी करू तरी काय ममा? मी काही जन्मभर घरात लपून बसू शकत नाही.                
बऱ्याच ऊहापोहानंतर हेन्री एकदाचा ॲतलिएमध्ये दाखल झाला. प्रोफेसर बॉन्ना हात पाठीमागे बांधून वर्गात येरझाऱ्या घालत होते. मधेच थांबून मुलांपुढील कॅनव्हासवर एक दृष्टिक्षेप टाकीत फिरत होते.
पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे चित्रकलेतला सर्वोत्कृष्ट कलाप्रकार. फक्त आविष्काराच्या दृष्टीने नव्हे तर अर्थप्राप्तीचे एक साधन म्हणूनसुद्धा. पैसा काय तसा इतर कसलीही रंगरंगोटी करून कसाबसा मिळत असतो. पण पोर्ट्रेट पेंटिंग जर जमायला लागलं तर जरा सुस्थिर जीवन जगण्याची आशा धरायला हरकत नाही.
एक यशस्वी पोर्ट्रेट पेंटर होण्यासाठी काही प्राथमिक नियमांचे ज्ञान असणं आवश्यक आहे. एखाद्या मोठ्या कर्तृत्ववान पुरुषाचं चित्रण कसं करायचं. उदाहरणार्थ, तुमचा चित्रविषय एखादा सरदार, सेनापती, उद्योगपती नाहीतर एखादा राजकारणी असेल तर त्याला ताठ उभा, कपाळावर किंचित आठी, हाताची दोन बोटं वेस्टकोटमध्ये असाच दाखवला पाहिजे. नेपोलियनचं पोर्ट्रेट डोळ्यांसमोर आणा. याच्या उलट तुम्ही जर एखाद्या विचारवंताचं पोर्ट्रेट करत असाल उदाहरणार्थ, शास्त्रज्ञ, लेखक, कार्डिनल वगैरे तर त्याला बसलेला दाखवा. उजवा हात हुनवटीवर. चेहऱ्यावर जगाच्या चिंतेचे भाव.
हेन्री एका कोपऱ्यातल्या स्टुलावर घाबरून अंग आक्रसून बसला होता. समोरच्या इझलवर थरथरत्या हाताने चित्र काढत होता. प्रोफेसरांनी आपले चित्र पाहिले तर ते काय म्हणतील, आपण काढलेले चित्र त्यांच्या पसंतीला उतरेल की ते आपली नेहमीसारखी चेष्टा करतील या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला होता.
विषय कोणताही असला तरी तंत्र मात्र तेच. तुमच्या फिगरचे चार भाग करा. प्राथमिक रेखाटन करून घ्या. ठळक छाया प्रदेश रॉ अँबरने दाखवा. रॉ अँबर. मी काय म्हणतोय इकडे लक्ष आहे ना.अचानक त्यांचा आवाज चढला, “त्या इंप्रेशनिस्ट आणि इंडिपेंडन्सच्या पोरांना काय हवा तो रंग वापरू दे. जांभळा नाहीतर निळासुद्धा. आपण तिकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही. माझ्याकडे असले थेर मुळीच चालणार नाहीत. इथे फक्त रॉ अँबरच. दुसऱ्या रंगाला चुकूनही हात लागता कामा नये. काय समजलात.
फिरत फिरत तो हेन्रीकडे येऊन पोहचला. त्याच्या कॅनव्हासकडे डोळे किलकिले करून त्याने एकवार पाहिले. सगळ्या वर्गात टाचणी पडली तरी ऐकू येईल एवढी शांतता पसरली.
काय गिरमिटलंयत हे राजेसाहेब. हे पोर्ट्रेट पेंटिंग चाललंय का मस्करी. रंग आणि कॅनव्हासचा नुसता नाश चालवला आहात आपण.त्यांच्या या बोलण्याने सर्व वर्गात हास्याची एक लाट उसळली. त्याने त्याला अधिकच चेव आला. तुम्हाला कल्पना नसेल इथे येणाऱ्या कित्येक मुलांना रंग आणि कॅनव्हास विकत घेण्यासाठी एक वेळ उपास काढावा लागतो. पण उद्या पोटाची खळगी भरता यावी म्हणून आज ते पोटाला चिमटा घेत असतात. तुमचं काय. तुम्हाला कशाचीही ददात नाहीये. तुम्ही येथे कशाला येता आहात. स्वतःच्या या कारागिरीकडे बघून तुम्हाला वाटतं का की कधी काळी तरी आपण चित्रकार होऊ म्हणून. उगाच कशाला कॅनव्हास, रंग वगैरे फुकट घालवताय. त्यापेक्षा एखाद्या गुणी गरिबाला द्या. त्याला त्यातून काही करायला जमलंच तर त्याच्या दोन घासांची सोय केल्याबद्दल तो तुम्हाला आयुष्यभर दुवा देईल.
तुम्हाला किती वेळा मी समजावून सांगितलंय. तुमच्यात कोणतेही कलागुण नाहीयेत. अगदी नावालासुद्धा. आपण चित्रकार बनू शकू अशी फक्त ऊर्मी आहे तुमच्या जवळ. अशा नुसत्या ऊर्मीचा काही उपयोग नसतो. त्यासाठी सौंदर्यदृष्टी असावी लागते. ती तुमच्याकडे औषधालासुद्धा नाही. तुम्हाला सगळीकडे दिसते ती फक्त कुरूपता. स्वतःवरून तुम्ही जगाची कल्पना करता. तुम्हाला चित्रकला येणे कालत्रयी शक्य नाही. आमच्यावर कृपा करा आणि आपल्या घरी स्वस्थ बसा. दुसरं काही काय वाट्टेल ते करा. पण कृपा करून चित्रकलेच्या वाटेला पुन्हा जाऊ नका. म्हणजे असले हे रंगांचे फरांटे बघण्याची पाळी आमच्यावर येणार नाही. मोठे उपकार होतील आमच्यावर.
प्रोफेसरांनी टाळी वाजवून हॉलच्या मध्यभागी बसलेल्या मॉडेलचे लक्ष वेधून घेतले आणि पाच मिनिटांची सुट्टी जाहीर केली. इतका वेळ पुतळ्याप्रमाणे स्तब्ध बसलेल्या मॉडेलमध्ये टाळीचा आवाज ऐकताच जीव आला आणि तिने चटकन बाजूला पडलेली जुनी मळकट चादर उचलून आपल्या नग्न देहाभोवती गुंडाळून घेतली. काडीने दात कोरत पेपर वाचत ती तेथेच बसून राहिली. सर्वांनी आपापले ब्रश पॅलेटवर ठेवून दिले. तरी हेन्रीचे पेंटिंग चालूच होते. त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. आठवड्यातून एकदा तरी त्याला अशी चेष्टा ऐकून घ्यावी लागे. आईचे म्हणणे बरोबर होते. वर्गातील इतर मुलांनी त्याला खड्यासारखा दूर ठेवला होता. त्यांच्या दृष्टीने तो एक श्रीमंत, खुशालचेंडू, आईचा लाडावलेला एकुलता एक लेक. वेळ घालवायला म्हणून ॲतलिएमध्ये नाव घातलेला. त्यात हेन्रीचे शारीरिक व्यंग. उपेक्षा आणि कुचेष्टा अशीच चालू राहिली तर आई म्हणत होती तशी सरळ मास्टर्स डिग्री करावी हे उत्तम.

No comments:

Post a Comment