Thursday, October 25, 2018

मुलँ रूज - ७६

पुढच्या रविवारी मिरीयमने लुव्हरला जायचे सुचविले. तेथे बघण्यासारखे काय आहे. ते एक कबरस्तान आहे. फक्त पर्यटकांशिवाय तेथे कोणी ढुंकूनही बघत नाही. म्हणून हेन्रीने तो बेत मुळातूनच धुडकावून लावला.
‘‘हेन्री प्लीज, श्रेष्ठ कला कशाला म्हणतात ते मला तुमच्याकडून समजावून घ्यायचं आहे.’’
‘‘ते तर मुळीच शक्य नाही. कलेतील सौंदर्य हे स्त्रीच्या सौंदर्यासारखेच केवळ शब्दांतून समजावून सांगणं कठीण आहे. ते जाणवावं लागतं. त्याची सरळ सोपी व्याख्या करता येत नाही. श्रेष्ठ कला ही समजायला सोपी असते हे तद्दन खोटं आहे. कलेतील सौंदर्यमूल्यं ही खूप गुंतागुंतीची असतात आणि ती तशी का असू नयेत? मानवी जीवनसुद्धा तेवढ्याच गुंतागुंतीनं भरलेलं आहे. मानवी मन, बुद्धी, संगीत, गणित ह्या सगळ्या गोष्टी समजायला मुळीच सोप्या नाहीयेत.’’
‘‘तर मग आपल्याला जायलाच हवं. आजच नव्हे तर दर रविवारी. वारंवार पाहिल्यानेच त्या मोनालिसाच्या स्मितामागचे गूढ कळून येईल.’’
‘‘त्या बुर्झ्वा फ्लॉरेंटाईन बाईचं नावसुद्धा काढू नका. त्या पोर्ट्रेटला त्याच्या लायकीपेक्षा उगाचच जास्त प्रसिद्धी मिळालीय.’’
त्याच्या पुढच्या रविवारपर्यंत हेन्रीचा विरोध मावळला व तो तिला लुव्हरला घेऊन गेला. त्यानंतर पुन्हा बऱ्याच वेळा ते तिथे गेले. ती जगप्रसिद्ध पेंटिंग बघताना तिचे विस्फारलेले डोळे पाहून हेन्रीला मजा वाटायची. तिच्या प्रश्नांना उत्तरे देताना तिला कलेच्या आस्वादातील बारकावे समजावून सांगायचा. रेम्ब्रांद व प्रॅगोनार्ड हे पीटर हूच व नॅटीयरपेक्षा श्रेष्ठ का हे तिला समजावून सांगताना त्याने तिला कला व कुसर यातील फरक कसा ओळखावा ते सोदाहरण दाखवून दिले.
व्हीनस द मिलोचा पुतळा पाहताना मिरीयम म्हणाली, ‘‘किती सुंदर आहे.’’
‘‘एका ग्रीक शेतकऱ्याला ती शेतात मिळाली. यापेक्षा या पुतळ्याविषयी आपल्याला जास्त काहीही माहीत नाही. त्या गरीब शेतकऱ्याने तिला अवघ्या सहा हजार फ्रँकना आपल्या फ्रेंच सरकारला विकून टाकली. फ्रेंच सरकारला जमलेला हा सर्वोत्तम सौदा असेल.’’ हेन्री दबक्या आवाजात पुढे म्हणाला,‘‘नेपोलिअनने इटलीमधून लुटून नेलेले कॅनव्हास सोडले तर.’’
‘‘तुम्हाला माहीत आहे, ही व्हीनस, जी आज आपण बघतोय ती या पॅरीस शहरापेक्षा पुराणी आहे, कदाचीत ख्रिस्त जन्माच्याही आधीची असण्याची शक्यता आहे.’’
‘‘चला, आपण आज खूप पाहिलं. इजिप्शियन, ग्रीक व फोनेशियन शिल्पकला. एवढ्याने एका आठवड्यापुरती तरी तुमची कलात्मक भूक शमायला हरकत नाही.’’
‘‘तुम्ही आज फिलीपो लिपीची मॅडोना दाखवायचं कबूल केलं होतं.’’
‘‘अरे देवा. तुम्ही काहीच विसरत नाही. चला लवकर म्युझियम बंद व्हायची वेळ झालीय.’’
ती दोघे मॅडोनाच्या पेंटिंगसमोर अख्रिश्चन भक्तिभावाने उभे राहिले. मॅडोना तिच्या पायाजवळ उभ्या असलेल्या बालयेशूकडे मोठ्या ममतेने बघत आहे असे ते दृश्य होते.
‘‘मिरियम, एक पाहिलत का? मॅडोनाची कांती कशी तेजःपुंज दिसतेय ती. प्रकाश जणू काही तिच्या त्वचेखालून येतोय असं वाटतं. ही किमया फिलीपो लिपीने कशी साधली माहितीय? त्याने ऑकरचा एक हात तिच्या त्वचेखाली दिलाय. आता हे तंत्र जुनं झालंय. पण त्या वेळी ते नवं होतं. लिपीचे मोठेपण यात आहे की त्याने ते पहिल्या प्रथम वापरलं. मॅडोना कशी अगदी एंजलसारखी वाटतेय ना.’’
‘‘सगळ्या मोठ्या चित्रकारांनी आपल्या पेंटिंगमध्ये पौराणिक कथांवर आधारित विषयांचे चित्रण केले आहे. त्यात एक गमतीचा योगायोग असा की, बहुतेक सगळ्या चित्रकारांनी आपल्या चित्रातून पुण्यवान माणसांपेक्षा पापी माणसं जास्त वेळा दाखवली आहेत. यासाठी तरी चित्रकलेने जगातील यच्चयावत पापी जनांचे ऋणी राहिलं पाहिजे.’’ हेन्रीच्या डोळ्यात मिष्कीलपणाची चमक होती.
‘‘बायबलातल्या भाकडकथा थोड्या वेळापुरत्या खऱ्या मानल्या तर या वेळी आपण हे मॅडोनाचे पेंटिंग बघत असताना फिलीपो लिपीने ती मॅडोना ज्या मॉडेलवरून बेतली ती बाई तिच्या पापांची सजा भोगत नरकात उकळत्या तेलाच्या कढईत पडली असेल आणि हे आमचे मॅडोनाला तेजःपुंज करणारे फिलीपो लिपी महाशय बाजूच्या कढईत पोहत असतील.’’ हेन्री डोळे मिचकावीत म्हणाला. धक्का देणारी विधाने करीत आपल्या बोलण्याकडे लक्ष वेधून घेण्याच्या कलेत हेन्री ला नुव्हेलपासून तरबेज झाला होता.
‘‘त्या दोघांनी असं कोणतं पाप केलं होतं?’’ हेन्रीच्या अर्धवट बोलण्याने मिरीयमचे कुतूहल चाळवले गेले.
‘‘फिलीपो लिपी हा एक धार्मिक शिक्षण घेतलेला मध्यमवयीन इसम होता. तो चर्चमध्ये पॅस्टर म्हणून काम पाही आणि फावल्या वेळात चित्र काढीत असे. एक म्युरल काढण्याचे काम चर्चने त्याच्यावर सोपवले. त्यातील मॅडोनाच्या चित्रासाठी त्याने मदर सुपीरियरच्या परवानगीने एका ननची निवड केली. ती नन तरुण व सुंदर होती हे त्या म्युरलवरून आपल्याला आजही कळतं. म्युरल करता करता त्या दोघांचं प्रेम जमलं.’’ उत्सुकता ताणण्यासाठी हेन्रीने नाट्यपूर्ण पॉज घेतला.
‘‘पुढे काय झालं?’’
‘‘पुढे काय होणार? स्त्रीपुरुषांचे एकमेकांवर प्रेम असेल तर सहसा जे होते तेच त्यांच्या बाबतीत झालं. म्युरल पूर्ण झाल्यामुळे त्या दोघांना एकमेकांना भेटता येणं शक्य नव्हतं. मॅडोनाच्या चित्रासाठी पोज द्यायला परवानगी देताना मदर सुपीरियरने कितीही उदारपणा दाखवला असला तरी यापुढे तिच्याकडून कसल्याही उदारपणाची अपेक्षा करणं मूर्खपणाचं ठरलं असतं. म्हणून म्युरलचे काम झाल्यावर ते दोघे दूर देशी पळून गेले आणि मुलंबाळं, नातवंडं, पतवंडं होईपर्यंत सुखाने संसार केला. सेंट पीटरच्या दरबारात त्यांची पापी म्हणून नोंद झाली असली तरी या इथे पृथ्वीतलावर त्यांनी सर्व सुखांचा पूर्ण उपभोग घेतला.’’
(मॅडोना वुईथ चाईल्ड – फिलीपो लिपी – ऑईल ऑन पॅनेल – १४५२)
पॅलेझो पिती, इटली

No comments:

Post a Comment