Tuesday, October 9, 2018

मुलँ रूज - ३६

हेन्रीला लवकरच स्वत:मधील नव्या क्षमतेचा शोध लागला. दारू कितीही प्यायली तरी आपल्याला पचते. इतर लोक प्यायल्यावर कसे ताळतंत्र सोडतात तसे आपले कधीही होत नाही. दारू कितीही प्यायली तरी इतरांपेक्षा आपल्याला कमी चढते याचा त्याला अभिमान वाटू लागला. या जाणिवेने तो आतल्या आत सुखावला. कोण उत्तुंग पर्वतशिखर पादाक्रांत करू शकत असेल तर कोण अथांग सागर पार करू शकत असेल. मी दारू पिऊ शकतो. कोणीही पिऊ शकणार नाही एवढी दारू मी एका बैठकीत रिचवून पचवू शकतो.
दारूमुळे हेन्रीचा दिवाभीतपणा कुठच्या कुठे पळाला. त्याच्या अंतरी एक नवे धैर्य निर्माण झाले. वेश्यागृहात पाऊल टाकण्याचे. एके दिवशी दुपारच्या जेवणानंतर तडक घोडागाडी करून तो ल पॅरॉक्वे ग्रीमध्ये गेला. त्याने मुद्दामच दुपारची वेळ निवडली होती. त्या वेळी फारशी गर्दी नसायची. सर्व मुली दुपारच्या जेवणानंतर निवांतपणे लोळत पडलेल्या असत.
‘‘या साहेब. लवकर आत या.’’ एका पिचपिच्या डोळ्यांच्या गबाळ्या बाईने दरवाजा उघडून त्याला आत घेतले. बाहेर पाऊस रिमझिमत होता.
‘‘तुम्ही पूर्वी एक दोन वेळा इकडे येऊन गेला होतात नाही का? तुमचे मित्र नाही आले वाटतं आज.’’ तिच्या चेहऱ्यावर ओळखीचे स्मित होते, ‘‘बरोबर ओळखलं की नाही? एकदा पाहिलेला चेहरा मी सहसा विसरत नाही.’’
त्याने मान डोलावली आणि हाताच्या मुठीत तयारीने ठेवलेले एक चांदीचे नाणे हळूच तिच्या हातावर टेकवले.
‘‘हे माझं बक्षीस समजायचं का? देव तुमचं भलं करो. तुमच्यासारखी भली माणसं यायला लागली तर मी लवकरच गावाला जाऊन देवाचं नाव घेत बसेन.’’
हेन्रीचा बुजरेपणा पाहून ती त्याला डोळा मारत हळू आवाजात म्हणाली, ‘‘तुम्ही अगदी वेळेवर आलात बघा. वरती कोणीही नाहीय. सगळ्या पोरी मोकळ्याच आहेत.’’
जिना चढताना हेन्रीची केविलवाणी धडपड पाहून ती नकळत म्हणाली, ‘‘मस्य, जमेल ना वर चढायला.’’ बोलण्यात अजाणता आलेली खोच लक्षात येताच तिने चटकन स्वतःला सावरून घेतले, ‘‘माणूस लहान असो की मोठा, तरणा असो की म्हातारा. या कामातल्या ताकदीचा माणसाच्या आकारावरून काही पत्ता लागत नाही. सावकाश जा हां वर. मी सगळ्यांना सांगून ठेवीन.’’
एका हातात काठी तर दुसऱ्या हाताने जिन्याच्या कठड्याला घट्ट धरून हेन्री एकदाचा वर दिवाणखान्यात जाऊन पोचला. जिना अगदी उभा सरळसोट आणि पायऱ्या खूप उंच होत्या. त्यामुळे हेन्रीला धाप लागली. त्याने थोडा दम खाऊन झाल्यावर इकडे तिकडे पाहिले. गेल्या वर्षभरात काहीही बदल झालेला नव्हता. दरवाजात लोंबकळणारा तो मेणचट पडदा, गंजक्या लोखंडी मांडणीवर ओळीने मांडून ठेवलेली कपच्या उडालेली क्रॉकरी, धुळीचे थर बसलेला चावीचा यांत्रिक पियानो, जळमटे चिकटलेली कोपऱ्यातील झाडांची कुंडी, पारा उडालेले दोन आरसे, बटबटीत रंगांत रंगवलेले एक काचचित्र क्लिओपात्रा ॲट बाथ’. वातावरणात फेस पावडर व तंबाखूचा संमिश्र वास. त्या जागेत एक प्रकारची कुबट शांतता होती.
हेन्री एका कोचावर जाऊन बसला. पावसामुळे भिजलेली हॅट त्याने काढून बाजूच्या टेबलावर ठेवली आणि धडधडत्या हृदयाने पुढे काय होईल त्याची प्रतीक्षा करू लागला. एका झिरझिरीत झगा घातलेल्या मुलीने पडद्याच्या फटीतून हळूच डोकावून पाहिले. त्याच्याशी नजरानजर होताच तिच्या चेहऱ्यावरचे कृत्रिम हास्य एकदम थिजल्यासारखे झाले. तिच्या नजरेतील आश्चर्याचे भाव तत्क्षणी त्याच्या लक्षात आले. दुसऱ्याच क्षणी ती गरकन वळली आणि त्या मेणचट पडद्याआड अदृश्य झाली. त्याने मान खाली घातली. तरी हॉलवेमधून येणारी दबक्या आवाजातली कुजबुज, हसण्याचे, आश्चर्याचे चीत्कार त्याच्या कानी पडण्याचे त्याला टाळता येणे शक्य नव्हते. हृदयातली धडधड वाढली. समोरच्या पडद्याच्या फटीतून त्याला बघायला म्हणून एकाच वेळी पाच जणींनी आपली डोकी बाहेर काढली. ते दहा डोळे त्याच्याकडे टकमक बघत त्याला आपादमस्तक न्याहाळू लागले. संतापाने त्याची कानशिले गरम झाली.
‘‘अरे देवा! हा तर आपला हेन्री.’’
हेन्रीने दचकून आवाजाच्या दिशेने पाहिले. भोकरासारख्या मोठ्या डोळ्यांची, गोल गरगरीत देहाची एक कृष्णकेशी बाई बाहेर आली आणि त्याच्याकडे बघून तिने ओळखीचे स्मित केले.
‘‘तुम्ही मला ओळखणार नाही, पण मी तुम्हाला चांगली ओळखते. मी बेर्थ.’’ त्याच्या समोरच्या टेबलावर हात टेकून ओणवी उभी राहत ती म्हणाली. तिच्या झिरझिरीत झग्याखालून तिचे थुलथुलीत स्तन दिसत होते. तिच्या टपोऱ्या डोळ्यांतून आनंद ओसंडून वाहत होता. एखाद्या पोरकट कोड्याचे उत्तर देताना असतो तसा. ‘‘तुमचा मित्र रॅचो. तो मला तुमच्याविषयी सांगायचा.’’ हेन्रीला आठवलं.
‘‘हे मोठे आर्टिस्ट आहेत बरं का. हेसुद्धा पेंटिंग करतात माझ्या शोशूसारखं.’’ तिच्या पाठोपाठ दिवाणखान्यात आलेल्या पाची मुलींकडे पाहत ती म्हणाली.
एका वाक्यात सगळ्यां गोष्टींचा खुलासा झाला. वातावरणातला सगळा ताण शिथिल झाला. सगळ्या मुली लगबगीने कोचाभोवती गोळा झाल्या.
‘‘ही व्हेरोनिका,’’ बेर्थने एका काटकुळ्या, दाताड्या, कृष्णकेशी मुलीकडे निर्देश केला. एखाद्या केविलवाण्या उंदरासारखी ती दिसत होती. ‘‘तीनच महिने झाल्येत हिला इकडे येऊन.’’
व्हेरोनिकाने आपला हात हळूच पुढे केला. ती काही तरी बोलणार तेवढ्यात बेर्थ दुसऱ्या मुलींची ओळख करून द्यायला पुढे सरसावली, ‘‘ही सुझान. आमची गाववाली आहे बरं का. आणि ती कोपऱ्यात बसलीय ती जियानिना.’’ ती एक आडव्या हाडापेरीची, उंच आणि भरल्या बांध्याची स्त्री होती. तिने फिक्या पिवळसर रंगाची स्पॅनिश शाल आपल्या पुष्ट देहाभोवती लपेटून घेतली होती. शालीच्या आत ती संपूर्ण नग्न होती हे हेन्रीला शालीवर पडलेल्या सुरकुत्यांवरून जाणवले. ‘‘ती इतालियन आहे. आणि ही मिनेट.’’ हेन्रीच्या शेजारी नुसती अंतर्वर्स्त्र घालून बसलेल्या मुलीकडे बघत ती म्हणाली.
त्या सगळ्या मुलींनी त्याच्याशी हस्तांदोलन केले. त्या आता खुदूखुदू हसत होत्या. स्वतःच्या अर्धनग्नतेचा त्यांना विसर पडला. हेन्रीकडे आता त्या एक गिऱ्हाईक म्हणून बघत नव्हत्या. त्यांच्यात एक आपुलकीचे नाते निर्माण होऊ लागले होते.
गबाळ्या वेषातला एक वेटर आत आला. ऑर्डर घेता घेता हातातल्या मळकट फडक्याने त्याने टेबल पुसल्यासारखे केले. हेन्रीने त्याचे टर्किश सिगरेटींचे पाकीट काढले व त्यातल्या सिगरेटी सर्वांना दिल्या. मोठ्या अदबीने काडी ओढून एक एक करून सर्वांच्या तोंडासमोर धरली. त्या मुलींना असे सौजन्य कधी अनुभवायला मिळाले नव्हते. त्याचे खुरटे पाय, उंची कपडे या सगळ्या गोष्टींचे त्यांचे हळूच निरीक्षण चालू होते. या बुटक्या पण खानदानी वागणुकीच्या तरुणाविषयी त्यांचे मन अनुकंपेने भरून आले. तो त्यांच्यासारख्या कंगाल बाजारबसव्यांच्या दारात आज आला होता. कारण दुसऱ्या कोणा घरंदाज मुलीच्या मैत्रीचा लाभ त्याला मिळणे शक्य नव्हते, ह्या वस्तुथितीची त्यांना नकळत जाणीव झाली.
‘‘मस्य, तुम्ही कोणत्या प्रकारची पेंटिंग करता?’’ व्हेरोनिकाने मोठ्या अदबीने विचारले. पण त्याचे उत्तर मात्र बेर्थने दिले, ‘‘हे आर्टिस्ट किनई सगळ्या प्रकारची पेंटिंग करतात. आता माझ्या शोशूच बघ ना. मनात येईल त्या कशाचेही चित्र काढतो. अगदी पोर्ट्रेटसुद्धा करतो बरं का. मी बऱ्याच वेळा त्याला पोज दिलीय.’’ तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. अंगाने थोडी सुटलेली असली तरी तिच्या देहाचे सौष्ठव चित्रकाराच्या नजरेत भरण्यासारखे होते. मानेवर मोकळ्या सोडलेल्या केसांची एखादी नीटशी वेणी घातली असती तर पुस्साँने रंगवलेल्या इटालीयन शेतकरी स्त्रियातली एक शोभली असती. रॅचोने तिचे पोर्ट्रेट कसे केले याचे अगदी तपशीलवार वर्णन तिने सर्वांना ऐकवले. तो पॅलेट कशी ठेवे, इझल समोर उभा कसा राही, कॅनव्हासवर ब्रशचे फटकारे कसा मारी इथपासून ते मधूनच जवळ येऊन तिच्या कुल्यांवर हळूच चापटी कशी मारी व लाडात आला की मांडीवर घेऊन स्तन कसे कुरवाळत बसे इथपर्यंत.
अशा प्रकारे एखाद्या आर्टिस्टसमोर नागव्याने पोज द्यायला सुझानचा विरोध होता. एखाद्याच्या शेजेवर झोपणे वेगळे आणि इझलसमोर तासन्‌तास उभे राहणे वेगळे. अगदी कसेतरीच वाटते.
‘‘तुला काही कळत नाही. आर्टिस्टची नजर वेगळीच असते. एखाद्या डॉक्टरसारखी.’’ बेर्थ मधेच म्हणाली. रॅचोशी असलेल्या मैत्रीमुळे चित्रकारांविषयी काही बोलण्याचा अधिकार तिला जणू काही आपोआपच मिळाला होता.
‘‘डॉक्टर जेव्हा तपासायला येतो तेव्हा त्याला आपण सगळं भांडवल दाखवतोच ना. तेव्हा नाही ती लाज वाटत. आर्टिस्टचं तसंच असतं.’’
सर्वजणी तावातावाने आपली बाजू मांडत होत्या. हेन्री त्यांच्याकडे अंमळ गमतीने पाहत होता. विशेषतः त्यांचे धूम्रपान. प्रत्येक झुरका त्या अगदी चवीने घेत होत्या. एवढी महागडी सिगारेट पहिल्यांदाच ओढायला मिळाली असावी.
त्याला वाटले होते तेवढ्या काही त्या वेश्या घाणेरड्या नव्हत्या. गलिच्छपणा असला तरी गरिबीमुळे असतो तेवढाच होता. त्या स्वभावाने साध्या आणि प्रेमळ होत्या. त्यांची आपापसातली थट्टा-मस्करी कोणाला न दुखवणारी होती. त्याच्या खुरट्या पायांकडे कोणाचे लक्षही नव्हते. त्याला वाटले यापूर्वीच आपण येथे आलो असतो तर केवढा मनःस्ताप वाचला असता.
बाहेर अंधारून आले. वेटरने दिवे लावले आणि पुन्हा एकदा सर्वांचे पेले व्हर्माउथने भरले. हळूहळू गिऱ्हाईकांची वर्दळ चालू झाली. चोरट्यासारखे ते हलक्या पावलांनी येत व कोणाच्याही नजरेला नजर न देता हातातल्या कॅपशी चाळा करत ते टेबलावर बसत. आपले गिऱ्हाईक आलेले पाहिले की अ रॉव्हर ऑरी (हेन्री)असे म्हणत गिऱ्हाईकाच्या दिशेने कुल्ले उडवत जायच्या व त्याच्या गळ्यात हात घालून म्हणायच्या अलोर शेरी, ड्रिंक मागवता का माझ्यासाठी?’
समोरच्या कोपऱ्यात ठेवलेला यांत्रिक पियानो कोणीतरी चालू केला.
ल पॅरोक्वे ग्रीमधली रात्र आता रंगात आली होती. त्याच्याभोवती गप्पा छाटत बसलेल्या सगळ्या मुली एक एक करून आपापल्या गिऱ्हाईकांबरोबर निघून गेल्या. एकटी बेर्थ त्याच्या शेजारी बसून होती.
‘‘आता माडीवर येता ना?’’ त्याच्या भेटीचा उद्देश लक्षात घेऊन तिने विचारले.
हेन्रीने क्षीणपणाने मान डोलावली व तिच्या मागोमाग माडीवर जाणाऱ्या जिन्याच्या पायऱ्या तो मोठ्या कष्टाने चढू लागला.

No comments:

Post a Comment