Saturday, October 13, 2018

मुलँ रूज - ४६

बाहेर पडताक्षणी दिसलेल्या पहिल्या घोडागाडीत तो लगबगीने चढला. गाडीवानाला मूलँ रूज म्हणून फर्माविले. गाडी चालू झाल्यावर त्याने मागे वळून पाहिले. झाडाच्या फांदीआडून आईच्या खोलीची खिडकी दिसत होती. तावदानातून प्रकाश क्षीणपणे झिरपत होता. बिचारी आई. तिने वर्षभर एवढ्या प्रचंड घरात एकाकी अवस्थेत दिवस काढले. वर्षातील ही शेवटची रात्र तरी तिच्या सहवासात घालवायला हवी होती. त्याच्या मनात आले. पण परस्परांच्या सहवासात दोघांनाही घुसमटल्यासारखे होत होते. त्यामुळे आपण जे ठरविले आहे ते एका परीने बरेच आहे.
बाहेर पडणाऱ्या पावसाने थंडीत भर पडली होती. त्या थंडी-पावसातसुद्धा गाडीवान गाणे गुणगुणत मोठ्या मजेत स्वतःशी हसत रस्त्यावरच्या गर्दीतून गाडी हाकत होता. हसणे हेच आनंदी आयुष्याचे साधे सरळ रहस्य आहे. हसून घ्या! जास्तीत जास्त हसून घ्या. डोक्यात विचार मात्र अगदी कमीतकमी करा. कोणीतरी म्हटलेच आहे. हसण्यासाठी एखाद्या निमित्ताची वाट पाहू नका. नाही तर सगळे आयुष्यच त्या वाट पाहण्यात संपून जायचे.
गाडी मुलँ रूजसमोर येऊन थांबली आणि हेन्रीची तंद्री भंगली. नववर्षाच्या निमित्ताने मुलँ रूजवर दिव्यांची मोठी रोषणाई केली होती. त्याला गाडीतून उतरताना बघताच सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचे अगत्यपूर्वक स्वागत केले. लॉबीमध्ये लावलेल्या त्याच्या फर्नांदो द रिंगमास्टरह्या भव्य पेंटिंगवर मोठा प्रकाशझोत सोडल्यामुळे आत शिरताच सर्वांचे लक्ष वेधले जाई. तिकडे एक ओझरता दृष्टिक्षेप टाकून हेन्री सर्वांची विचारपूस करीत पुढे गेला.
‘‘वेलकम अँड हॅपी न्यू इयर, मस्य तुलूझ.’’ दरवान काचेचा दरवाजा उघडताना म्हणाला.
हेन्री बॉलरूममध्ये जाऊन पोचला. बॉलरूम अतिशय भव्य होती. तेथील दिव्यांच्या झगमगाटाने त्याचे डोळे दिपले. दर वेळी तेथील भव्यतेतील कुरूपता हेन्रीच्या डोळ्यांना खुपत असे. तो हॉल अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल, असा असला तरी तेथे ल एलीसमधील उदास काव्यात्मता नव्हती की मोंमार्त्रमधील कोणत्याही बकाल बिस्ट्रोमधील आपलेपणा.
तो सरळ बॉलरूमच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या महॉगनी बारच्या दिशेने चालत गेला. सारा सिंकवर ओणवी होऊन ग्लास धूत होती. पार्श्वभूमीला आरसे, त्याच्या पुढ्यात मांडलेल्या विविध मद्यांच्या बाटल्या व निरनिराळ्या आकाराचे चषक. हेन्री धापा टाकत एका हाताने काउंटरचा आधार घेत उभा राहिला.
‘‘अरे बापरे. आज तुम्ही इतक्या लवकर उगवलात?’’ तिच्या डोळ्यांत घरेलू स्मित होते.
‘‘त्याचं काय आहे, आज मी एक पार्टी देणार आहे. त्याची सगळी व्यवस्था ठाकठीक आहे ना, त्याची खात्री करून घ्यायला म्हणून मी इतक्या लवकर आलोय.’’
‘‘आज कपडे अगदी खास घातलेले दिसतायत. या पोशाखात तुम्ही काय रुबाबदार, हँडसम दिसता आहात म्हणून सांगू.’’ सारा डोळा मारत म्हणाली.
‘‘उगाच वेळ दवडू नकोस. एक कोनॅक दे.’’
तिने एक चषक कोनॅकने भरला व त्याच्या समोर ठेवला.
समोर आलेली कोनॅक त्याने एका घोटात संपविली.
‘‘जरा अंमळ धीर धरा. एवढी घाईने पिऊ नये. अशानं पोटातील आतडी जळतात.’’
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत त्याने हातातला चषक काउंटरवर ठेवला. मोठ्या प्रयत्नपूर्वक एका बारस्टूलवर विराजमान झाला. आता तो एकदम उंच दिसू लागला. त्याचे रुंद खांदे तिच्या बरोबरीला आले.
‘‘मस्य तुलूझ. सावकाश प्यायला काय होतं तुम्हाला?’’
‘‘माझ्या घशाला कोरड पडली होती.’’ त्याने आपल्या डोक्यावरची हॅट काढून ठेवली. ‘‘खरं म्हणजे अजूनही माझी तहान भागली नाहीय, संध्याकाळी जेवताना घोटभर वाईन घेतली होती तेवढीच.’’ त्याने सावकाश एक सिगरेट शिलगावली आणि म्हणाला, ‘‘आणखी एक देतेस का?’’
‘‘जर तहानच लागली असेल तर एक ग्लास पाणी देते मी. कोनॅकने काही तहान भागत नसते.’’
‘‘तुझं चुकतं ते इथेच. कोनॅकने तहान भागते, अन्नपचनाला मदत होते, स्नायूंमध्ये ताकद येते, रक्त शुद्ध होतं, यकृत साफ राहतं, पोटात गुदगुल्या होतात, अंगात ऊब निर्माण होते आणि वर चित्तवृत्ती उल्हसित होतात ते वेगळेच. चल चटकन माझा ग्लास भर पाहू. आणि अशी डोळे वटारून पाहू नकोस. थोड्या वेळात नव्या वर्षाची सुरुवात होईल. अरे नव्या वर्षावरून आठवलं -’’ त्याने कोटाच्या खिशातून एक लहानसा खोका बाहेर काढला. ‘‘ही एक छोटीशी भेट. याचा अर्थ असा नव्हे की अशा भेटीला तू पात्र आहेस. सारखी मला प्रवचन झोडत असतेस. एकेका ड्रिंकसाठी तुझ्या नाकदुऱ्या काढायला लावतेस. पण तरीही तू मला आवडतेस.’’
‘‘माझ्यासाठी -’’ एप्रनला हात पुसत ती जवळपास ओरडलीच.‘‘ओह! मस्य तुलूझ्‌. यू आर सो स्वीट.’’ तिने काउंटरवर वाकून त्याच्या गालाचे एक चुंबन घेतले.
‘‘, हे काय? प्रपोजल वाटतं. सांभाळ. आता एक ड्रिंक द्यायला काय घेशील.’’
तिने तो खोका मोठ्या उत्सुकतेने उघडला, ‘‘वा! कित्ती छान. माझ्या नावाची आद्याक्षरंसुद्धा आहेत की.’’
त्या खोक्यात तिच्या नावाची आद्याक्षरे असलेले अर्धा डझन रुमाल होते. त्या रुमालांच्या कापडाचा पोत बोटांनी बघताना ती अगदी आनंदून गेली.
‘‘नववर्षाची भेट म्हणजे चिनी मातीची फुलदाणी हे अगदी जवळपास ठरलेलं असतं. त्यापेक्षा हे रुमाल कसे काय वाटतात?’’ हेन्रीने डोळे मिचकावीत विचारले, ‘‘आता कृपा करून मला ड्रिंक द्यायला काय घेशील?’’
त्याच्या बोलण्याकडे लक्ष नाहीय असे दाखवीत ती दुसऱ्या कामात गुंतली. तिचा थंडपणा पाहून हेन्री थोडासा चिडून म्हणाला, ‘‘हल्ली इथली सर्व्हिस खूप खालावलेली दिसतेय.’’
‘‘तुम्हाला एक पेग अगोदरच दिलाय. एवढी दारू पिणं चांगलं नाही तब्येतीला.’’
‘‘अग काय बोलत्येस तू. अशाने कसा धंदा होणार तुमचा? झिडलरला वाटतंय की तू धंदा चांगला करतेयस म्हणून.’’
सारा हेन्रीच्या जवळ गेली व कोणाला ऐकू जाणार नाही अशा सुरात म्हणाली, ‘‘इतर कोणी दारू पिऊन आपलं पोट जाळून घेतलं तर मला त्याचं काही नाही. पण तुम्ही मात्र एका पेगच्या वर पिऊ नका. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.’’ ती पोटतिडकेने बोलत होती.
‘‘तुला एक गोष्ट माहितीय का? माझ्यावर दारूचा काहीच परिणाम होत नाही.’’
‘‘तसं सर्वच म्हणतात सुरुवातीला.’’
‘‘पण मी मला पचते तेवढीच पितो. मला कधी झिंगलेला पाहिलंयस.’’
‘‘चढली नाही तरी दारूचा दुष्परिणाम हा सगळ्यांवर होत असतोच.’’
‘‘या बायकांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. आता शेवटचं सांग मला कोनॅक देत्येस की नाही?’’
‘‘ठीक आहे.’’ तिने पेल्यात बदाबदा कोनॅक ओतली व त्याच्या पुढ्यात आदळला.
त्याने पेला एका घोटात रिकामा केला व ओठ पुसत तो म्हणाला, ‘‘आता ते रुमाल जरा बाजूला ठेव आणि कामाला लाग. मी मागवलेले लॉबस्टर आले का?’’
‘‘या कपाटात ठेवल्येत.’’
‘‘आणि शॅम्पेन.’’
‘‘अगदी तुम्हाला हवी होती तीच मिळाली आहे. मोये ए शांदों ७८.’’ तिने बकेटमध्ये थंड करीत ठेवलेल्या बाटल्या दाखवल्या.
‘‘वाह! तेरा जवाब नहीं.’’
बारच्या आरशात त्याला झिडलर येताना दिसला.
‘‘काय झालंय काय तुम्हाला?’’ हेन्री स्टुलावरून मागे वळत म्हणाला, ‘‘नुकतेच कोणाला तरी पोचवून आल्यासारखे दिसताय. सारा, एक डबल रम आण पाहू.’’
झिडलर हेन्रीच्या शेजारील स्टुलावर विराजमान होऊन खिन्न मुद्रेने म्हणाला, ‘‘काही कळेनासं झालंय. तुम्हाला आठवतंय मस्य, मी किती ठासून सांगायचो सगळ्यांना. या मुलँ रूजमधून कमीतकमी दहा एक लाख फ्रँकची कमाई अपेक्षित आहे. पण कुठे माशी शिंकली काही कळत नाही. शो चांगला दिमाखदार आहे, संगीत उत्कृष्ट आहे, मद्य लज्जतदार आहे, कॅनकॅनला लोकांची दाद मिळते, तिकिटांचे दरसुद्धा खिशाला परवडतील असेच ठेवलेत. तरीही गर्दी जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही.’’
‘‘आज बघा लोक कसे गर्दी करतील ते!’’ हेन्री सांत्वनपर म्हणाला.
‘‘त्यात विशेष ते काय? नूतन वर्षासाठी म्हणून सगळीकडेच गर्दी उसळत असते. माझं काहीतरी मुळातच चुकत असलं पाहिजे. एक्स्पोझिशन चालू असतानासुद्धा इथे फारसे लोक फिरकले नाहीत. इंग्लिश अमेरिकन आले तेसुद्धा अगदी रस्ता चुकून. तेवढेच. जर अमेरिकनांनाच आपल्याकडे आकर्षून घेता येत नसेल तर धंदा तो काय होणार?’’
‘‘तुमचं काहीच चुकलेलं नाहीय. फक्त लोकांना मुलँविषयी पुरेशी महिती नाहीय म्हणून.’’
निराशेने ग्रासलेला झिडलर म्हणाला, ‘‘लोकांना सगळी माहिती मी दिलीय. प्रसिद्धीवर केवढा पैसा मी खर्च केलाय ठाऊक आहे? शहरातल्या प्रत्येक टपरीवर मुलँचं पोस्टर लागलंय. सगळ्या भिंती, अगदी मुतारीसुद्धा, मोकळी सोडलेली नाही. या पॅरीसमध्ये फिरताना पावलोपावली मुलँ रूजची पोस्टर्स नजरेस पडतात.’’
 ‘‘अगदी खरंय. पण कोणी तिकडे बघत नाही.’’
‘‘जाहिरातीतल्या सगळ्यात महागड्या आर्टिस्टकडून करून घेतलंय.’’
‘‘अगदी मायकेल अँजेलोकडून करून घेतलंत तरी त्यात काही अर्थ नाही. ते एक छान पेंटिंग होईल, पोस्टर नव्हे.’’
‘‘काय फरक आहे पेंटिंग आणि पोस्टरमध्ये?’’ झिडलरने चमकून विचारले.
‘‘तोफेच्या धडाक्यात आणि बासरीच्या मंजूळ सुरात जो फरक आहे तोच. पोस्टर कसं अगदी बघता क्षणी नजरेत भरलं पाहिजे. पहिल्या झटक्यात बघणारा जागच्या जागी उडायला हवा. त्याची उत्सुकता चाळवली गेली पाहिजे. नाही तर हे तुमचे पोस्टर पाहा. एक मुलगी घोड्यावर बसून चाललीय. चेहऱ्यावर मूर्खासारखे हसूं. ही मुलगी एखाद्या सर्कशीतली वाटते. मुलँ रूजमधील कॅनकॅन नर्तिकेशी तिचा अगदी दुरान्वयानेही संबंध पोचत नाही.’’
‘‘हा संबंध कसा प्रस्थापित करता येईल?’’
‘‘अगदी सोपं आहे. तिला कॅनकॅन नृत्याच्या पोजमध्ये दाखवायची.’’
‘‘माय गॉड. मला हे यापूर्वीच कसं सुचलं नाही?’’
‘‘मुलँ रूजमध्ये रोज जे घडतं त्याची झलक, थोडीतरी झलक, पोस्टरमध्ये दिसायला हवी. कॅनकॅन नाच चालू आहे. नर्तिकेने एका हाताने आपला स्कर्ट थोडा वर उचलून धरलाय. एक पाय हवेत उडवलाय. आणि हे नृत्य दूर एखाद्या कोपऱ्यातल्या स्टेजवर होत नसून अगदी सगळ्या प्रेक्षकांच्या मधोमध, कोणाला कुल्ल्यावर हळूच चापटी वगैरे मारायची असेल तर शक्य होईल इतक्या जवळ चालू आहे.’’
झिडलरच्या डोक्यात काय किडा वळवळतोय हे ताडून हेन्री मधेच म्हणाला, ‘‘एक मिनिट थांबा. तुम्हाला वाटत असेल की हे पोस्टर मी करावं. तर छोड दो वो बात.’’
‘‘तुमच्याशिवाय दुसरा कोणीही माझ्या नजरेसमोर येत नाही.’’
‘‘पेर कोटेलकडे जा. तो एक चांगला लिथोग्राफर आहे.’’
‘‘तुम्ही केलेली स्केचेस मी पाहिलीयत. त्याचे पोस्टर केले तर ते पेर कोटेलपेक्षा चांगले होईल.’’
‘‘हे पहा. मी यापूर्वी कधीही पोस्टर केलेलं नाहीय. लिथोग्राफीमधलं ओ का ठो मला येत नाही.’’
‘‘त्यात काय आहे? तेवढ्यापुरती कोटेल तुम्हाला मदत करेल. मला वाटतं तो तेवढ्या मोठ्या मनाचा आहे.’’
‘‘लिथोग्राफीचं काम किती किचकट असतं ते तुम्हाला ठाऊक नाहीय. त्यात प्रावीण्य मिळवायला बरीच वर्षं लागतात.’’
‘‘तुम्ही मनावर घेतलंत तर काहीच कठीण नाही.’’
‘‘पुढच्याच महिन्यात मी ब्रुसेल्सला चाललोय. मला मुळीच वेळ नाहीय.’’
झिडलर पुढचा अर्धा-एक तास आपले म्हणणे हर एक प्रकारे त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करीत होता. हेन्रीने त्याला टाळायची खूप शिकस्त केली. मी मुलँत पुन्हा पाऊलही ठेवणार नाही, असे निक्षून सांगूनही पाहिले. पण सरतेशेवटी झिडलरच्या चिकाटीचा विजय झाला.
हेन्रीने पोस्टर करण्याला एकदाची मान्यता दिल्याचे ऐकून साराला आनंद झाला. झिडलर गेल्यावर हेन्रीला ती लाडीकपणे म्हणाली, ‘‘हे पोस्टर लागलेलं कधी एकदा बघेन असं झालंय.’’
‘‘काय कटकट माझ्यामागे लावून दिलीस. मी जवळ जवळ त्याला फुटवलाच होता. तेवढ्यात तू कशाला मधेच लुडबुडलीस. काय तर म्हणे लॉबीतल्या माझ्या पेंटिंगचं सर्वजण कौतुक करीत असतात.’’
‘‘पण मी खरं तेच सांगितलं.’’
‘‘पण वेळ चुकली. तुम्हा बायकांना आपलं तोंड कधी बंद ठेवता येईल तर शप्पथ. तुला कल्पना आहे तू काय घोटाळा करून ठेवलायस तो? तो आता सर्वांना सांगत सुटेल मी पोस्टर करतोय म्हणून. झक मारत मला त्या पेर कोटेलला गाठला पाहिजे, लिथोग्राफी शिकायला. लिथोग्राफी शिकून मग पोस्टर करायला घ्यायचं म्हणजे कमीतकमी पाच वर्षं लागतील हे पोस्टर तयार व्हायला.’’
‘‘मला काही त्यातलं कळत नाही म्हणून विचारतेय हां. तुमच्या स्केचेसवरून पेर कोटेल छापू शकणार नाही का?’’
‘‘माझं पोस्टर लोकांना माझ्या सहीशिवाय ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी मला स्वतःला लिथोग्राफी मुळातून शिकण्याशिवाय पर्याय नाही.’’
त्याने खिशातून घड्याळ काढून पाहिले व म्हणाला,‘‘माझे मित्र येण्याची वेळ झाली आहे. मी माझ्या टेबलाकडे जातोय. कोनॅकची एक बाटली पाठवून दे. आता तुझा उपदेश खूप झाला. हे बघ नो कोनॅक नो पोस्टर.’’
हेन्री काउंटरच्या कडेचा आधार घेत स्टुलावरून खाली उतरला व त्याच्यासाठी राखून ठेवलेल्या टेबलाच्या दिशेने काठी टेकत टेकत निघाला. सारा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. त्याचा पोशाख अगदी झोकदार होता. तरी त्याच्या चालण्यातील बेंगरूळपणा काही त्याने लपत नव्हता. तिला त्याची कणव आली.
‘‘थँक्यू फॉर द हँडकरचीफ्स मस्य तुलूझ,’’ ती लांबूनच म्हणाली, ‘‘अँड हॅपी न्यू ईयर.’’ त्याने मागे वळून स्मित केले. त्याचा चेहरा कुरूप असला तरी हसरा होता. पण त्याचे बदामी डोळे गहिऱ्या दुःखात झाकोळले होते.

(बॉल अँट मुलँ रूज – ज्युल्स शेरे - चार रंगी लिथोग्राफ
)

(ल गुल्वी अँट मुलँ रूज - तुलूझ लोत्रेक - चार रंगी लिथोग्राफ )

(ज्युल्स शेरेच्या बॉल अँट मुलँ रूज या आणि लोत्रेकच्या ला गुल्वी अँट मुलँ रूज या पोस्टरची तुलना केली तर त्याला नेमके काय म्हणायचेय ते कळून येते. लोत्रेकने शेरेच्या पोस्टरमधील बराच फाफटपसारा कमी केला आणि रचना सोपी केली, ते पोस्टर सर्कसचे न वाटता कॅबरेचे आहे असे वाटू लागले आणि त्याच वेळेला ते पोस्टर बघणाऱ्याला आपण स्वत: कॅब्रेच्या प्रेक्षकांपैकी एक आहोत असे वाटायला लावणारा आभास त्याने मोठ्या चतुराईने निर्माण केला.)

No comments:

Post a Comment