Tuesday, October 16, 2018

मुलँ रूज - ५३

त्या दिवशी संध्याकाळी घरी जाताना त्याची फार धावपळ उडाली होती. कारण मारीने ठीक सात वाजता येईन म्हणून सांगितले होते. त्याला लिथोग्राफी शिकण्यासाठी म्हणून पेर कोटेलकडे जायचे होते. पण आता त्याला त्यापेक्षा जास्त महत्वाचे काम होते. मुलँ रूजच्या पोस्टरच्या कामात एका दिवसाने एवढा काय फार मोठा फरक पडणार होता? झिडलर थोडा थांबू शकेल. पण मारी पुन्हा थोडीच भेटणार आहे? रात्री काय काय करायचे ते त्याने सर्व ठरवून ठेवलेले होते. रेस्तोराँमध्ये जाऊन जेवण्यापेक्षा खऱ्या प्रेमिकांप्रमाणे घरीच जेवण घ्यायचे. वाईन कोणती आणायची. शॅम्पेनच हवी ही घटका साजरी करायला. शॅम्पेन पिता पिता तिच्या चित्तवृत्ती खुलून येतील, ती हसेल, हसता हसता लाडात येईल. अशा वेळी उत्तेजित होऊन थोडासा नर्म शृंगार, किंचित चावटपणा करता येईल. थोडीशी फुलेसुद्धा आणली पाहिजेत. त्याशिवाय स्टुडिओेला घरपण येणार नाही. एका चांगल्या रेस्तोराँमध्ये त्याने जेवणाची ऑर्डर दिली. बरोबर मोये ए शाँदाँ ७८ व कोनॅक. ऑर्डर देऊन झाल्यावर काहीतरी खायला म्हणून क्रिमरीमध्ये जात असता त्याला हाक ऐकू आली.
‘‘बाँज्यूर मस्य तुलूझ्‌. काय योगायोग पाहा. मी तुमच्याकडेच यायला निघालो होतो.’’ हेन्रीला पाहून पाटू म्हणाला.
‘‘काय खास काम?’’
‘‘तसं महत्वाचं काही नाही. पण तुम्हाला एक सूचना करायची होती. तुमच्या भल्यासाठी म्हणून.’’ हेन्रीला तो जवळच्या एका क्रिमरीमध्ये घेऊन गेला. तिथे फक्त पौष्टिक पदार्थ मिळत. उदाहरणार्थ, अंडी, लोणी, चीज वगैरे. पेय फक्त दूध. अशी दुकाने नगरपालिकेने गरिबांना चांगले व पौष्टिक पदार्थ वाजवी दरात मिळावेत व ते दारूसारख्या व्यसनांपासून दूर राहावेत म्हणून मुद्दाम गरीब वस्तीत उघडली होती. अशा दुकानांत कमालीची स्वच्छता असे.
खाणे झाल्यावर पाटू म्हणाला, ‘‘काल तुम्ही मला चांगली थाप मारलीत. मला सहसा कोणी बनवू शकत नाही. पण काल तुमच्या थापेवर माझा विश्वास बसला. पण तुम्ही गेल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्ही माझा मामा केलायत ते. मला बनवलंत त्याचं एवढं काही नाही. पण तरीही मी एका बाबतीत तुम्हाला सावध करणार आहे. तुम्ही त्या मारीचा नाद सोडा.’’
तिचे नाव त्याला कळल्याचे लक्षात येताच हेन्री चमकला. पण त्याने ते दिसू दिले नाही.
‘‘तुम्ही खूप तरुण आहात. तुमच्यापेक्षा चार पावसाळे मी जास्त पाहिले आहेत. माझा सल्ला ऐका. काल रात्री तुम्ही तिला घरी घेऊन गेलात. एका रात्रीने काही बिघडत नाही. पण तिला घरात कायमची ठेवू नका. ती एक नालायक, फुकट गेलेली पोरगी आहे. नासक्या फळासारखी. माझ्या विभागाच्या हद्दीत असली पोरटी मला नकोय. ताबडतोब तिला हाकलून द्या. तेच तुमच्या हिताचे आहे.’’
‘‘तुम्हाला तिची फारशी माहिती दिसत नाहीय. ती एक भटकी वेश्या आहे. वेश्यांना प्रीफेक्टकडे जाऊन नोंदणी करणं कायद्याप्रमाणे आवश्यक असतं. पण बऱ्याच वेश्या ते करणं टाळतात. एक म्हणजे नोंदणीकृत वेश्यांना महिन्यातून दोनदा सँ लझारला जाऊन तपासणी करून घ्यावी लागते. ती त्यांना नको असते. दुसरं म्हणजे असं कार्डाशिवाय रस्त्यावर फिरण्यात त्यांना एक प्रकारची फुशारकी वाटते. त्यामुळे अशा रस्त्यावर फिरणाऱ्या वेश्यांची नियमित तपासणी होत नाही. तिला काय रोग झाले असतील त्याचा आपल्याला पत्ताही लागणार नाही. माझे ऐका. लाथ मारून हाकलून द्यायच्या लायकीची पोरगी आहे ती.’’
‘‘अशा पोरींचा जन्म कुठल्या तरी झोपडपट्टीत होतो. आईच्या दुधातूनच त्यांना सगळ्या दुर्गुणांचे बाळकडू मिळत असते. गटाराच्या कडेला खेळत खेळत त्या वाढतात. पाचएक वर्षांची झाली की त्यांचे आई-बाप त्यांना भीक मागायला पाठवतात. बाराव्या वर्षापासून धंद्याला लागतात. सुरुवात दुकानाच्या वळचणीला नाही तर एखाद्या सार्वजनिक मूत्रीत होते. पंधराव्या वर्षापासून दिव्याच्या खांबाखाली उभ्या राहायला लागतात.’’
‘‘सार्जंट पाटू, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही त्या मुलीला नीट पाहिलंसुद्धा नाही.’’ इतका वेळ गप्प राहून ऐकणारा हेन्री म्हणाला.
‘‘एकदा पाहिलेला चेहरा आम्ही पोलीस लोक आयुष्यात विसरत नाही. काल मला वाटलं होतं मी चुकत असेन. पण आज सकाळी थोडा तपास केल्यावर खात्रीच पटली. आता तुम्हाला तिचा सगळा इतिहासच सांगायला हवा. तिचे पूर्ण नाव मारी फ्रँक्वा शार्लेत. तिचा जन्म ऱ्यू मुफतार्दमध्ये झाला. असा काही भाग पॅरीसमध्ये आहे हे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना ठाऊकही नसेल. दारूच्या भट्ट्या ज्या भागात आहेत तोच हा भाग. तुम्ही जर कदाचित तिथे पाऊल ठेवलंत तर घाण व दुर्गंधीने तुम्हाला उलटी होईल. या ठिकाणी तुमच्या या मारीचा जन्म झाला. तिची आई तरुणपणी रस्त्यावर उभं राहून धंदा करायची. आता तिच्याकडे ढकलगाडीचा परवाना आहे. बाप एका गावठी दारूच्या गोदामात कामाला होता. प्यायला फुकटची मिळाल्याने नेहमी पिऊन टेर असायचा. मारीची थोरली बहीण रोझ सोळाव्या वर्षी घरातून पळून गेली व सॅबॅस्टोपलला राहायला आली. पाठोपाठ तीन वर्षांनी मारी तिला येऊन मिळाली. त्या वेळी मी सॅबॅस्टोपलच्या ठाण्यावर होतो. म्हणून एवढ्या खात्रीने सांगतोय.’’
‘‘आज सकाळीच मी सॅबॅस्टोपलला जाऊन आलो. मारीच्या नावाची फाईल त्यांच्याकडे आहे ती पाहिली. बेबेर नावाच्या एका मवाल्याबरोबर तिची खास मैत्री आहे. एखाद्या माजावर आलेल्या कुत्रीसारखी ती त्याच्याशी लगट करीत असते. भडवेगिरी, अधूनमधून भुरट्या चोऱ्या, बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांची किरकोळ कामे करून गुजराण करणाऱ्या गुंडांपैकी तो एक छोटा गुंड आहे. अशा लोकांच्या आयुष्याची अखेर ठरलेली असते. एक तर रस्त्यावरच्या मारामारीत कोणाच्या तरी हातून मरण आणि याच्या हातून कोणी मारला गेला तर मग गिलोटीनखाली शिरच्छेद. वयाची तिशी गाठायला मिळाली तरी नशीब. पस्तीस म्हणजे डोक्यावरून पाणी.’’
‘‘अशा मवाल्यावर या मारीसारख्या कोवळ्या पोरी कशा भाळतात कळत नाही. तिला चार पैसे मिळाले की ती सगळे याच्या स्वाधीन करते. मग हा चार दिवस केसांना पोमेड लावून, गळ्यात रुमाल बांधून फिरेल. आणि रात्र झाली की दारू पिऊन टेर. ही मारी त्या बेबेरसाठी एवढा जीव टाकत होती तरी एक दिवस त्याने ढुंगणावर लाथ मारून तिला बाहेर काढलं. त्यानंतर ती जी गायब होती ती काल या भागात गस्त घालताना दिसली.’’
हेन्री हातातल्या सिगरेटच्या थोटकाकडे बघत होता. मारी एक गावभवानी आहे हे त्याला ठाऊक होते. दारुडा बाप, रांड आई, छिनाल बहीण, भडवा प्रियकर. मारीच्या आयुष्यातील या गोष्टी वेश्येच्या जीवनातील अभिजात घटकांसारख्याच होत्या. तिने एखाद्या गुंड व दुष्ट प्रवृत्तीच्या इसमावर प्रेम करावे हेसुद्धा वेश्यांच्या अभिजात पार्श्वभूमीला साजेसे होते. तिचे आपल्यावर प्रेम वगैरे बसेल असे वाटण्याइतका तो उल्लू नक्कीच नव्हता. पण तरीही त्याच्या मनात चलबिचल झाली.
‘‘हाकलून द्यायला काय कारण घडलं?’’ निव्वळ कुतूहलापेक्षा जास्त काही अर्थ काढता येऊ नये याची काळजी घेत त्याने विचारले.
पाटू जोरात हसू सागला, ‘‘कारण सरळ आहे. त्याला जेवढे पैसे हवे होते तेवढे ती त्याला पुरवू शकत नव्हती. याचा अर्थ असा नव्हे की स्वतःसाठी ती काही राखून ठेवायची. आपली सगळी कमाई ती त्याच्या हवाली करायची, पण त्याची अपेक्षा अशी होती की, तिने तिच्याकडे जे भांडवल आहे त्याचा वापर पूर्ण क्षमतेने करून जास्तीत जास्त पैसे कमवावेत, पण तेच तिला नीटपणे जमत नव्हतं. कारण ती खरोखरच त्याच्या प्रेमात एवढी आकंठ बुडाली आहे की तिचे धंद्यावर नीट लक्ष लागत नव्हतं. कधीतरी अक्कल येईल म्हणून वाट बघून शेवटी तो कंटाळला. एक आठवडा तिने काहीच धंदा केला नाही तेव्हा त्याने दिली हाकलून.’’
अचानक त्याच्या आवाजात हळुवारपणा आला. ‘‘मला कल्पना आहे की तुम्हाला हे सगळं ऐकून त्रास होतोय ते. पण ही सगळी कहाणी मी तुम्हाला ती पोरटी कशी फुकट गेलेली आहे ते समजावे म्हणून सांगतोय. तुम्ही फ्रान्समधील एका घरंदाज घराण्यातील आहात. मस्य कॉम्ते अल्फान्सो तुमचे पिताजी...’’ किंचित हसून तो पुढे म्हणाला, ‘‘ होय. तुमच्याविषयी सगळी माहिती आम्ही गोळा केलीय. आमच्या व्यवसायाचा तो भागच आहे म्हणा ना.’’
‘‘तुम्ही सगळ्यांची एवढी माहिती गोळा केलीय. आता तुमच्याविषयी काही आम्हाला सांगाल की नाही?’’
पाटूच्या ठोकळेबाज चौकोनी चेहऱ्यावर मार्दव आले. तो हळुवार आवाजात म्हणाला, ‘‘मला एक मुलगी आहे. कोणालाही हेवा वाटावा एवढ्या गुणाची आहे माझी लेक. पुढच्या वर्षी लग्न होईल तिचं. मुलगा अगदी हुशार व होतकरू आहे. एकुलत्या एक लेकीचा हात त्याच्या हातात देताना सगळी चौकशी करून खात्री करून घेतलीय.’’
‘‘मारीविषयी एवढी माहिती देऊन मला सावध केलंत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. काल तुम्हाला थाप मारली ते माझं चुकलंच. त्यावद्दल मला माफ करा. याची भरपाई करण्यासाठी मी तुमच्यासाठी काही करू शकलो तर मला बरं वाटेल.’’
‘‘त्याची काही गरज नाही. मी माझं कर्तव्य केलं. तुम्ही आपण होऊन म्हणताय म्हणून सांगतो. माझ्या लेकीचं एक पोर्ट्रेट करून घ्यावं असा विचार आहे. लग्न होऊन सासरी गेली की आठवण डोळ्यांसमोर राहील. आर्टिस्टची फी द्यायला पुरेसे पैसे नाहीत म्हणून बेत सारखा पुढे ढकलत होतो. तुम्ही करून दिलंत तर माझी बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण होईल.’’
‘‘वा! तुमच्या मुलीचं पोर्ट्रेट करायला मला आवडेल. माझ्या स्टुडिओवर तिला फुरसतीने घेऊन या. माझा पत्ता तुम्हाला नक्कीच ठाऊक असणार.’’ डोळे मिचकावत हेन्री म्हणाला.

No comments:

Post a Comment