Sunday, October 21, 2018

मुलँ रूज - ६८

हेन्रीचा मोंमार्त्रमधील नित्याचा दिनक्रम चालू होता. म्हणण्यासारखे नवे कोणतेही काम त्याने अजून हाती घेतले नव्हते. संध्याकाळ झाली की न चुकता त्याची पावले मुलँ रूजकडे वळत.
‘‘तुला दररोज मुलँमध्ये जाऊन बसायचा कंटाळा कसा काय येत नाही बुवा?’’ मॉरीस त्याच्या सारखा पाठी लागला होता. ‘‘तीच जागा, तीच माणसं, तेच विषय आणि शिळ्या कढीला ऊत आणून केलेल्या त्याच त्या चर्चा.’’
‘‘आजच्या घडीला तू पॅरीसमधील एक यशस्वी कलाकार समजला जातोस. कलाविश्वात तुझ्या नावाची चर्चा होते. मोंमार्त्रमधील फालतू, रिकामटेकड्या आणि अपेशी लोकांच्या गोतावळ्यात राहण्याचा तुझा अट्टहास का तेच मला समजत नाही. जीवनाच्या या अंगाचा तुला अनुभव घ्यायचा होता. तो घेऊन झाला. आता तुझी खरी जागा जिथे आहे ती तुला घेतली पाहिजे.’’ मॉरीसने आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला.
‘‘त्या तुझ्या उच्चभ्रू लोकांना छानछोकीने मिरवण्याच्या पलीकडे दुसऱ्या कशात रूची आहे असं मला वाटत नाही. कलाकाराच्या कामाने प्रभावित होण्याऐवजी ते त्याच्या व्यक्तिमत्वाकडे जास्त आकर्षित होतात. खांद्यावर घ्यायच्या फरच्या झुलीसारखा त्याला घेऊन त्यांना मिरवायचं असतं. माझ्या कामाकडे पाहण्याऐवजी तुझी ती रसिक मंडळी माझ्या पायांकडे प्रथम बघतील. चेष्टा आणि सहानुभूती दोन्हीही गोष्टी मला नकोयत.’’ हेन्री विषादाने म्हणाला.
‘‘तुझे पाय. सारखे तुझे पाय. तुला काय वाटतं? लोकांना फक्त तुझे पाय दिसतात. काही लोक तसे असतीलही, पण सर्वजण तसे नसतात. तुला या नातानसोन दाम्पत्याविषयी सांगितलं आहेच. ते तसे नाहीत. त्यांना सरसकटपणे इतरांसारखं जोखताना हेन्री तू चुकतोयस. पॅरीसमध्ये त्यांच्यासारखी सुसंस्कृत व जाणकार माणसं फारच थोडी असतील. गेले कित्येक दिवस मिसीया नातानसोन माझ्या पाठीशी लागल्यायत की तुला घेऊन ये म्हणून. त्या स्वतः पियानो खूप चांगला वाजवतात. शिवाय कलेच्या चांगल्या जाणकार आहेत. त्यांच्या संग्रहात...’’
‘‘स्त्रियांमध्ये मला रस नाहीय,’’ हेन्री त्रासिक आवाजात म्हणाला, ‘‘आणि त्यांच्यासारख्या लब्धप्रतिष्ठित स्त्रियांमध्ये तर अजिबात नाही. या बायका जेव्हा एखादं पेंटिंग विकत घेतात तेव्हा त्या आपण जणू काही चित्रकारालाच विकत घेतलंय असं समजत असतात. त्यांना चित्रकलेतील ओ का ठो कळत नसतं. ना त्यांना काही शिकण्याची तळमळ असते. त्यांना फक्त क्लब आणि टी पार्टीमध्ये गप्पागोष्टींपुरता एक विषय हवा असतो. पेंटिंग विकत घेतल्यावर त्यांना चित्रकाराला अशा पाटर्यांना बोलावून मिरवायचं असतं. आता तू सांग, मुलँमध्ये काय वाईट आहे? मला ती जागा आवडते. तिथली ती गर्दी, गलबलाट, दिव्यांची झगमग सगळं काही. बारटेंडर सारा आणि इतर नर्तिकांशी गप्पा मारत बसायला मला फार आवडतं. झिडलरला कृतज्ञता शब्दांत व्यत्त करता येत नाही. तो अधूनमधून चांगल्या शँपेनची बाटली माझ्या टेबलावर पाठवून देतो. माझ्या दारूचे पैसेही तो मला कधी द्यायला देत नाही.’’
‘‘झिडलरसाठी तू जे पोस्टर करून दिलंस त्या मानाने तो तुझे जे आदरातिथ्य करतोय ते काहीच नाही. या पोस्टरचा खरं म्हणजे तुला याहून खूप फायदा व्हायला हवा होता, पण झिडलरचं वर्तुळ खूप छोटं आहे. नातेनसोनचं तसं नाहीय.’’
‘‘हे बघ. मी ते पोस्टर मैत्रीखातर केलं आणि मी ते पोस्टर करण्यापूर्वीसुद्धा झिडलर माझा चांगला पाहुणचार करीत होता. पोस्टर केल्यावर तो वाढलाय असं नाही. तुला तुझे ते नातानसोन बरे आणि मला माझं मुलँ रूज.’’
हेन्री काहीही म्हणाला तरी तो आतून कंटाळला होता हे खरे होते. कॅफेत शिरताच त्याला सर्वजण आपल्या टेबलावर बसायला बोलावीत. पण त्याच त्या गप्पातील त्याचा रस आटू लागला. कलाकार म्हणून स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना, भ्रामक स्वप्ने, आत्मप्रौढी व पोकळ बढाया, सतत कशाविषयी तरी कुरबूर. तो कितीही सोशीक श्रोता असला तरी रोज तेच ते ऐकून त्याला कंटाळा आला होता. कॅनकॅन नाचणाऱ्या मुलीही आता बदलल्या होत्या. ल एलीसमधील मंतरलेले दिवस केव्हाच मागे सरले होते. मुलँतील तीन वर्षांनी त्या मुलींना पार बदलून टाकले होते. त्यांच्या वागण्यातला भोळाभाबडा खट्याळपणा जाऊन त्याची जागा धंदेवाईक सफाईने घेतली होती. आपल्या व्यवसायाच्या नव्या स्वरूपाविषयी त्या आता जागरूक होत्या. पोस्टरमुळे प्रसिद्धीला आलेली ला गुल्वी आता स्वतःला कॅनकॅनची सम्राज्ञी म्हणवून घेऊ लागली होती. तिला वाटायचे की ही जी गर्दी होते ती केवळ तिच्यामुळेच. अल्पावधीत मिळालेले यश डोक्यात गेल्याने तिच्यात एक प्रकारचा उद्धटपणा आला होता. इतका की एक दिवस तिने चक्क खुद्द प्रिन्स ऑफ वेल्सकडे शॅम्पेनची फर्माइश केली. मोंमार्त्रसारख्या तळागाळातल्या समाजातून स्वतःच्या अंगभूत गुणांच्या जोरावर वर आलेली, साधीभोळी, उत्साहाने सतत मुसमुसणारी अशी तिची प्रतिमा हेन्रीच्या मनात पक्की झाली होती. त्या जागी तिची आजची संपूर्ण व्यावसाईक प्रतिमा त्याच्या मनाला पटेना.
मोंमार्त्रशी असलेली भावनात्मक जवळीक जरी संपली होती तरी प्रत्यक्ष ताटातूट व्हायला एक नाट्यपूर्ण घटना घडली. एका विचित्र अपघातात एक नर्तिका कॅनकॅन नृत्य करीत असताना मरण पावली. या घटनेचा हेन्रीच्या मनावर खूप परिणाम झाला. त्यातच एकदा त्याची जुनी मैत्रीण बेर्थ त्याच्या स्टुडिओत रडत रडत आली. तिच्या ल पॅरोक्वेमधील एका सहचरिणीचा खून झाला होता आणि त्यामुळे ल पॅरोक्वेला टाळे लागले होते. तिची दुसऱ्या ठिकाणी सोय होईपर्यंत हेन्रीने तिला आसरा दिला. बाकीच्या मुली पॅरीसभर विखुरल्या. परिणामी हेन्रीला लैंगिक भूक भागवण्यासाठी स्टुडिओपासून दूर जावे लागे. भरीत भर त्याची जिव्हाळ्याची मैत्रीण जेन ॲव्हरील मुलँ सोडून फॉलीज बर्जेरामध्ये गेली.
शेवटचा धक्का आणखी एका महिन्याने बसला. त्या संध्याकाळी झिडलर नेहमीप्रमाणे सिगारचे थोटूक चघळत हेन्रीच्या टेबलाकडे आला.
‘‘सगळं संपलं. मी आजच सही केली.’’ तो समोरच्या खुर्चीत बसत म्हणाला. हेन्रीला काही कळेना.
‘‘मी मुलँ रूज विकून टाकलंय. मस्य तुलूझ्‌. तुम्हाला आठवतंय. मी म्हणायचो माझ्या मुलँमधील गुंतवणुकीतून मला कमीतकमी दहा लाख तरी सुटले पाहिजेत. हे पैसे थोडेसे अडकल्यासारखे झाले होते. ते आज सुटले. पण हे पैसे मिळाल्यावर मी काही स्वस्थ बसणार नाहीय. पैसा लवकर वसूल होण्यासाठी जरा चांगल्या वस्तीत हाच व्यवसाय पुन्हा सुरू करायचा विचार आहे. शाँझ्‌ एलिझेवर एक नवा आलिशान नाईट क्लब सुरू करण्याचा विचार आहे. तीन गोष्टी नक्की केल्यात. नाव ल जारदाँ द पॅरीस’, बारटेंडर सारा, लीड डान्सर जेन ॲव्हरील. आणखी एक सर्वात महत्वाचं म्हणजे, पोस्टर बाय तुलूझ्‌ लोत्रेक.’’
(लोत्रेकचे जेन ॲव्हरील ॲट जारदाँ द पॅरीसहे पोस्टर खूप प्रसिद्ध आहे.)
हेन्रीचे सारे विश्व त्याच्यासमोर कोसळून पडत होते. झिडलर, सारा आणि जेन ॲव्हरील गेल्यामुळे मुलँ रूजमध्ये इतरांच्या दृष्टीने फारसा फरक पडणार नसला तरी त्याचे भावविश्व रिते झाले. मुलँ रूजमध्ये त्याच्या असण्याला असलेले प्रयोजन संपले. त्याला जे काही सांगायचे होते ते त्याच्या मुलँ रूजवरील पोस्टर, पेंटिंगमधून पुरेपूर व्यत्त होत होते. मॉरीसचे म्हणणे बरोबर आहे. कलाकार म्हणून वाढ व्हायची असेल तर येथून आता बाहेर पडले पाहिजे.
त्या रात्री तो नेहमीप्रमाणे कॅनकॅनचा नाच होईपर्यंत थांबला पण त्याने एकही स्केच केले नाही. शो संपल्यावर बारवर जाऊन सारा वगैरे सर्वांचा त्याने आवर्जून निरोप घेतला. जाता जाता लॉबीमध्ये लावलेल्या त्याच्या सर्कस या पेंटिंगसमोर जाऊन तो क्षणभर थबकला आणि काठीवर भार टाकत पाय ओढत बाहेर पडला.
घोडागाडीत चढता चढता त्याने पुन्हा एकदा मुलँ रूजकडे, विद्युत दिव्यांची रोषणाई केलेल्या फिरत्या पवनचक्राकडे डोळे भरून पाहून घेतले.
‘‘गुड बाय मुलँ रूज.’’
एखाद्या मित्राचा निरोप घ्यावा तसे तो हात हलवून म्हणाला. घोडागाडी सुरू झाल्यावर स्वतःशी बोलावे तसे हळूच पुटपुटला,
‘‘गुड बाय मोंमार्त्र.’’

(इन द प्रोमोनेद ऑफ द मुलँ रूज – तैलरंग, कॅनव्हास, १३३x१४१ सेमी – १८८२)
आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो

(या पेंटींगमध्ये मुलँ रूजच्या स्टेजभोवती बसलेल्या व्यक्तिंचे चित्रण केले आहे. यातील सर्व व्यक्ति ओळखता येतात. मध्येभागी बसलेल्या शँपेनचा व्यापारी मॉरीस गिल्बर्ट आणि त्याच्या मित्रांच्या मागे तुलूझ लोत्रेक आणि त्याचा चुलतभाऊ गॅब्रिएल उभे आहेत. दुसऱ्या बाजूला ला गुल्वी आरशासमोर उभी राहून केस नीट करत आहे. तिच्याकडे बघणारी स्त्री म्हणजे तिची मैत्रीण मॉम फ्रोमांज. उजव्या कोपऱ्यात दिसणारा मोठा चेहेरा मे मिल्टन या दुसऱ्या नर्तिकेचा आहे. छायाविरहीत कृत्रीम प्रकाशामुळे पेंटींगचे सर्वसाधारण नियम या पेंटींगला लागू पडत नाहीत. रंगीत प्रकाशाच्या विचित्र परावर्तनाने तिचा चेहेरा भितीदायक वाटत आहे. कादंबरीत लोत्रेकला आवडणाऱ्या हिरव्या शॅडोज त्या ह्या. लोत्रेकच्या वारसांनी या पेंटींगचा उजव्या कोपऱ्यातील हा भाग कापून टाकला होता, तो १९१४ साली पुन्हा जोडण्यात आला. *मुलँ रूजचा मालक झिडलर, तेथील नर्तिका, कर्मचारी, वादकवृंद आणि आश्रयदाते यांच्यावर आधारित एका उपकथानकाचे बाझ लुहमन दिग्दर्शित मुलँ रूज या हॉलीवूड चित्रपटात हृद्यस्पर्शी आणि मनोरंजक चित्रण केले आहे. या चित्रपटाला २००१ मध्ये एकूण आठ ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली.)

No comments:

Post a Comment