Saturday, October 6, 2018

मुलँ रूज - ३०

ऑगस्ट महिन्यातली ती एक दुपार होती. बाहेर ऊन रणरणत होते. सर्व सृष्टी आळसावली होती. शॅतो द माल्‌रोमवरील मंडळींची वामकुक्षी चालू होती. एका चेस लाउंजवर पुस्तक वाचता वाचता हेन्रीला डुलकी लागली होती. बाजूला अर्धवट प्यालेल्या लेमोनेडचा ग्लास पडला होता. मादाम एदल एका आरामखुर्चीवर पडल्या पडल्या अर्धमिटल्या डोळ्यांनी लेकाकडे पाहत होती. शेवटी एकदा मोंमार्त्रचे खूळ संपले तर. सॅलूनमधले अपयश सुटीत विसरायला होईल. अभ्यासात त्याला गती आहे. युनिव्हर्सिटीत वेळ चांगला जाईल. तेवढ्यात जोसेफने मादाम ल आंद्रे द प्राँतनेक आल्याची वर्दी दिली म्हणून ती उठली आणि हेन्रीला जाग आली. कोण आलेय ते बघण्यासाठी हेन्री गच्चीच्या कठड्याकडे गेला. घोडागाडीतून आईच्याच वयाची एक स्त्री उतरत होती. एकमेकांना एदल’,‘एंजेलिकअशा हाका मारत त्यांनी धावत जाऊन मिठी मारली.
घोडागाडीतून सतरा-अठरा वर्षांची एक मुलगी आपला पायघोळ स्कर्ट सांभाळत खाली उतरली.
‘‘माझी मुलगी डेनिस-’’ बॅरोनेसने ओळख करून दिली.
चहाच्या टेबलावर हेन्रीची ओळख करून देण्यात आली. मग पुढचा तासभर प्राँतनेक कुटुंबाची वंशावळ, त्यांच्या शाखा, उपशाखा यांचे गुऱ्हाळ हेन्रीला ऐकावे लागले.
‘‘गेल्या वर्षी बॅरोनेट वारले आणि डेनिस बिचारी पोरकी झाली.’’ एंजेलिकचे डोळे पाणावले.
‘‘शेरी डीअर. मस्य द तुलूझ्‌ लोत्रेकना जरा पियानो वाजवून दाखवतेस का?’’ एंजेलिक म्हणाली, ‘‘आमची डेनिस पियानो खूप छान वाजवते बरं का.’’
आज्ञाधारक मुलांप्रमाणे ती दोघे खुर्चीवरून उठली. हेन्री मोठ्या अदबीने तिला दिवाणखान्यात घेऊन गेला. तिने पियानो वाजवायला सुरुवात केली. हेन्री सोफ्यावर बसून तिच्याकडे बघत होता. पाठीमागच्या फ्रेंच विंडोमधून येणाऱ्या संध्याकाळच्या उन्हात भिंतीवर पडलेली तिची सावली मोठी छान दिसत होती. सुरावटीतला शेवटचा कॉर्ड वाजवून होताच ती पियानोस्टुलावरून गरकन वळली. तिचा एक हात अजून पियानोच्या पट्टीवर होता.
‘‘कसं वाटलं? सेझार फ्रँकचा प्रील्यूड आहे. ही रचना फारशी कोणाला माहीत नाही. पण माझ्या पपांना फार आवडायची.’’ ती उठली आणि सोफ्यावर त्याच्या शेजारी जाऊन बसली. दोघेही तसे समवयस्क होते. त्या दोघांनाही इतर मित्रमैत्रिणी कोणीही नव्हते. वय पालकांपासून फटकून राहण्याचे होते. त्यामुळे दोघांची थोड्याच वेळात चांगली मैत्री जमली.
दुसऱ्या दिवसापासून ते दोघे रोज संध्याकाळी फिरायला जाऊ लागले. तिच्या आगमनामुळे हेन्रीच्या दिनक्रमात फरक पडला. आयुष्यात प्रथमच त्याला एखाद्या मुलीशी मैत्री करण्याची संधी मिळत होती. प्रथमदर्शनी मनात आलेले रोमँटिक विचार त्याने कटाक्षाने मनातून काढून टाकले. तरीही नकळत तो थोडा नीटनेटका राहायला लागला होता. त्याने पॅरीसमधून डझनभर नवे शर्ट मागवून घेतले. दाढी व्यवस्थित कोरून घेतली. कपड्यांची इस्त्री, टायची गाठ, बुटांचे पॉलीश वगैरे गोष्टींवर जास्त लक्ष पुरवायला लागला. हातात अंगठी, गळ्यात सोन्याची साखळी घातल्याशिवाय तो बाहेर पडत नसे.
रोज फिरायला जाण्यासाठी तो नवनवी ठिकाणे शोधून काढायचा. लोत्रेकांच्या इस्टेटची त्याला चांगली माहिती होतीच. भरीला त्याने स्थानिक इतिहासाची पुस्तके नीट वाचून काढली. संध्याकाळी फिरायला जाताना तो तिचा वाटाड्या असे. आपल्या गप्पा मनोरंजक व्हाव्यात म्हणून तो खूप काळजी घेई.
मोंमार्त्रमधल्या कनिष्ठ वर्गातून आलेल्या मुलींशी कित्येक वेळा काय बोलावे हा प्रश्न त्याला पडे. तसा प्रकार डेनिसच्या बाबतीत होत नसे. एक तर ती त्याच्या तोलामोलाच्या उमराव घराण्यातली होती. साहजिकच त्यांच्या परंपरा, आचारविचार, पूर्वग्रह, आवडी -निवडी मिळत्याजुळत्या होत्या. त्यामुळे लवकरच त्यांची चांगली गट्टी जमली.
ऑक्टोबरमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि त्यांचे बाहेर फिरायला जाणे बंद झाले. त्यामुळे हेन्रीने तिचे पोर्ट्रेट करायला घेतले. रोज दुपारी ती त्याच्या स्टुडिओत जायची. आरशासमोर नट्टापट्टा झाला की हेन्री तिला पोज देऊन बसवायचा. मग गप्पागोष्टी करत, हसत-खिदळत वेळ कसा जायचा ते तिच्या आईचे बोलावणे येईपर्यंत कळायचे नाही.
एके दिवशी ती नेहमीप्रमाणे पोज देऊन बसली होती. त्या दिवशी बाहेर पाऊस पडत होता. का कोण जाणे दोघेही गप्प होते. पावसाची रिपरिप व शेकोटीतल्या लाकडांची तडतड याशिवाय सगळे काही चिडीचूप होते. अचानक डेनिस स्टुलावरून उठली व हेन्रीचा हात हातात घेऊन म्हणाली, ‘‘हेन्री, तुम्ही किती चांगले आहात. माझ्यासाठी केवढं करता. तुम्ही नसता तर मी कंटाळ्याने अगदी वेडी झाले असते. तुमचे आभार कसे मानावे ते कळतच नाही.’’
अचानक झालेल्या या प्रकारामुळे हेन्री थोडा गोंधळून गेला. ‘‘वास्ताविक मीच तुमचे आभार मानायला हवेत. तुझ्यापेक्षा मीच जास्त कंटाळलो होतो. चल. तो चहा घेऊया आणि कामाला लागू.’’ हेन्री म्हणाला, ‘‘असे एकमेकांचे आभार मानायच्या अगोदर ते पोर्ट्रेट एकदाचं पूर्ण करूया.’’

No comments:

Post a Comment