Wednesday, October 24, 2018

मुलँ रूज - ७४

हेन्री जेव्हा लॉजवर येऊन पोहोचला तेव्हा मादाम ल्युबेत शेगडीत कोळसे घालीत होती. अशा अधूनमधून अचानक गायब होण्याची हेन्री जी कारणे सांगायचा त्या सगळ्या थापा आहेत हे तिला चांगलेच ठाऊक होते. कारण एक तर हेन्रीला थापा नीट मारता येत नसत आणि दुसरे म्हणजे मॉरीसशी बोलताना हेन्रीच्या थापेतील विसंगती उघड्या पडत. वरवर ती काही दाखवत नसे, पण आतून तिचा जीव तीळ तीळ तुटायचा. हेन्रीबद्दल तिच्या पोटात विलक्षण माया होती. हेन्रीचे पिणे आणि त्याची दिवसेंदिवस ढासळणारी प्रकृती पाहून तिच्या काळजाला घरे पडत.
बाहेर कुंद हवा पडली होती. थोड्याच वेळात येते असा जेन ॲव्हरीलचा निरोप होता. हेन्री शेकोटीजवळ शेकत मादाम ल्युबेतबरोबर गप्पा मारीत बसला होता. त्याने तिला एक ब्रूच दिला. तो पाहून तिचे डोळे पाण्याने भरून आले. तेवढ्यात बाहेर दरवाजात वस्त्रांची सळसळ ऐकू आली. जेन ॲव्हरील धाडकन दरवाजा उघडून आत आली. त्या दिवशी तिचा उत्साह उतू जात होता. तिने पोस्टरला पोज दिली, पण तासाभरातच ती कंटाळली. आळस देऊन ती उठली व म्हणाली,
‘‘बाकीचं काम उद्या केलेलं चालेल ना? मला आता कंटाळा आलाय. चला फिरून येऊ.’’
हेन्री तिच्याबरोबर फिरायला म्हणून बाहेर पडला. वाटेत तिने गाडी पाकीन्सया स्त्रियांच्या कपड्यांच्या दुकानासमोर थांबविली. हेन्री गाडीतच बसून राहिला. पण तिने त्याला तिच्याबरोबर दुकानात बोलाविले. ती एक मोठी भपकेबाज इमारत होती. दारवानाने मोठ्या अदबीने आत घेतले. आतला भाग म्हणजे एक गोलाकार खोली होती. चहूकडे आरसे लावलेले. जमिनीवर जाड गालिचा अंथरलेला होता. हेन्री सोफ्यावर बसून विसावतो तोच एक शेलाट्या बांध्याची काळ्याभोर केसांची स्त्री आत आली. तिचे व्यक्तिमत्त्व पाहताक्षणी आकर्षून घेईल असे होते. विशेषतः तिचे डोळे. खोल, गहिरे, कॉफीसारख्या गडद तपकिरी रंगाचे.
‘‘बाँज्यूर, जेन.’’ जेनचा व तिचा खूप परिचय असावा असे दिसत होते.
‘‘मिरीयम, हे मस्य हेन्री द तुलूझ लोत्रेक.’’
मिरीयम हेन्रीकडे वळून म्हणाली,‘‘मी तुमच्या प्रदर्शनाला गेले होते, पण गर्दीमुळे पेंटिंग्ज नीट बघता आली नाहीत.’’ तिच्या मंदस्मितातून तिची मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात चमकले. तिच्या नजरेत निखळ कौतुक होते.
‘‘आमच्याकडे एक नवा ड्रेस आलाय. तुम्हाला घालूनच दाखवते हां. थांबा थोडं.’’ मिरीयम जेनला म्हणाली.
‘‘आता नको. मला जरा दुसरीकडे जायचंय. उद्या परत येईन.’’असे म्हणून जेन घाईघाईने बाहेर पडली. एवढी घाई होती तर दुकानात आली कशाला या विचाराने हेन्री बुचकळ्यात पडला.
‘‘कशी वाटली तुम्हाला? आवडली?’’ दुकानातून बाहेर पडता पडता जेनने विचारले.
‘‘सुंदर आहे. पण मला आवडून काय फायदा?’’
‘‘तुम्हीही तिला आवडला आहात, म्हणून मुद्दाम होऊन विचारलं.’’
‘‘तुला कसं कळलं?’’
‘‘माझा असा होरा आहे की तुम्हा दोघांचं जमेल. तुमची मिरीयमशी ओळख करून देण्याच्या उद्देशाने मुद्दामच मी तुला पाकीन्समध्ये घेऊन आले. तिला तुमच्याविषयी सगळी माहिती, म्हणजे चांगली आणि वाईट दोन्ही बाजू मी अगोदरच सांगितल्या होत्या.’’
‘‘तुला या नसत्या उचापती करण्याची काय गरज होती?’’
‘‘मी तुम्हा दोघांना चांगली ओळखते. मिरीयमला यशस्वी लोक खूप आवडतात. चित्रकलेच्या जगाचा विचार करायचा झाला तर तुमची गणना या दशकातील एका यशस्वी पुरुषात नक्की होईल. शिवाय तुमचे उच्च खानदान. या दोन गोष्टींच्या पुढे तुमचे शारीरिक व्यंग ही दुय्यम बाब ठरते. मिरीयम एक महत्वाकांक्षी स्त्री आहे. जीवनात काय मिळवायचं हे तिला चांगलं ठाऊक आहे. तिची स्वप्नं मोठी आहेत आणि ती वास्तवात आणण्यासाठी लागणारी जिद्द तिच्याकडे आहे.’’
‘‘हे सगळं तू मला कशासाठी ऐकवतेयस?’’
‘‘कारण तुमच्या दोघांची चांगली मैत्री होऊ शकेल.’’
‘‘माझ्याशी मैत्री म्हणजे प्रेमात फसण्याची भीती नाही असेच ना?’’
‘‘अं... एका अर्थाने तसंही म्हणता येईल. हे बघा तुम्ही काही आता नवशिका तरुण नाही आहात. मैत्री, प्रेम, शरीराची भूक या गोष्टी तुम्हाला नीट माहितेयत. मिरीयमला मैत्रीची गरज आहे आणि माझ्या मते तुम्हालाही.’’
‘‘तुला असं सुचवायचं आहे की तिला माझ्याशी शुद्ध मैत्रीचे संबंध राखायचेयत. म्हणजे बरोबर जेवायला जाणे, थिएटर, पार्टी वगैरे ठिकाणी जायला बरोबर कोणीतरी असावं एवढ्यापुरते संबंध.’’
‘‘होय. तेच. सुरुवातीपासून दोघांनाही कल्पना असली की गैरसमजाला वाव कमी राहतो आणि अपेक्षाभंगाचे दुःख होत नाही. बघा. तुम्हाला पसंत असेल तर पुढच्या आठवड्यात शो संपल्यावर ल रिशमध्ये भेटू.’’

No comments:

Post a Comment