Wednesday, October 10, 2018

मुलँ रूज - ३८

मोंमार्त्रमधल्या पुनरागमनानंतर एक वर्षभर हेन्रीचा दिनक्रम हा असा होता. रात्रभरच्या भटकंतीनंतर सकाळी खूप उशिरा उठायचे. दुपारच्या जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी फिरायला बाहेर पडायचे. या फेरफटक्यात कधी कधी तो कॅफे ल मिर्लितोंमध्ये जायचा. हे कॅफे रस्त्याच्या पातळीच्या खूप खाली असलेल्या तळघरात होते. इतके खाली की तेथील गडबड गोंधळाचा मागमूस रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसाला लागणे मुळीच शक्य नव्हते. हेन्रीला तेथील गर्दी व धुराने भरलेले वातावरण मनापासून आवडत असे.
तेथे एक छोटेखानी स्टेज होते. स्टेजवर ॲरिस्टाइड ब्रुअँट हा एक तत्कालीन लोकप्रिय गायक नेहमीप्रमाणे काळा वेल्व्हेटचा सूट, गळ्यात लाल मफलर, पायात गुडघ्यापर्यंत येणारे उंच बूट घालून बॅलड रियालिस्त, सत्याचा पोवाडा गात होता. बॅलड मोठ्या रंगात आला होता. गीत ऐकण्यात तल्लीन झालेले लोक समोरची बीअर पाणी घालून पातळ केलेली आहे हे विसरून गेले होते. हेन्रीने धडपडत एका कोपऱ्यातले टेबल गाठले व कोणाचाही रसभंग होणार नाही अशा रीतीने हळूच एक डबल कोनॅक मागविली. टेबलावर कोनॅक येताच त्याने तो नाजूक पेला हातात घेऊन एक-दोन क्षण न्याहाळला व एका घोटात रिकामा केला. काही क्षण तो स्तब्ध झाला. डोळे मिटून त्याने डोके किंचित मागे झुकविले. खाली उतरणाऱ्या मद्याची जाणीव घसा, अन्ननलिका, जठर व मग हळूहळू सर्व शरीरभर, कानाच्या पाळीपासून ते पायांच्या तळव्यापर्यंत अशी क्रमाक्रमाने पसरत गेली. त्याने डोळे उघडले. मोठ्या समाधानाने ओठांवरून जीभ फिरवली. कोनॅक किती अप्रतिम चीज आहे नाही.
बॅलड संपला होता. टाळ्यांचा कडकडाट चालू होता. हेन्री त्यात सामील झाला. ब्रुअँटने त्याच्याकडे बघून ओळखीचे स्मित केले. त्याने गळ्याभोवती एक मफलर मोठ्या रुबाबात गुंडाळला होता. त्यातून कवीची बेफिकिरी तो कितीही दाखवत असला तरीही एखादी बडी असामी आली तर त्याचे हसून स्वागत करायला तो विसरत नव्हता.
उपस्थितांना अभिवादन करून त्याने दुसऱ्या गीताची घोषणा केली. अ सँ लझार. जमलेल्या गर्दीत उत्साहाची एक लाट उसळली. वादकाने आपल्या छोट्याशा पियानोवर उदास स्वर छेडले. ॲरिस्टाइड ब्रुअँटने आपल्या चेहऱ्यावर दुःखी भाव आणले. मफलर खांद्यावर भिरकावला आणि गायला सुरुवात केली. गीताचे सूर व्याकूळ होते आणि शब्द भावनांना हात घालणारे होते. ते गीत ऐकताना मोंमार्त्रमधल्या गरीब लोकांच्या जीवनातील दुःख चित्रदर्शी होऊन डोळ्यांसमोर येई. ब्रुअँटच्या बॅलड रिॲलिस्तप्रमाणे ह्या गीतातही एका दारिद्र्याने गांजलेल्या तरुण मुलीची दर्दभरी कहाणी होती. दोन्ही गीतांतील तरुणी वेश्याव्यवसायात केवळ नाइलाज म्हणून पडल्या होत्या. बॅलड रिॲलिस्तमध्ये स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तर सँ लझारमध्ये प्रियकराच्या पोटाची. ही दरिद्री तरुणी एका निरुद्योगी मवाली तरुणाच्या प्रेमात पडते. आता दोघांचेही पोट भरायचे म्हणजे वेश्याव्यवसायासारखा दुसरा सोपा मार्ग उपलब्ध नव्हता. एके दिवशी जेंडामेर (पॅरीसमधील पोलीस) तिला पकडून तिची रवानगी सँ लझार येथील सुधारगृहात करतात. आता हा फटका बसल्यावर खरे तर तिला आपल्या दुर्दैवाची काळजी वाटायला हवी होती ती. पण सुधारगृहात तिच्या मनात सतत आपल्या याराचेच विचार घोळत असत. तो आपल्या सर्व छानछौकींसाठी सर्वस्वी तिच्याच उत्पन्नावर अवलंबून असायचा. त्याचे आता कसे होईल या काळजीने तिचे मन पोखरून निघते. त्याला व्हर्माउथचा चषक कोण भरून देईल? केसांना लावायचे पोमेड आता त्याला कोण आणून देईल? दुःखातिरेकात तिने पत्र लिहायला घेतले. त्या पत्रात प्रेमज्वर पुरेपूर उतरलेला होता. स्पेलिंग आणि व्याकरणाच्या जागोजागी चुका असल्या तरी त्यामुळे एका कामविव्हल विरहिणीच्या भावना कळायला काही अडचण येत नव्हती. सुधारगृहाच्या त्या कुबट अंधाऱ्या जागेत विरहाने व्याकूळ होऊन ती आपल्या हृदयेश्वराला दिलासा देत होती, ‘माझ्या लाडक्या थोडा धीर धर. मी लवकरच परत येईन. तूर्तास कसेतरी चालवून घे. जी काही उधार-उसनवारी होईल ती मी परत आल्यावर फेडायला समर्थ आहे.असे प्रेम अणि अशी निष्ठा. यामुळे रस्त्यावरच्या भटकभवान्यांच्या जीवनाला एक प्रकारच्या हौतात्म्याचा स्पर्श झाला. उपस्थित स्त्रियांचे डोळे आपापल्या यारांच्या आठवणीने भरून आले.
स्टेजवर ॲरिस्टाइड ब्रुअँटचा आर्त स्वर टिपेला पोहोचला होता. त्याने एका हाताने आपल्या कोटाचे टोक घट्ट पकडले होते. त्याच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. गीताच्या शेवटच्या कडव्याला सुरुवात झाली. उपस्थित स्त्रियांपैकी बहुतेकींनी आपल्या याराने दिलेल्या लत्ताप्रसादाची चव कधी ना कधीतरी चाखली होती. पण सँ लझारमध्ये डांबून ठेवलेल्या वेश्येची प्रेमकहाणी वर्णन करणारे गीत ऐकता ऐकता त्यांना आपले हुंदके आवरेनात. त्या भावनेच्या भरात त्यांनी लाथा घालणाऱ्या आपल्या यारांना माफ केले. प्रेमापुढे ढुंगणावर बसलेल्या लाथांचे ते काय!
      अंती या प्रेमपत्राच्या, चुंबिते मी तुजला
      बाय बाय माझ्या राजा, बाय बाय करी तुजला
      प्रीती जरी नसे तुझी मजवरी, प्रीती माझी परी तुजवरी
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने, स्त्रियांच्या पाणावलेल्या डोळ्यांनी आणि नाक शिंकरल्याच्या आवाजाने गाणे आवडल्याची पावती मिळाली. ब्रुअँट वाकून नम्रपणे अभिवादन करत करत हसतमुख चेहऱ्याने हेन्रीकडे आला. रुमालाने तोंड पुसत तो म्हणाला, ‘‘जेव्हा जेव्हा हे गीत मी गातो तेव्हा अगदी शक्तिपात झाल्यासारखं वाटतं. मी स्वतःला खूपच झोकून देतो.’’
हेन्रीने मोठ्या प्रयासाने हसू आवरले. गाणे ऐकून मुसूमुसू रडणाऱ्या बायकांना सांगण्यासाठी ते एक वेळ ठीक होते. पण तो अशा आविर्भावात त्याला सांगत होता की जणू काही ते खरेच असावे.
‘‘मी एखादे ड्रिंक मागवू का तुमच्यासाठी.’’
‘‘मस्य, खरं म्हणजे मीच तुमच्यासाठी ड्रिंक मागवायला हवं.’’ त्याने घाईघाईने वेटरला हाक मारून कोनॅक मागविली.
त्याच्या या दिलदारपणामुळे हेन्रीला वाटलेले आश्चर्य फार काळ टिकले नाही. कोनॅक टेबलावर येताच तो हळूच म्हणाला, ‘‘सँ लझारचं पुस्तक प्रसिद्ध होतंय. मोठ्या प्रयासाने सगळा योग जुळून येतोय. एक प्रकाशक तयार झालाय. फक्त एकच गोष्ट बाकी राहिलीय.’’
त्याला हवे होते मुखपृष्ठासाठी एखादे स्केच. ‘‘ताबडतोब माझ्या डोळ्यांसमोर तुमचं नाव आलं. एक साधेसे स्केच. फार गुंतागुतीचं नको. तुम्हाला अगदी सहज जमेल. फार वेळही लागणार नाही त्याला.’’ हेन्रीच्या प्रतिक्रियेसाठी थोडा वेळ थांबून तो पुढे म्हणाला, ‘‘या चित्राचे पैसे देणं काही मला जमणार नाही. माझा पेशा कवीचा. कवींची आर्थिक परिस्थिती कशी असते ते तुम्हाला सांगायला नको.’’ येथे एक नाट्यपूर्ण उच्छ्‌वास. खांदे उडवल्याचा आविर्भाव. ‘‘दोन वेळच्या जेवणाचे वांदे. सगळं भागवून खिशात दमडीसुद्धा शिल्लक उरत नाही.’’
ब्रुअँट एक कवी होता हे खरे असले तरी प्रत्यक्षात मोंमार्त्रमधील एक चांगले चालणारे कॅबरे नृत्यगृह त्याच्या मालकीचे होते हे सांगायला तो सोईस्कररीत्या विसरला होता. त्याने गांभीर्याचा एवढा आव आणला होता की हेन्रीला तो एक खरेच गरीब बापडा कवी वाटला.
‘‘प्लीज, पैशांची काही काळजी करू नका. तुमच्यासारख्या कवीला मदत करण्यात मला आनंदच आहे.’’
दोन दिवसांनी हेन्रीने एक स्केच करून ब्रुअँटला दिले आणि तो हे सर्व विसरून गेला.



हेन्रीच्या स्केचचे मुखपृष्ठ असलेली अ सँ लझार ही पुस्तिका तडाखेबंद खपली. पॅरीसच्या रस्त्यांवर दिव्याच्या खांबाखाली उभे राहून गिऱ्हाइकांना खुणावणाऱ्या, लालबत्तीच्या नोंदणीकृत घरांमधल्या, सरकारी परवाना जवळ असलेल्या व नसलेल्या, रेल्वे स्टेशनावर उभ्या राहाणाऱ्या, बराकीमधल्या, बाजेवरच्या, कॅबरेमधल्या, धंदेवाईक रांडा, छिनाल गावभवान्या, ठेवलेल्या बायका, रखेल्या, गणिका, अंगवस्त्रे अशा सर्व प्रकारच्या व सर्व दर्जाच्या वेश्यांनी सँ लझारची पारायणे करून गाळलेल्या अश्रूंनी ब्रुअँट व त्याचे प्रकाशक लवकरच गब्बर झाले. मिळालेल्या तुफान लोकप्रियतेने सँ लझारला एखाद्या संघगीताचा मान प्राप्त झाला. जणू वेश्याविश्वाचे राष्ट्रगीतच.
हेन्रीला जरी सँ लझारमधून काही अर्थलाभ झाला नाही तरी या चित्रामुळे त्याची गणना त्या वेळच्या एका होतकरू चित्रकारांत होऊ लागली. आपल्याच वर्तुळात मशगूल असलेल्या उच्चभ्रू कलाजगताने कधी नव्हे ती एका गाण्याच्या पुस्तिकेच्या मुखपृष्ठासारख्या क्षुल्लक गोष्टीची दखल घेतली होती.
वेश्यांच्या पुरातन काळापासून असलेल्या प्रश्नांवरील कडवट पण सखोल टीका.
तरुण व नवशिक्या चित्रकाराचे अंतर्मुख करणारे रेखाटन.
या सिद्धहस्त तरुणाच्या पुढच्या कामावर सर्व कलाप्रेमींनी लक्ष ठेवायला हवे.
थोड्याच दिवसांत ब्रुअँटने गाण्याचे आणखी एक पुस्तक प्रसिद्ध करायचे ठरवले. साहजिकच ज्या चित्रकाराला कवींविषयी कळकळ आहे, अशाच चित्रकाराकडे तो परत गेला. पुन्हा एकदा सर्व कलासमीक्षकांनी आपल्या लेखण्या सरसावल्या. त्याच्या मुखपृष्ठाचे नागडी वास्तवता’, ‘क्रूर सत्यअशा विशेषणांनी कौतुक केले. या सर्व प्रसिद्धीमुळे चाणाक्ष ब्रुअँटला त्याच्या मूळ चित्रांचे मोल उमगले व त्याने ती फ्रेम करून आपल्या कॅबरेमध्ये नेऊन टांगली.



(पॅरीसमधील शाँझ्‌ एलीझे या प्रख्यात रस्त्यावरील लेझ्‌ आँबॉसॉदर या नृत्यगृहातील ॲरीस्टाइड ब्रुअँटच्या एका कार्यक्रमासाठी लोत्रेकने ब्रुअँटच्या आग्रहावरून एक पोस्टर करून दिले होते. पण संगीतगृहाच्या मालकाला ते न आवडल्याने त्याने ते लावायला नकार दिला. तेव्हा ब्रुअँटने पोस्टर नाही तर कार्यक्रम नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने त्याचा नाइलाज झाला. आज ॲरीस्टाइड ब्रुअँट व लेझ्‌ आँबॉसॉदर लोत्रेकच्या पोस्टरमुळे अजरामर झाले आहेत. या पोस्टरचे आजवर असंख्य प्रिंट निघाले आहेत आण आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. जसे व्हॅन गॉग आणि सनफ्लॉवर किंवा पिकासो आणि गार्निका तसे लोत्रेकचे नाव या पोस्टरशी निगडीत झाले आहे. ब्रुअँटच्या धिप्पाड देहाची आकृती पोस्टरच्या कडांनी कापली गेली आहे. हातात दांडक्यासारखी दिसणारी काठी, हॅट, खांद्यांवरून बेफिकीरीने मागे फेकलेला स्कार्फ यामुळे त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वातील आक्रमकता बघणाऱ्याच्या अंगावर येते. इंग्रजी टी या अक्षरासारखा दिसणारा स्कार्फचा आकार ही या पोस्टरची खासियत समजली जाते.)



No comments:

Post a Comment