Sunday, October 14, 2018

मुलँ रूज - ४८

मारी शार्लेत

हेन्री ब्रुसेल्सहून परत आल्यावर लगेच देगाने त्याला घरी जेवायला बोलाविले. हेन्री गेला तेव्हा देगा शर्टाच्या बाह्या वर सरकावून खाद्यपदार्थ टेबलावर मांडत होता. हेन्रीला पाहून त्याने विचारले, ‘‘ब्रुसेल्स कसं काय वाटलं? मुख्य म्हणजे तुझा शो कसा काय झाला?’’
‘‘शो तसा लोकांना आवडला असं दिसत होतं. पण समीक्षक मात्र...’’ देगा मोठ्याने हसताना पाहून हेन्री मधेच थांबला.
‘‘हे समीक्षक. तुला माहितेय,’’ देगा तेथे बसलेल्या कमिल पिस्सारोकडे पाहून म्हणाला, ‘‘इकडे बघ जरा. हा किती निराश झालेला दिसतोय बघ.’’ परत हेन्रीकडे पाहत तो पुढे म्हणाला, ‘‘समीक्षकांना तुझी पेंटिंग आवडली नाहीत ना? म्हणजे तू एक मोठा चित्रकार असल्याचं हे एक लक्षण आहे. या पिस्सारोला विचार दहा वर्षांपूर्वी ही मंडळी माझ्या चित्रांबद्दल काय लिहीत होते ते. आणि आज हीच मंडळी मला एक महत्वाचा चित्रकार म्हणून सलाम करतात.’’
त्या दिवशी देगा अगदी खुशीत येऊन गप्पा मारीत होता. अधूनमधून मित्रांना जमवून अशा बैठकी करणे हा त्याच्या एकाकी आयुष्यातील एक विरंगुळा होता. तो दिवस सगळ्यांना शिव्या घालण्याचा होता. समीक्षकांपासून झालेली सुरुवात आर्ट डिलर, अकादमीवर वर्षानुवर्षे जागा अडवून बसलेले ढुढ्ढाचार्य, कलेचे आश्रयदाते असे करता करता शेवटी गाडी त्याच्या म्हाताऱ्या स्वयंपाकिणीवर येऊन घसरली.
‘‘स्वयंपाकातल्या काही खुब्या अशा आहेत की त्या मूर्ख नोकरांवर सोपवून चालत नाहीत.’’ देगाने अतिशय काटेकोरपणे तोलून-मापून व्हिनेगर, मिरपूड व मीठ यांचे मिश्रण तयार केले. ‘‘आता यात ऑलिव्हचं तेल किती घालायचं रे? कॅमिल, तुला सॅलडमध्ये तेल भरपूर घातलेलं आवडतं की थोडंसंच?’’ त्याने मोठ्या गांभीर्याने विचारले.
‘‘च्यायला. या भुक्कड गोष्टीला किती महत्त्व देतोयस? घाल तुला हवं तेवढं.’’ पिस्सारो म्हणाला.
‘‘बघ हेन्री -’’ देगा उसळून म्हणाला, ‘‘तुझे हे इम्प्रेशनिस्ट, सॅलडच्या चवीतील सीझनिंगचे महत्त्व हा एक विचार करण्यासारखा विषय आहे हे यांना कधी पटणारच नाही. सॅलड ते काय. कसंही करता येतं. थोडं तेल, लसूण, मिरपूड, व्हिनेगर, मीठ. जे हाताला लागेल ते टाका आणि ढवळा की झालं तयार. सगळे इम्प्रेशनिस्ट असेच आहेत. ड्रॉइंग, ॲनाटॉमी. कोणी सांगितलीय एवढी तसदी घ्यायला? प्रायमरच्या पेस्टचा मोठा लपका कॅनव्हासवर फासा, त्यात थोडे गुलाबी, निळे अशा रंगांचे फराटे मारा. की झालं तुमचं पेंटिंग तयार! सनराईज - ॲन इम्प्रेशन. वा!’’
‘‘हे बघ देगा, असा चिडून तुझा इम्प्रेशनिस्टांवरचा राग त्या लेट्यूसवर काढू नकोस.’’ पिस्सारो शांतपणे म्हणाला.
‘‘हे बघ. मी जरी इम्प्रेशनिस्टांवर चिडलो असलो तरी तो राग आजच्या मेजवानीवर काढणार नाही. आज जेवण खरंखुरं अस्सल आणि पोटभर असणार आहे. नुसतं जेवणाचं इम्प्रेशन नव्हे.’’ नंतर देगा हेन्रीकडे वळून म्हणाला, ‘‘हा आमचा नेहमीचा वादाचा विषय. जाऊ दे. आता मला तुझ्या ब्रुसेल्सची हकिगत सांग. अर्थात तिथल्या लोकांनी तुला चर्चमधील प्रसिद्ध पेंटिंग दाखवली असतीलच. पण मी सांगितल्याप्रमाणे तू म्युझियममध्ये जाऊन व्हॅन डाइक पाहिलास का. तरुण माणसा, परिपूर्णता म्हणजे कशाला म्हणतात ते त्याची पेंटिंग्ज बघितल्याशिवाय कळणार नाही. काय ते हात. काय ती ड्रेपरी. त्याच्यापेक्षा जास्त परिपूर्ण काम करायचं तर फक्त देवालाच जमू शकेल. अरे तिकडे ब्रुसेल्समध्ये तू कोणाशी तरी द्वंद्वयुद्ध केलंस म्हणे. मी ऐकलंय ते खरंय का?’’
हेन्रीला हा प्रश्न अपेक्षित होता. त्या द्वंद्वाची वार्ता एव्हाना साऱ्या मोंमार्त्रमध्ये पसरली होती. ‘‘तसं प्रत्यक्षात काही झालं नाही. मी फक्त आव्हान दिलं होतं एवढंच.’’ हेन्री ओशाळत म्हणाला. ‘‘द ग्रूने व्हिन्सेंटविषयी जे वत्तव्य केलं ते मला सहन झालं नाही.’’
मग त्याने तो प्रसंग वर्णन करून सांगितला. सोसायटीने शेवटच्या दिवशी एक मेजवानी ठेवली होती. एका मोठ्या टेबलावर सर्व आमंत्रित शांतपणे समोरच्या नानाविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. लोकांच्या कुजबुजण्याचा आवाज काट्या-चमच्यांच्या आवाजात मिसळून गेला होता. आणि एवढ्यात त्याचे लक्ष द ग्रूकडे गेले. त्याचा पेहेराव मोठा उंची व दिमाखदार होता. तो म्हणत होता की ‘‘व्हिन्सेंट व्हॅन गॉगला प्रदर्शनात भाग घ्यायला बोलवायला नको होते. का तर तो वेडसर आहे. त्याने आपला कान कापून घेतल्यानंतर खरे तर त्याची रवानगी वेड्यांच्या इस्पितळातच करायला हवी होती. अशा इसमाला इथे बोलावून काय साधले?’’
हेन्रीने स्वतःवर ताबा ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्या संयमाचे बंध तुटले आणि तो आपली मूठ टेबलावर जोरात आदळत ओरडला, ‘‘मस्य द ग्रू!’’ एवढ्या जोरात की टेबलावरचे काटे-चमचे थरथरले. हातातल्या शॅम्पेनच्या बाटल्या हवेत वर धरल्या आहेत अशा स्थितीत वेटर क्षणभर गोठल्यासारखे जागच्या जागी उभे राहिले.
‘‘ज्या माणसाला स्वतःचा बचाव करता येणार नाही, अशा माणसावर टीका करणे हा भेकडपणा झाला. तू हे जे बोलतोयस तेसुद्धा त्याच्या पाठीमागे. सर्व महान माणसांना तुझ्यासारख्या मूर्खांनी कधी ना कधी तरी वेड्यात काढलं आहे. आता व्हिन्सेंट इथे हजर असता तर त्याने तुझं थोबाड फोडलं असतं किंवा त्याने तुला माफही केलं असतं. पण त्याच्या अनुपस्थितीत मी काही तुला सोडणार नाही. खरं म्हणजे तुझ्याशी तलवारीनेच दोन हात केले पाहिजेत. म्हणजे तुझे दोन्ही कान उडवता आले असते. पण त्यापेक्षा मला पिस्तूल चालवायला आवडेल.’’
‘‘आणि या द्वंद्वात मस्य तुलूझना जर काही बरं-वाईट झालं तर तलवारीचे दोन हात माझ्याशी करावे लागतील हे लक्षात ठेवा.’’ जॉर्ज सुरा उसळून म्हणाला.
नंतर उडालेल्या गोंधळात क्लबच्या प्रेसिडेंटनी द ग्रूची समजूत घातली व त्याला बाहेर काढले. सोसायटीतर्फे दिलगिरी व्यत्त करून मेजवानी आटोपती घेतली.
‘‘वंडरफुल. पूर्वी अशीच धमाल ऑलिंपिया या पेंटिंगवरून उडाली होती. त्या वेळी पेंटिंग व पेंटरशी काहीही संबंध नसलेले लोक कसे हमरीतुमरीवर यायचे व एकमेकांना द्वंद्वाचे आव्हान द्यायचे तुला आठवतय ना? बाय द वे, तुला त्या पोर्ट्रेटसाठी पोज देणारी ती मॉडेल आठवतेय कॅमिल?’’
‘‘व्हित्तोरीना. काय चिकनी होती ती. एव्हाना आजीबाई झाली असेल नाही?’’
‘‘तिच्या वक्षस्थळांइतकी सुंदर वक्षस्थळे मी अजून पाहिली नाहीत. चित्रकाराला हवी असलेली पोज व मुद्रेवरचे भाव किती चटकन द्यायची ती.’’

No comments:

Post a Comment