Tuesday, October 9, 2018

मुलँ रूज - ३७

काही महिने असेच निघून गेले. चित्रकला वर्ग संपलेला. सर्व मित्र परिवार पांगलेला. तरुण वयात हवासा वाटणारा स्त्री-सहवास मिळण्याची शक्यता त्याच्या रूपामुळे त्याला दुष्प्राप्य होती. हेन्रीला एकटेपणा खायला उठायचा. स्त्री-सहवासासाठी आसुसलेले मन स्वतःच्या रूपाच्या जाणिवेने उद्विग्न व्हायचे. त्यातून त्याला दिलासा मिळायचा तो ल पॅरोक्वे ग्रीला अधूनमधून दिलेल्या भेटींनी. तेथे सहसा तो दुपारी जरा लवकरच जायचा. माडीवरच्या मुली प्रेमचेष्टांमध्ये अगदी पारंगत होत्या. तो आल्यापासून त्याची आपुलकीने विचारपूस करून त्याला काय हवे नको याची त्या अत्यंत काळजी घेत. शेवटी कामक्रीडेत त्याला अत्युच्च सुख मिळवून देत. तेथील मुलींनी अगदी सरळ मनाने त्याला स्वीकारले होते. त्या मुलींसाठी तो छोट्या-मोठ्या भेटी आणीत असे. परफ्युम, बॉनबॉन कँडी आणि टर्किश सिगरेटी. त्यांच्या वाढदिवसांची नोंद आपल्या वहीत करून तो आठवणीने त्या दिवशी केक्स व वाइनच्या बाटल्या पाठवायचा. त्याने आपखुशीने दिलेल्या बक्षिसींबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञतता, त्याच्या पौरुषाची केलेली प्रशंसा या सगळ्या गोष्टींत कृत्रिमतेचा लवलेशही नसायचा. त्यामुळे त्याला त्या मुली मनापासून आवडू लागल्या. त्यांच्या बाहुपाशात थोडा वेळ का होईना पण तो आपल्या सगळ्या वेदना, दुःख विसरून जायचा आणि आपल्या दैवावर सूड घेतल्याच्या समाधानाने सुखावयाचा. त्या सर्व वेश्यांनी मिळून त्याला प्रेमाची मुळाक्षरे व कामक्रीडेचे शरीरशास्त्र शिकविली. त्यांच्या सहवासात त्याला कामतृप्तीची विविध अंगे सापडली. कामवासनेचा सरळ शुद्ध आविष्कार. बेगडी प्रेमाच्या कोणत्याही गुंतागुंतीशिवाय. त्यांच्या सहवासात त्याला हव्या असलेल्या मैत्रीचा ओलावा मिळू लागला.
दुसऱ्यांचे बोलणे सहानुभूतीपूर्वक ऐकण्याची त्याची कला ॲतेलीएप्रमाणे येथेही त्याच्या कामी आली. त्यामुळे तो फक्त भरपूर टिप्स व भेटवस्तू देणारा नुसता दिलदार आश्रयदाता न राहता त्या वेश्यांच्या सुखदुःखांचा एक साक्षीदार झाला होता. त्या सर्वजणी त्याला आपल्या आयुष्याच्या कर्मकहाण्या सांगत. काही खऱ्या, काही रंगवलेल्या. सुखदुःख, आशा-निराशा आणि स्वप्ने यांनी भरलेल्या गुजगोष्टी ऐकता ऐकता त्या स्त्रियांच्या नग्नतेखाली लपलेले त्यांचे अनामिक व्यक्तित्व त्याच्यासमोर हळूहळू उलगडू लागले. सुझानला एक मुलगा होता आणि कमावलेला प्रत्येक पैसा ती त्याच्या पालनपोषणासाठी गावी पाठवून द्यायची. जियानिना समलिंगी संभोगी होती. व्हेरोनिका सायकल शर्यतींच्या जुगारावर सगळी कमाई उधळून टाकीत असे. मिनेट नाट्यगृहात लागलेली सर्व कौटुंबिक भावनाप्रधान नाटके न चुकता बघत असे. नाटक बघून परत आल्यावर त्याचे कथानक त्यातील बारीकसारीक तपशिलांसकट सगळ्या मुलींना रंगवून सांगायची.
बेर्थ एखाद्या मायाळू आईसारखी दिसे. तिच्याशी बोलताना नेहेमी रॅचोचा विषय निघे. रॅचोच्या रू गेनेराँमधल्या टिनपाट स्टुडिओेत घालवलेल्या प्रत्येक क्षणाच्या आठवणी ती सतत कुरवाळीत असे. रॅचोने तिचे केलेले एक पोर्ट्रेट. गडद रंगात केलेला एक छोटासा कॅनव्हास तिने सोनेरी रंगाच्या भल्या मोठ्या फ्रेममध्ये बसवून आपल्या खोलीच्या दर्शनी भागात टांगला होता. ते पोर्ट्रेट म्हणजे ल पॅरोक्वे ग्रीमधील मोनालिसा होती. तिचा एखादा गिऱ्हाईक त्या पोर्ट्रेटचे कौतुक करायचे विसरला तर त्याची कंबक्तीच भरली म्हणून समजा. हा एक मास्टरपीस आहे असे हेन्रीने जेव्हा जाहीर केले तेव्हा तिचे गोबरे गाल अभिमानाने अधिक फुगले आणि टपोऱ्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.

Add caption
(पोर्ट्रेट - वुमन वुईथ अम्ब्रेला – तुलूज लोत्रेक – जलरंग, गॉश आणि टेंपेरा – कार्डबोर्ड ७६.५x५७.५ सेमी – १८८९)

(लोत्रेकने केलेली बेर्थची दोन पोर्ट्रेट एक स्टुडिओेतील तर दुसरे पीएर फॉरेस्टच्या बागेतील बेर्थ द डेफनावाने प्रसिद्ध आहेत. ती थोडीशी बहिरी असल्याने बेर्थ द डेफ या नावाने ओळखली जायची. उपजीविकेसाठी ब्रिटनी मधून पॅरीसला आल्यावर शेवटी पोटाची खळगी भरण्यासाठी तिला वेश्यागृहात भरती व्हावे लागले. पोर्ट्रेटमध्ये उच्चभ्रू खानदानी स्त्री सारखे दिसावे म्हणून महागडी हॅट, छत्री आणि लेस लावलेला गाऊन घालून ती मोठ्या हौसेने लोत्रेक समोर बसली. त्यात ती बरीच यशस्वीही झालेली दिसत असली तरी या अवतारात ती अवघडलेली आहे. ही गंमत लोत्रेकने आपल्या समोर बसलेल्या मॉडेलची कुचेष्टा न करता मोठ्या सहानभूती पूर्वक नेमकी टिपली आहे. तिची जीवनावरील आसक्ती त्याने तिच्या टपोऱ्या डोळ्यातून दाखवली आहे. पण त्याच वेळेला तिचे उन्हाने रापलेले राकट हात, मुठीत घट्ट पकडून ठेवलेली छत्री यातून एक सामान्य शेतकऱ्याची मुलगी घरंदाज स्त्रीचा आव आणण्याचा प्रयत्न करत आहे हे लोत्रेक मोठ्या चतुराईने दाखवून देतो.)


No comments:

Post a Comment