Thursday, November 28, 2013

ओव्हेरचे चर्च

ओव्हेरचे चर्च

         आमच्या झोपण्याच्या खोलीत व्हिन्सेंट व्हान गॉगच्या ‘ओव्हेरचे चर्च’ या सुप्रसिध्द पेंटींगचा प्रिंट फ्रेम करून लावलेला आहे. ओव्हेर फ्रान्समध्ये कुठे तरी असावे या पलीकडे मला इतके दिवस काहीही माहीत नव्हते. ओव्हेरला आपण जाऊ असे मला कधी स्वप्नातसुध्दा वाटले नसेल. युरोपची सहल संपल्यावर सरळ मुंबईला न परतता म्युझियम बघण्यासाठी म्हणून मी आणि माझ्या पत्नीने आमचा पॅरीसमधील मुक्काम पाच सहा दिवसांनी वाढवला होता. सुनील काळदाते नावाच्या गेली तीस वर्षे पॅरीसमध्ये राहणा-या मराठी माणसाशी आमची तेथील वास्तव्यात ओळख आणि मैत्री झाली. एकोणीसशें ऐशीं साली त्याने चित्रकार म्हणून पॅरीसमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. पेंटींगच्या जोडीने फोटोग्राफी, फ्रेंच टीव्ही सीरीयल, शॉर्ट फिल्म, आय.टी. अशा अनेक क्षेत्रातील मुशाफिरीचा अनुभव त्याच्या गाठीला आहे. त्याने आम्हाला ओव्हेरला भेट देण्याचे सुचवले. आम्ही तात्काळ होकार दिला.
(ओव्हेर सूर ओवाज - आज)
            ओव्हेर सुर ओवाज हे पॅरीसपासून तीस चाळीस किलोमीटरवर असलेले एक छोटेसे, शांत उपनगर आहे. आम्ही रेल्वेने तासाभरात तेथे जाऊन पोचलो. संध्याकाळचे पाच वाजले होते. प्लॅटफॉर्मवर कोणीही नव्हते. आजची तारीख पंधरा मे दोन हजार दहा. मनात विचार आला बरोबर एकशेवीस वर्षांपूर्वी याच स्टेशनवर कदाचित याच वेळेला व्हिन्सेंट आपला धाकटा भाऊ तेओबरोबर कॅनव्हासची वळकटी आणि काखेत इझल घेऊन उतरला असेल.
(व्हिन्सेंट व्हॅन गॉग - सेल्फ पोर्ट्रेट)
        
          ओव्हेरला येण्यापूर्वी व्हिन्सेंट सँ रेमी येथील मनोरूग्णालायात उपचार घेत होता. त्याला तेथून बाहेर पडायचे होते. कमिय पिसारो या जेष्ठ इंप्रेशनीस्ट चित्रकाराने व्हिन्सेंटला ओव्हेर या गावी जाऊन रहाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार व्हिन्सेंटने ओव्हेरला जाण्याचा निर्णय घेतला. ओव्हेर हे पॅरीसजवळील एक छोटेसे खेडे होते. पॅरीसमध्ये प्रॅक्टीस करणारा गाशे नावाचा एक डॉक्टर ओव्हेरला रहायचा. तो व्हिन्सेंटचा चांगला मित्र होता आणि त्याच्या पेंटींगचा चाहाताही. त्यामुळे ओव्हेरमध्ये व्हिन्सेंटला डॉक्टर गाशेच्या देखरेखीखाली रहाचा येणार होते. डॉ. गाशे मोठ्या आनंदाने व्हान गॉग बंधूंना घ्यायला स्टेशनवर गेला. ओव्हेरचा आणि चित्रकारांचा संबंध पूर्वी पासून होता. कमिय पिसारो आणि पॉल सेझान अठराशेंसत्तरमध्ये ओव्हेरमध्ये मुक्काम ठोकून होते. डॉ. गाशे स्वत: एक हौशी चित्रकार आणि फ्रेंच नव-चित्रकलेचा चाहाता आणि संग्राहक होता. इंप्रेशनीस्टांच्या मांदियाळीतील रन्वा, सिस्ले, दगा, मोने आणि माने प्रभृतींनी त्याच्या दिवाणखान्यात नाहीतर घरामागच्या परसबागेत बसून पेंटींग केली होती.
(डॉ.गाशे - पोर्ट्रेट - व्हॅन गॉग)
       व्हिन्सेंटने ‘डॉ. गाशेचे पोर्ट्रेट’ केले आहे. पांढरी टोपी आणि जांभळा कोट घातलेला डॉ. गाशे एका टेबलावर हाताचे कोपर टेकून बसला आहे. हाताच्या मुठीने चेहे-याला आधार दिला आहे. दु:खाचे चित्रण करण्यासाठी वापरली जाणारी पारंपारीक पोझ. मुद्रेवर दु:खी कष्टी भाव. या पोर्ट्रेटमध्ये व्हिन्सेंटने आणखी काही प्रतीकांची योजना केलेली आहे. त्याकाळी प्रेमभंगाचे कथानक असलेल्या शोकांतीका लोकप्रिय होत्या. पोर्ट्रेटमध्ये टेबलावर ठेवलेल्या दोन कादंब-यात अशा प्रकारच्या शोकांतीका होत्या. व्हिन्सेंटला शहरी जीवन मुळीच आवडत नसे. शहरी जीवन म्हणजे आजारपण, रोगराई आणि दु:ख. उलट खेड्यातील जीवन आरोग्यकारक आणि आनंदी असते असा त्याचा अनुभव होता. म्हणूनच त्याने पॅरीस सोडून दक्षिण फ्रान्समधील  ग्रामिण भागातील आर्ल गाठले. व्हिन्सेंटला या पोर्ट्रेटमध्ये नागरी जीवनाच्या दुष्परीणामांनी दु:खी झालेला आधुनीक मानव दाखवायचा आहे. नागरीकरणातून उद्भवणाऱ्या दु:खापासून तात्पुरती का होईना सुटका करण्याचा प्रयत्न व्हिन्सेंटने आपल्या कलेच्या माध्यमातून वारंवार करुन पाहीलेला आहे.
         व्हिन्सेंट वीस वर्षांचा असताना त्याचे एका मुलीवर प्रेम होते. पण तिने त्याला नकार दिला होता. या नकाराचे दु:ख तो कधीच पचवू शकला नाही. त्या नंतर त्याच्या आयुष्यात बऱ्याच स्त्रिया आल्या पण त्यापैकी कोणाशीही त्याचे भावबंध जुळू शकले नाहीत. डॉ. गाशेला मार्गारेट नावाची एक मुलगी होती. तिचे पियानो वाजवतानाचे एक पोर्ट्रेट व्हिन्सेंटने केले आहे. असे म्हणतात की तिचे व्हिन्सेंटवर प्रेम होते. व्हिन्सेंटला त्या प्रेमाची कल्पना होती की नाही याचा निश्चित पुरावा नाही, पण त्याच्या मृत्युचे तिला खूप दु:ख झाले होते हे मात्र खरे.
(पोर्ट्रेट - एक युवती - व्हॅन गॉग)
          व्हिन्सेंट होता त्या काळी ओव्हेर हे एक छोटेसे खेडेगाव होते. त्या वेळची शेतक-यांची शाकारलेली घरे जाऊन त्या जागी आता पॅरीसमध्ये नोकरी धंद्या निमीत्त जाणा-या लोकांनी बांधलेली आधुनिक पध्दतीची टुमदार घरे आली होती. ओव्हेर गाव उवाझ नदीच्या किना-यावर वसले आहे. व्हिन्सेंट रहात होता त्या राव्हूच्या कॅफेकडे आम्ही चालत चालत निघालो. आकाश निळेभोर होते. संध्याकाळचे साडे पाच वाजले होते तरी सुर्यास्त उशीरा असल्याने स्वच्छ उन पडले होते. हवेत सुखद गारवा होता. आम्ही पाच मिनीटात कॅफे गाठला. आमच्यासारख्या पर्यटकांची तुरळक गर्दी होती. आमचा मार्गदर्शक सुनील म्हणाला की दहा बारा वर्षांपूर्वी या गावात फारसे कोणी फिरकत नसे. कधीतरी एखाद्या पाहुण्याला घेऊन आम्ही मित्रमंडळी संध्याकाळी यायचो. कॅफेत वाइन पिता पिता गप्पा होत. बारच्या डाव्या बाजूला एक मोडकळीला आलेला जिना होता. आम्ही मालकाला विचारून त्या अंधा-या जिन्यावरून वर जायचो. वरच्या मजल्यावर व्हिन्सेंट व्हान गॉग रहायचा ती खोली होती. त्याचा तो सुप्रसिध्द पलंग आणि खुर्ची तशीच जपून ठेवलेली होती. आम्ही त्या खुर्चीवर बसायचो, पलंगावर लोळायचो. नंतर तो कॅफे एका अमेरीकन माणसाने विकत घेतला आणि त्याचे म्युझियममध्ये रूपांतर केले. आता तो बघण्यासाठी सहा युरो मोजावे लागतात. म्युझियममध्ये रूपांतर करताना त्या कॅफेचे मुळचे स्वरूप बरेच बदलले आहे. त्यापेक्षा रेल्वे स्टेशन समोरचे कॅफे ल मनारा बरेचसे मुळच्या कॅफे राव्हूसारखे आहे. आम्ही गेलो तो पर्यंत साडे पाच वाजल्याने तिकीटविक्री बंद झाली होती. पण सुनीलच्या फ्रेंचवरील प्रभुत्वाने आम्हाला आत जाण्याची परवानगी मिळाली ते सुध्दा तिकीट न घेता. बार आणि कॅफेचे म्युझियममध्ये रुपांतर झाल्याने तेथे फ्रेंच जेवण घेण्याचा आमचा बेत आम्हाला रहीत करावा लागला. आम्ही त्या डगमगत्या जिन्यावरून वर गेलो. ज्या खोलीत व्हिन्सेंटने आपल्या भावाच्या बाहुपाशात शेवटचा श्वास घेतला होता तीच ही खोली. त्या खोलीतून स्मशान आणि एक चर्च दिसत होते. व्हिन्सेंटने आर्लमधील आपल्या वास्तव्यात बेडरूमची अनेक पेंटींग केली होती. ही बेडरूम तशीच दिसत होती. फक्त खुर्ची नवीन होती आणि पलंगावरील बिछाना काढून टाकलेला होता. नुसत्या स्प्रिंगवर बसलो असतो तर चिमटे बसण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही पलंगावर बसण्याचा बेत रहीत केला. गावातील दुकानात त्या डिझाईनच्या खुर्च्या सुवेनीर म्हणून मिळतात असे सुनील  नंतर म्हणाला.
(कॅफे राव्हूतील व्हिन्सेंटची खोली तेव्हा)
(कॅफे राव्हूतील व्हिन्सेंटची खोली आज)
       कॅफे राव्हूतून टेकडीकडे जाणा-या रस्यावर ते चर्च होते. गावातून येणारा रस्ता चर्चच्या मागच्या बाजूने येतो. मी त्या चर्चचे फोटो काढायला थांबलो तर सुनील म्हणाला थांब आपण व्हिन्सेंटने ज्या कोनातून या चर्चचे पेंटींग केले आहे त्याच कोनातून फोटो काढू. आम्ही धावतच त्या कोप-यावर गेलो आणि त्या चर्चकडे पाहीले. बाजूच्या एका दिव्याच्या खांबावर व्हिन्सेंटने केलेल्या ‘ओव्हेरचे चर्च’ या पेंटींगच्या प्रिंटची फ्रेम लावली होती. हे चर्च आणि हे पेंटींग. पेंटींगमधील गडद जांभळ्या रंगाचे आकाश रात्रीची वेळ दर्शवत होते. आवारातील पिवळसर रंगाचे गवत आणि फरसबंदी केलेल्या रस्त्याच्याकडेने आपला स्कर्ट सावरत चर्चच्या दिशेने जाणा-या पाठमो-या स्त्रीच्या आकृतीने उदास आणि खिन्न वातावरणाची निर्मिती होते. चांदण्याच्या मिणमिणत्या प्रकाशात उजळलेली चर्चची पिळवटलेली बाह्यरेषा आणि चर्चच्या विपर्यास्त पर्स्पेक्टिव्हमुळे वातावरणात एक प्रकारच्या गूढपणाची भर पडते. व्हिन्सेंट आपल्या चित्रविषयाशी एवढा एकरूप व्हायचा की त्याच्या मनातील अस्वस्थपणा, खळबळ त्याच्या ब्रशच्या फटकाऱ्यात उतरत असे. उलट अर्थाने व्हिल्सेंटच्या सर्वच कामातून त्या त्यावेळी त्याची मनस्थिती कशी होती ते ओळखू येते. चित्रविषयात सर्वस्व झोकून देण्याच्या पध्दतीमुळे इम्प्रेशनीझमचा पुढे विकास झाला. त्याची ही शैली पुढे एक्सप्रेशनीझम म्हणून ओळखली जाऊ लागली.
ओव्हेरचे चर्च - तैलरंग कॅनव्हास व्हॅन गॉग

ओव्हेरचे चर्च - फोटो - आज
        व्हिन्सेंट ओव्हेरमध्ये आल्यावर थोडा सावरला. प्रकृतीची काळजी घ्यायला डॉ. गाशे होताच. सँ रेमीचे आजारपण तो विसरला. ओव्हेर मधील दोन महिन्यात त्याने अनेक पेंटींग केली. त्याच्या अवती भवती असलेली माणसे, निसर्गाची विवीध रूपे त्याने आपल्या कॅनव्हासवर चित्रीत केली. व्हिन्सेंट व्हान गॉगशी संबंध आलेली प्रत्येक वस्तू आणि वास्तू पर्यटकांचे आकर्षण झाल्या आहेत. त्यातील शक्य होतील तेवढ्या पाहून घेण्याचे आम्ही ठरवले. इंप्रेशीनीस्टांच्या पूर्वी एक दोबीनी नावाचा चित्रकार ओव्हेरमध्ये राहयला आला होता. त्याला श्रध्दांजली म्हणून त्याने त्याच्या घराच्या बागेचे एक सुंदर पेंटींग ‘दोबीनीची ओव्हेर मधील बाग’  फक्त हिरव्या रंगाचा वापर करून रंगवले होते. हे पेंटींग बघताना चित्रकाराचेही मन प्रसन्न असावे असे वाटते. ओव्हेरमधील वास्तव्यात असे क्षण त्याच्या वाटेला फारसे आले नाहीत. जवळच आलो आहोत तर पाहून घेऊ म्हणून ती बाग आम्ही पाहायला गेलो.
तेथून पुढे जाणारा थोडा चढावाचा रस्ता माळरानाकडे जात होता. गाव मागे पडले. रस्त्याच्या एका बाजूला स्मशानाची भिंत आणि दुस-या बाजूला गव्हाची शेते दिसू लागली. वसंत ऋतूतील सुंदर उन पडले होते. संध्याकाळच्या मंद वा-यावर निळसर हिरव्या रंगाचे शेत डोलत होते. व्हिन्सेंटने अशाच एका  प्रसन्न संध्याकाळी त्याचे ते सुप्रसिध्द ‘गव्हाचे शेत’ हे चित्र रंगवले असेल. त्याच गव्हाच्या शेतातून आज आम्ही चालत आहोत या कल्पनेने अंगावर रोमांच उभे राहिले. व्हिन्सेंट आर्लमध्ये असताना तिथला प्रखर सूर्यप्रकाश त्याच्या पॅलेटवर आला होता. त्याने केलेल्या सूर्यफुलांच्या आणि गव्हाच्या शेतांच्या पेंटींगमध्ये हे पॅलेट दिसून येते. ओव्हेरमधील वास्तव्यात त्याच्यावरील क्रोम यलो आणि यलो ऑकर या रंगांचा प्रभाव थोडा कमी झाला होता. क्षितीजापर्यँत पसरलेल्या गव्हाच्या शेतामधून लांब जाणारी एक पायवाट होती. आम्ही त्या पायवाटेवर उभे राहून एकमेकांचे फोटो काढले. आकाशात ढग गोळा झाले. आभाळ दाटून आले. आता पाऊस पडला तर या उघड्यावर आसरा कुठे घेता येईल ते बघू लागलो. पण आकाशातील विलक्षण रंगसंगती कॅमेऱ्यात पकडण्याचा मोह आवरता येईना. व्हिन्सेंटने असाच क्षण ‘ढगाळलेल्या आकाशाखालील गव्हाचे शेत’ या आपल्या पेंटींग मध्ये पकडून अमर केला आहे. कॅनव्हासचा दोन तृतीयांश भाग काळपट निळ्यारंगाच्या आकाशाने व्यापला आहे. उरलेल्या एक तृतीयांश भागात निळसर हिरव्या रंगाचे गव्हाचे शेत. सँ रेमीमध्ये रंगवलेल्या गव्हाच्या शेताच्या कॅनव्हासवरील पिवळा रंग येथे अभावानेच दिसतो. पुढे घडणा-या अघटीताची चाहूल तर त्याला लागली नसेल?
व्हीटफिल्ड अंडर क्लाउडेड स्काय - तैलरंग कॅन्हास

जून महिना व्हिन्सेंटला चांगला गेला. पण नंतर नैराश्याच्या झटक्याने त्याला पुन्हा ग्रासले. जुलै महिन्यातील कडक उन्हामुळे त्याच्या पाचवीला पुजलेल्या अस्वस्थपणाने परत उचल खाल्ली. त्याची मनस्थिची बिघडली. त्याचा आत्मविश्वास डळमळला. त्याच्या पेंटींगमध्ये भिरभी-यासारख्या दिसणाऱ्या रेषा त्याच्या मनातील खळबळीच्या निर्देशक आहेत.

         व्हिन्सेंट सकाळीच कॅनव्हास, रंगांच्या ट्युब, ब्रशचा खोका आणि काखोटीला इझल घेऊन कॅफे राव्हूमधील आपल्या खोलीच्या बाहेर पडे आणि गावाबाहेरील शेतात जाऊन पेंटींगला सुरवात करीत असे. मी खूप वर्षांपूर्वी पाहिलेल्या मेट्रो गोल्डवीन मेयरच्या लस्ट फॉर लाईफ या चित्रपटातील एक प्रसंग मला आठवला. व्हिन्सेंट माळरानावरच्या एका गव्हाच्या शेतात इझलवर कॅनव्हास लावून बसला आहे. गहू कापणीला आला आहे. तळपत्या ऊन्हात न्हाऊन निघालेल्या शेताचे चित्र पिवळ्या धम्म रंगात रंगवून होते तोच काळे ढग आले आणि अचानक आकाशाचा रंग पालटला. क्षणोक्षणी बदलणारा रंग कॅनव्हासवर उतरवण्यासाठी ट्युबमधला रंग पॅलेटवर घेऊन मिश्रण करायला वेळ नव्हता. त्याने निळ्या आणि काळ्या रंगांच्या ट्युब सरळ कॅनव्हासवर पिळल्या आणि ब्रशच्या दोन चार फटका-यात हवा तो परीणाम कॅनव्हासवर साकार झाला. पेंटींग पूर्ण झाल्याच्या समाधानात तो स्वत:शीच किंचीत हसला. तेवढ्यात इतका वेळ कुठेतरी लपून बसलेल्या कावळ्यांचा एक थवा आकाशात उडाला. उडणा-या कावळ्यांनी इतका वेळ मोकळे असलेले आसमंत व्यापून टाकले. काव, काव, काव. व्हिन्सेंटच्या कपाळावरची शीर उडू लागली. तो अस्वस्थ झाला. त्याचा उभा देह पिळवटून गेला. त्याने बंद केलेला खोका उघडला आणि त्यातून पॅलेट नाईफ बाहेर काढून उडणारे कावळे भराभर कॅन्हासवर उतरवले. एवढ्या झपाट्यात की एक क्षण असे वाटले की सगळा कॅनव्हास कावळ्यांनी भरून जातोय की काय. ‘भिववणा-या आकाशाखालील गव्हाचे शेत आणि कावळे’ हे त्याचे शेवटचे पेंटींग त्याने कुठल्या कोनातून केले असावे. ते कावळे खरेच त्याला दिसले होते की तो सगळा त्याच्या मनाचा खेळ होता. ते आकाश त्याला भिववणारे का वाटले असावे. त्याच्या अंतर्मनाने त्याला भविष्याची सूचना तर दिली नसेल? या विचाराने मन सुन्न झाले. पत्नीने काय झाले असे विचारल्यावर मी जरा भानावर आलो. चित्रपटातील वरील प्रसंग मी तिला वर्णन करून सांगीतला. क्लर्क डग्लस या नटाने व्हिन्सेंट व्हान गॉगची भूमिका अगदी तदृप होऊन केली होती. एरवी हॉलीवूडच्या देमार चित्रपटात भूमिका करणाऱ्या त्या रांगड्या दणकट नटाने या भूमिकेला अनुरूप दिसण्यासाठी आपले वजन भरपूर घटवले होते.
(व्हीटफिल्ड अंडर थ्रेटनींग स्काय वुईथ क्रोज - तैलरंग कॅनल्हास - व्हॅन गॉग)
(तेच गव्हाचे शेत, तेच ढगाळलेले वातवरण, तोच ग्रीष्म ऋतू – आज १२० वर्षांनंतर)
व्हिन्सेंटचा धाकटा भाऊ तेओ पॅरीसमध्ये गुपिल्स या प्रख्यात आर्ट गॅलेरीमध्ये नोकरी करत होता. त्याची पेंटींगची जाण चांगली होती. व्हिन्सेंटच्या पेंटींगचे अजून पर्यंत कोणीही कौतूक केले नव्हते. तरीही तेओला आपला भाऊ एक प्रतिभावंत आहे आणि एक दिवस तो एक महान चित्रकार म्हणून ओळखला जाईल याची खात्री होती आणि. ओव्हेरमध्ये येईपर्यंत व्हिन्सेंटच्या कामाची फक्त एकाच समीक्षकाने दखल घेतली होती. त्याचे फक्त एकच पेंटींग विकले गेले होते. त्यामुळे त्याला आयुष्यभर उदरनिर्वाहासाठी त्याचा धाकटा भाऊ तेओ याच्यावर अवलंबून राहावे लागले होते. तेओचे आपल्या मोठ्या भावावर निर्व्याज्य प्रेम होते. ते नुसतेच बंधुप्रेम नव्हते. त्याने आयुष्यभर व्हिन्सेंट आणि त्याच्या कलेची पाठीराखण केली. व्हिन्सेंट जेव्हा निराश होई तेव्हा तेओ त्याला उत्तेजन देई. स्वत:ची आर्थिक परीस्थिती फारशी चांगली नसतानाही तो व्हिन्सेंटला नियमीत आर्थिक मदत करी. तेओला कधी दोन पैसे जास्त मिळाले तर त्यातील अर्धा वाटा व्हिन्सेंटचा असे. आपण काहीच कमवत नाही ही गोष्ट व्हिन्सेंटच्या मनाला नेहमी लागत असे. त्याच्या त्या विकल्या गेलेल्या एकमात्र पेंटींगचे गि-हाईक तेओने स्वत:च पैसे देऊन पाठवले असावे असा त्याला दाट संशय होता.
         व्हिन्सेंट ओव्हेरमध्ये येण्याच्या थोडे आधी तेओचे लग्न झाले होते. त्याला दोन महिन्यांचा मुलगा होता. व्हिन्सेंट ओव्हेरमध्ये आल्यावर तेओचा लहान मुलगा आजारी पडला होता. तेव्हा तेओचे त्याच्या मालकशी असलेले संबंध बिघडलेले होते. कोणत्याही क्षणी त्याची नोकरी जाण्याची शक्यता होती. व्हिन्सेंट त्याला भेटायला पॅरीसला गेला तेव्हा त्याला परीस्थितीची कल्पना आली. भावाची आर्थिक परीस्थिची एवढी ओढताणीची असताना आपल्याकडून त्याला काही मदत होण्याऐवजी आपण त्याला भार बनून राहीलो आहोत या कल्पनेने तो खूप अस्वस्थ झाला. तो ओव्हेरला परतला तेव्हा ही काळजी त्याचे डोके पोखरत होती. त्यात जुलै महिन्याचे कडक उन्ह. त्यामुळे त्याची मनस्थिती पुन्हा बिघडली. त्याने नेहमी प्रमाणे डॉ. गाशेकडे दुपारचे जेवण घेतले आणि सरळ माळरानावरच्या शेताची वाट धरली. रविवारची शांत संध्याकाळ होती. अर्ध्या रस्त्यात त्याने खिशातले पिस्तूल काढले आणि नळी छातीवर ठेऊन चाप ओढला. बंदूकीच्या आवाजाने शेतातील कावळे पुन्हा उडाले. त्या कावळ्यांना आपल्या कॅनव्हासवर चित्रीत करून कलेच्या इतिहासात अमर करणारा व्हिन्सेंट मातीत रक्ताच्या थारोळ्यात पालथा पडला. पण त्याचे दुर्दैव तेथे संपले नव्हते. जगण्यात अयशस्वी ठरलेला व्हिन्सेंट मरताना पण अयशस्वीच झाला. तात्काळ मरण त्याच्या नशीबी नव्हते. तेथून तो कसाबसा कॅफे राव्हूमधला अंधारा जिना चढून आपल्या खोलीवर गेला आणि पलंगावर पहुडला. जिन्यात ठिबकलेले रक्त पाहून मिसेस राव्हूने डॉ. गाशेला बोलावून घेतले. डॉ. गाशेने त्याच्यावर तातडीचे उपचार केले आणि पॅरीसमध्ये तेओला तार ठोकली. दुसऱ्या दिवशी सकाळी तेओ आल्यावर व्हिन्सेंट त्याला म्हणाला रडू नकोस, मी जे काही केले ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच केले आहे. तेओने त्याची समजूत घातली आणि तू यातून वाचशील असा त्याला धीर दिला. त्यावर व्हिन्सेंट म्हणाला की दु:खाला अंत नसतो. तिसऱ्या दिवशी २९ जुलै १८९० रोजी पहाटे एक वाजता त्याने वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षी आपल्या भावाच्या बाहूपाशात प्राण सोडला. ओव्हेरमधल्या स्मशानात त्याचे दफन करण्यात आले. व्हिन्सेंटच्या मृत्युनंतर त्याचा धाकटा भाऊ तेओ निराशेने खचला. त्यातून तो कधीच सावरू शकला नाही. त्याची प्रकृती ढासळत गेली आणि त्यातच त्याचे अवघ्या सहा महिन्यात पॅरीस मध्ये निधन झाले. पत्नी जोहान्नाने तेओचे दफन ओव्हेरला त्याच्या लाडक्या भावाच्या शेजारी केले.
      रस्याच्या उजव्या हाताला स्मशान होते. स्मशानातून उवाझ नदीचे खोरे आणि गावातील घरांची छप्परे दिसत होती. आम्हाला व्हान गॉग बंधूंची कबर बघायची होती. सुनील म्हणाला इथे कधीही आलो तरी व्हिन्सेंटच्या कबरी जवळ दोन तीन माणसे तरी सापडतातच. त्यामुळे कबर शोधायला त्रास पडत नाही. दोघा भावांच्या कबरी शेजारी शेजारीच आहेत. कबरीच्या जागी कोणतेही बांधकाम नाही. फक्त दोन दगडांना पांढरा रंग देऊन त्यावर त्या दोघा व्हान गॉग बंधूंची नावे व जन्म-मृत्युचे वर्ष लिहीले आहे. ऐंशीच्या दशकात प्रसिध्द झालेली आयर्विग स्टोनची लस्ट फॉर लाईफ ही चरीत्रात्मक कादंबरी आणि माधुरी पुरंदरेने मराठीत व्हिन्सेंट व्हान गॉग या नावाने तिचा केलेला अनुवाद वाचताना डोळ्यात पाणी आले होते. आज इतक्या वर्षांनीसुध्दा कलेच्या ध्याससाठी पणाला लावलेले आयुष्य आणि बंधूप्रेमाच्या विलक्षण कहाणीच्या आठवणीने आम्हा सर्वांचे डोळे पुन्हा एकदा तसेच पाण्याने डबडबले.


व्हॅन गॉग - सेल्फ पोर्ट्रेट
तेओ - पोर्ट्रेट - व्हॅन गॉग












जोहान्ना तेओच्या मागे खूप वर्षे जगली. तिच्या हयातीतच व्हिन्सेंटची थोरवी लोकांना कळू लागली होती. व्हान गॉग बंधू एकमेकांना नियमीत पत्रे लिहीत. त्या भावांचा पत्रव्यवहार व्हिन्सेंटच्या पेंटींग एवढाच प्रसिध्द आहे. त्या दोघांना परस्परांबद्दल वाटणारा जिव्हाळा त्यांच्या पत्रव्यवहारात दिसून येतो. व्हिन्सेंटची मातृभाषा डच होती. शिवाय इंग्लीश आणि फ्रेंचवर त्याचे चांगले प्रभुत्व होते. त्याचे वाचन दांडगे होते. त्याला साहित्याची चांगली जाण होती. याचे प्रतिबिंब त्याच्या पत्रांत पडले आहे. जोहान्नाने त्या दोन भावांच्या पत्रव्यवहाराचे फ्रेंचमध्ये भाषांतर करून ते प्रसिध्द केले. हा पत्रव्यवहार प्रसिध्द झाल्यावर त्यांचे बंधूप्रेम एक दंतकथा बनून गेले. या पत्रांच्या इंग्लीश भाषांतराची सचित्र आवृत्ती स्ट्रँड बुक स्टॉलमध्ये नव्वदसाली पाच हजार रूपयांत मिळायची. एवढी महाग असुनही ती हातो हात संपली. तेओला पॅरीसमध्ये भेटून ओव्हेरमध्ये परत आल्यावर व्हिन्सेंटने त्याला एक पत्र लिहीले होते. हे व्हिन्सेंटने तेओला लिहीलेले शेवटचे पत्र. ते पोस्टात टाकण्यापूर्वीच व्हिन्सेंटने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. व्हिन्सेंट गेल्यावर ते पत्र तेओला त्याच्या खिशात सापडले.
‘‘तुझ्या पत्रा बद्दल आणि बरोबर पाठवलेल्या ५० फ्रँक बद्दल आभार.
(तेओला लिहीलेल्या बहुतेक पत्रांची सुरवात अशीच असायची.)
तुला सांगण्यासारख्या पुष्कळ गोष्टी माझ्याकडे आहेत, पण त्याचा काही उपयोग नाही कारण तुला ते पटणार नाही. तुला ज्यांचे मत पटेल अशी बरीच मंडळी पॅरीसमध्ये तुझ्या जवळ आहेत.
तुझं ठीकठाक चाललंय असं जरी तू मला सांगत असलास तरी आंखोदेखा हाल पाहिल्यावर तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. चौथ्या मजल्यावरच्या लहानशा खुराड्यात एका लहान मुलाला वाढवताना तुला आणि जोला काय त्रास होत असेल त्याची मला कल्पना आली.
आपल्या सर्वांचा चरितार्थ सुरळीत कसा चालेल हा सर्वात महत्वाचा प्रश्न समोर असताना मी अवांतर गोष्टीत वेळ कां घालवतोय? आपल्याला दोघांना मिळून जो काही उद्योगधंदा करायचा आहे त्याची नुसती चर्चा करणे हा सुध्दा खूप लांबचा पल्ला आहे हे लक्षात घे.
बहुतेक चित्रकार चित्रांची विक्री हे आपलं काम नाही असं समजून विक्रीपासून दोन हात लांबच रहातात.
आपल्याला जे काही बोलायचंय ते आपली चित्रंच बोलतील हे जरी कितीही खरं असलं तरी मी तुला जे सांगतोय ते नीट ध्यानात घे. हे मी तुला यापूर्वीही बऱ्याच वेळा सांगीतलं असेल आणि आता मी तुला पुन्हा एकदा अगदी कळकळीने सांगतोय. चित्रांचा फक्त एक विक्रेता म्हणून मी तुझ्याकडे बघत नाही. त्यापेक्षा अधिक काही तरी तुझ्या हातून घडेल याचा मला विश्वास आहे. तू तुझ्या निव्वळ विक्रेत्याच्या भूमिकेतून बाहेर ये आणि चित्रनिर्मितीत लक्ष घालायला सुरवात कर. मी तुला त्यात मदत करीन. कितीही आपत्ती आल्या तरी तू जे काही कॅनव्हास निर्माण करशील ते जास्त शास्वत असतील हे लक्षात घे. हीच गोष्ट मला तुला सांगायची आहे.
सध्या चित्रविक्रेत्यांचे दोन गट पडलेले आहेत हयात चित्रकारांची चित्रं विकणारे आणि मयत चित्रकारांची चित्र विकणारे. या दोन गटांत खरी चुरस आहे.
(आपण मेल्यावर आपल्या पेंटींगना चांगली किंमत येईल आणि त्यामुळे आपल्या भावावरचे आर्थिक संकट टळेल या विचारातून तर व्हिन्सेंट आत्महत्येला प्रवृत्त झाला नसेल?)
आता माझ्या कामाविषयी म्हणशील तर मी त्यात माझं अख्खं आयुष्यच पणाला लावलं आहे. ही आपत्ती मीच माझ्यावर ओढवून घेतली आहे आणि त्याची फळं मी भोगतोय. ते जाऊं दे.
तू काही इतर विक्रेत्यांसारखा नाहीस हे मला चांगलंच ठाऊक आहे. तू तुझी बाजू निवडू शकतोस. सहानभूतीने पण योग्यायोग्याचा विचार करूनच निर्णय घे.’’
         हे पत्र मला व्हिन्सेंटच्या खिशात सापडले असा शेरा तेओने त्या पत्रावर स्वत:च्या हस्ताक्षरात लिहीलेला आहे. व्हिन्सेंटच्या बदलत्या मनस्थितीचे प्रतिबिंब जसे त्याच्या ब्रशच्या फटका-यांमध्ये दिसून येते तसे त्याच्या पत्रांतील भाषेच्या शैलीत. या शेवटच्या पत्रातील तुटक अडखळणारी भाषा त्याच्या मनातील खळबळ तर दाखवत नसेल?
         व्हिन्सेंटच्या मृत्युनंतर त्याची लोकप्रियता वाढत गेली. पिकासोने म्हटले होते की माझ्या आवडीचे चित्रकार बरेच आहेत पण व्हिन्सेंटवर माझे प्रेम आहे. आज व्हिन्सेंट व्हान गॉगची गणना जगातील मोजक्या महान चित्रकारांमध्ये होते. १९७३ मध्ये ऍमस्टरडॅममध्ये रेब्रांद म्युझियमच्या जवळच व्हान गॉगच्या चित्रांसाठी एका स्वतंत्र आणि प्रशस्त अश्या म्युझियमची स्थापना करण्यात आली. तेओ आणि जोहान्नाच्या मुलाचे नाव त्याच्या काकाच्या नावावरून व्हिन्सेंट असे ठेवले होते. आपल्या जगद्-विख्यात काकांच्या नावे स्थापन करण्यात आलेल्या या म्युझियमचे उद्-घाटन करण्या इतपत दीर्घायुष्य त्याला लाभले.
         पॅरीसमध्ये आम्ही होतो तेव्हा योगायोगाने माझा शिकागोमध्ये रहाणारा मुलगासुध्दा त्याच्या कंपनीच्या कामा निमीत्ताने पॅरीसमध्ये होता. तोही आमच्या बरोबर ओव्हेरला आला होता. त्याने मला एक प्रश्न विचारला. व्हिन्सेंट व्हान गॉग आजही एवढा लोकप्रिय कां आहे? त्याची कला, त्याचे मन:पूत जीवन, भावाभावांचे जिव्हाळ्याचे नाते की त्याची कलेवरची अढळ निष्ठा. उत्तर अवघड आहे. कलाकृती बघताना कलाकाराचे जीवन अणि त्याची कलेवरची निष्ठा यांना त्याच्या कलाकृतींपासून अलग करून बघणे कितपत शक्य होईल?

* * * * *
लेखातील मूळ पेंटींग – व्हिन्सेंट व्हॅन गॉग : सौजन्य – गुगल ईमेज
लेखातील फोटो – जयंत आणि कौशिक गुणे
प्रथम प्रसिद्धी – मौज दिवाळी - २०१०
लेखक - जयंत गुणे, पत्ता - 10, मधुमधुरा, प्रार्थना समाज रस्ता, विलेपार्ले, मुंबई, 400057.
टेलीफोन - 22-26116995, 91-9619016385 ईमेल : jayant.gune@gmail.com
ब्लॉग : jayantgune@blogspot.com