Saturday, October 6, 2018

मुलँ रूज - २८

पीएर टँग्वी अराजकवादी म्हणून प्रसिद्ध होता. दुकानात येणाऱ्या-जाणाऱ्याला आपली राजकीय मते व भूमिका सुनावल्याशिवाय तो सोडत नसे. त्याच्या दुकानात पोचल्यावर हेन्रीने इकॅरससाठी फ्रेम मागताच दुसऱ्या क्षणी टँग्वी उसळून म्हणाला, ‘‘सॅलूनसाठी पेंटिंग पाठवत आहात. तुम्हाला माहितेय. हे सॅलून वगैरे म्हणजे सगळा बकवास आहे. भांडवलदारांचा भंपकपणा दुसरं काही नाही. हे तुझे अकादमीवाले, भडवे समजतात कोण स्वतःला? भांडवलदारांचे पित्ते आहेत एकजात. गोळ्या घातल्या पाहिजेत एकेकाला.’’
हेन्री टँग्वीचा प्रतिवाद करण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याने चटकन फ्रेमची मापे टँग्वीला संगितली. मापे वहीत टिपून घेतल्यावर टँग्वीने कोपऱ्यातला एक पोर्टफोलिओे उचलला व त्यातले जपानी प्रिंट हेन्रीला दाखवले. ‘‘त्या कॉर्मेनकडे रंग कितीही घोटलेस तरी याची सर येणार नाही.’’
ते एकूण तीन प्रिंट होते. एकात समुद्रकाठी बसलेल्या तीन वेश्यांचे चित्र होते. त्यातली एक केस विंचरीत होती, दुसरी वाळूत गुडघ्यांवर बसून शिंपले वेचीत होती, तर तिसरी आपल्याच नादात समुद्राच्या लाटांकडे टक लावून बघत होती. ते चित्र म्हणजे नजाकतदार शैलीतील चित्रणाचा एक अप्रतिम नमुना होता. चित्रातील रेषा संगीतातली लय व नृत्यगतीतला ताल घेऊन कागदावर उतरली होती.
‘‘अप्रतिम!’’ हेन्री त्याच्या हातातला प्रिंट जवळ जवळ हिसकावून घेत म्हणाला, ‘‘केवढ्याला?’’
‘‘हे विकण्यासाठी नाहीत. तुम्हाला फक्त दाखवायला म्हणून बाहेर काढलेयत.’’
‘‘पण विकत का नाही? दुकान तर थाटून बसला आहात.’’
‘‘अरे या ज्या मुली आहेत ना त्या अगदी माझ्याच मुलींसारख्या वाटतात मला. आपल्या मुली कोणता बाप विकायला काढेल.’’
एवढ्यात पाठच्या खोलीतून आवाज आला, ‘‘बारा फ्रँक पडतील. फ्रेम करून पाहिजे असेल तर चौदा.’’
‘‘अग लाडके, एवढं सुंदर चित्र तू विकायला काढलंस.’’
‘‘त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका मस्य तुलूझ्‌. यांना काहीच विकायचं नसतं. मागच्या आठवड्यात एकाने सेझानच्या पेंटिंगची किंमत विचारली. कधी नव्हे तर सेझानला गिऱ्हाईक मिळत होतं. यांनी काय किंमत सांगितली असेल माहितेय. दहा हजार फ्रँक. नशीब मी होते. पंचवीस फ्रँकला काढलं. तीन सफरचंद तर होती त्यात.’’
(सेझानच्या पश्चात थोड्याच दिवसांत त्या तीन सफरचंदांना खरेच दहा हजार फ्रँक किंमत आली. सध्या त्याची किंमत कित्येक लाख फ्रँकच्या घरात जाईल)
‘‘बायकांना कलेची काही कदर नसते. त्यांना दिसतो नुसता पैसा पैसा आणि फक्त पैसा.’’
‘‘रोजच्या जेवणातला पाव, तुमच्या चित्रांना लागणारा कॅनव्हास या सगळ्या गोष्टींना जोपर्यंत दिडक्या मोजाव्या लागतात तोपर्यंत पैशाचं महत्त्व राहणारच आहे.’’ तिने फणकाऱ्याने सांगितले.
‘‘थोडे दिवस थांब एकदा कामगारांचं राज्य येऊ दे मग...’’
नंतर दोघा नवरा-बायकोचे प्रेमळ भांडण झाले. टँग्वीने देगाससाठी थोडे रंग बांधून दिले आणि हेन्रीला निरोप दिला.
(थ्री ॲपल्स – पॉल सेझान – तैलरंग – कॅनव्हास, १८७२ – म्युसे डी’ओर्से – पॅरीस)


No comments:

Post a Comment