Wednesday, October 17, 2018

मुलँ रूज - ५५

मारी हेन्रीच्या घरी रहायला आली.
मारीच्या गृहप्रवेशानंतर हेन्रीची बाथरूम तिच्या वापरातल्या गोष्टींनी भरून गेली. कंगवे, फण्या, केसांना लावायच्या पिना, आकडे अशा असंख्य चीजा जागोजागी पडलेल्या दिसू लागल्या. ती त्याचे ब्रश, उंची सुवासिक साबण, परफ्युम वगैरे महागड्या वस्तू बिनदिक्कत वापरू लागली. तिच्या सहवासात अशा गोष्टींमुळे त्याला सुरुवातीला जो मनस्ताप व्हायचा तो आता सवयीने त्याला होईनासा झाला. त्याच्या टॉवेलला तिची लिपस्टिक लागलेली असायची. इकडे-तिकडे वाळत घातलेली तिची मळकी अंगवस्त्रे त्याच्या नजरेला खुपेनाशी झाली. एवढेच नव्हे हळूहळू त्याला हे सर्व आवडू लागले. आयुष्यात प्रथमच स्त्रीचे एवढ्या जवळून निरीक्षण करण्याची संधी त्याला मिळत होती. स्नान, वेणीफणी, प्रसाधन अशा स्त्रियांच्या म्हणून ज्या खास गोष्टी असतात त्या करताना तिला पाहाण्यात त्याला खूप मजा वाटायची. आता काय ती त्याची स्वत:ची रखेली होती.
‘‘तुम्हाला मी जर रोज यायला पाहिजे असेल तर मला पैसे द्यावे लागतील,’’ एके दिवशी सकाळीच तिने त्याला बजावले. सर्वसाधारणपणे वेश्यांना असलेली पैशांची हाव तिला नसावी असे त्याला उगाचच वाटत होते. तिच्यामध्ये गुंतल्यामुळे तिचा देह हेच तिच्याकडचे एकमेव भांडवल आहे व तो देह भाड्याने देणे हेच तिच्या उत्पन्नाचे साधन आहे हे वास्तव तो विसरला होता.
‘‘फुल नाईटला दहा फ्रँक पडतील.’’ तिच्या शब्दांनी तो ताळ्यावर आला. दिवसासुद्धा त्याच्याकडे राहिले पाहिजे, असे त्याने सांगितले तेव्हा तिला थोडे आश्चर्य वाटले, पण तिने हिशेब केला.
‘‘दिवसाचे पाच फ्रँक अलग.’’ घासाघिशीला थोडा वाव असावा म्हणून तिने भाव वाढवून सांगितला होता, पण त्याने ताबडतोब मान्य केले तेव्हा ती अचंब्यात पडली.
हेन्रीने मोठ्या उत्साहात तिला त्याच्या सगळ्या आवडत्या ठिकाणी फिरवून आणले. आपल्या मित्रपरिवाराची ओळख करून दिली. पण चार दिवसांत तिला त्याचा कंटाळा आला. त्याच्या मित्रांबरोबरच्या गप्पांचा तिला कंटाळा यायचा. मोंमार्त्रमधील त्याची जिव्हाळ्याची ठिकाणे, त्याचा मित्रपरिवार अशा कोणत्याही गोष्टीत तिला काडीचाही रस नव्हता. कला, साहित्य, राजकारण, तत्त्वज्ञान वगैरे विषयांवरील चर्चेत तिला ना गती होती ना समजून घेण्याची इच्छा. लवकरच त्याच्या लक्षात आले की, तिच्या ठायी कोणत्याही इच्छा-आकांक्षेचा लवलेशही नाही. किमानपक्षी हा एक श्रीमंत बकरा मिळालाय तर त्याला धरून असावे असा व्यवहारी विचारही तिच्या मनाला शिवला नसावा. तिचा जन्म एका झोपडपट्टीत झाला होता. दोन वेळ पोटभर जेवण मिळण्याची मुष्कील. असे असले तरीही त्याला जर ती हवी असेल तर तिच्या अटींवरच ती त्याला मिळणार होती. त्याच्यासाठी म्हणून ती तिच्या कोणत्याही सवयी सोडणार नव्हती. त्यालाच तिच्यासाठी बदलणे भाग होते आणि त्याने ते तसे जमवून घेतले.
त्याने आपले मित्र, ॲपरटीफस्‌, उंची रेस्तरॉँमधील दुपारचे जेवण, मुलँ रूजमधील रम्य संध्याकाळ या सर्वांवर पाणी सोडले. रात्रीचे जागरण व दिवसा झोप या प्रकारात कामही बंद झाले. साराला कबूल केलेल्या चित्राचे कामही रखडले. झिडलरला कबूल केलेले मुलँ रूजचे पोस्टर, त्यासाठी पेर कोटेलकडे घ्यायचे लिथोग्राफीचे धडे सर्व काही तो विसरून गेला. मॉरीसला तो टाळू लागला.
बाह्य जगाशी असलेल्या त्याच्या संबंधात एक प्रकारचा चोरटेपणा आला. तो आणि ती सोडून इतर कोणालाही त्यांच्या जगात जागा नव्हती. दिवस आळसात लोळण्यात जाई. एखाद्या रेस्तोराँमध्ये नाश्ता व जेवण. संध्याकाळ कारमेन नावाच्या एका टुकार बारमध्ये. तेथे वेश्या व त्यांचे दलाल यांची सतत वर्दळ असे. एका कोपऱ्यात ती दोघे सिगरेट फुंकत, दारू ढोसत रात्र पडण्याची वाट बघत तासन्‌तास बसलेली असायची.
हजार वेळा तरी त्याला प्रश्न पडला असेल की, आपण हे काय आयुष्य जगतोय? काय झालेय तरी काय मला. उत्तर एकच होते. मला ती हवी आहे. तिचा कोवळा लुसलुशीत मांसल देह, लासवट वासना. ती जर रखेली म्हणून राहायला हवी तर तिचे सर्व अस्तित्व जसे आहे तसे सहन करीत राहिले पाहिजे. तिच्या वर्तनात एक थंड निष्क्रियता होती. तिचा मठ्ठपणा आश्चर्यकारक होता. तिचा बांधा कमनीय होता, रतीक्रीडेच्या शारिरीक अंगात ती प्रवीण होते, पण वरचा मजला मात्र रिकामा होता. कधी कधी त्याने ज्या बुळेपणाने तिला शरणागती दिली त्याची त्याला लाज वाटायची. पण तिचा तो गात्रन्‌गात्र उत्तेजित करणारा स्पर्श, मादक चुंबन, टोकदार जिभेने केलेला लडिवाळ खेळ, कंबरेची लयबद्ध हालचाल यापुढे कशाची तमा. अवघ्या पंधरा फ्रँकच्या बदल्यात तिच्या सुकुमार देहाचा इंचन्‌इंच त्याच्या ताब्यात होता.
मार्च महिन्यातील एका सकाळी उठल्या उठल्याच तिने त्याला बँकेत खाते कसे उघडायचे ते विचारले. तिच्या या चौकशीचे त्याला आश्चर्य वाटले.
‘‘अगदी सोपे आहे ते. बँकेत जा आणि काउंटरमागे बसलेल्या कारकुनाला सांग मला खाते उघडायचंय म्हणून. बाकीचे तो सगळं करेल.’’
‘‘फक्त एवढंच. बाकी काय बी विचारणार नाहीत ना?’’
‘‘फक्त तुझं नाव तेवढं विचारेल, लेजरमध्ये लिहिण्यासाठी.’’
‘‘आणि माझे पैसे मला पाहिजे तेव्हा मिळतील?’’
‘‘अगदी व्याजासकट. काही चिंता करू नकोस.’’
ती आज प्रथमच घरच्यासारखी बोलत होती.
‘‘पण तुला बँकेत खाते कशासाठी उघडायचंय?’’
‘‘ढकलगाडीच्या परवान्यासाठी,’’ उपासमारीचे दिवस आठवून तिचा स्वर थोडा कातर झाला, ‘‘आईने बजावून ठेवलंय जेव्हा कधी चार पैसे हातात पडतील तेव्हा त्यातले थोडे ढकलगाडीचा परवाना घेण्यासाठी म्हणून बाजूला काढून ठेव. एकदा परवाना जवळ असला की मग दोन घास कसेही मिळत्यात.’’
तिच्या आईने तिच्यावर केलेला तो एकमेव संस्कार असावा. अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्याचा, आपले जैविक अस्तित्व टिकवून धरण्याचा मूलभूत संस्कार.
‘‘किती पडतात एका परवान्याला?’’
‘‘पंधराशे फ्रँक माहितेय का?’’ हेन्रीच्या लेखी किरकोळ असलेली रक्कम तिच्या कल्पनेच्या आवाक्याबाहेरची होती. त्यामुळे तो आकडा सांगताना तिची छाती दडपून गेली होती. ‘‘पण एकदा परवाना घेतला की पुन्हापुन्हा काढावा लागत नाही. मग जन्मभर जिवाला घोर नसतो.’’
‘‘तुझ्याकडे किती पैसे जमा झालेयत.’’
‘‘तीनशे.’’
एक वेळ त्याला वाटले की बाकी पैसे तिला एकरकमी देऊन टाकावेत, पण नको. एकदा पैसे हातात पडल्यावर ती परत तोंड दाखवणार नाही. बँकेत खाते उघडून आल्यावर तिने आपले खाते पुस्तक मोठ्या उत्साहाने त्याला दाखवले. नंतर कित्येक दिवस ते खाते पुस्तक तिच्या कौतुकाचा विषय झाले होते. ते पुस्तक ती सदैव जवळ बाळगायची. मधेच पर्स काढून उघडून बघायची. सारखे त्या खाते पुस्तकाविषयी बोलायची.

No comments:

Post a Comment