Tuesday, October 2, 2018

मुलँ रूज - १९


दुसऱ्या दिवशी हेन्री रू क्लॉझेलवरच्या पिएर टँग्वीच्या दुकानात रंग व कॅनव्हास घ्यायला म्हणून गेला. कला साहित्याच्या दुकानासाठी रू क्लॉझेल अगदी सर्वतोपरीने अयोग्य असा भाग होता. दिवसभर तिकडे शुकशकाट असे. रात्र जसजशी उलटू लागे तशी त्या भागाला जाग येई. त्या भागातल्या काळ्याकुट्ट अंधारामुळे मोंमार्त्रमधल्या ठग, वेश्या व त्यांचे भडवे यांना हा भाग आपल्या हालचालींना सोयीचा वाटे. पण टँग्वीचे तेथे दुकान असायला नेमकी हीच गोष्ट कारणीभूत होती. कारण तो एक पक्का अराजकवादी होता. कला ही सामाजिक जाणिवेचा एक आविष्कार आहे आणि त्यासाठी कलेने आपल्या सभोवतालच्या तळागाळातल्या सर्वहारावर्गाच्या सान्निध्यात राहिले पाहिजे आणि प्रस्थापितांविरुद्ध बंड करणाऱ्यांना सर्वतोपरीने मदत केली पाहिजे, असे त्याचे ठाम मत होते. या मताला अनुसरून त्याने आपल्या खिडकीवर सेझानची काही प्रेम न केलेली पेंटिंग्ज लावली होती.
हेन्री दुकानात गेला तेव्हा टँग्वी पाइप ओढत काउंटरवर बसला होता.
‘‘या! मस्य. अलभ्य लाभ. तब्येत काय म्हणतेय तुमची? मस्य रॅचो काय म्हणताहेत.’’ त्याने सगळ्यांची मोठ्या आस्थेने चौकशी केली. ‘‘सध्या हवा अगदी खराब आहे. या खराब हवेने धंदा बसलाय हो. दिवसभर काळोखी वातावरण. या वातावरणात स्टुडिओत चित्र रंगवायला पुरेसा उजेड कुठून मिळणार. परिणामी रंगांचे गिऱ्हाईक बंद.’’
‘‘पण थोडे दिवस थांबा.’’ दरवाजाकडे हळूच बघत तो म्हणाला, ‘‘जेव्हा क्रांती होईल तेव्हा हे सगळं बदलून जाईल. सर्व चांगल्या कलाकारांना, म्हणजे आपले सामाजिक जाणीव असलेले हो, सरकारतर्फे सर्व काही पुरवलं जाईल. आम्ही त्यांची अगदी खास बडदास्त ठेवू.’’
‘‘आणि सामाजिक जाणीव नसलेल्यांचं काय करायचं?’’
‘‘त्यांचं काय करायचं म्हणता. अहो क्रांतीत त्यांना सरळ गोळ्या घालायच्या. मुळावरच घाव. काय?’’ टँग्वी अगदी हलक्या आवाजात बोलला.
नंतर बराच वेळ टँग्वी ल कम्युन च्या आठवणी सांगत होता. १८५० मध्ये पॅरीसमध्ये समाजवाद्यांनी केलेल्या त्या ऐतिहासिक उठावात त्याचा थोडाफार सहभाग होता. त्याच्या रूमानी आठवणी सांगताना तो अगदी मोहरून गेला होता. दर वेळेला तीच ती गोष्ट ऐकून हेन्रीला पाठ झाली होती. पण पुन्हा एकदा ते पुराण हेन्रीला ऐकवून झाल्यावरच त्याने हेन्रीला काय हवे आहे ते विचारले.
बरोबर घेता येईल ते सर्व सामान घेऊन हेन्री घरी परतला. मागाहून पाठवून दिलेला आठ बाय आठचा कॅनव्हास दुपारपर्यंत येऊन पोहचला. पुढच्या दोन-तीन दिवसात हेन्रीने कामाला सुरुवात केली. इकॅरस ड्रॉइंग हिज विंगज्‌. त्या उडणाऱ्या अथेन्सवासीयांचे भूत पुढचे काही महिने त्याच्या मानगुटीवर स्वार झाले होते. त्याचे भवितव्य, सारी उमेद त्या इकॅरसशी निगडित झाली. ओग्युस्तिनामध्ये दुपारचे जेवण झाल्यावर गप्पाटप्पात वेळ न दवडता तो सरळ घरी जायचा व तडक कामाला सुरुवात करायचा. रॉ अँबरच्या शॅडोज्‌ व रंगांची काळजीपूर्वक घुटाई.
हेन्रीचे काम बघायला काहीतरी निमित्त काढून मादाम ल्युबेत येऊन बसायची. त्याची पॅलेट रॉ अँबरने भरलेली असायची. बहुतेक प्रायमरी शॅडोज्‌ भरून झाल्या होत्या. ब्रशचे फटकारे दिसू नयेत म्हणून हेन्रीने ते घोटून घोटून इतके गुळगुळीत केले होते की सगळ्या कॅनव्हासला सॅटीनसारखी चकाकी आली होती. इकॅरससाठी निवडलेल्या डमीचा चेहरा अगदी कमालीचा रेखीव होता. सरळ नाक, नाजूक जिवणी, पुष्ट स्नायू. पण डोळे निर्जीव आणि चेहरा मूर्खासारखा. हे सगळे कॅनव्हासवर चितारताना कधी एकदा हा इकॅरस संपतोय असे हेन्रीला झाले होते. सारखे खाली-वर करून हेन्री अगदी थकून जाई. अशा वेळी तो दुसरा एखादा छोटा कॅनव्हास रंगवायला घेई. रू कुलँकुरवरील एखादी धोबीण हातात कपड्यांनी भरलेली टोपली घेऊन जातेय किंवा कॅफेत पाहिलेल्या एखाद्या वेश्येचा चेहरा. नाहीतर ल एलीसमधल्या कॅनकॅन डान्सरचे आदल्या रात्री केलेले स्केच रंगवायला घ्या. अशा पेंटिंगमध्ये तो हिरवा, लाल, निळा मनाला येईल त्या रंगांचा अगदी मुक्तपणे वापर करायचा. त्या वेळी त्याचा शीण कुठल्या कुठे पळून जाई.
एके दिवशी असाच तो कॅनकॅनचे दृश्य रंगवत बसला असता धाडकन त्याचे वडील आत आले. मादाम ल्युबेतने घाबरून नजर फिरवली आणि ती हळूच निघून गेली.
तुमच्या मांसाहेबांनी सांगितलं की तुम्ही एक स्टुडिओ घेतला आहे. म्हणून मी तुमचं कसं काय चाललंय ते बघायला आलो.हात पाठीमागे घेऊन येरझाऱ्या घालत ते बोलत होते. इकडे तिकडे पाहत ते हळून म्हणाले, “जागा काय वाईट नाहीय. पण इमारत थोडी मोडकळीला आलेली दिसतेय. मी ऐकलंय की मोंमार्त्रमधल्या बहुतेक सगळ्या इमारतींची अशीच अवस्था आहे.
बोलता बोलता ते खिडकीजवळ गेले. ‘‘वा! इथून बाहेरचं दृश्य मात्र अगदी झकास दिसतय हां.’’ त्यांनी पाठ वळवली. स्टुडिओतल्या इकडे तिकडे पडलेल्या कॅनव्हासवर नजर फिरवत ते पुढे म्हणाले, ‘‘लहानपणी तुम्हाला सारखी चित्रं काढायला हवी असायची. आता तुम्हाला इकडे हवी तितकी चित्रं काढता येतील. कोणी सांगावं एके दिवशी तुम्ही चांगले चित्रकार व्हाल. त्या बिचाऱ्या मस्य प्रँस्तोंसारखे.’’
त्याने वडिलांकडे भीत भीत पाहिले. त्यांचा तो पहिला रुबाब वरवर कायम होता. पण आत ते कुठेतरी दुःखाने पोखरल्यासारखे वाटत होते. आपला मुलगा, लोत्रेक घराण्याचा वंशज आपल्यासारखा देखणा, दणकट, घोडेस्वारीत तरबेज असावा. शिकारी, मेजवान्या, नृत्य समारंभाला त्याला आपल्याबरोबर नेता यावे हे त्यांच्ये स्वप्न मोडल्याचे दुःख ते लपवू शकले नव्हते.
‘‘अरे हे काय आहे?’’ इकॅरसच्या कॅनव्हासकडे हातातल्या काठीच्या टोकाने निर्देश करत ते म्हणाले.
‘‘माझं सॅलूनसाठी पेंटिंग.’’
‘‘हा या विचित्र पंखांनी काय करतोय?’’
‘‘ती एक ग्रीक पुराणातली कथा आहे. इकॅरसची. त्याला पक्ष्यासारखं उडून समुद्रापार जायचं असतं. त्यासाठी त्याला त्याचे वडील डीडॅनस मेणाचे पंख बनवून देतात. पण उडण्याच्या भरात तो सूर्याच्या इतका जवळ जातो की त्याचे मेणाचे पंख वितळून जातात व तो भर समुद्रात कोसळून पडतो.’’
‘‘बरं झालं. जगातला एक मूर्ख कमी झाला.’’ हातातली काठी गरगर फिरवीत ते म्हणाले, ‘‘ठीक आहे मी निघतो आता. तुम्ही आनंदात आहात हे बघून बरं वाटलं.’’
जाता जाता त्यांचे लक्ष कॅनकॅनच्या कॅनव्हासकडे गेले. ‘‘तुम्ही असली चित्रं काढता ते तुमच्या माँसाहेबांना ठाऊक आहे का?’’ यावर हेन्री काही बोलला नाही.
‘‘ही तर शुद्ध अश्लील चित्रं झाली. आपला मुलगा असली गलिच्छ चित्रं काढतो हे त्यांना कळलं तर त्यांना केवढा धक्का बसेल याचा विचार कधी केलाहेत तुम्ही? वेश्या त्यांच्या जागीच ठीक दिसतात. कॅनव्हासवर नव्हे.’’ असे बोलून दुसऱ्या क्षणाला ते ताडताड निघून गेले.

No comments:

Post a Comment