Friday, October 26, 2018

मुलँ रूज - ७८

मे महिना लागला आणि वसंत ऋतूची किमया पॅरीसवर जागोजागी दिसू लागली. झाडांवर नवी पालवी आली. सोलर हॅट व छत्र्या घेतलेल्या माणसांनी बुलेव्हार फुलले. पार्क मोनेक्यूवर कठपुतळ्यांचा खेळ पुन्हा सुरू झाला व तो बघायला पुढच्या पिढीतल्या मुलांची गर्दी लोटू लागली. प्रेमी युगुले बागेत एकमेकांचे चुंबन घेताना आढळू लागली. हेन्रीने जेन ॲव्हरीलचे लंडनच्या शोसाठी केलेले पोस्टर तयार झाले होते.
व्हिएन्नाचा ख्यातनाम संगीतकार ब्राह्म याच्या स्मृत्यर्थ एक संगीत महोत्सव आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचे अतिशय महागडे तिकीट काढून हेन्री मिरीयमला घेऊन गेला. कार्यक्रमाला पॅरीसमधील सगळे प्रतिष्ठीत झाडून हजर होते. त्या कार्यक्रमात ब्राह्मची सी मायनॉरमधील सिंफनी आणि पियानो कॉन्सेर्टो ऐकताना ती देहभान विसरून गेली. तिच्या आयुष्यातील तो एक रोमांचकारी अनुभव होता.
‘‘ही सिम्फनी पुन्हा कधी ऐकण्याचा योग आलाच तर मला तुमचीच आठवण येईल.’’
हेन्रीने या कार्यक्रमाला तिला बरोबर नेले याचे आभार कसे मानावेत हे तिला कळेना. कार्यक्रम संपल्यानेतर हेन्री तिच्या घरी गेला. तिने हेन्रीसाठी म्हणून कोनॅक घरी आणून ठेवली होती. ती पीत पीत बराच वेळ ते दोघे गप्पा मारीत होते. गप्पांच्या ओघात पॅरीसच्या हवामानाचा विषय आला.
‘‘या उन्हाळ्यात अर्कोनला जायचा बेत का करीत नाही?’’ मिरीयमने विचारले, ‘‘जेन म्हणत होती तेथे तुमचा एक व्हिला आणि एक बोटसुद्धा आहे.’’
‘‘अर्कोन तसं एका बाजूला पडतं, तिथला समुद्रकिनारा तसा फारसा मोठा नाही, पण जो आहे तो फार सुंदर आहे.’’
‘‘तुम्हाला माहीत नसेल. मी अजून पॅरीसच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवलं नाहीय. समुद्रकिनारा तर दूरच राहिला.’’
‘‘असं असेल तर मग चला. ताबडतोब तयारीला लागा. उद्याच व्हेर्सायपासून सुरुवात करू.’’
भारावल्यामुळे तिला काय बोलावे ते सुचेना. ती शांतपणे बसून होती. मध्यरात्र उलटून गेली होती. हेन्री तिच्याकडे अर्धोन्मिलीत नेत्रांनी पाहत होता.
‘‘हेन्री, तुम्हाला एक विचारू? तुम्ही माझ्या प्रेमात वगैरे तर पडला नाहीत ना?’’ अचानक तिने विचारले.
एक क्षणभर हेन्रीला काय उत्तर द्यावे ते सुचले नाही. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत तो म्हणाला, ‘‘छे छे. प्रेमात पडायला आता मी काही नुकतीच मिसरूड फुटलेला बच्चा नाहीय. अनुभवांचे टक्केटोणपे खाऊन मी आता शहाणा झालोय.’’
‘‘अगदी मनापासून बोलताय का हे?’’
‘‘खरंच बोलतोय मी. तुम्हाला काय वाटलं सगळे पुरुष सुंदर मुलींच्या प्रेमात पडण्यासाठी हपापलेले असतात की काय! बरेच जण तसे असतीलही, पण मी त्यातला नाहीय. मला हवी आहे तुमची निव्वळ मैत्री, तुमचा सहवास.’’ हेन्रीने मोठ्या प्रयासाने मनातील खळबळ दाबून ठेवली.
‘‘ठीक आहे. तुम्ही म्हणता म्हणून मी विश्वास ठेवते. तुम्हाला प्रेम नको असले तरी मी हवीय की नाही? खरं की नाही?’’
‘‘जर सुरुवातीपासून आपल्याला काय हवंय हे जर एकमेकांना ठाऊक असेल तर ती गोष्ट वेगळी. प्रेमात पडल्याने किंवा प्रेमाचे नाटक केल्याने आयुष्य बरबाद होतं. त्यापेक्षा बाहेरख्याली केलेली परवडली. त्यात भावनिक गुंतवणूक नसते. आता तूम्ही तरुण आणि सुंदर आहात. मलाही शरीरसुख मिळालं तर हवंच आहे. पण त्यासाठी पॅरीसमध्ये दुसऱ्या जागा उपलब्ध आहेत. माझी वैषयिक भूक शमवण्यासाठी तुम्हाला कशाला उगाच भावनेच्या जाळ्यात गुंतवू. मिरीयम, मला तुमची शुद्ध मैत्री हवीय. मला ठाऊक आहे एके दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा वेगळा मार्ग सापडेल. तोपर्यंत तरी मला तुमच्या सहवासाचा लाभ मिळाला तर मला त्यात आनंदच आहे.’’ हेन्रीच्या मनातील खळबळ शांत झाली.
‘‘गुड नाईट मिरीयम.’’ असे म्हणून त्याने उरलेली कोनॅक एका घोटात संपवून ग्लास टेबलावर ठेवला व काठी घेण्यासाठी आपला हात पुढे केला. तो उठणार इतक्यात मिरीयम त्याच्या जवळ येऊन त्याला बिलगून बसली व त्याच्या ओठांचे चुंबन घेत म्हणाली,
‘‘हेन्री, तुम्ही आज येथेच राहा.’’
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हेन्रीने मरियमला बरोबर घेऊन आपल्या साऱ्या जामानिमा सकट अर्कोनच्या दिशेन कूच केले. समुद्रकिनाऱ्यावरच्या व्हिलामध्ये मिरीयमबरोबर घालवलेले तीन आठवडे म्हणजे हेन्रीच्या आयुष्यातील परमोच्च सुखाचा काळ होता. सकाळी बऱ्याच उशिराने जेव्हा हेन्रीने डोळे किलकिले करून पाहिले तेव्हा ऊन खिडकीतून त्याच्या अंगावर आले होते. बाजूला मिरीयम अजून झोपेतच होती. अकरा वाजायला आले होते. थोड्याच वेळात वारे वाहू लागण्याचे लक्षण दिसत होते. मिरीयमची सुटी संपत आली होती. त्या दिवशी त्यांनी दुपारी शिडाच्या होडीतून समुद्रात एक फेरफटका मारला. होडीत पहिल्यांदाच बसताना मिरीयम अतिशय घाबरली होती. पण शिडे उभारून होडी खोल समुद्रात शिरल्यावर तिचा आनंद गगनात मावेना.
संध्याकाळी ते दोघे लाउंजमध्ये बसून सूर्यास्त बघत होते. आकाश निरभ्र होते. वारा पडला होता. हेन्री मिरीयमचा हातात हात घेत म्हणाला,
‘‘हे दिवस कधी संपूच नये असं वाटतं नाही?’’
‘‘पण संपणार आहेत कुठे? पॅरीसमध्ये आपण परत एकमेकांना भेटूच की.’’
‘‘पॅरीसमध्ये ते शक्य होणार नाही. मी माझ्या स्टुडिओत तू तुझ्या दुकानात. आठवड्यातून फार तर एकदा आपली भेट होणार. रेस्तराँमध्ये नाहीतर थिएटरमध्ये.’’
‘‘पण तुम्ही तर म्हणाला होता की आहे त्यात सुख मानावं. भलताच हव्यास बाळगू नये.’’
‘‘मी म्हणतो ते सहज जमण्यासारखं आहे. इथे हवा इतकी छान आहे की उन्हाळा संपेपर्यंत इकडेच राहू. शरद ऋतूच्या सुमारास पॅरीसमध्ये परतू आणि वसंत चालू झाला की परत इकडे समुद्राच्या काठी.’’ हेन्री बोलण्याच्या भरात नकळत वाहावत गेला खरा, पण तिचा हात थोडा ताठर झाल्याचे त्याला जाणवताच तो चटकन भानावर आला.
‘‘हेन्री, एक विचारू?’’ तिने त्याच्या नजरेला नजर भिडवीत सरळ विचारले, ‘‘कितीही नाही म्हटलंस तरी तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात. खरं सांगा.’’
हेन्री थोडा वेळ गप्पच होता. नंतर मान खाली घालून सावकाश म्हणाला, ‘‘होय. मागे तुम्ही हेच विचारलं तेव्हा मी खोटं बोललो होतो. मी स्वतःची समजूत घालू पाहात होतो. खरं म्हणजे मी प्रथमदर्शनीच तुमच्या प्रेमात पडलो होतो. पण कबूल करायला भीती वाटत होती आणि लाजही.’’ त्याने मान वर केली आणि तिच्याकडे पाहिले, पण तिच्या नजरेला नजर देणे त्याला जमले नाही.
‘‘मला माहीत होतं की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीय ते. तशी माझी अपेक्षाही नव्हती. जेनने तुमच्याशी ओळख करून देताना सर्व शक्यतांचा विचार करून स्पष्ट कल्पना दिली होती. तुम्हाला ज्या प्रकारचे आयुष्य जगायचे आहे ते जगण्याची संधी मी तुम्हाला देऊ शकतो. त्या बदल्यात मला प्रेम हवे आहे. खोटे का असेना. मिरीयम प्लीज मला समजून घ्या...’’ मिरीयमने त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि त्याचे शब्द त्याच्या ओठातच राहिले.
‘‘हेन्री, मी तुमची परिस्थिती समजू शकते. पण तरीही मला वाटतं की ही वेळ यायला नको होती. तुम्ही म्हणता की मी तुमच्यावर प्रेम करेन अशी तुमची अपेक्षा नव्हती. पण तरीही तुम्ही एकतर्फी प्रेम करीत राहिलात. हे चुकीचं आहे. कारण प्रतिसाद मिळण्याची वेडी का होईना अपेक्षा असल्याशिवाय नुसते एकतर्फी प्रेम होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाला होतास की मागच्या दोन अनुभवांवरून तुम्ही धडा शिकलायत. पण मला वाटतं की अजूनही तुम्ही काहीच शिकला नाहीत आणि यापुढे त्याची शक्यताही दिसत नाही. यामुळे आयुष्यात तुमच्या वाटेला नेहमीच निराशा येत राहील. माझ्या या बोलण्याने तुम्हाला यातना होत असतील नाही? पण त्याला माझा नाइलाज आहे. सत्य कितीही कठोर असलं तरी त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. आपल्या दोघांनाही आपापल्या परीने प्रेम हवं होतं. पण दोघांनाही ते मिळणं शक्य नाही. मला शक्य नाही. कारण मी त्याचा बुद्ध्याच त्याग केलाय. तुम्हाला शक्य नाही. कारण तुमचं शारीरिक व्यंग आणि कुरूपता.’’
मिरीयमचे हे शब्द त्याच्या कानात तप्त शिशासारखे शिरले. तप्त लोखंडाचा तुकडा ऐरणीवर ठोकून ठोकून सरळ करावा तशी ती पुनश्च म्हणाली, ‘‘हेन्री, तुमचा खुजेपण आणि कुरूपता तुम्ही कितीही विसरण्याचा प्रयत्न केलात, लोकांनी विसरावं आणि कोणीतरी विसरून तुमच्यावर प्रेम करील ही तुमची जी अपेक्षा आहे ती पूर्ण होणारी नाही. शक्य असतं तर मीच तुमच्यावर प्रेम केलं असतं. मी तसा प्रयत्नही केला, पण मला जमलं नाही आणि कधी जमेलसं वाटतही नाही.’’
हेन्रीने बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्याला थांबवीत ती पुढे म्हणाली, ‘‘जरा थांबा. माझं पूर्ण ऐकून घ्या. मी तुमच्यावर का प्रेम करू शकत नाही माहितेय? कारण माझं अजूनही आंद्रेवर प्रेम आहे. त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. त्याला शक्य होतं तेवढं तो मला सुखात ठेवण्यासाठी झटला असता, पण मी त्याला पैशासाठी नकार दिला. आता जरी कोणी मला ॲव्हेन्यु द बुवावरील मॅन्शन जरी देऊ केलं तरी माझं प्रेम आंद्रेवरच राहील. तुमच्याकडे पैसा आहे, उंची कपडे, फर, दागदागिने, पैशाने विकत घेता येणाऱ्या सगळ्या गोष्टी, सुखं तुम्ही मला देऊ शकाल आणि यासाठी जर मी तुम्हाला पत्करलं तर तुमच्या जागी मला तुमचा पैसाच दिसू लागेल आणि मी तुमचा तिरस्कार करू लागेन. पैशासाठी मला कोणाला तरी पत्करणं भाग असलं तर त्यासाठी मी दुसरा कोणीतरी गाठेन.’’
‘‘मला कल्पना आहे की मी तुमच्याशी फार कठोरपणाने वागतेय. तुमचं माझ्यावर प्रेम असल्याने माझं वागणं तुम्हाला क्रूरपणाचेही वाटेल. हेन्री, पैशांनी विकत घेता येणार नाहीत अशीसुद्धा काही सुखं असतात आणि ती तुमच्या सहवासात मला मिळाली आहेत. सुखाचे चार दिवस आपण एकत्र घालवलेयत. ते नातं निर्भेळ राहू दे. पैशांनी त्याची चव बिघडून जाईल.’’
थोडा वेळ ते दोघेही गप्प होते.
‘‘मग मी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे? तुम्हाला भेटायचं बंद करू?’’
‘‘तुम्ही मला भेटत राहावं असं मला अजून वाटतंय. गेल्या हिवाळ्यात आपण कसे मजेत फिरत होतो. लूव्हर, सीन, सिनेमॅटोग्राफिक, ऑपेरा, व्हेलोद्रोम. असं तुमच्याबरोबर फिरायला मला अजूनही आवडेल. पण प्रेमाचा विषय पुन्हा काढणार नसाल तर. मी सगळं तुमच्यावर सोपवते.’’
दूर क्षितिजावर सूर्य डोंगरांच्या मागे केव्हाच बुडाला होता. शिडांच्या दोन होड्या संथपणे किनाऱ्याकडे परतत होत्या. सगळ्या परिसरावर शांततेची दुलई पसरली होती.

No comments:

Post a Comment