Sunday, October 28, 2018

मुलँ रूज - ८५

हेन्रीची काळजी वाहण्यासाठी पॉल व्ह्यू या त्याच्या एका लांबच्या चुलत भावाची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर जवळपास एक वर्ष भर हेन्रीने दारूला स्पर्शही केला नाही. या काळात हेन्री पार बदलून गेला होता. त्याचा एरवीचा शीघ्रकोपी, मनस्वी स्वभाव सौम्य झाला. इतका की मादाम ल्युबेत व पॉलला विचारल्याशिवाय तो काही करीत नसे. प्रकृतीही चांगली राहिल्याने तो उत्साही असे. या काळातच त्याने मॉरीसचे पोर्ट्रेट केले. इतरही अनेक पोर्ट्रेट केली, पण त्यात न्यूड एकही नव्हते. रात्री-अपरात्री भटकणे, चिल्लर कॅफेत तासन्‌तास ठाण देऊन बसणे, फालतू निरुद्योगी लोकांत मिसळणे, वेश्या, नाटकातील नटनट्या वगैरे लोकांबरोबर रात्र रात्र गप्पा मारत बसणे हे सगळे आता थांबले होते. आईला आपल्या मुलात हव्याशा वाटणाऱ्या सगळ्या सद्‌गुणांचा संचार त्याच्या वयाच्या पस्तिसाव्या वर्षी का होईना त्याच्यात झाला होता. पण ह्या सद्‌गुणांच्या उदयाने त्याच्या सृजनशक्तीचा स्रोत मात्र लुप्त झाला होता.
ज्या समीक्षकांनी त्याच्या कलेची बंडखोर, रासवट, असंस्कृत अशी संभावना केली होती तेच समीक्षक घर सोडून गेलेला उधळा मुलगा स्वगृही परत आला म्हणून त्याच्या स्वागतासाठी उभे राहिले. सुरुवातीच्या काळात केलेली कित्येक पेंटिंग हेन्रीने कलाविक्रेत्यांना बेफिकिरीने देऊन टाकली होती. अशा विक्रेत्यांनी अडगळीत पडलेली त्याची पेंटिंग शोधून काढली आणि फ्रेम करून भरपूर किमतीला विकली. आता हेन्री एक प्रतिथयश चित्रकार समजला जाऊ लागला. त्याच्या पेंटिंगच्या बनावट नकला व्हायला सुरुवात झाली. हुबेहूब त्याच्या शैलीत काढलेली पेंटिंग त्याची सही ठोकून विकली जात.
(त्या काळात लोत्रेकच्या पेंटिंगच्या एवढ्या नकला झाल्या की मॉरीस ज्वाय्यांने त्याच्या समग्र चित्रांचा एक कटलॉग बनवून प्रसिद्ध केला.)
फिरायला जाताना पॉल व्ह्यू बरोबर असे. कधी लेमोनेड किंवा कॉफी प्यायला एखाद्या कॅफेत गेला की तिथे टोळक्याने गप्पा छाटत बसलेले चित्रकलेचे विद्यार्थी त्याच्याकडे आदराने बघत, जसा हेन्री पूर्वी देगासकडे बघत असे. तो कॅफेत आला की तरुण विद्यार्थी त्याच्या टेबलाभोवती गोळा होत. तोसुद्धा त्यांच्याशी अगदी मोजक्या शब्दात बोले. यशस्वी माणसांच्या बोलण्यात आत्मविश्वासामुळे येणारी किंचित आढ्यता त्याच्या बोलण्यात कधी कधी दिसू लागली. प्रसिद्धीने आपण होऊन त्याच्या गळ्यात वरमाला घातली होती. पुन्हा एकदा लीजन ऑफ ऑनरचा सन्मान त्याला देऊ करण्यात आला. विसाव्या शतकाच्या आगमनाची जोरदार तयारी फ्रान्समध्ये सुरू झाली. त्याच्यासाठी एक पोस्टर तयार करण्याचे ठरविले होते. हेन्रीला त्या निवड समितीचा प्रमुख करण्यात आले. हेन्रीच्या नावाभोवती एक वलय निर्माण व्हायला हळूहळू सुरुवात झाली होती.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दिवशी साऱ्या पॅरीसभर जल्लोष चालू होता. मुलँ रूजमध्ये एक खास कार्यक्रम ठेवला होता. त्या दिवशी हेन्री बुलेव्हारवरील आईच्या घरी गेला. व्ह्यूच्या देखरेखीखाली राहायचा त्याला कंटाळा आला होता. रात्रीचे जेवण झाल्यावर कॉफी पिताना त्याने आईकडे विषय काढला.
‘‘आता मी बरा झालोय. गेले वर्षभर मी दारूच्या थेंबालासुद्धा स्पर्श केला नाहीय्. या पॉलला आपण परत आल्बीला पाठवलं तर चालेल काय?’’
‘‘हेन्री या विषयावर आपण नंतर बोललं तर चालणार नाही का?’’
‘‘ममा, मी तुम्हाला वचन देतो हवं तर.’’
‘‘हे बघा. पॉलला पैशांची गरज आहे.’’
‘‘तसं असेल तर ठीक आहे.’’


(पोर्ट्रेट डावीकडे मॉरिस जॉय्याँ, उजवीकडे पॉल व्ह्यू – तुलूझ लोत्रेक – तैलरंग कॅनव्हास)


No comments:

Post a Comment