Monday, July 30, 2018

व्युत्पत्ती आणि इतिहास

आज ज्यांना आपण ब्रिटीश बेटे म्हणून ओळखतो तेथे एके काळी सेल्ट नामक लोक रहात होते. आणि ते सेल्ट असल्यामुळे ते सहाजिकच त्यांच्या मातृभाषेत म्हणजे सेल्टीक भाषेत बोलत असत. त्यांना इंग्लीशचा गंधही नव्हता. कारण तेव्हा इंग्लीश भाषा अस्तित्वातही नव्हती. या सेल्ट लोकांना आपल्या शरीरावर जागोजागी रंगवून किंवा टॅटू गोंदवून घ्यायची खूप हौस होती. त्यांच्या या सवयीमुळे प्राचीन ग्रीक त्यांना प्रिटानोई म्हणजे शरीरावर टॅटू काढणारे लोक असे संबोधत. या प्रिटानोईवरून त्या कायम धुक्या पावसात गुरफटलेल्या बेटांना ब्रिटन हे नाव पडलं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या भूप्रदेशाला आज इंग्लंड म्हणून ओळखतो ते नाव त्याकाळी प्रचलित नव्हतं.
 इसवी सन चारशेच्या सुमारास डेन्मार्कमधून अँग्लीस लोकांचं ब्रिटीश बेटांवर आगमन झालं. त्यांनी या नवीन प्रदेशाला अँग्ल-लँड किंवा इंग्लंड असं म्हणायला सुरवात केली. त्यांच्या पाठोपाठ आजच्या फ्रान्समधील सॅक्सनी प्रांतामधून सॅक्सन लोक ब्रिटीश बेटांवर वसाहतीसाठी स्थलांतर करू लागले. आणि या दोन्ही लोकांच्या संपर्कातून जी भाषा उत्क्रांत झाली ती म्हणजे आज जिला आपण इंग्लीश म्हणून ओळखतो ती ज्या भाषेपासून उत्क्रांत झाली ओल्ड इंग्लीश भाषा.
लवकरच या नवस्थलांतरीत लोकांना आल्फ्रेड द ग्रेट नावाचा एक राजा मिळाला. हा मूळात फक्त सॅक्सनीमध्ये राहणाऱ्या लोकांचा राजा होता. त्याने स्वतःला अँग्लो-सॅक्सन राजा म्हणून घोषित करून घेतले. पण या मधल्या तीन चारशे वर्षांच्या कालावधीत मूळच्या सेल्ट लोकांचं काय झालं. या सगळ्या भानगडीत ते कुठे नाहिसे झाले?
या प्रश्नाचं उत्तर कोणालाच नीटसं ठाऊक नाहीय. यात दोन मतप्रवाह आहेत. एक भाषा शास्त्रज्ञांचा दुसरा इतिहास तज्ञांचा.
ज्यावेळेला एक लोक समूह दुसऱ्या लोक समूहावर आक्रमण करून त्यांचा भूप्रदेश व्यापतो तेव्हा जेते आणि जित या दोघांच्याही भाषेवर परिणाम होत असतो. त्याला नाईलाज असतो. जेत्यांनी कितीही प्रयत्न केला, कत्तली, अत्याचार केले तरी पराभूत लोकांच्या समूहाचं त्यांच्या अवती भवती असलेलं अस्तित्व त्यांना पुसून टाकणं अशक्य असतं. आक्रमकांना जितांच्या भाषेची त्यांच्यावर हुकमत गाजवण्यासाठी म्हणून का होईना थोडी फार तरी माहिती असावी लागते. शिवाय जिंकून घेतलेल्या प्रदेशातील बऱ्याच गोष्टी त्यांना अपरिचित असतात, त्यांचं वर्णन करण्यासाठी त्यांच्या भाषेत शब्द नसतात.
ब्रिटीशांच्या भारतातील राजवटीचं उदाहरण घेऊ. भारतावर ब्रिटीशांनी जेमतेम दिडशे वर्ष राज्य केलं असेल. पण या कालावधित त्यांच्या भाषेतून किती शब्द त्यांनी घेतले पहाः ’शांपू, बंगलो, जुगरनॉट, मूंगूस, खाकी, चटणी, बँगल, पंडित, बँडाना, डिंगी’ वगैरे असंख्य शब्द आज इंग्लीश भाषेचा अविभाज्य भाग झाले आहेत. भारतातून जी संपत्ती त्यांनी लूटून आपल्या बेटांवर नेली त्यातील संपत्ती केव्हाच लयाला गेली असेल पण आज फक्त शब्द तेवढे टिकून उरले आहेत. ब्रिटीश साम्राज्य लयानंतर वसाहतींची आर्थिक लूट बंद झाली असली तरी शब्दसंपत्तीची लूट अजूनही चालू आहे. एवढेच नव्हे इंग्रजी मातृभाषा नसलेले लोकसमूह तर संपूर्ण नव्या शब्दांची भर इंग्रजी भाषेत दर वर्षी घालत आहेत. त्यातील कित्येक शब्दांच मूळ त्यांच्या स्वत:च्या मातृभाषेतही सापडणार नाही.
मग असं असेल तर त्या सेल्ट लोकांपासून अँग्लो-सॅक्सन लोकांनी किती शब्द घेतले असावेत? ते तर शेकडो वर्षं एकमेकांच्या शेजारीच रहात होते. Valley या अर्थाने सेल्टीक भाषेतील combe हा शब्द आहे. आणि tor या सेल्टीक शब्दाचा अर्थ rock किंवा hill. आणखी शोधलं तर cross हा शब्द  मूळ सेल्टीक असण्याची शक्यता आहे. पण तो शब्दसुद्धा नंतर दहाव्या शतकात आयरीश मिशनऱ्यांकडून इंग्लीश भाषेत आला. आणखी एक उदाहरण ...
बस्स एवढेच. सांगता येण्यासारखं आणखी एकही उदाहरण शोधूनही सापडत नाही. यावर शब्द खूप आहेत पण त्यांची नोंद सापडत नाही असंही कोणी म्हणू शकेल. मांडायला एक मुद्दा म्हणून हे ठीक आहे. ज्यांना जिंकून घेतलं त्या जितांच्या मूळ सेल्टीक भाषेतील एकही शब्द आपल्या भाषेत न घेता अँग्लो-सॅक्सन लोकांना त्यांच्यावर शेकडो वर्ष राज्य कसं करता आलं हे एक आश्चर्यचं म्हणावं लागेल.
भाषाशास्त्रिय दृष्टया हे आक्रमण नसून कत्तल आहे. एक प्रकारे संपूर्ण वंशविच्छेद म्हणता येईल अशी भीषण कत्तले-आम. कोणतीही कत्तल ही वाईटच. पण कितीही सार्वत्रिक कत्तल असली तरी कमीत कमी ouch, stop, no या अर्थाचे सेल्टीक शब्द जुन्या इंग्लीश भाषेत सापडायला हवेत. पण तसा एक ही शब्द शोधून सापडत नाही हे फार भयंकर आहे.
पण इतिहासकारांना हे मुळीच पटत नाही. त्यांना पुरावा पाहिजे. ते म्हणतात कत्तली झाल्या असतील तर कुठे तरी त्याचे पुरावे, सामुहीक दफन केलेली ठिकाणं, साहित्यातील नोंदी काहीतरी सापडलं पाहिजे. या कत्तलींबद्दल तसे काहीही पुरावे सापडत नाहीत. त्यांचं म्हणणं तसं बरोबर आहे. इतिहासाला पुरातत्व शास्त्रानुसार पुरावे द्यावे लागतात. या कत्तलींविषयी कोणत्याही नोंदी, अगदी ऐकीव माहितीसुद्धा उपलब्ध नाही. संशयास्पद म्हणता येईल असा सुद्धा एकही पुरावा सापडत नाही.
त्यामुळे भाषाशास्त्रज्ञांना जेथे सामुहिक कत्तल किंवा वंशविच्छेद दिसतो तेथे पुरातत्व शास्त्रज्ञांना शांततापूर्ण सहजीवन दिसतं. हे थोडं विचित्र वाटतं. व्युत्पत्तीशास्त्राच्या आधारे आणखी एक शक्यता संभवते. हेरफोर्डशायर परगाण्यात Pensax नावाची एक टेकडी आहे. आता Pensax या शब्दाची फोड केल्यास Pen म्हणजे Hill आणि Sax म्हणजे सॅक्सन. यातील Pen हा शब्द सेल्टीक भाषेतून आला आहे. त्या काळी त्या प्रदेशात सॅक्सन लोक त्या टेकड्यांवरील डोंगराळ भागात रहात असावेत आणि सेल्ट खाली खोऱ्याच्या भागात रहात असावेत. त्यामुळे त्या टेकडीला Pensex म्हणजे Hill of the Saxons असं नाव पडलं. याच्या उलट जेव्हा म्हणजे सेल्ट डोंगराळ प्रदेशात रहात होते आणि सॅक्सन खोऱ्याच्या भागात रहात असत तेव्हा त्या टेकड्यांना Saxpen असं नाव पडलं. याचा अपभ्रंश होता होता त्याचं Sixpenny असं झालं.
इसेक्स परगाण्यात Saffron Walden नावाचं एक शहर आहे. यतील Safron त्या प्रदेशात होणाऱ्या केशराच्या शेतीवरून आलं, पण Walden म्हणजे थोडं विचित्र प्रकरण आहे. कारण या सॅक्सन शब्दाचा अर्थ Valley of foreigners असा होतो. हे परदेशी कोण असावेत हे कोडं आहे. कारण सॅक्सन लोक सेल्ट लोकांचा उल्लेख Wealh असा करत. या Wealh वरून Wales हा शब्द आला असावा. पण व्युत्पत्तीशास्त्रानुसार त्याच्या पुढे काही जाता येत नाही.
गावांच्या नावावरून पुरावे शोधायचे म्हटले तर अँग्लो-सॅक्सन आणि सेल्ट लोकांच्या वसाहती शेजारी शेजारीच असाव्यात असं म्हणावं लागेल. पण शतकानूशतके एकमेकांच्या शेजारी राहूनही त्यांचे आपापसात व्यापार, देवघेव, लग्न वगैरे असे कोणतेही सामाजिक संबंध नव्हते. मग त्यांनी एकमेकांच्या वसाहतींना नाव देण्याचा उद्योग का केला असावा. कदाचित एकमेकांचा संपर्क टाळण्यासाठीच तर त्यांनी एकमेकांच्या वसाहतींना नावे दिली नसतील. अगदी विचित्र वाटतं. पण दुसरे काही पुरावेच सापडत नाहीत.
गावांच्या नावाची फोड करून इतिहासाचे पुरावे शोधण्यात आणखी एक गंमत होते. आता Pen म्हणजे सेल्टीक भाषेत Hill हे आपण पाहिलेच आहे. कलौघात या Pen चा अर्थ लोक विसरले आणि त्याचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी hill या अर्थी जुन्या इंग्लीश भाषेतील hull हा शब्द चिकटवून त्याचं Penhul असं नामकरण झालं. पुढे त्याचाही अपभ्रंश होऊन Pendle असा शब्द प्रचलित झाला. नंतरच्या काळात अपभ्रंशामुळे मुळ अर्थ विसरला गेला आणि मग अर्थ स्पष्ट होण्यासाठी त्याच्यापुढे आधुनित इंग्लीश मधील hill हा शब्द जोडला गेला. Pendle hill. या नावाची आपल्याला फोड करायची झाली तर hill hill hill अशी करावी लागेल. इंग्लंडमधील अश्या कित्येक नद्या, टेकड्या, गावांच्या नावांची फोड केली तर आपल्याला सेल्ट, सॅक्सन, ओल्ड इंग्लीश आणि मॉडर्न इंग्लीश या भाषेतील एकाच अर्थाचे शब्द एकमेकांपुढे जोडलेले आहेत असं आढळून येतं.
याचा ऐतिहासिक अर्थ काय असावा. एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवाशांची भाषा न शिकता त्या प्रदेशातील लोकांना हाकलून दिल्याने त्या प्रदेशातील मुळच्या प्रादेशिक नावांचा अर्थ लुप्त होतो. त्यामुळे तो अर्थ स्पष्ट होण्यासाठी मूळ शब्दाला आक्रमकांनी आपल्या भाषेतील शब्दाची जोड दिली. अँग्लो-सॅक्सन आणि सेल्ट लोकांचं काय झालं याचे निश्चित पुरावे आपल्याला कधीच सापडणार नाहीत. कदाचित कत्तली झाल्या असतील किंवा दोन्ही जमातींनी शांततापूर्ण सहजीवनाने एकमेकांना सामावून घेतलं असेल. इतिहासातील काही कालखंड आपल्याला नेहमी अज्ञात रहातात. जर आपण आणखी मागे जाऊन पाहिलं तर इतिहास हा आक्रमणे आणि लुटालुट यांनी भरलेला दिसेल. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात सेल्ट लोकांनी ब्रिटनमधील मूळ स्थानिक लोकांवर आक्रमण केले. पहिल्या शतकात युरोपच्या किनाऱ्यावरून अँग्लो-सॅक्सन आले. नंतर स्कँडिनेव्हियामधून अधिक लढाऊ आणि विध्वंसक असे व्हायकिंग आले. प्रत्येक आक्रमक आपल्याबरोबर तलवारी आणि त्यांची भाषा घेऊन आले. स्थानिक भाषेतील अनेक शब्द त्यांनी आपल्या भाषेत उचलले. जिंकलेल्या प्रदेशातील गावे, नद्या-नाले, डोंगर वगैरेनां त्यांनी स्वतःच्या भाषेतील नावे दिली. इतिहासात घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल शोक करणं किंवा राग धरून बसणं फार शहाणपणाचं नसतं.

शब्दांशी खेळत खेळत, विविध विषयांना चौफेर स्पर्श करत असा मनोरंजक धांडोळा मार्क फोरसिथ नावाच्या एका लेखकाने त्याच्या ‘The Etymologicon – A Circular Stroll Through the Hidden Connections of the English Language, First published by - Icon Books Ltd, Distributed in India - Penguin’ या पुस्तकात घेतला आहे. व्यासंग आणि बहुश्रुतततेला नर्म विनादाची जोडमिळाल्यामुळे व्युत्पत्तीशास्त्रासारख्या विषयावरील पुस्तक सर्वसामान्य वाचकांसाठी रंजक झाले आहे. इंग्रजीमधून लिखाण करणाऱ्यांच्या संग्रही असावीत अशी याच लेखकाने लिहीलेली ‘The Horologicon’ आणि ‘The Elements of Eloquence’ ही पुस्तकेही तेवढीच रंजक झाली आहेत.