Wednesday, October 10, 2018

मुलँ रूज - ३९

बॅलड रिऍलिस्त या पुस्तिकेचे मुखपृष्ठ आणि अरिस्टाईड ब्रुअंटचे पोस्टर यामुळे हेन्री तुलूझ लोत्रेक या नावाला प्रसिद्धी मिळाली. रस्त्याने जाता जाता अनोळखी व्यक्ति हेन्रीला बघून हॅट उंचावून अभिवादन करू लागल्या. रू कुलँकूरमधल्या धोबिणींनासुद्धा त्याचे कपडे धुताना आपण एका चित्रकाराचे कपडे धुतोय याचा अभिमान वाटायला लागला. मोंमार्त्रमधल्या सर्व हॉटेलातल्या वेटरना त्याचे नाव रातोरात ठाऊक झाले. त्याचे हॉटेलमध्ये पाऊल पडताच सगळे वेटर अदबीने पुढे व्हायचे. त्यात त्याच्याकडून मिळणाऱ्या घसघशीत बक्षिसीचा अर्थातच थोडाफार परिणाम असायचा पण तरीही त्यात ओशाळेपणापेक्षा आपलेपणाचा अभिमान जास्त असे. ल पॅरोक्वेमधल्या वेश्या त्यांच्या गिऱ्हाइकांना मोठ्या अभिमानाने सांगत की इथे यायचा तो दाढीवाला बुटका मोठा आर्टिस्ट आहे बरं का.असे म्हणून पुराव्यादाखल त्याने काढलेले मुखपृष्ठ दाखविले जायचे. कित्येकांनी तर ते फ्रेम करून घेतले होते.
मधूनच कुठल्या तरी अनियतकालिकांचे संपादक उपटायचे. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याकडून एखादे रेखाटन हवे असायचे. काहीतरी पाच-दहा मिनिटांत करून दिलेत तरी चालेल. पण बिदागीचे नाव काढायचे नाहीत. आमचे मासिक नुकतेच चालू होत आहे. पहिला किंवा दुसराच अंक आहे हा. एकदा नियमित चालू झाले की देऊ की. हेन्री स्वतःच बिदागीचा प्रश्न उडवून लावायचा. बहुधा तिसरा अंक निघतच नसे. अशा रीतीने त्याच्या कलेचा प्रसार व चर्चा होऊ लागली.
लेखक-प्रकाशकांच्या पाठोपाठ कुठल्यातरी गल्लीबोळातले कलावस्तू विक्रेते येऊन टपकायचे. त्याच्या स्टुडिओेचा उंच जिना चढताना त्यांना धाप लागलेली असे. पण हेन्री दिसताच कलिंगडाच्या फोडीसारखे तोंड फाकून हसत. त्यांना म्हणे असे नवे होतकरू चित्रकार हुडकून त्यांना संधी द्यायची हौस असे. त्याची चित्रे त्यांच्या दुकानात ठेवून ते जसा काही त्याच्यावर उपकारच करत होते. जिना उतरताना ते काखोटीत दोन-तीन कॅनव्हास मारूनच उतरत. पण त्याची रीतसर पावती द्यायचे मात्र त्यांनी सोयीस्करपणे टाळलेले असे.
हे सगळे बघून मादाम ल्युबतेचा जीव तीळ तीळ तुटायचा. ती त्या सगळ्या फुकट्या मंडळींना चोरच म्हणायची. पण हेन्री मात्र ते हसण्यावर उडवून लावायचा, ‘चित्र काढण्यात जो काही निर्मितीचा आनंद असतो तो मला मिळालाय. आता ती चित्रे म्हणजे नुसती अडगळच.
एकदा अनपेक्षितपणे वर्गमित्र गोझी आणि आँक्तां त्याच्याकडे येऊन टपकले. मोंमार्त्रमध्ये हेन्रीचे नाव झाल्यावर प्रथमच त्यांची भेट होत होती. चित्रकला वर्ग संपल्यानंर त्याने केलेली रेखाटने, काही नवे कॅनव्हास त्यांनी पहिले...आपण ज्याला सर्व विद्यार्थ्यांत ढ समजत होतो त्याचेच नाव सर्वतोमुखी झालेले पाहून त्या बुढ्ढ्या कॉर्मेनची किती करपली असेल नाही...ती चिकनी मारिया, ऑग्युस्तिना किती मजेचे दिवस होते नाही...जुने दिवस गेले तेल लावत, तुझी चित्रे ही सगळी मासिके कशी काय छापतात बुवा? तुझा काही वशिला वगैरे असेल तर आमच्यासाठी बघ जरा जमतंय का? बरं ही खडूस समीक्षक मंडळी कोणा नव्या चित्रकाराबद्दल काही बरं लिहितील तर जणू काही त्यांची लेखणी झिजेल. पण तुझ्या या साध्या रेखाटनांची कशी काय स्तुती करतात. काय जादू केलीस त्यांच्यावर. त्यांना काही खिलवावं वगैरे लागतं की काय? तसं असेल तर आम्हाला कसं काय बुवा परवडणार? आता तू तर एवढा मोठा माणूस झालायस. आमच्यासारख्या जुन्या दोस्तांसाठी एखादा तरी शब्द टाक.त्या संध्याकाळी ते सर्व जुने दोस्त ला नुव्हेलीत जाऊन जुन्या आठवणींना उजाळा देत बसले होते.
दोन दिवसांनी कॅमिल पिस्सारो हेन्रीच्या स्टुडिओेत आला. त्याच्या एकूण अवतारामध्ये गावठी रांगडेपणा दिसून येत होता. तरीही इंप्रेशनिस्टांचा अनभिषित्त सम्राट असल्याचा डौल त्याच्या देहबोलीमध्ये स्पष्टपणे जाणवत होता. त्याने आल्या आल्या मादाम ल्युबेतला मोठ्या अदबीने अभिवादन केले. हेन्रीच्या चित्रांवरून एक नजर फिरवली आणि कोपऱ्यातल्या शेगडीवर हात शेकत म्हणाला, ‘‘तू डिझाइन केलेली मुखपृष्ठे, नियतकालिकांतील रेखाटने एक स्वतंत्र कलाकृती म्हणूनसुद्धा विचारात घेण्यासारखी आहेत. देगासुद्धा खुश आहे तुझ्यावर. त्याला तुला एकदा भेटायचंय. पुढच्या आठवड्यात जेवायलाच ये माझ्याकडे. येताना पोर्टफोलियो आणायला विसरू नकोस. देगाला बोलावलंय. तुझ्या तोंडावर तुझी प्रशस्ती करणार नाही तो. तुझ्या कामाला अगदी फालतू आहे असंसुद्धा बोलेल. पण ते फारसं मनावर घेऊ नकोस.’’
कॅफेमध्ये अगदी अनोळखी लोक त्याच्या टेबलाजवळ येऊन त्याची स्तुती करीत... काय तुमची लाइन आहे... उधळपट्टी म्हणून कुठे नावालासुद्धा नाही, अगदी आवश्यक तेवढीच. केवढी जोरकस. मी तुमच्या कलेचा चाहता आहे. एखादा पेला ॲबसिंथ होऊन जाऊ दे. मीसुद्धा आर्टिस्ट आहे आणि हो...
चित्रकार, शिल्पकार, साहित्यिक, आपल्या नव्या कादंबरीने, नव्या पाच अंकी शोकांतिकेने अथवा नव्या कॅनव्हासने पॅरीसमध्ये खळबळ उडणार आहे, अशा वल्गना करणाऱ्यांची मोंमार्त्रमध्ये वाण नव्हती. अशा सर्व मंडळींचे एक व्यवच्छेदक लक्षण होते. डोळ्यांत बुद्धिमत्तेची चमक, नखे व दाढी वाढलेली, फाटक्या कॉलरचा शर्ट, खांद्यावर शिवण उसवलेला कोट, डोक्यावर जुनाट बसकी हॅट. वयाची तिशी उलटून गेलेली. पण तरीही विद्यार्थिदशेतल्या बंडखोरपणाला घट्ट चिकटून बसलेले. त्यांच्या बोलण्या-चालण्यात मावळत्या तरुणाईतील निसटते क्षण पकडण्याची त्यांची करुण धडपड दिसून येई. आयुष्याची लढाई आपण हरलो आहोत हे स्वीकारायला त्यांच्या मनाची अजून तयारी होत नव्हती. त्यामुळे मोठमोठ्या योजना आखल्या जात, संकल्प सोडले जात. एकमेकांच्या अस्मितेला फुंकर मारून एकमेकांच्या आकांक्षा फुलविण्याचा प्रयत्न केला जाई. समांतर कलेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने काही मंडळींनी पुढाकार घेऊन सॅलूनच्या विरोधात सोसायटी द अर्टिस्ट्‌स इंडिपेंडंटस्‌ची स्थापना केली होती. हेन्री त्यांचा सुरुवातीपासूनचा एक सभासद होता. त्याच्या चित्रांना लाभलेल्या प्रसिद्धीमुळे त्याची कमिटी एक्झेक्युतीफवर निवड झाली. त्यामुळे हेन्रीवर प्रतिष्ठितपणाचे शिक्कामोर्तब झाले.

No comments:

Post a Comment