Tuesday, October 2, 2018

मुलँ रूज - २०


डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पॅरीसमध्ये जागोजागी उत्साहाचे वातावरण जाणवू लागले. दुकानात नाना तऱ्हेचा माल दिसू लागला. लोक खरेदीसाठी गर्दी करू लागले. मित्रांशी बोलताना हेन्रीच्या लक्षात आले की प्रत्येकाचा नाताळच्या सुटीत काय काय करायचे याचा बेत ठरलेला आहे. कोण मैत्रिणीकडे तर कोण नातेवाइकांकडे जाणार असतो. तीन वर्षांची मैत्री ॲतेलिएमधील शेवटच्या टर्मबरोबर संपणार होती. सर्वजण लवकरच वेगवेगळ्या दिशेने पांगणार होते. दुपारचे ओग्युस्तिनामधील आनंदी वातावरण, ल नुव्हेलमधील वादविवाद व रात्रीची ल एलीसमधली धमाल या सगळ्यांना हेन्री लवकरच मुकणार होता.
नाताळच्या संध्याकाळी आईच्या घरी बसला असताना तो या विचारांनी उदास झाला. छतावर दिव्याच्या प्रकाशाचा लंबगोल कवडसा पडला होता. फायर प्लेसमध्ये एक मोठा ओंडका धगधगत होता. मेंटलवर ठेवलेल्या ॲलॅबॅस्टर क्लॉकची टिकटिक एखाद्या गळक्या नळातून पाणी ठिबकण्याचा आवाज यावा त्याप्रमाणे वाटत होती. बाहेरच्या शांत वातावरणात बर्फ भुरभुरत होता. मधूनच रस्त्यावरच्या रहदारीचे आणि नाताळच्या गर्दीचे आवाज येत आणि विरून जात. उरे फक्त दिव्याच्या पिवळसर प्रकाशातील निःस्तब्ध शांतता.
‘‘तुमचा इकॅरस काय म्हणतोय?’’ हातातले विणकाम मधेच थांबवीत आईने विचारले, ‘‘तुमच्या मनासारखं काम होतंय ना.’’
‘‘फारच छान चाललंय.’’ आई आपल्या चित्रकलेविषयी उत्सुकता दाखवतेय याचा त्याला फारच आनंद झाला. ‘‘प्रायमरी शॅडोज्‌ रंगवून झाल्यात. चेहरासुद्धा संपत आलाय. पण अजून खूप घोटकाम करायचं बाकी आहे.’’
बोलताना तो आईकडे बघत होता. बिचारी. तीही त्याच्यासारखीच एकाकी होती. एका परीने ती मायलेकरे दोघेही समदुःखी असली तरी हळूहळू वाढत जाणाऱ्या दुराव्याचा एक अदृश्य पडदा त्या दोघांच्या मधे लटकत होता. त्यामुळे त्यांच्या संवादात मधेच खंड पडायचा.
नाताळमध्ये काय करावे याचा बेत काही नक्की होऊ शकला नाही. पण बोलता बोलता पुढच्या वर्षी स्टुडिओ भाड्याने घेण्याचा विषय निघाला. आईने स्वतंत्र स्टुडिओ असावा याला मान्यता दिली. पण मोंमार्त्रमध्ये स्टुडिओ थाटायला तिचा ठाम विरोध होता.
‘‘हे बघ. पाहिजे तर मादाम ल्युबतेला देखरेखीला म्हणून ठेवता येईल. पण स्टुडिओ घ्यायचा असेल तर तो चांगल्या वस्तीतच हवा.’’
त्याची नजर परत शेकोटीतल्या विस्तवाकडे वळली. या वेळी आपले मित्र काय करत असतील असे त्याच्या मनात आले. फ्रँक्वा गोझी, लुई आँक्तां, रेने ग्रॅनीए, रॅचो व त्याच्या मैत्रिणी.
हातातील विणकाम चालू ठेवून मधेच आई त्याच्याकडे बघत होती. त्याचा अस्वस्थपणा तिच्या लक्षात आला. तिला वाटले, अजून तरी सगळे ठीक चाललेय. पण पुढे काय वाढून ठेवलेय देव जाणे. हेन्रीची थोडा काळ लांबलेली पौगंडावस्था संपत आली होती आणि आता तो तारुण्यात पदार्पण करू पाहत होता. कळी पूर्ण उमलायला अजून थोडा अवकाश होता. तुलूझ्‌ लोत्रेकांचे गरम रक्त त्याच्या धमन्यांत सळसळू लागले होते. वारे घोंगावू लागले होते पण वादळ सुरू व्हायला अजून अवकाश होता.

No comments:

Post a Comment