Sunday, October 21, 2018

मुलँ रूज - ६६

व्हिन्सेंटच्या आत्महत्येच्या मागोमाग जॉर्ज सुराच्या अकाली मृत्यूमुळे हेन्रीला मोठा धक्का बसला. दोघेही तरुण होते. उमेदीच्या ऐन भरात असतानाच मृत्यूने त्यांना गाठले होते. सुराच्या मृत्यूनंतर असाच एके दिवशी इझलसमोर विमनस्क मनःस्थितीत बसला असताना अचानक झिडलर समोर येऊन उभा राहिला.
‘‘आताच लेव्हिजकडून पोस्टरचे गठ्ठे छापून आलेयत. आज रात्री सर्व पॅरीसभर गल्लोगल्ली पोस्टर लावण्याचे काम पूर्ण होईल. मग बघ उद्या काय धमाल उडेल ती.’’
दुसऱ्या दिवशी उजाडताच लोकांची कुजबुज सुरू झाली. संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत ज्याच्या त्याच्या तोंडी मुलँ रूजच्या पोस्टरचाच विषय होता.
‘‘तू पाहिलंस काय?’’
‘‘काय पाहिलंस म्हणून विचारतोस. पोस्टर?’’
‘‘कॅनकॅन नाचणाऱ्या मुलीचं.’’
‘‘अगदी खुल्लमखुल्ला दाखवलंय.’’
‘‘शी. किती अश्लील.’’
‘‘मास्टरपीस म्हणून गाजेल.’’
‘‘कळायला अक्कल लागते.’’
मुलँ रूजच्या त्या पोस्टरमुळे सर्व पॅरीसभर खळबळ माजली. शहरातील प्रत्येक भिंतीवर, टपरीवर, मुत्रीवर जिकडे पाहावे तिकडे पोस्टर नजरेला पडत होते. पोस्टर बघायला चौकाचौकांतून लोकांची गर्दी जमे. हमरीतुमरीवर येऊन वाद चालत. शेवटी गर्दी इतकी वाढे की रहदारीचा खोळंबा होई. मग पोलिसांना येऊन गर्दी हटवावी लागे.
‘‘नॉम दे दियू. ढुंगण दाखवून नाचणारी पोरगी कधी पाहिली नाहीत काय? चला हटा. पुढे व्हा.’’
लोक माना वर करून, डोळे बारीक करून चित्रकर्त्याचे नाव शोधत. डाव्या कोपऱ्यात त्यांना सही दिसे.
लोत्रेक.
थोड्याच दिवसांत ते नाव सर्वतोमुखी झाले. फुटपाथवरचे ओपन कॅफे, रेस्तोराँ, बिस्ट्रो, कचेऱ्या, क्लब, केस कापण्याची दुकाने, कोपऱ्यावरचे वाणी, वेश्यागृह, शाँझ्‌ एलिझेवरची फॅशनेबल दुकाने, भव्य डायनिंग रूम्स, नाईट क्लब अशा सर्व ठिकाणी लोत्रेकच्या नावाची चर्चा चालू झाली. वृत्तपत्रांचे रकाने मुलँ रूजच्या पोस्टरविषयीच्या बातम्या, परीक्षणे, वाचकांचे मत अशा गोष्टींनी भरून गेले. कलात्मक मूल्य असलेले हे पहिलेच पोस्टर यापासून ते हे पोस्टर म्हणजे जणू सैतानाची निर्मिती शोभेल इथपर्यंत. काही सनातन्यांनी हे पोस्टर जनतेच्या नैतिकतेला घातक असल्याचे जाहीर केले व यामुळे स्त्रियांना मान वर करून रस्त्यावरून चालता येणे अशक्य झाल्याने पोस्टर ताबडतोब काढून टाकावे असा अर्ज नगरपालिकेकडे केला. त्यांना अकादमीच्या सभासदांचा पाठिंबा मिळाला. सनातन्यांच्या गटाने ते पोस्टर अनैतिक आहे असे ठरवले. त्यामुळे पुरोगामी व बंडखोर चित्रकार व समीक्षकांचा गट पोस्टरच्या बाजूने उभा राहिला. त्यांनी ते पोस्टर म्हणजे कला-नैतिकतेचा एक नमुना आहे असे जाहीर केले. त्या पोस्टरमध्ये त्यांना दांभिकतेचा उपहास आणि नव्या नीतिमत्तेचे दर्शन झाले. व्हॅलेंटाईनच्या हॅट घातलेल्या पडछायेत काहींना जीवनाचे क्षणभंगुरत्व दाखविणारे तांडव दिसले. अशा रीतीने दोन गटांच्या भूमिका नक्की झाल्यानंतर साहित्यिक, प्राध्यापक, तत्त्वज्ञ, वकील, डॉक्टर व अन्य व्यावसायिक मंडळी या ना त्या गटाच्या बाजूने उभे राहिले. एवढे झाल्यावर राजकारणी यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते.
मुलँ रूजच्या पोस्टरमुळे लिथोग्राफीच्या तंत्राची बाटल्यांची लेबले व सिगारेटची पाकिटे छापणे यांच्या मर्यादेतून सुटका झाली व तिचा एक स्वतंत्र ग्राफिक कला म्हणून उदय झाला. मस्य तुलूझ्‌ द लोत्रेकने म्युझियम व आर्ट गॅलरीमध्ये बंदिस्त असलेल्या कलेला नकळत रस्त्यावर आणले होते. पोस्टरला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे हेन्री स्तंभित झाला. गंमत म्हणून फेकलेल्या एखाद्या खड्याने हिमकडा कोसळावा तसे झाले.
मॉरीसशी खाजगीत बोलताना त्याने कबूल केले की एवढी खळबळ माजेल याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती.
‘‘मला फक्त झिडलरला थोडीशी मदत करायची होती. ही क्रांती वगैरे काहीही त्या वेळी मनातसुद्धा नव्हतं.’’
‘‘पण एक कबूल कर. पोस्टरसाठी तू मेहनत खूप घेतलीस. दुसऱ्या कोणी दोन-तीन तासांत चार-पाच स्केचीस काढून एकदा पेर कोटेलच्या स्वाधीन केल्यावर तिकडे ढुंकूनही पाहिले नसते. तू तर स्वतः लिथोग्राफी शिकण्यापासून सुरुवात केलीस ते अगदी छपाई पूर्ण होईपर्यंत तू पोस्टरच्या मागे लागला होतास. वरवर साध्या वाटणाऱ्या या पोस्टरमागच्या तुझ्या सहा महिन्यांच्या अखंड तपश्चर्येची कोणाला कल्पना येणार नाही. बरं ते असू दे. तुमच्या मातोश्री काय म्हणाल्या या पोस्टरबद्दल?’’
‘‘आईनं पोस्टर पाहिलं की नाही याची मला काही कल्पना नाही. ती तसं काही मला अजून बोललेली नाही. पण बाकी सगळ्यांनी मात्र मला खूप भंडावून सोडलंय. दिवसातून इतके लोक भेटायला येतात की काय सांगू. प्रत्येकाला त्यांच्या उत्पादनासाठी एक पोस्टर करून हवंय. कॉर्सेटचे निर्माते, पर्फ्युम, ब्युटी क्रीम, थिएटरचे मालक, नाटककार, नट, नट्या कोण कुठले ज्यांची नावंसुद्धा कधी ऐकली नाहीत असे. या गर्दीमुळे मला काही काम करायची सोय राहिली नाहीय.’’
‘‘तू काय सांगतोस त्यांना?’’
‘‘सांगणार काय कपाळ. फुटवतो काहीतरी सांगून.’’
‘‘आणि तुला येणाऱ्या ढीगभर पत्रांचं, आमंत्रणांचं काय करतोस?’’
‘‘चुलीत घालण्यासाठी सरळ मादाम ल्युबेतच्या हवाली करतो. तेवढा तरी उपयोग होतो त्यांचा.’’
‘‘त्यातली काही पत्रे उघडून बघ. थोड्या आमंत्रणांचा स्वीकार कर. झाला तर फायदाच होईल. थोरामोठ्यांच्या ओळखी होतील. तुझ्या त्या नेहमीच्या गोतावळ्यातून तेवढीच सुटका. मोंमार्त्रमध्ये आणखी किती दिवस राहायचा विचार आहे तुझा?’’
‘‘असं का विचारतोयस तू? जणू काही माझ्या मोंमार्त्रमध्ये राहाण्यामुळे माझा सामाजिक दर्जा जो कमी झाला होता तो आता या पोस्टरमुळे वाढलाय असं तर तुला म्हणायचं नाहीय? हे बघ मला तिथे अगदी घरच्यासारखं वाटतं. म्हणून मी तिथे कायमचं राहायचं ठरवलंय.’’
‘‘दर संध्याकाळी त्या मुलँमध्ये जाऊन बसण्याचा कंटाळा नाही येत तुला? त्या मोंमार्त्रमधल्या रिकामटेकड्या, फालतू, अपयशी लोकांच्या संगतीत किती दिवस घालवणार आहेस? जरा बाहेर पड. त्याशिवाय पॅरीसमधील कलाविश्वाची कल्पना तुला येणार नाही. यशस्वी, सुसंस्कृत लोकांत उठबस वाढव. मी तुझ्या ओळखी करून देईन. मादाम नातानसोनचं नाव ऐकलं असशील. ती पॅरीसमधील एक सर्वात सुंदर, सुसंस्कृत व बुद्धिमान अशी स्त्री आहे. मला तिने आपण होऊन तुला तिच्याकडे घेऊन यायला सांगितलंय. माझं ऐक. सौंदर्य, बुद्धिमत्ता, संपत्ती आणि रसिकता यांचा असा मिलाफ सहसा एका व्यक्तित सापडत नाही.’’
‘‘मला कोणाकडेही जाण्यात रस नाहीय. मी माझ्या मुलँमध्ये आहे ते ठीक आहे. तिथे सर्वजण मला ओळखतात. माझ्याशी फार चांगले वागतात. ओह. बाय द वे. तिथे एक नाचणारी नवी मुलगी आलीय. तू येशील तेव्हा तिच्याशी तुझी ओळख करून देईन. जेन ॲव्हरील तिचं नाव.’’
(मुलँ रूज ला गुल्वी – चार रंगातील लिथोग्राफ – पोस्टर ६७x७४ सेमी – १८९१)
म्युझियम ऑफ आर्ट, सॅन डिएगो

एम हे अक्षर खूप मोठे करून इतर मजकूराची तीन ओळीत केलेली विभागणी, पात्रांची भाऊगर्दी कमी करून ला गुल्वी आणि व्हॅलेंटाईन या मुलँ मधील लोकप्रिय कलाकारांना मध्यभागी दिलेले स्थान, पार्श्वभूमीला प्रेक्षकांच्या पडछायेचा वापर केल्याने पेंटींगमधे दाखवतात तसा खोलीचा आभास या वैशिष्ट्यांमुळे हे पोस्टर ज्यूल शेरच्या पोस्टरच्या तुलनेत उठून दिसते.

No comments:

Post a Comment