Monday, October 15, 2018

मुलँ रूज - ५०

मुलँ रूजवरील चक्र फिरण्याचे थांबले होते. दिव्यांचा लखलखाट विझल्यामुळे काळोखात बुडालेली मुलँ रूजची वास्तू एखाद्या पुरातन चर्चसारखी वाटत होती. निर्मनुष्य बुलेव्हारवरून चालताना त्याला मागून दबक्या पावलांचा आवाज ऐकू आला. एक मुलगी त्याच्या जवळ येऊन त्याला अगदी लगटून चालू लागली व हळूच म्हणाली, ‘‘मस्य प्लीज. कोणी विचारलं तर मी तुमच्याबरोबरच आहे असं सांगा.’’
पाठून जड बुटांच्या पावलांचा आवाज ऐकू आला. एक दांडगट इसम पुढे आला व त्याने त्या मुलीचे मनगट पकडले.
‘‘तुझं कार्ड दाखव.’’ तो दरडावणीच्या सुरात म्हणाला. तिने त्याच्या हाताच्या पकडीतून आपला हात सोडवण्याची धडपड केली. त्या इसमाने तिच्या हातावरील पकड घट्ट करीत तिला एक शिवी हासडली व तिचा हात पिरगळला. ती ओणवी होत वेदनेने विव्हळली. ‘‘आता बऱ्या बोलाने चलतेस की तुला फरफटत घेऊन जाऊ?’’
‘‘सोडा पाहू तिचा हात. दिसत नाही किती कळवळतेय ती.’’ हेन्री म्हणाला.
‘‘पाच मिनिटांपूर्वीच तुमची ओळख झाली, नि लागलात बाजू घ्यायला?’’
‘‘मस्य. काल संध्याकाळी मित्राच्या घरी पार्टीत ती मला भेटली तेव्हापासून आम्ही दोघं बरोबर आहोत.’’ हेन्री नकळत खोटे बोलून गेला.
‘‘उगाच बतावणी करू नका. मी आताच तिला माझ्या डोळ्यांनी तुमच्या मागे येताना पाहिलंय.’’ तो मधेच थांबला आणि थोड्या नरमाईने म्हणाला, ‘‘ओह! तुम्ही मस्य तुलूझ ना? सॉरी मी तुम्हाला पहिल्यांदा ओळखलं नाही.’’
‘‘नशीब ओळखलंत ते. आता सोडा तिला. नाही तर मला पोलिसांना बोलवावे लागेल.’’
‘‘ठीक आहे. तुम्हाला लांब जायला नको. मीच पोलीस आहे.’’
‘‘पोलीस? युनिफॉर्म नाही घातला तो?’’
‘‘मी सार्जंट बार्ताझार पाटू.’’ तो खिशातून आपले ओळखपत्र बाहेर काढून दाखवीत म्हणाला.
‘‘ओह! तुमची बरीच तारीफ मी ल एलीसमध्ये ऐकलीय. या विभागातील सर्वात कर्तव्यदक्ष ऑफिसर म्हणून. पण या मुलीच्या बाबतीत मात्र तुमची काहीतरी गफलत होतेय.’’
‘‘एका मुलीला त्या गल्लीतून या रस्त्यावर येताना मी नक्की पाहिलंय.’’
‘‘ती दुसरी कोणीतरी असेल. तुम्ही तिचा चेहरा नीट पाहिलाय का?’’
‘‘कसा पाहणार? गल्लीत रस्त्याला दिवे नाहीयेत.’’
‘‘तुम्ही म्हणताय ती मुलगी त्या मागच्या बोळात गेली असणार. कारण मी तिकडे कोणाला तरी पळत जाताना पाहिलं.’’
‘‘मलासुद्धा कोणतरी तिकडे पळताना दिसलं खरं.’’ इतका वेळ गप्प असलेली ती मुलगी मनगट चोळत म्हणाली.
पाटू गोंधळात पडला. तो थोडा विचार करून म्हणाला, ‘‘सॉरी. मी तुम्हाला उगाच त्रास दिला.’’ त्याने मोठ्या अदबीने हेन्रीचा निरोप घेतला.
आपण ही थाप कशाला मारली या विचाराच्या तंद्रीत हेन्री चालत होता. ती शेलाट्या बांध्याची उंच तरुणी लांब पावले टाकीत चालत होती. त्याला तिच्या चालीने चालताना सारखी धाप लागत होती. तो मधेच थांबलेला पाहून मागे वळून ती म्हणाली, ‘‘एवढ्या धापा का टाकताय. असं पाय फरफटत चालायला काय धाड भरलीय तुम्हाला?’’ तिने चिडून विचारले. ‘‘जरा भराभर पाय उचला की.’’
तिच्या या उद्‌गारांनी त्याला अगदी चीड आली. ‘‘हे बघ. तुला दिसत नाहीय का. मला शक्य होईल तेवढ्या जोरात मी चालतोय ते. ’’
ती थोडा वेळ गप्प राहिली. तिने विचारले, ‘‘जन्मापासून तुमचे पाय असेच आहेत की नंतर काहीतरी झालं. माझ्या माहितीत एक माणूस होता. मशिनीत सापडून त्याचा हात तुटला. मोठ्या नशिबाचा तो. पाचशे फ्रँक मिळाले त्याला विमा कंपनीकडून.’’ तिच्या कोरड्या आवाजात ना सहानूभूती होती, ना हेटाळणी, ना साधे कुतूहल.
‘‘तुला जर माझ्या चालीने यायचं नसेल तर तू पुढे का जात नाहीस? तो आता लांब गेलाय. तो काही आता परत तुला पकडायला येणार नाही.’’
‘‘तो परत आला तर त्याचे दात पाडायला मी कमी करणार नाही. त्याच्या तोंडात शेण घालीन. हलकट कुठला.’’ तिच्या आवाजात खुन्नस होती.
‘‘आता कशाला शिव्या देतेस त्याला? त्याने तुला सोडलं ना.’’
‘‘कुत्र्याची जात ती. येऊ दे तर भडव्याला. आंडावर लाथ मारीन त्याच्या.’’ सावजाला शिकाऱ्याबद्दल वाटणारा युगानयुगाचा तिरस्कार तिच्या बोलण्यातून दिसत होता.
‘‘तुम्ही त्याला चांगला मामा बनवलात. पोलिसाला थापा मारणं लय कठीण असतं. चांगले हुशार दिसताय.’’ तिच्या आवाजात तोच भावनाशून्य कोरडेपणा कायम होता. ती त्याचे आभार मानत नव्हती की त्याला दुवा देत नव्हती.
हिवाळ्यातील ती लांबलचक रात्र संपता संपत नव्हती. उजाडायला अजून खूप अवकाश होता. ते दोघे चालत चालत रू कुलँकूरपर्यंत आले. तो एका दिव्याच्या खांबापाशी थांबला व त्याने एका हॉटेलकडे बोट दाखविले. ‘‘हे हॉटेल रात्रभर उघडं असतं. इथे तुला झोपायला एखादी खोली मिळेल. तुझ्याकडे पैसे आहेत का?’’
‘‘मला हॉटेलात जायचं नाहीय. कार्ड दाखवल्याबिगर ते खोली देणार नाहीत. दिली तरी डब्बल भाडं लावतील. आणि सकाळी पोलिसांना खबर देऊन वर दहा फ्रँक बक्षीस मिळवतील. लई वंगाळ लोक.’’
इतक्या वेळात आता कुठे त्याचे तिच्या चेहऱ्याकडे लक्ष गेले. तिची कांती गोरी नितळ होती. केस सोनेरी. त्याला वाटले होते त्यापेक्षा ती खूप तरुण दिसत होती. अगदी कोवळ्या वयाची. फार तर अठरा किंवा एकोणीस असेल. रात्रीच्या वेळी तिचे डोळे गडद तपकिरी वाटत होते. दिवसा बदामी वाटले असते. तिचे ओठ थोडे बद्दड होते. तिच्या डोक्यावर हॅट नव्हती. तिने दोन-तीन जागी रफू केलेला जुनाट कोट घातला होता. गुडघ्याखाली येणारा स्कर्ट बऱ्याच दिवसात धुतलेला नसावा. त्या गलिच्छ अवस्थेतही तिच्या देहाचे सौष्ठव लपत नव्हते. एवढ्या लहान वयात परिस्थितीचे टक्केटोणपे खाऊनही तिच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव लोपला नव्हता. तिच्या रूपाने एक धोकेबाज आव्हान त्याच्यासमोर उभे होते.
‘‘तुम्ही इथं जवळच राहता का.’’
‘‘पुढच्या गल्लीत माझा स्टुडिओे आहे.’’
‘‘कृपा करून आजच्या रात्रीपुरतं मला तुमच्या घरी घेऊन चला.’’ प्रथमच तिच्या तोंडून विनवणीचा स्वर बाहेर पडला. तिने त्याच्या नजरेला नजर दिली व नंतर आपली नजर खाली वळवत ती म्हणाली, ‘‘त्याच्या बदल्यात पाहिजे तर मला शेजेला घ्या. एक दमडीसुद्धा घेणार नाही तुमच्याकडून.’’ वर पाहत तिने त्याच्याकडे एक सिगरेट मागितली. त्याने आपली सोनेरी सिगरेट केस तिच्या पुढे केली. तिने ती हातात घेऊन नवलाईने निरखून पाहिली. एक सिगरेट घेऊन परत देताना म्हणाली, ‘‘खऱ्या सोन्याची दिसतेय. मागे एकाने मला खऱ्या सोन्याची कानातली दिली होती. पण त्यातलं एक कुठेतरी हरवलं. माचिस आहे का?’’
त्याने काडी ओढून तिच्यासमोर धरली. सिगरेटचा एक खोल झुरका मारून ती म्हणाली, ‘‘काय भयंकर दिसता तुम्ही? लहान मुलं तुम्हाला पाहून रात्रीची घाबरत असतील.’’
संतापाने त्याची कानशिले गरम झाली. ‘‘तू चालती हो पाहू इथून.’’
तो तरातरा चालत पुढे निघाला. तिने दोन पावलातच त्याला गाठले, ‘‘तुम्हाला एवढी डोचक्यात राख घालायला काय झालं? आता एवढ्या रात्री कुठे जाऊ मी?’’
‘‘हे बघ. मी तुला माझ्या स्टुडिओेवर घेऊन जाणार नाही हे नक्की.’’
‘‘अहो असं काय करता? मी तुमच्या एकाही वस्तूला हात लावणार नाही, का कसली चोरी करणार नाही. तुम्ही कसे बी असा. मला त्याचं काही देणं नाही की घेणं नाही. मला फकस्त एका रात्रीपुरता आसरा पाहिजे. बदल्यात तुम्ही माझ्यासंगे तुम्हाला काय पाहिजे ते करा.’’ तिचा स्वर थोडा खाली आला, ‘‘मी वागायला तशी चांगली आहे. एकदा मला तुमच्या पांघरुणात घ्या. मग समजेल. कशी मजा येईल ती.’’

No comments:

Post a Comment