Friday, October 12, 2018

मुलँ रूज - ४३

२ एप्रिल १८८९. एफेल टॉवरवर फ्रान्सचा ध्वज फडकू लागला. ल ग्रँड एक्स्पोझिशन युनिव्हर्सलच्या उद्‌घाटनासाठी प्रेसिडेंट सॅदी कॅर्तोत खास शिवलेल्या दिमाखदार पोशाखात आले होते. सकाळी बरोबर दहा वाजता उद्‌घाटन झाले. शॉँ द मार्सवर उभारलेल्या नगरीत लोकांची रीघ लागली. पॅरीसवासीयांचे जगाची सफर करण्याचे आपले स्वप्न घरबसल्या पूर्ण झाले. निळसर झिरझिरीत वस्त्रे परिधान केलेल्या अर्धनग्न इजिप्शियन यौवना, टिंबक्तूमधील विणकर, सुदानी हिजडे, वक्षस्थळे उघडी टाकणाऱ्या दाहोमियन आदिवासी स्त्रिया, उघड्या अंगावर गेरूने रंगरंगोटी केलेला मॅलॅगे जमातीचा राजा, समुद्रातून मोती वेचणारे ताहितियन, गारुडी, वुडू मांत्रिक. कोणाच्या डोक्याला फेटा तर कोणाचा तुळतुळीत चमनगोटा. कोणाच्या कंबरेला झाडांची पाने, कधी नुसती लंगोटी, वाघाचे कातडे, सारोंग, किमोनो, जरीच्या साड्या, चोळणा, हस्तिदंत, कवड्या, शंखशिंपले, हाडे, शिंग अशा विविध वस्तूंपासून बनविलेली आभूषणे असे चित्रविचित्र वस्त्रालंकार परिधान केलेला विविध मानवजातींचा समूह तेथे दृष्टीस पडत होता. अनोख्या अनवट सुरावटीत ढोलाच्या तालावर नृत्यगान सतत चालू होते. ह्या साऱ्या गडबडीत हत्ती मात्र शांतपणे फिरत होते. हत्तीच्या पाठीवर बसलेली मुले उंटाच्या पाठीवर बसलेल्या बुटक्या विदूषकांच्या चाळ्यांकडे बघून खिदळत होती. स्त्रिया ट्युनिशियन ब्रेसलेट व अल्जेरियन अत्तरांच्या खरेदीत दंग होत्या. या गर्दीत आपल्या बायका-मुलांपासून हरवलेले नवरे नाचणाऱ्या मुलींच्या कनातीशी हमखास सापडत.
एक्स्पोझिशन बघण्यासाठी आलेल्या इंग्लिश लोकांमध्ये एक गोबऱ्या गालांचा शौकीन असामी होता. त्याच्या ऐटबाज कपड्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले जायचे. विशेषतः तरुणी तर त्याला बघण्यासाठी पागल झालेल्या दिसत होत्या. ह्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या असामीचे नाव होते एडवर्ड, प्रिन्स ऑफ वेल्स. जरी हा इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणीच्या दरबारातील एक वाह्यात इसम म्हणून प्रसिद्ध असला तरी इथे फ्रान्समध्ये मात्र त्याला राजाचा मान मिळत होता. आपल्या गुणी राजाचा गिलोटीनखाली शिरच्छेद करणाऱ्या क्रांतिकारकांची नातवंडे, पतवंडे या सतत सिगार ओढणाऱ्या राजपुत्राचा घसा फुटेस्तोवर ओरडून जयजयकार करीत होती. शंभर वर्षांपूर्वी एका गुणी राजाचे शिर ज्या नगरीत उडविले गेले त्याच नगरीत आज या नादान राजाच्या शिरावर फुले उधळली जात होती.
सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली ती मस्य थॉमस एडिसन या अमेरिकन असामीला. बोलणारे यंत्र, सूर्याला काचेच्या गोलात बंदिस्त करणारा विजेचा दिवा अशा असंख्य विस्मयकारक गोष्टींचा जनक. तो जेव्हा विजेवर चालणाऱ्या पाळण्यात बसून एफेल टॉवरच्या सर्वात उंच टोकापर्यंत गेला तेव्हा ते दृश्य बघायला जमलेल्या अफाट जनसागराने हर्षभरित होऊन त्याचा उत्स्फूर्त जयजयकार केला. अशी मानवंदना कोणा सम्राटालासुद्धा कधी मिळाली नसेल.
वर्तमानपत्रांनी वर्णिल्याप्रमाणे पॅरीसवर अखिल जगताने जणू आक्रमण केल्यासारखे भासत होते. कॅफेमध्ये जगातल्या यच्चयावत भाषा कानी पडत. वेटर आणि बारटेंडरना विनिमयाचे दर चांगलेच कळू लागले होते. एक डॉलर म्हणजे पाच फ्रँक, पौंडाचे पंचवीस फ्रँक तर रुबलला चार फ्रँक. जुजबी व्यवहारातील चार-पाच वाक्ये बहुतेकांना येऊ लागली. तर बारमध्ये परदेशी गिऱ्हाइक पटवणाऱ्या मुली थोड्याच दिवसांत बहुभाषातज्ज्ञ झाल्या.
मोंमार्त्रमध्ये मुलँ रूजवरील चक्र रात्री त्याच्यावर लावलेल्या लाल दिव्यांच्या झगमगाटात फिरू लागे. हेन्री तेथे रोज नेमाने हजेरी लावत असे. मागच्या शरद ऋतूपासून झिडलरचे स्वप्न आकारताना तो त्याचा साक्षी होता. झिडलर दररोज किमान पंधरा-सोळा तास तरी काम करी. तो सगळीकडे तोंडातील चिरूट चघळत, कधी हसत तर कधी ओरडताना आढळायचा. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर त्याची जातीने देखरेख असायची. वेगवेगळ्या कामांचे कंत्राटदार, परातीवर चढलेले कामगार, गालिचे, क्रोकरी, वाणसामानाचे दलाल इत्यादी गोष्टींकडे त्याचे एकाच वेळी लक्ष असे.
इमारतीचा सांगाडा उभा राहिल्यावर तालमी सुरू झाल्या. सभोवताली घणांचे कानठळ्या बसवणारे आवाज, करवतीची करकर, मुकादमांचा आरडाओरडा, रंगांचे उग्र वास असा गदारोळ चालूच असायचा. ल एलीसमध्ये नाचणाऱ्या बहुतेक सगळ्या मुलींना झिडलरने तेथे आणले होते. त्या हेन्रीला बघून आवर्जून त्याच्याकडे येत. तालीम मास्तरच्या शिस्तबद्ध तालमींमुळे कॅनकॅनचे लोकनृत्य हे स्वरूप बदलून त्याला काटेकोरपणे ताला-सुरांवर बसवलेल्या बंदिस्त नृत्यप्रकाराचे रूप येऊ लागले. झिडलर कित्येकदा आपले मन हेन्रीजवळ मोकळे करीत असे. त्या दरम्यान हेन्रीची त्याच्याशी चांगली दोस्ती जमली. हेन्रीची काही पेंटिंग झिडलरने लॉबीत लावायला म्हणून घेतली. त्यांपैकी लॉबीमध्ये लावलेल्या फर्नांदो द रिंगमास्टरह्या भव्य पेंटिंगकडे आत शिरताच लक्ष जाते.

(सिर्क द फर्नांदो हे पेंटिंग मुलँ रूजमध्ये लावलेले आजही आपल्याला पाहायला मिळते.)


(सिर्क द फर्नांदो – तुलूज लोत्रेक – तैलरंग, कॅनव्हास – ९८x१६१ सेमी, १८८८ – आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो) 

No comments:

Post a Comment