Friday, October 19, 2018

मूलँ रूज - ६२

पेर कोटेलचा ॲतलिए द लिथोग्राफिक अर्टिस्टिकचा वर्ग नोत्र दॅम चर्चच्या मागच्या बाजूला एका जुन्यापुराण्या मोडकळीस आलेल्या इमारतीत होता. पूर्वी त्या जागेचा वापर घोड्यांचा तबेला म्हणून केला जात असे. त्या जागेला अजूनही येणाऱ्या घोड्यांच्या लिदीच्या वासात आता छपाईची शाई, नायट्रिक ॲसिड, शिरस, तंबाखू आणि कॉफी यांचे वास छानपैकी मिसळून गेले होते.
हेन्रीने आपली ओळख करून दिली व लिथोग्राफी शिकण्याचा आपला मनोदय व्यत्त केला. हेन्रीचे बोलणे ऐकत असताना पेर कोटेलचे अर्धे लक्ष कागदांच्या थप्पीवर पडलेल्या एका छपाईच्या जाडजूड शिळेकडे होते. त्याने डोक्यावर एक घट्ट बसणारी टोपी घातली होती. एका हाताने तो आपल्या लांब दाढीतील एक बट कुरवाळत होता. त्याचा एकूण अवतार एखाद्या चिनी पंडितासारखा किंवा एखाद्या म्हाताऱ्या बकऱ्यासारखा दिसत होता. नक्की कोणासारखा यावर हेन्रीचे एकमत होत नव्हते.
‘‘मस्य झिडलरना एक पोस्टर करून द्यायचं तुम्ही कबूल केलंयत असं मी ऐकलंय ते खरं आहे ना?’’
‘‘रंगीत पोस्टर.’’
‘‘रंगीत पोस्टर.’’ पेरे कोटेल मान डोलावत म्हणाला, ‘‘आणि लिथोग्राफीचे काम तुम्ही पूर्वी कधी केलंय?’’
‘‘नाही.’’
‘‘म्हणजे या कलेविषयी अगदी प्राथमिक ज्ञानसुद्धा तुम्हाला नाही.’’
‘‘बरोबर.’’
‘‘हे काम स्वतःच करायचा तुमचा विचार आहे.’’
‘‘होय. मला हवा तो परिणाम साधण्यासाठी सगळ्या शक्यता अजमावून पाहायचा विचार आहे.’’
आपली लंबेलांब दाढी कुरवाळीत बराच वेळ पेर कोटेल विचारात गढून गेल्यासारखा गप्प होता. दरम्यान हेन्री छापखान्याचा अस्ताव्यस्त पसारा न्याहाळत होता. खिडकीतून स्वच्छ सूर्यप्रकाश आत येत होता. दुरून पक्ष्यांचे कुजन ऐकू येत होते. सप्टेंबरमधील तो एक प्रसन्न दिवस होता.
‘‘तुमचे रंगीत पोस्टर झिडलरला तुम्ही कधी द्यायचं कबूल केलंय?’’ त्याच्या स्वरात किंचित उपहास होता. पहिल्यांदाच त्याने आपली नजर समोरच्या शिळेवरून त्याच्याकडे वळवली.
‘‘एक वर्षात. त्यातील सहा महिने अगोदरच गेलेयत. झिडलर अगदी मेटाकुटीला आलाय. त्यामुळे शक्य तितक्या लवकर.’’
‘‘पोस्टरसाठी म्हणून काही रेखाटने केली आहेत?’’
‘‘नाही. माझ्या डोक्यात काहीच येत नाहीय. म्हणूनच लिथोग्राफी शिकण्याचा विचार आहे. लिथोग्राफी शिकता शिकता काहीतरी सुचेलच. किती दिवस लागतील शिकायला?’’
‘‘दिवस. लवकरात लवकर म्हणजे पाच वर्षं लागतील.’’
‘‘पाच वर्षं? काय म्हणताय काय तुम्ही?’’
‘‘एखादं वर्ष जास्तच, पण कमी नाही. तुमच्या अजून लक्षात आलेलं दिसत नाहीय. सर्व ग्राफिक कलांमध्ये लिथोग्राफी ही सर्वात कठीण आणि गुंतागुंतीची अशी कला आहे आणि त्यात रंगीत लिथोग्राफी म्हणजे अधिक गुंतागुंत. कॅप्चर ऑफ जेरुसलेम हे प्रसिद्ध चित्र तयार व्हायला तब्बल दोन वर्षं लागली. तरी त्याला लंडनच्या डे अँड हेग या चित्रशाळेतील तज्ज्ञांचा हातभार लागला होता.’’
त्याने हेन्रीकडे रोखून पाहिले.
‘‘ज्याला संगीतातला ओ की ठो कळत नाही अशा माणसाने सरळ सिंफनीला हात घालावा तशी तुमची गत झालीय. या कामात उडी घेण्यापूर्वी तुम्हाला ठाऊक असावं म्हणून सांगतोय. तुम्हाला नाउमेद करण्याचा माझा उद्देश नाही. तरीही तुमचा निश्चयच असेल तर तुम्हाला शिकवण्यात मला आनंदच वाटेल.’’
‘‘ठीकय. लगेच सुरुवात केलेली बरी. अगोदरच उशीर झालाय. आता आणखी वेळ फुकट दवडण्यात अर्थ नाही.’’
‘‘चला तर मग. तुमचा कोट आणि हॅट काढून ठेवा आणि तिथला एखादा एप्रन घाला पाहू.’’
‘‘लिथोग्राफी या शब्दापासूनच सुरुवात करू या. हा ग्रीक भाषेतला एक जोडशब्द आहे. लिथोस म्हणजे शिळा आणि ग्राफी म्हणजे लिहिणे. ह्या तंत्राचा शोध गेल्या शतकात ॲलोइस सेनफेल्डर नामक एका बव्हेरीयन प्रिंटरने लावला. केवढा थोर प्रतिभावंत माणूस असला पाहिजे मस्य.’’ अशा रीतीने हेन्रीची लिथोग्राफीची शिकवणी चालू झाली.
आल्हाददायक वातावरणाचा सप्टेंबर महिना संपला. शरद ऋतूतील बोचऱ्या वाऱ्यांनी चेस्टनटची रस्त्यावर गळून पडलेली पिवळी पाने भिरभिरत गटारात उडवून द्यायला सुरुवात केली. पण लिथोग्राफीच्या वर्गात मात्र शांतपणे काम चालू होते. छपरावर पावसाची टिपरी वाजत असली तरीही कामात खंड पडत नसे. सकाळी हेन्री निळा एप्रन चढवून शिळेवर वाकून कामाला सुरुवात करी. या माध्यमाचे तंत्र आत्मसात करीत असताना त्याच्या नव्या शक्यतांचा विचार हेन्रीच्या मनात सतत चालू असे.
काम चालू असताना एखाद्या वेळी मद्यपान करायला पेर कोटेलचा विरोध नाही हे लक्षात येताच त्याने थंडी पडायला लागल्याचे निमित्त करून कोनॅकच्या बाटल्यांचा एक खोका चित्रशाळेवर मागवून ठेवला. त्याच्या कामावर पेर खूष असल्याने तो त्याच्या पिण्याकडे दुर्लक्ष करी.
‘‘तुमचं काम विलक्षण आहे. तुम्हाला इथे येण्याच्या पूर्वी लिथोग्राफीची काहीच माहिती नव्हती हे खरं आहे का. तसं असेल तर तुम्हाला लिथोग्राफीचे ज्ञान उपजतच असले पाहिजे असं म्हणावं लागेल.’’
लवकरच हेन्री लिथोग्राफीमध्ये नवे प्रयोग करायला लागला.
‘‘थांब. सांभाळ. कोणाही लिथोग्राफरने ही पद्धत पूर्वी वापरली नाहीय.’’
एके दिवशी सकाळी येताना हेन्री टूथब्रश बरोबर घेऊन आला व छपाईच्या शाईत बुडवून बोटांनी त्याचा फवारा शिळेवर उडवायला सुरुवात केली.
‘‘नॉम दे दियू. तुम्ही करताय तरी काय.’’ पेर कोटेल धावत त्याच्या टेबलाकडे आला.
‘‘शिळेवर ठिपक्यांचं काम करायचा माझा विचार आहे.’’
‘‘टूथब्रशने. मे नो, मे नो, मे नो. शिळाचित्राचं काम खूप नाजूक हातांनी करावं लागतं ठाऊक आहे ना तुम्हाला? त्यावर असे शिंतोडे उडवून चालणार नाही.’’
‘‘एकदा स्वतःच्या हातांनी करून पाहा तर. किती छान काम होतंय ते तुम्हाला समजेल.’’
त्या बुजुर्ग माणसाने टूथब्रश हातात घेऊन स्वतः फवारा उडवून पाहिला.
‘‘झकास. फारच सोपं आहे. इतके दिवस कसं कोणाला सुचलं नाही? शाबास. तुम्ही हाडाचे लिथोग्राफर दिसताय.’’
थोड्याच दिवसात हेन्री लिथोग्राफीच्या सर्व अंगांत पारंगत झाला. कोणतेही कसब शिकता शिकताच तो त्यात प्रावीण्य मिळवी. शिळेवरचे रेखाटन, ठिपक्यांचे काम, रंगीत लिथोग्राफीतील क्लिष्टता. हात शाईने माखलेयत, चेहेऱ्यावर रंगीत खडूचे फराटे उडालेयत अशा अवतारात तो एक निष्णात लिथोग्राफर म्हणून शोभून दिसायचा. पेर कोटेल सुरुवातीला हेन्रीला सबुरीने घ्यायला सांगत असे. पण त्याची विलक्षण प्रगती पाहून तो थक्क झाला होता. हेन्रीचे अप्रतिम रेखाटन कौशल्य, कोणतेही क्लिष्ट काम कमीतकमी वेळात आत्मसात करण्याचा त्याचा झपाटा. त्याच्या कामात कोणतीही अडचण, कौशल्याच्या मर्यादा कधीही पडल्या नाहीत. या बुटक्या, दारुड्या तरुणाच्या ठायी विलक्षण प्रतिभावंताची लक्षणे दिसत होती.

No comments:

Post a Comment