Thursday, October 11, 2018

मुलँ रूज - ४०

हेन्रीचे जीवन उलथवून टाकेल अशी एक घटना घडली. एखाद्या कादंबरीतल्याप्रमाणे कपोलकल्पित व असंभाव्य वाटावी एवढी ती घटना विलक्षण होती. पण अशा गोष्टी प्रत्यक्ष जीवनातच घडत असतात. कित्येक वेळा सत्य हे कल्पिताहून अद्‌भुत असते हेच खरे.
‘‘मॉरीस!’’
तो दरवाजात उभा होता. गोरापान, उंच, देखणा, डोक्यावर हॅट, कोट, तलवारकट मिशा. तेओ व्हॅन गॉगसारख्या. फक्त दाढीच काय ती कमी. चेहऱ्यावर तोच भोळाभाबडा, सरळ, गंभीर भाव. तसेच निळसर डोळे. बघताक्षणी प्रेमात पडावे असे.
‘‘हेन्री!’’
या धडाक्यानंतर जो जल्लोश उडाला त्यात नक्की काय झाले ते कळणे शक्य नव्हते. पण एवढे मात्र ठामपणे सांगता येईल की, मादाम ल्युबेतच्या हातातील वर्तमानपत्र खाली पडले आणि तिने जेव्हा चष्म्याच्या काचेवरून पाहिले तेव्हा तिला एक विनोदी दृश्य दिसले. एक ताडमाड उंच माणूस व एक बुटका एकमेकांना मिठी मारताहेत, हस्तांदोलन करताहेत, पाठीवर थाप मारताहेत आणि चित्रविचित्र हावभाव करून सात मजली हसताहेत.
‘‘मादाम ल्युबेत हा मस्य मॉरिस ज्वाय्याँ. माझा लहानपणचा दोस्त. अगदी सख्ख्या भावासारखा. पंधरा वर्षांनी आम्ही भेटतोय. मला वाटत होतं की हा बेटा लिओनमध्ये आहे आणि याला वाटत होतं की मी आल्बीमध्ये. खरे म्हणजे आम्ही लहानपणी कॅनडात जाऊन फासेपारधी व्हायचं ठरवलं होतं. त्यासाठी आम्ही घोडेस्वारी शिकायला सुरुवात केली होती. पण कॅनडातील जंगलाऐवजी आता भेटतोय पॅरीसमध्ये. तसं बघायला गेलो तर पॅरीससुद्धा जंगलच म्हणायला हवं. पॅरीसमध्ये असूनसुद्धा दोन वर्षं एकमेकांना पत्ता लागला नाही. आहे की नाही गंमत.’’
 हेन्री बोलता बोलता अचानक थांबला. त्याच्या चेहऱ्यावर क्षणिक विषण्णता दाटून आली. पण पुढच्या क्षणी तो सावरला. बालपणीच्या स्वप्नरंजनातून बाहेर पडून परिस्थितीचे दाहक वास्तव त्याने वयाची पंचविशी गाठण्याच्या आतच स्वीकारले होते. त्या दोघांचा उतू जाणारा आनंद पाहून मादाम ल्युबेतचे डोळे पाण्याने भरून आले. तिच्या लाडक्या छोट्या मस्यला त्याचा बालमित्र भेटला होता. तिने धावत खाली जाऊन दोन वाडगे भरून खीर आणली व त्या दोघांना बळेबळे खाऊ घातली.
‘‘थंडी अजून संपलेली नाही. सकाळी बाहेर पडण्यापूर्वी काहीतरी पोटात गेलेलं बरं.’’
‘‘माझा पत्ता कसा मिळाला तुला?’’ हेन्रीने विचारले.
‘‘तो तर एक योगायोगच घडला. मी पॅरीस इलस्ट्रेटेडचा उपसंपादक म्हणून काम करतोय. तुझी गेल्या दोन महिन्यातली प्रसिद्धी ऐकून होतो. पण तू गेली दोन वर्षे पॅरीसमधल्या या मोंमार्त्रमध्येच ठाण मांडून आहेस हे मात्र ठाऊक नव्हतं. आज सकाळी मी आमच्या प्रिंटरकडे काही गॅलीज घेऊन गेलो होतो. तेथे लिथोग्राफीच्या डिपार्टमेंटमध्ये काही ट्रायल प्रुफ्स पडली होती. जरा वेगळी वाटली म्हणून पाहायला गेलो तर खाली तुझी सही पाहून उडालोच. त्याला विचारलं तर त्याने सांगितलं की तू पॅरीसमध्ये राहतोयस म्हणून. मी ताबडतोबच तुझ्या आईचं घर गाठलं. तिने मला हा पत्ता दिला.’’
मधे पंधरा वर्षांचा काळ गेला होता. शैशव संपून दोघांनीही तारुण्यात पदार्पण केले होते. बालपणीच्या मैत्रीचे धागे अजून अतूट होते. जुन्या आठवणींना उजाळा देत, मधल्या काळातल्या गोष्टी एकमेकांना सांगत लवकरच तो कालखंड भरून आला. दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी असली तरी त्यात चित्रकलेवरील प्रेम हा समान धागा होता. त्यामुळे लवकरच ते एकमेकांना पूरक ठरणार होते. त्यामुळे वादांना आता नवे मुद्दे मिळाले.
‘‘हे बघ. चित्रकलेवर माझं प्रेम आहे. तर त्यातच का करियर करू नये.’’
‘‘तुला नक्की काय करावंसं वाटतंय?’’
‘‘मी स्वतः चित्रकार होऊ शकणार नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. ते अंग माझ्यात नाही. पण कलेशी संबंधित असं काहीतरी. उदाहरणार्थ, आर्ट डिलर.’’
‘‘आर्ट डिलर,’’ स्टुलावरून हातातल्या पॅलेटसकट गरकन वळून हेन्री म्हणाला, ‘‘तुला हे भिकेचे डोहाळे कुठून लागले रे बाबा. चित्रकारीइतकाच चित्रविक्री हा व्यवसाय दळिंदर आहे. तुला ठाऊक नाही, आजकाल या पॅरीसमध्ये प्रत्येकजण पेंटिंग करू लागलाय. आता जर सगळे लोक स्वतःच चित्र काढायला लागले तर विकत कोण घेणार? आहेस तिथेच नेटाने राहा. चार-पाच वर्षांत पॅरीसमधल्या एखाद्या ख्यातनाम नियतकालिकाचा संपादक होशील.’’

No comments:

Post a Comment