Sunday, October 14, 2018

मुलँ रूज - ४७

मुलँ रूजच्या बॉलरूममधे नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांची गर्दी हळूहळू वाढू लागली. पाहता पाहता लॉबी व बाल्कनीसुद्धा भरून गेली. व्यवस्थापनाने वाटलेल्या पिसे खोवलेल्या कागदी टोप्या घालून पिपाणी कर्कशपणे वाजवीत लोक इकडे तिकडे फिरत होते. छतावरून सोडलेली रंगीत कागदांची भेंडोळी खाली उत्साहाने नाचत बागडणाऱ्या माणसांच्या डोक्यावर हेलकावत होती. अशा उत्सवी वातावरणात सगळ्यांच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या नसत्या तरच नवल.
हेन्री आपल्या टेबलावर जाऊन बसला. शेजारच्या टेबलावरील अमेरिकन प्रवासी त्यांच्या मोडक्यातोडक्या फ्रेंचमधून वेटरला ऑर्डर देत होते. शॅम्पेनची सर्वात मोठी बाटली आणि चार फटाकड्या पोरी. उईऽ उईऽ ओह ला ला. व्हिवा ल फ्रान्स!
बाँज्यूर मस्य तुलूझ - असे म्हणत वेटरने हेन्रीच्या टेबलावर कोनॅकची बाटली आणून ठेवली. त्याने हळुवारपणे आपल्या चषकात कोनॅक ओतली व टेबलावरील मांडणीचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. एवढ्यात मॉरीस तेथे आला.
‘‘अरे तू तर पार्टी सुरू होण्याच्या अगोदरपासूनच प्यायला सुरू केलेलं दिसतंय. म्हणजे मी जे ऐकलंय ते खरंय. तुला जरा सांभाळून...’’
‘‘प्लीज. आताच साराचं प्रवचन ऐकलंय. तू तरी मला आजची रात्र मौजमजा करू देणार आहेस की नाही?’’
‘‘ठीक आहे. तुझी मर्जी. मोठा खास बेत दिसतोय! कोण कोण येणार आहेत?’’
‘‘कलाविश्वातील काही बडी मंडळी. तुझा जर आर्ट डीलर व्हायचा हट्ट कायम असेल तर मस्य बुसादशी थोडी ओळख करून देतो. तो तुला तेओ व्हॅन गॉगच्या हाताखाली जागा देईल. तेओला एखादा मदतनीस मिळाला तर हवाच आहे.’’
‘‘तेओचं कसं चाललंय?’’
‘‘नोकरी म्हणशील तर उत्तम करतोय. बुसादच्या मर्जीतला आहे पण पगार मात्र जेमतेम. स्वतःचा व्यवसाय सुरू करायला हरकत नाही एवढा अनुभव गाठीला बांधलाय त्याने. पण संसाराच्या कटकटींनी मेटाकुटीला आलाय. आजारी मूल व त्यात भर म्हणजे बंधुराज व्हिन्सेंट. त्याच्या आर्ल्समधील प्रतापांविषयी मी तुला सांगितलं होतंच.’’
‘‘ठीक आहे. आज ओळख करून दे बुसादशी. तू ल फिगारोमध्ये सोसायटीवर आलेला लेख वाचलास का?’’
एवढ्यात तिथे एक सुंदर व आकर्षक तरुणी येऊन उभी राहिली व आल्या आल्या शार्लीची चौकशी करू लागली.
‘‘जरा दम धरशील की नाही? शार्ली येईल एवढ्यात. तोपर्यंत या माझ्या बालमित्राची ओळख करून देतो. मॉरीस ज्वॉय्यां आणि ही जर्मेन. कॉमडोरची प्रेयसी.’’
‘‘प्रेयसी, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना?’’ ती हेन्रीकडे बघत खुर्चीवर बसली. ‘‘नुसत्या ओळखीवर त्या मूर्ख व आळशी इंग्लिश माणसाबरोबर झोपायला मला काही खूळ लागलं नाहीय.’’
हेन्रीचे माँमार्त्रमधील जुने दोस्त गर्दीतून वाट काढत टेबलाकडे येत होते. गोझीचा चेहरा पूर्वीसारखाच पडलेला होता. उदास, गंभीर व चिंताक्रांत. आँक्तां विद्यार्थी असताना जसा होता तसाच दिसत होता. फक्त दाढी थोडी दाट झाली होती. अंगावरचा कोटसुद्धा तोच होता. फक्त जुना झाल्यामुळे आता थोडासा विरला होता एवढेच.
हेन्रीला पाहताच तो टू यू ऑल ग्रीटिंग्जम्हणून बेंबीच्या देठापासून ओरडला. डोक्यावरची जुनीपुराणी हॅट हातात घेऊन मोठ्या नाटकी आविर्भावात कमरेत वाकून त्याने कुर्निसात केला. झोकदारपणे उभे राहत त्याने व्हीनस व बॅकूस या कलेच्या देवतांना आवाहन करून त्यांचा आशीर्वाद मागितला व सर्व टीकाकारांचा तळतळाट होवो असा शाप दिला.
हेन्रीने डोळ्याने इशारा करताच सर्वांनी भराभर खुर्च्या पकडल्या. अहाहा शेवटी अन्न हेच जीवनातील अंतिम सत्य आहे.दुसरा एक जण एक भला मोठा खेकडा हातात उचलून सर्वांना दाखवीत म्हणाला, ‘बघा. काय लाइन आहे. हे प्लेन हा कर्व्ह आणि डोळ्यांत घनगंभीर दुःखी भाव. काय अप्रतिम इचिंग करता येईल याचं. रेम्ब्रांद आणि द्यूरेर झक मारतील. पण काय करणार? आता मला एवढी भूक लागलीय की मी हा ताबडतोब स्वाहा करणार आहे. चित्र काढण्याइतका धीर धरणं मला जमणार नाही. पोट आणि हृदय यांच्या संघर्षात नेहमी पोटाचाच विजय होतो.
सर्व मंडळी जमा झाली. हेन्री मॉरीसची सर्वांशी आवर्जून ओळख करून देत होता. पुरुष नर्मविनोद करत होते व स्त्रिया त्याला हलकेच हसून दाद देत होत्या. व्हिंटेज वाईन व त्याची चव खुलवणारे खाद्यपदार्थ यांच्या साथीने चाललेल्या दिलखुलास गप्पांनी पार्टीत रंग भरू लागला.
लोत्रेक, ते ब्रुसेल्सचं आमंत्रण कसं काय मिळवलंस बाबा? मी एवढा प्रयत्न करीत होतो तरी मला नाही ते बोलावलं.
माझ्या नव्या नाटकाच्या दुसऱ्या अंकातील एका प्रवेशात चोवीस हत्ती स्टेजवर येणार आहेत.
त्या हत्तींचे संवाद लिहून झाले असतील तर एकदा त्याचं वाचन कर.
लग्नसंस्था ही मुळातच अनैसर्गिक आहे. त्यामुळे लग्न करून एकत्र राहणे हे साहजिकच अनैतिक ठरतं. त्यामुळे समाजाची नीतिमत्ता उंचवायची असेल तर लग्नसंस्थेवर कायद्याने बंदी घातली पाहिजे.
रेन्वाचा नवा शो तू पाहिलास काय?’
रूबेन्सनंतर स्त्रियांची पेंटिंग करावीत ती रेन्वानेच.
कंबर आणि मोठ्ठे ढुंगण यापलीकडे काय असतं त्याच्या पेंटिंगमध्ये?’
लोत्रेक, तुम्हाला कळलं का? सुरा...
माझ्या पुढच्या पेंटिंगमध्ये एक प्रयोग म्हणून मी व्हेरोनीज व सेझान यांच्या शैलीचा मिलाफ करणार आहे.
सगळ्यांच्या तोंडाची टकळी चालू होती. बाजूच्या टेबलावरून मधेच हास्याची कारंजी उडत होती तर मधेच आरडाओरडा. त्यात भर पिपाण्यांच्या कर्णकटू आवाजाची. पुढ्यातील चवदार खाद्य, उंची मद्य व स्त्रियांची उपस्थिती यामुळे पुरुष मंडळी रंगात योऊन मोठ्या तावातावाने गप्पा मारीत होती. अपयशाची दारुण जाणीव त्यांना विसरायची होती. त्यामुळे ते सर्वजण लंब्याचौड्या बाता मारत होते. त्यात सत्य परिस्थितीपासून दूर पळण्याची केविलवाणी धडपड दिसून येत होती. मधेच एक घास तोंडात टाका, पेला उंचावून ओठाला लावा, नाचण्यासाठी म्हणून अचानक उठा, नाचणे थांबवून धापा टाकीत चालू असलेल्या वादात कुठलाही मुद्दा धरून सामील व्हा, मधेच मित्राबरोबर आलेल्या मुलीला डोळा मारा, जमले तर टेबलाखालून पायाला पाय लागतो का ते चाचपून बघा.
त्या पार्टीला आलेल्या स्त्रिया म्हणजे मोंमार्त्रमधील स्त्रियांचा प्रातिनिधिक नमुना म्हणता आल्या असत्या. अंगावर साधे घरी शिवलेले कपडे. प्रत्येकीने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही ना काही तरी धडपड करून पाहिलेली होती. मॉडेल, नर्तिका, गायिका, फॅशन डिझाइनर असे बरेच काही करून पाहिले होते पण कोणाच्याही हाती फारसे काही लागले नव्हते.
बहुतेक जणांनी वयाची तिशी ओलांडल्यावर तारुण्यातील स्वप्नांना तिलांजली दिली होती आणि जे काही आपल्या वाट्याला आलेय ते निमूटपणे स्वीकारले होते. रात्रीच्या उत्सवी वातावरणात आणि आसपासच्या कोलाहलात त्यांच्या जाणिवा बोथट झाल्या होत्या. जाळणारी दुःखे, खंत विसरून एक रात्र कशीतरी मजा मारायची. शॅम्पेनने डोळे धुंद झाले होते. हॉलमध्ये लाज गुंडाळून चाललेल्या प्रणय चेष्टितांमुळे कामभावना उद्दिपित झाल्या होत्या. पुरुषांच्या शारीरिक चाळ्यांना लटका विरोध दाखवीत स्त्रिया खिदळत होत्या.
मध्यरात्र जसजशी जवळ येऊ लागली तसतसा हा गदारोळ शिगेला पोचला. स्त्री-पुरुष युगुले एकमेकांच्या मिठीत विसावलेली, ओठ एकमेकांवर टेकवलेले, मिटल्या डोळ्यांमागे दडलेली अनामिक भीती, सिगरटेचा धूर व उपस्थितांच्या श्वासाने जड झालेली हवा. नववर्षाचे स्वागत करायचे ते असेच. आईच्याबरोबर शेकोटीवर हात शेकत बसण्यापेक्षा हे चालले आहे ते कित्येक पटीने उत्तम. हेन्रीने कोनॅकचा आणखी एक पेला संपविला. नशेची उब पांघरुणासारखी त्याच्या अंगावर पसरली.
तेवढ्यात मद्याने धुंद झालेला शार्लो झोकांड्या खात बरोबर एका तरुणाला घेऊन आला व म्हणाला, ‘‘हाय हेन्री. याला ओळखता का? हे माझे मित्र ऑस्कर वाइल्ड. प्रसिद्ध लेखक. आणखी बरंच काही सांगता येईल यांच्याबद्दल. आताच लंडनवरून थेट इथे आले आहेत.’’
शार्लो अधिक काही बोलण्याच्या शुद्धीत नव्हता. हेन्रीने लंडनहून आलेल्या पाहुण्याला अगत्याने आपल्या शेजारची एक खुर्ची दिली.
‘‘अहाहा! सुसंस्कृत म्हणता येईल असं जगातील एकमेव शहर म्हणजे पॅरीस. दोनच दिवस झाले मला येऊन. पण कसं अगदी मोकळं वाटतंय. नाहीतर आमच्या लंडनला बघा. घरी सारखी बायका-मुलांची कटकट, बाहेर जावं तर उद्योगधंद्याशिवाय दुसरा विषय कानावर पडेल तर शप्पथ.’’ ऑस्कर वाइल्डने सिगरेटच्या धुराने भरलेल्या हवेत एक दीर्घ श्वास घेतला व म्हणाला, ‘‘अहा! येथे जरा मोकळा श्वास तरी घेता येतोय. थोडी शॅम्पेन घेऊ या का? डोक्यातल्या विचारचक्राला एकदाची चालना मिळेल.’’
हेन्री ऑस्कर वाइल्डच्या सिगरेटच्या धुराच्या वलयांमागे लपलेल्या चेहऱ्याचे चित्रकाराच्या नजरेतून निरीक्षण करीत होता. त्याच्या सरळ साध्या चेहरेपट्टीवर त्याच्या अंतर्मनात चाललेला संघर्ष दिसत होता. मोठ्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचा अपराधी भाव डोकावत होता. ओठ एखाद्या स्त्रीसारखे नाजूक. पण भुवया मात्र ठाशीव. खानदानी व्यक्तिमत्वाची झाक दाखविणाऱ्या.
हेन्रीच्या मनात ऑस्कर वाइल्डशी थोड्या गप्पा माराव्यात असे होते पण तो त्याच्या इतर मित्रांच्या संभाषणात खेचला गेला. सर्व चित्रकार मित्र मिळून आर्ट डिलरना शिव्या घालीत होते. नंतर नाटककारांनी निर्मात्यांवर मोर्चा वळवला व लेखकांनी प्रकाशकांवर. कोणालाच कलेशी काही देणे-घेणे नव्हते. स्वतःचा खिसा भरल्याशी कारण. कलाकारांना दोन दमड्या देताना त्यांचा हात आखडतो. हेन्री कोनॅक पीत शांतपणे ऐकत होता.
आयुष्य प्रत्येकाच्या वाट्याला एकदाच येते. त्यातील क्षणन्‌क्षण उपभोगता आला पाहिजे. त्यात आज तर नववर्षाची रात्र साजरी करायला लोकांची गर्दी जमली होती. गप्पागोष्टी, चेष्टामस्करी यांना ऊत आला होता. सर्व जण हसत-खिदळत होते. संगीताच्या तालावर नृत्य रंगात आले होते. एकच जल्लोष चालू होता. अचानक संगीताची धून थांबली. नाचणारी पावले थबकली. गप्पागोष्टी अर्ध्याच राहिल्या. ऑर्केस्ट्राच्या कंडक्टरने हातातला बॅटन उंचावून मोठ्या आवाजात जाहीर केले, ‘आता या वेळी बरोबर बारा वाजले आहेत. हॅपी न्यू इयर टू ऑल. व्हिवे ला नुव्हेल ॲनी.अशी घोषणा करून तो एक गिरकी घेऊन मागे वळला. सर्व वाद्यांचा झंकार एका क्षणात चालू झाला.
हेन्रीने शेजारच्या माणसाकडून कागदी टोपी मागून घेतली व डोक्यावर घातली. तोंडाचा चंबू करून बेंबीच्या देठापासून जोर करीत पिपाणी फुंकली. १८९० या नव्या वर्षाच्या आगमनाने हेन्रीच्या आयुष्यात एक नवा अध्याय चालू होणार होता...मारी शार्लेत.


(पोर्ट्रेट ऑफ ऑस्कर वाईल्ड – तुलूझ लोत्रेक – जलरंग)
(नववर्षाच्या पार्टीत आलेल्या जवळपास प्रत्येकाचे पोर्ट्रेट लोत्रेकने केले आहे. यातील ऑस्कर वाइल्डचे पोर्ट्रेट प्रसिद्ध आहे. इंग्लंडमध्ये ऑस्कर वाईल्डच्या तथाकथित समलिंगी संबंधांवर आरोप झाले आणि त्याला तुरूंगवासही भोगावा लागला. त्यामुळे झालेल्या बदनामीमुळे त्याला समाजात तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. त्यातून सुटका मिळण्यासाठी तो पॅरीसला आला असता लोत्रेकने त्याचे एक पोर्ट्रेट केले. ते पोर्ट्रेट केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्कर वाईल्डला नैराश्याचा झटका आला आणि त्यातून तो कधीच बाहेर येऊ शकला नाही. या पोर्ट्रेटचा नंतर बरीच वर्ष कोणालाही थांगपत्ता नव्हता. जवळ जवळ अर्ध्या शतकानंतर ऑस्कर वाईल्डच्या शताब्दी वर्षात कोणीतरी ते ब्रिटीश लायब्ररीला निनावी पाठवून दिले.)


No comments:

Post a Comment