Monday, October 22, 2018

मुलँ रूज - ६९

मिरीयम
थोड्या दिवसांनी मॉरीस ज्वाय्याँ हेन्रीला घेऊन नातानसोन दाम्पत्याकडे गेला. दरवाजात गणवेश घातलेला फुटमन त्यांच्या हॅट, कॅप्स, ग्लोव्हज्‌ वगैरे वस्त्रसांभार सांभाळायला मोठ्या अदबीने उभा होता. ते दोघे तरुण हॉलमधून मोठा जिना चढून ड्रॉइंग रूमच्या दिशेने जाऊ लागले. तो उंच जिना चढताना हेन्रीला थोडी धाप लागली. रेशमी कापडाची शेड लावलेल्या दिव्यांचा उजेडात घर होते त्यापेक्षा अधिक भव्य वाटत होते. कोपऱ्यातील फायरप्लेसमध्ये जळणाऱ्या ओंडक्यांचा लालसर प्रकाश चकचकीत फरशीवर पसरला होता. दुसऱ्या कोपऱ्यातील ग्रँड पियानो एखाद्या शवपेटीसारखा वाटत होता. जमलेली मंडळी छोट्या छोट्या गटांत विखुरली होती. दागिन्यांनी मढलेल्या स्त्रिया, झोकदार दाढी राखलेले पुरुष, सावकाशपणे शेरीचे घुटके घेत, सभ्यता आणि शिष्टाचाराच्या साऱ्या मर्यादा सांभाळून हळू आवाजात एकमेकांशी गप्पा मारीत होते. पांढरे हातमोजे घातलेले फुटमन उंची वाईन व मौल्यवान क्रिस्टल सांभाळीत जमलेल्या गर्दीतून लीलया फिरत होते.
हेन्रीने मिसीया नातानसोनला पाहताक्षणी ओळखले. ती काही तिथे जमलेल्या स्त्रियांतील सर्वात सुंदर स्त्री होती अशातला भाग नव्हता. हे सगळे माझे आहे हे तिच्या एकूण आविर्भावातून अगदी सहजगत्या दिसत होते. त्यात आपण मालकीण असल्याचा तोरा नावालासुद्धा नव्हता. त्यांच्याकडे लक्ष जाताच ती ताबडतोब आपला गाऊन सांभाळत मोठ्या डौलदारपणे एक हात पुढे करीत त्याच्या दिशेने आली.
‘‘मस्य ज्वाय्याँ, बरं झालं तुम्ही तुमच्या मित्रांना घेऊन आलात ते.’’ ती हेन्रीकडे वळून तिच्या किंचित स्लाव्हिक उच्चारात म्हणाली, ‘‘मस्य तुलूझ द लोत्रेकनी अखेर माझ्यावर मेहरनजर केली म्हणायची. तुम्हाला कल्पना नसेल मी किती दिवस तुमची भेट व्हावी म्हणून वाट पाहात होते. आता मी तुमचा पूर्ण ताबा घेणार आहे. अर्थात तुमची हरकत नसेल तर.’’
तिच्या वेड लावणाऱ्या मोहक हास्याने हेन्री विरघळून गेला.
‘‘ज्वाय्याँ गॅलेरी. ९ रू फॉरेस्ट.’’ हेन्रीने गाडीवानाला सांगितले. मॉरीसने नुकतीच स्वतःची आर्ट गॅलरी सुरू केली होती. त्या गॅलरीत त्याने लोत्रेकच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. गाडी चालू झाली आणि गाडीच्या धक्क्यांबरोबर हेन्रीचे मन भूतकाळात हिंदकळू लागले.
गेली पाच वर्षे दैवाने त्याची क्रूर थट्टा चालविली होती आणि आज त्याच्यावर नशिबाने एकदम मेहेरनजर केली होती. पाच वर्षे काही थोडाथोडका काळ नव्हे. तोसुद्धा ऐन उमेदीतला. पूर्वी पदोपदी त्याला स्वतःच्या व्यंगाची जाणीव व्हायची आणि आता पाहावे तो सर्वांनी मिळून त्याच्या व्यंगाकडे दुर्लक्ष करायचे ठरविले असल्यासारखे.
मिसीयाचे उदाहरण घ्या. तिने त्याच्यावर अशी काही मोहिनी घातली होती की विचारता सोय नाही. अक्कलहुशारीवर फारसे विसंबून चालत नाही एवढी हुशारी तिच्याकडे नक्कीच होती आणि त्यामुळेच तिने सहज हौसेखातर म्हणून सुरू केलेल्या सॅलूनची ख्याती थोड्याच अवधीत साऱ्या पॅरीसभर पसरली. एमिल झोला, क्लेमॅन्सो, ॲनातोल फ्रान्स यांसारख्या ख्यातनाम मंडळींना तिने तिच्या प्रतिस्पर्ध्यांकडून आपल्याकडे ओढून घेतले होते तर बिचाऱ्या हेन्रीची काय कथा! तो तर पहिल्याच दृष्टिक्षेपात खलास झाला होता. तिच्या मोहक हास्याने भूतकाळातील कटू आठवणी विसरून त्याला भविष्यकाळातील गोड स्वप्ने पडू लागली होती. पहिली ओळख झाली ती रात्र अजून त्याच्या चांगली लक्षात होती. त्या रात्री ती खूप सुंदर दिसत होती. सुंदर असणे आणि सुंदर दिसणे यात फरक आहे. ती बुद्धिमान होती. तिने रसिकता आपल्या अंगी काळजीपूर्वक बाणवली होती. संपत्तीमुळे येणारा उद्दामपणा तिच्यात नव्हता. तिच्या व्यक्तिमत्वातील खानदानी अदबेची बघताक्षणी छाप पडे. तिच्या केशभूषेवर सर्वांत महागड्या हेअर ड्रेसरचा हात फिरायचा, तिचे कपडे पॅरीसमधल्या सर्वांत महाग दुकानातून, वर्थ नाही तर पाकीन्समधून, यायचे. कपडे परिधान करण्यासाठी चार सेविकांचा हातभार लागायचा. हेन्री तेव्हा सत्तावीस वर्षांचा होता. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी स्त्रीदेहाची चांगलीच जाण त्याला आली होती. तिने त्या किमती ड्रेसखाली तशीच किमती लिंगरी घातली असेल आणि त्या लिंगरीखाली तिचा गोरापान नितळ देह कसा दिसत असेल त्याची तो कल्पना करू शकत होता.
पहिल्याच भेटीत मिसीयाने हेन्रीकडे पाहून टाकलेल्या कटाक्षाची तशी गरज नव्हती. असा कलिजा खलास करणारा कटाक्ष टाकायचा म्हणजे एखाद्या सशाला मारण्यासाठी तोफेचा गोळा डागण्यासारखे होते. एक साधे स्मित त्याच्यासाठी पुरेसे होते. एरवी तो कुठे गेला की त्याच्याकडे निर्देश करून लोक कुजबुजत असत, ‘तो बुटका पाहिलात. फेंगड्या पायांचा. केवढा भयानक दिसतो नाही?’ लोकांच्या नजरेतूनच त्यांचे कुजबुजणे हेन्रीला ऐकू येई. त्याऐवजी त्या रात्री त्याच्या वाटेला आली सौजन्यशील वागणूक. उपस्थितांनी आपल्या बोलण्यात हेन्रीच्या व्यंगाचा उल्लेख चुकूनही केला नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या नजरेतही तसे जाणवले नाही. उलट त्यांनी केलेल्या स्तुती व प्रशंसेने त्याला संकोचल्यासारखे झाले.
त्या रात्री उपस्थितांपैकी प्रत्येक व्यक्ति, घडलेला प्रत्येक प्रसंग हेन्रीला तपशीलवार आठवत होता. पांढराशुभ्र वेष परिधान केलेली सारा बर्नहार्ट, क्लॉड डेबसी व ऑस्कर वाईल्ड यांच्यामध्ये बसली होती. ॲनातोल फ्रान्स कोणाशी तरी वाद घालत होता. येथे वादसुद्धा कसे अगदी मुद्द्यांना धरून चालत. कुजबुजत्या आवाजात काचपात्र किणकिल्यासारखे हसत, कंबरेत वाकत, फारच झाले तर भ्रुकुटी किंचित वक्र व्हायची. ला नुव्हेलच्या तुलनेत येथील वाद म्हणजे विणकामाच्या सुयांनी खेळलेले द्वंद्वयुद्ध वाटले असते. ही दुनिया यशस्वी लोकांची दुनिया होती. अपेशी लोकांच्या दुनियेहून एकदम निराळी.
मिसीयाच्या अगत्यशील स्वागताने हेन्री अगदी हवेत विहार होता. तिच्या नवऱ्याने तिचा वेळ जावा म्हणून एक मासिक सुरू केले होते. त्याच्या मुखपृष्ठाचे काम पहिल्याच भेटीत त्याने हेन्रीकडे सोपविले आणि निघताना पुन्हा परत यायचे बजावून सांगितले.
त्या रात्री पहिल्यांदाच त्याला जाणवले की त्याची गणना एका यशस्वी पुरुषात केली जात आहे? बुटका असलो तरी मी तुलूझ-लोत्रेकांच्या कुळातील एक आहे. एक तरुण आणि धाडसी चित्रकार म्हणून जग मला ओळखते. पॅरीसमधील कोणतेही दरवाजे माझ्यासाठी उघडतील. मी जाईन तेथे कंबरेत लवून माझे स्वागत होईल.
स्वतःच्या या नव्या ओळखीनंतर हेन्रीने पॅरीसमधील झगमगत्या जीवनप्रवाहात स्वतःला झोकून दिले. दिवसभर स्टुडिओत काम. रात्री भटकंती. आज इथे तर उद्या तिथे. कॅफे शे वेबेर, कॅफे आँग्लीस, आयरीश-अमेरिकन बार, रू रोयाल, शे मॅक्झीम, ल एल दोरॅदो, ल लाम्ब्रा, लेझ्‌ अँम्बॉसॉदर, ल कझिनो द पॅरीस, फॉलीज बर्जेरा, पोलेझ्‌ द ग्लास, व्हेलोड्रोम. पहाटेपर्यंत भटकंती आणि अखंड मद्यपान. साहजिकच त्या पाच वर्षांत म्हणण्यासारखे फारसे काही झाले नाही. मोंमार्त्रमध्ये फारसा मानसन्मान त्याच्या वाटेला येत नसे. तरीही त्याची निर्मिती अखंड चालू होती. कदाचित कलाकाराची निर्मितीप्रक्रिया ही आत्मसन्मान मिळवण्याचा एक मार्ग असली पाहिजे.
पॅरीसमधील सर्व ख्यातनाम बार, तेथे भेटणाऱ्या स्त्रिया, यौवना व मध्यमा, गोऱ्या व सावळ्या, नट्या, नर्तिका, गायिका, फॅशन मॉडेल, रात्रीची सुरुवात संध्याकाळी जेन ॲव्हरीलबरोबर मारलेल्या गप्पांनी तर सांगता पहाटे पाच वाजता झिमरमनचा व्हेलोड्रोमवरील सायकलचा सराव बघण्याने व्हायची. प्रिन्स ऑफ वेल्सने ल जारदाँ द पॅरीसमध्ये दिलेली शाही मेजवानी, ड्रेफ्युज प्रकरणाअगोदर एमिल झोलाबरोबर घेतलेले जेवण, अधूनमधून केलेल्या लंडन, ॲमस्टरडॅमच्या फेऱ्या यात त्याचे दिवस गेले. लंडनच्या फेरीत त्याने जेम्स व्हिसलरच्या चेल्सीमधल्या स्टुडिओत केलेले स्केच, समलिंगी संभोगाच्या आरोपाखाली अटक होण्यापूर्वी थोडे दिवस आधी ऑस्कर वाईल्डचे केलेले एक पोस्टर अशा फुटकळ गोष्टींशिवाय त्याच्या हातून महत्वाचे असे काही झाले नाही. ला गुल्वी आता स्वतंत्रपणे कार्यक्रम करू लागली होती. तिने तिच्या कनातीचे पडदे हेन्रीकडून रंगवून घेतले.
(हे पडदे म्हणजे दोन मोठे कॅनव्हास होते. हेन्रीच्या निधनानंतर ला गुल्वीच्या पडत्या काळात तिने ते एका आर्ट डीलरला विकले. त्या डीलरने अजाणतेपणी त्याचे कापून तुकडे केले. नंतर १९२९ साली त्याचा शोध लागला आणि ते जोडून एकत्र केले गेले. सध्या हे पडदे म्हणजे लूव्हरचे एक भूषण समजले जातात.)
डकार, लिस्बन, माद्रिद, बार्सिलोना अशा ठिकठिकाणी हेन्री हिंडला. या भटकंतीत तो शेकडो लोकांना भेटला. पाटर्यांमध्ये विदूषकी चाळे केले. तरी अंतर्यामी तो एकाकीच होता. हे एकलेपण दूर करण्यासाठी तो मद्यपानाचा आसरा घेई. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत. मग घोडागाडीतच झोप. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवे ठिकाण नवी माणसे. त्याला कळून चुकले होते की कोणत्याही स्त्रीच्या प्रेमाचा लाभ त्याला कधीही होणार नाही. युवतींचे मोहक हास्य त्याच्यासाठी नसायचे. ते असायचे एका प्रसिद्ध चित्रकाराकरिता. त्याच्या वयाला बत्तीस वर्षे पूर्ण झाली होती. पण तो दहा वर्षांनी अधिक वृद्ध दिसायचा. त्याची प्रकृती झपाट्याने खालावत चालली होती. तो पूर्वीच्या निम्म्यानेसुद्धा काम करू शकत नसे. मद्याचा पेला उचलताना त्याचे हात कंप पावत. पाय इतके दुखायचे की कितीही दारू प्यायली तरी वेदनांचा विसर पडत नसे.

(फोटो - हेन्री तुलूझ लोत्रेक विदुषकाच्या वेषात)



No comments:

Post a Comment