Wednesday, October 17, 2018

मुलँ रूज - ५६

मारीचा एकदा असाच मूड लागला होता आणि त्यात ती तिच्या पूर्वायुष्यातील गोष्टी सांगायला लागली. ज्या झोपडपट्टीत तिचा जन्म झाला तिथली वस्ती, दारूच्या भट्ट्या, पिंपे, आसमंतात भरून राहिलेला दारूच्या रसायनाचा आंबूस वास, कुजणाऱ्या कचऱ्याची दुर्गंधी. आई, बाप, भाऊ, बहीण, शेजारीपाजारी, तिचे सवंगडी वगैरे. आईबापांची रोजची भांडणे, एकमेकांची समजूत काढणे. शनिवारी दोघेही इतकी झिंगून असत की मग मुलांच्या जेवणाचीही शुद्धही नसे. बाप कधी कधी घरातल्या सगळ्यांना बदडून काढायचा. शुद्धीवर आला की एकदम प्रेमाने जवळ घेऊन माफी मागायचा. बोलता बोलता अचानक ती थांबली आणि सर्व गरिबांना श्रीमंतांविषयी वाटणाऱ्या आदिम तिरस्काराने हेन्रीकडे बघू लागली.
‘‘मी हे सगळं तुमाला का सांगतेय? तुम्हाला काय कळणार खायचे वांदे होतात म्हणजे काय होतं ते. एका वख्ताला तरी कधी उपास काढलायत तुम्ही?’’
मग एकदम स्वतःच्या लैंगिक अनुभवांविषयी सांगू लागली. तिच्या मनात लाज, अपराधीपणा वगैरे भावनांचा लवलेशही नव्हता.
‘‘एकदा शनिवारी रात्री बापाच्या कारखान्यात काम करणारा एक माणूस मला वळचणीला घेऊन गेला. तेव्ही मी चौदा वर्षांची होते. एका कोपऱ्यात नेऊन माझा फ्रॉक वर करून उभ्यानेच मला घासायचा त्याने प्रयत्न केला. पण पिऊन एवढा टाईट होता की त्याला काम करायला काही जमलं नाही. तरी त्याने माझ्या हातावर एक फ्रँक टेकवला. त्या एका फ्रँकच्या मी रिबिनी घेतल्या माझ्या फ्रॉकला बांधायला.’’
एकदा सतत तीन दिवस उपाशीपोटी काढावे लागले. चौथ्या दिवशी ती सरळ सॅबॅस्टोपलला बहिणीकडे पळून आली. तिथे तिच्या मार्गदर्शनाखाली ती हळूहळू धंद्याला तयार झाली. पहिला संभोग, सहज हाती खेळणारा पैसा, धुराने भरलेल्या गुत्त्यात भडक कपडे केलेल्या मवाली मुलांबरोबर केलेला वॉल्टझ्‌, या सगळ्या गोष्टी ती अगदी मोकळेपणाने त्याला सांगत होती.
‘‘एकदा नाचताना बेबेरशी वळख जाली. काय हिरो दिसतो तो. सगळ्या पोरी त्याच्यासाठी जीव टाकायच्या. मी त्याला झॅट भाव देत नव्हते. तरी तो माझ्या मागे मागे असायचा. तो राग त्या पोरी माझ्यावर काढायच्या. आमचा नेहमी त्यावरून झगडा व्हायचा. या रोजच्या कटकटीला कंटाळून शेवटी मी सॅबॅस्टोपल सोडून मोंमार्त्रला आले.’’ बेबेरने लाथ मारून हाकलून दिले हे लपवण्यासाठी तिने सहजगत्या खोटे बोलण्याच्या आपल्या स्वभावानुसार एक बंडल लपेटून दिले.
‘‘पण कसलं काय. इकडे तो भडवा, नालायक पाटू कावळ्यासारखा माझ्यावर नजर ठेवून आहे. तुम्ही मला त्याच्या तावडीतून सोडवलं नसतं तर एव्हाना त्याने मला सँ लझारला पाठिवलं असतं.’’ त्या दिवशी तिच्या आवाजातून पहिल्यांदाच कृतज्ञतेचा अंश व्यत्त झाला, पण दुसऱ्याच क्षणी तिने त्याचावर पाणी फिरवले.
‘‘तुम्ही दिसायला कायतरीच, तुम्हाला चालताही धड येत नाही. तरी तुम्ही माझ्याशी केवढे चांगले वागलात.’’ तिच्या नजरेत चेष्टा व सहानुभूती यांचे विचित्र मिश्रण होते.

No comments:

Post a Comment