Tuesday, October 30, 2018

मुलँ रूज - ८९

पहाटवाऱ्याच्या झुळुकेत त्याचा डोळा लागला. जाग आली तेव्हा दिशा फाकल्या होत्या. आकाशाचा रंग गुलाबी झाला होता. रात्र आपल्याबरोबर चांदणे घेऊन निघून गेली होती. दूरवर कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकू आला. जोसेफ डोळे चोळत उठला.
‘‘बाँज्यूर जोसेफ, झोप चांगली लागली का?’’ हेन्री त्याच्याकडे बघत म्हणाला.
‘‘सॉरी मस्य. माझा नुकताच डोळा लागला.’’
‘‘तू थकलायस. हे सगळं घरच थकलंय माझ्यामुळे. जरा जवळ ये. मला उठव आणि माझा चष्मा मला दे.’’
जोसेफने जवळ जाऊन हेन्रीला अलगद उठवून बसते केले आणि त्याला चष्मा दिला.
‘‘तू अजून आहे तसाच आहेस. काही बदलला नाहीस. तुला आठवतंय, माझ्या लहानपणी, आमच्या फाँतेन्समधल्या घरी तू मला सकाळी उठवायला यायचास आणि मी झोपेचे सोंग घेऊन पांघरूण घेऊन पडून राहायचो. जरा इकडे बस. मला तुझ्याशी काही बोलायचंय.’’
‘‘डॉक्टरांनी सांगितलंय की जास्त बोलू नका. त्रास होईल तुम्हाला.’’
‘‘काही हरकत नाही. आता फार दिवस उरले नाहीयेत. हे बघ. मी गेल्यावर आईची काळजी घे. सारखा तिच्या जवळ राहा. तिने बोलावले नाही तरी काही तरी निमित्त काढून तिच्या खोलीत जा. तिला पांढरे गुलाब खूप आवडतात. रोज सकाळी तिच्या खोलीत ताजी फुले ठेवायची व्यवस्था कर.’’ बोलण्याच्या श्रमाने त्याला धाप लागली. दम घेण्यासाठी त्याने डोळे मिटले.‘‘जा खाली जाऊन कॉफी वगैरे घेऊन ताजातवाना हो.’’
जोसेफ त्याला सोडून खाली जाण्यास नाखूष होता.
‘‘काही घाबरू नकोस. तुझ्या गैरहजेरीत मी काही मरत नाही.’’
त्या दिवशी हेन्रीला थोडे बरे वाटले. त्याने दोन चमचे खीर घेतली. दुपारी त्याला भेटायला सगळे जुने नोकरचाकर जमा झाले. ॲनेत व ऑगस्टने त्याला अंगाखांद्यावर खेळवले होते. ते आल्बीहून सकाळीच आले होते. संध्याकाळी आई त्याच्या उशाशी काहीतरी विणकाम करीत बसली होती.
‘‘आज दिवस कोणता?’’ त्याने क्षीण आवाजात विचारले.
‘‘रविवार. ८ सप्टेंबर.’’
‘‘ममा, आज माझ्यामुळे तुम्हाला चर्चमध्ये प्रार्थनेला जाता आलं नाही.’’
‘‘काय माँ पेतीत?’’ तो काय बोलतोय ते तिला नीट ऐकू आले नाही.
‘‘डेनिसचं पुढे काय झालं? तिचं लग्न झालं का?’’
‘‘होय. तिचा नवरा नेव्हीमध्ये ऑफिसर आहे. तीन मुलं आहेत त्यांना.’’
‘‘ममा, आमचं थोडं चुकलंच...’’
आईने ओठांवर बोट ठेवले व त्याला पुढे बोलू दिले नाही. त्याने डेनिसच्या आठवणी चाळवण्याचा प्रयत्न केला. पण तिचे केस आईच्या केसांसारखेच ऑबर्न रंगाचे होते यापलीकडे त्याला काही आठवेना. आयुष्याची अखेर दिसू लागल्याने पूर्वस्मृती अंधूक व्हायला लागल्या होत्या.
अर्धवट झोपेत त्याला एक स्वप्न पडले. खेड्यातील बालपण, पॅरीसमधील नवीन शाळा, मॉरीस, आजारपण, उपचारासाठी केलेली भटकंती, ॲतेलीए, रॅचो, मोंमार्त्रमधल्या धोबिणींचे धुणी बडविणे, ल नुव्हेल, मुलँ रूज, मिसीया नातानसोनकडील पार्टी. अशा एकमेकांशी विसंगत दृश्यांची मालिका त्याच्या डोळ्यांसमोरून सरकत होती. मधेच आई शेजारी बसलीय याची जाणीव व्हायची. आपण मेल्यावर आपल्या वापरातल्या वस्तूंचे, कपड्यांचे काय होईल याचा विचित्र विचार त्याच्या डोक्यात तरळून गेला. मोठ्या माणसाचे पण एवढ्या लहान मापाचे कपडे आणि वेताची काठी. आपल्यासारख्याच दुसरा कोणी बुटका मिळाला तरच यांचा उपयोग होईल. आता त्या रंगांच्या ट्यूब पिळून रंग कोण काढणार? ब्रश, पॅलेट, नाईफ, इझल. सर्व काही अडगळीत पडून राहील.
‘‘ममा.’’ त्याने क्षीण आवाजात हाक मारली. ‘‘तुम्हाला माझे ते जपानी चित्रांचे पुस्तक कुठे आहे ते माहीत आहे ना? त्याची नीट काळजी घ्या.’’
‘‘माझ्या सगळ्या पेंटिंगची व्यवस्था मी मॉरीसला बघायला सांगितली आहे.’’
त्याने केलेली तैलरंगातील पेंटींगची संख्याच काही शेकड्यात भरली असती. शिवाय असंख्य ड्रॉइंग्ज, स्केचेस, वॉटर कलर्स, सँग्वाईन्स, लिथोग्राफ्स, चारकोल, पेन आणि इंक. त्याला नावे ठेवणाऱ्या लोकांनी त्याची ही प्रचंड निर्मिती पाहिली असती तर त्यांना हेन्रीला किमानपक्षी लोफर म्हणणे तरी सोडून द्यावे लागले असते.
‘‘ममा-’’ पुन्हा आईने तोंडावर बोट ठेवलेले पाहून तो म्हणाला, ‘‘मला थोडा वेळ बोलू दे. शेवटचंच. मग मी गप्प बसेन. कायमचा...’’
‘‘एक विचारू? तुम्ही तुमच्या लहानपणी अगदी चांगले वागायचात का?’’
तिने हातातील विणकाम बाजूला ठेवले व म्हणाली, ‘‘नेहमी नाही. कधी कधी मीसुद्धा दंगा करायचे. सगळी मुलं करतात तशी. राजे आता झोपा बरं.’’
तेवढ्यात जोसेफने दरवाजावर टकटक केले व आत आला.
‘‘तार. मादाम ल कॉम्तेस.’’ जोसेफने लिफाफा तिच्या हातात दिला.
‘‘काय आहे?’’ हेन्रीने विचारले, ‘‘पपांची तार आहे का?’’
‘‘मॉरीसची. तुम्हाला वाचून दाखवते.’’ तिने खुर्ची बिछान्याजवळ ओढून घेतली व लिफाफा उघडून वाचायला सुरुवात केली.
‘‘तुमच्या पेंटिंगचा कामोंदोकडे असलेला संग्रह सरकारने लुवरसाठी म्हणून विकत घेतलाय. यू आर इन, हेन्री.’’
‘‘द लुवर...’’ घशाशी आलेला आवंढा गिळत तो म्हणाला, ‘‘नक्की लुवर असंच आहे ना तारेत?’’
अचानक अत्यानंदाने तिला रडू आले. तिने खाली वाकून त्याच्या गालाचे, कपाळाचे पटापट मुके घेतले.
‘‘रिरी. मला कळायला हवं होतं. मला तुमची कला, तुमची लायकी शेवटपर्यंत कळलीच नाही. मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू.’’
‘‘ममा, खरं सांगा? तुम्हाला माझा अभिमान वाटतो का?’’
‘‘होय रिरी. खरंच. मी तुमची आई आहे याचा मला खूप अभिमान वाटतोय.’’
‘‘द लुवरचा मान सॅलूनपेक्षा खूप मोठा आहे ना?’’
‘‘ममा, मी खरं सांगतोय. तुमचा तेव्हा विश्वास बसला नसता. सॅलूनसाठी निवड व्हावी म्हणून इकॅरसवर मी खूप मेहनत घेतली होती, पण हा आजचा मान त्यापेक्षा फार मोठा आहे. नाही का?’’ त्याचा आवाज कापरा होत हळूहळू खोल गेला. घशातून अर्थहीन घरघर ऐकू येऊ लागली. त्याचे ओठ हलत होते.
पहाटेची वेळ झाली तरी काउंट अजून आले नव्हते. जोसेफ खिडकीतून बाहेर नजर लावून उभा होता. आई वाकून त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन त्याला धीर देत होती.
‘‘रिरी. माँ पेतीत. थोडा धीर धरा.’’
ॲनेतच्या हातात रोझरी होती. तिचा एक मणी तोंडाजवळ नेऊन ती मुसमुसून रडत होती. समोर येऊन उभ्या राहिलेल्या मृत्यूचे स्वरूप हे असे होते. फुप्फुसांच्या स्पंदनातील जोर हळूहळू कमी होत चालला होता. घशातून घरघर असा आवाज येत होता. शरीरातील सर्व शक्ती क्षीण होत चालल्या होत्या. शुद्ध हरपू नये म्हणून मेंदूला तारेवरची कसरत करावी लागत होती. फुप्फुसात हवा शिरली की आकाशात भरारी मारणाऱ्या पतंगासारखे वाटायचे. हवा बाहेर आली की गोता खाल्ल्यासारखी अवस्था व्हायची. पुन्हा हवा पाठीवर भरून घेऊन पतंग वर उडेल याची खात्री नसल्याप्रमाणे. जीवनाचा धागा केव्हाही तुटेल इतका नाजूक झाला होता.
पपा, लवकर या पपा. आणखी एक श्वास मला घेऊ दे. हे मृत्यो, थोडी दया कर माझ्यावर. थोडा वेळ थांब.
श्वास घेण्याची धडपड चालू असताना त्याला कोंबडा आरवलेला ऐकू आला. त्याच्या आयुष्यात आणखी एक दिवस उजाडला होता. सप्टेंबरमधील एक सुरेख दिवस. निरभ्र आकाश, प्रसन्न हवा. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर वाट पाहण्याचा विलक्षण ताण पडलेला दिसत होता. एवढ्यात बाहेरून आवाज ऐकू आला. फाटक उघडल्याची परिचित किरकीर, मागोमाग घोड्याच्या टापा.
‘‘पपा आले.’’
बोर्दोमार्गे येताना गाडी चुकल्यावर पुढच्या गाडीची वाट न बघता काउंटनी सरळ घोड्यावर मांड ठोकली होती. दिवसरात्र चौखूर दौड करीत ते आले. लोत्रेकांच्या कुळाची बिरुदावली लावणारे ते एक खरेखुरे सरदार होते. त्या अखेरच्या सरदाराने घोडदौडीतील आपले सारे कौशल्य पणाला लावून वेळ गाठली होती. तुलूझ्‌ लोत्रेकांच्या शेवटच्या वंशजाला तो शेवटच्या घटका मोजत असताना भेटण्याची.
खालच्या मजल्यावरूनच काउंटचा भरदार आवाज वर ऐकू आला, ‘‘मला उशीर तर झाला नाही ना?’’
दुसऱ्या क्षणी काउंट खोलीचा दरवाजा धाडकन उघडून आत आले. कपडे चुरगळलेले, बुटांवर चिखलाचा थर, चेहरा धुळाने माखलेला. हातातील चाबूक अजून तसाच. त्या अवतारातही त्यांच्या चेहऱ्यावरील दुःख स्पष्ट दिसत होते. धापा टाकीत हेन्रीच्या कानाजवळ तोंड नेत ते म्हणाले,
‘‘मला माफ कर बेटा.’’ त्यांनी त्याच्या कपाळाचे हळूच चुंबन घेतले आणि त्याच्याकडे डोळे भरून पाहिले. त्यांनी जर त्यांच्या कुरूप खुज्या मुलाला वेळीच समजून घेतले असते, पण हा तरचा प्रश्न झाला. आता त्याला खूप उशीर झाला होता. कदाचित मुलाच्या मृत्यूने काउंट आणि काउंटेस आपले मतभेद विसरून उरले आयुष्य एकमेकांच्या सहवासात घालविण्यास तयार झाले असते. दोघांचेही वय झाले होते आणि या वयात दोघांना एकमेकांच्या सोबतीची गरज होती.
काउंट ताठ उभे राहिले आणि आपल्या पत्नीकडे वळून म्हणाले, ‘‘अेदल. मला तुमचीसुद्धा माफी मागायला हवीय.’’
दोन पावले मागे सरकून त्यांनी तिला डोळ्यांनी खुणावून हेन्रीच्या जवळ जाण्याचा इशारा केला. ‘‘त्यांच्याजवळ जा. त्यांना तुम्ही हव्या आहात.’’
आई त्याच्या जवळ गेली. आता त्याला फक्त आईचा चेहरा दिसत होता. त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत ती म्हणाली, ‘‘माँ पेतीत, झोपा आता.’’
तिचे गाल अश्रूंनी भिजून चिंब झाले होते. पण तिचा चेहरा मुलाच्या अभिमानाने फुलून आला होता. तिच्या ओठांवर किंचित स्मित होते.
आता उगाच धडपडण्यात काय अर्थ आहे? आईचा चेहरा त्याच्यापासून दूर जातोय असा त्याला भास झाला. उगवत्या सूर्याचे किरण खिडकीतून आत येत होते, पण त्याच्या नजरेसमोर अंधारून येत होते. हा अंधार आतून उगवत होता.
‘‘ममा. अदियू ममा.’’
(वर्देले सिमेटरी मधील हेन्री तुलूझ लोत्रेकची कबर)

No comments:

Post a Comment