Monday, October 29, 2018

मुलँ रूज - ८६

‘‘प्लीज. व्हिक्टर.’’ दारुड्या माणसाच्या बरळण्याच्या आवाजाने त्या रिकाम्या कळकट बिस्ट्रोतील शांतता भंग पावली.
‘‘प्लीज. फक्त एकच.’’ त्या बरळण्यातून लाचारी व्यत्त होत होती.
‘‘प्लीज. मी तुला दहा फ्रँक देईन. हवं तर शंभर देतो. पण आणखी एकच. प्लीज.’’
शेवटी वैतागून व्हिक्टरने त्याच्या ग्लासात ॲबसिंथ ओतली.
‘‘हे बघा मस्य तुलूझ. खूप प्यायलात मगापासनं. आता हा शेवटचा.’’
हेन्रीने नेहमीप्रमाणे एका घोटात पेला घशाखाली रिकामा केला. अन्ननलिका जाळत दारू पोटात जाऊन पोचली. मेंदूला झिणझिण्या आल्या. डोळे विस्फारले. समोरचे दृश्य अंधूक झाले. टेबलावरचा संगमरवर डोळ्यांसमोर तरंगू लागला. कानात गुणगुणल्यासारखा आवाज ऐकू येऊ लागला. हेन्री एका हाताने टेबलाची कड पकडत खुर्चीत मागे रेलला. श्वासाची गती मुद्दाम होऊन धीमी करीत तो छातीवरून हात फिरवीत होता. पोटातून वर उसळू पाहणारा पित्तरस तो खाली ढकलण्याचा प्रयात्न करीत होता. थोड्या वेळाने पोटातील मळमळ शांत झाली, पण डोके मात्र भणभणायचे थांबले नाही.
बाहेर पाऊस पडत होता. अशा पावसाळी हवेत त्याची उदासी आणखीनच वाढायची. बिचारा व्ह्यू. पावसात भिजत, थंडीने कुडकुडत त्या आडवेळी हेन्रीला शोधत मोंमार्त्रभर या बिस्ट्रोतून त्या बिस्ट्रोत फिरत होता. हेन्रीला जायला शेकडो गुत्ते मोकळे होते. हेन्री रोज काहीतरी नवी थाप मारून सटकायचा. खूप शोधाशोध केल्यावर एखाद्या बिस्ट्रोत स्वारी झिंगून पडलेली आढळायची. कित्येक वेळा त्याला शोधण्यासाठी पाटूची मदत घ्यावी लागे. मग दोघेही त्याला घेऊन लॉजवर जात. तेथे मादाम ल्युबेत त्याला कॉफी पाजे व व्ह्यूच्या मदतीने त्याला बिछान्यावर झोपवे. असा कार्यक्रम आता रोजचाच झाला होता.
‘‘मस्य ... मस्य.’’
हेन्रीने डोके जोरजोरात हलविले. नजर स्थिर करण्याचा प्रयत्न केला व आवाजाच्या दिशेने पाहिले. त्याच्या टेबलाच्या बाजूला केसांच्या झिंज्या झालेली एक वयस्कर स्त्री त्याच्याकडे शून्य नजरेने बघत होती. तिच्या अंगावरच्या मळकट कपड्यांच्या फाटून चिंध्या झाल्या होत्या. तिने एक फाटकी शाल अंगावर पांघरली होती. पावसात अर्धवट भिजल्यामुळे ती थंडीने कुडकुडत होती.
‘‘मला जरा ते देता का?’’
हेन्रीला ती काय मागतेय तेच कळेना.
‘‘ती सिगारेटची थोटकं.’’ तिने टेबलावरच्या सिगारेटच्या थोटकांनी शिगोशीग भरलेल्या ॲशट्रेकडे बोट दाखवले, ‘‘ह्या थोटकांचे चार पैसे येतात.’’
दारिद्र्य, दुःख, आयुष्य सगळ्याचे शेवटचे टोक तिने गाठले होते. आता याहून अधिक अधोगती म्हणजे ती काय होणार? अशा या परिस्थितीतही तिच्या मागण्यात लाचारी किंवा आशाळभूतपणाचा लवलेशही दिसत नव्हता. तिच्या वागण्यातील थंड अलिप्ततेमुळे तिच्या त्या अवनत अवस्थेतही तिच्या अस्तित्वात एक शान जाणवत होती.
‘‘घ्या.’’ त्याने ॲशट्रे तिच्याकडे सरकविला. ‘‘हे पण घ्या.’’
त्याने खिशात हात घातला. हाताला लागलेली सोन्याचा मुलामा दिलेली सिगारेटकेस त्याने तिला देऊन टाकली.
‘‘तुम्ही काही घेणार का? बसा इथे.’’
‘‘थोडी रम मागवा.’’
ती खुर्चीवर बसली. अंगाभोवती गुंडाळलेली फाटकी शाल नीटनेटकी केली. कपाळावर आलेल्या पांढऱ्या केसांच्या बटा तिने मागे सारल्या. तिच्या सध्याच्या हलाखीच्या परिस्थितीला न शोभणारे असे एक विलक्षण मार्दव तिच्या त्या लकबीत होते.
‘‘तुम्ही चित्रकार आहात वाटतं?’’
‘‘होय. म्हणजे एकेकाळी होतो. पण तुम्ही कसं ओळखलंत?’’
‘‘चित्रकार मला पटकन ओळखता येतात. एकेकाळी बरेच चित्रकार माझ्या परिचयाचे होते.’’
वेटरने तिच्या समोर रम आणून ठेवली.
‘‘अ व्होत्र सान्ते मस्य.’’
‘‘अ व्होत्र सान्ते मादाम.’’ हेन्रीने आपला ग्लास उंचावत मोठ्या अदबीने म्हटले.
तिने सावकाश घोट घेतला. ग्लास टेबलावर ठेवून किंचित मान झटकली. डोळे मिटून मद्याचा आस्वाद घेत स्वतःशीच पुटपुटल्यासारखी म्हणाली,
‘‘तुम्ही मला मादाम म्हणालात. तेसुद्धा मला मादाम म्हणायचे. तुमच्या सारखेच ते सभ्य आणि सज्जन होते. भला माणूस. तुम्ही त्यांचे नाव ऐकलं असेल कदाचित. माने.’’
‘‘माने. एदुआर माने.’’ एका क्षणात त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ‘‘तुम्ही ऑलिंपिया आहात तर.’’
‘‘होय. मला ऑलिंपिया म्हणूनच ते हाक मारायचे. माझे खरं नाव व्हित्तोरीना. पण ते म्हणायचे तू माझी ऑलिंपिया आहेस. त्यांनी काढलेलं माझं पोर्ट्रेट तुम्ही बघितलं असेल?’’
‘‘बघितलं म्हणून काय विचारता? ते पोर्ट्रेट पाहिलेलं नाही असा माणूस शोधून सापडायचा नाही एवढं ते प्रसिद्ध झालंय. आज त्या पोर्ट्रेटची गणना जगातल्या महान कलाकृतींमध्ये केली जाते.’’
‘‘खूप नाटक केलं त्यांनी ते पेंटिंग करताना. तुम्ही असायला पाहिजे होता तेव्हा स्टुडिओत. मी सगळे कपडे काढून कोचावर आडवी झोपले होते. खूप विचार करून त्यांनी एक उशी मला डोक्याखाली घ्यायला दिली. मग त्यांनी एक फूल आणून माझ्या केसात माळलं. तरी त्यांच्या मनाला काही उतरेना. बराच वेळ तसेच टक लावून बघत होते माझ्याकडे. त्यांच्यासमोर नागव्याने पोज द्यायची ती काही माझी पहिलीच वेळ नव्हती. तरीही मला कसंतरीच वाटायला लागलं. तुम्हाला माहितेय कलाकार कसे असतात ते? त्यांच्या मनात काय आहे ते नीट कळतच नाही. तेवढ्यात ते चटकन बाहेरच्या खोलीत गेले. एवढा वेळ विचार करून त्यांनी काय आणलं महितेय? एक काळी रिबीन. त्यांनी ती रिबीन माझ्या गळ्यात बांधली व म्हणाले आता छान दिसतेयस. तशीच राहा. हलू नकोस. असं म्हणून त्यांनी समोरच्या कॅनव्हासवर चारकोल चालवायला सुरुवात केली.’’
ऑलिंपिया. ही समोर बसलेली कळाहीन, चिरगुटे ल्यालेली, बेवारशी भिकारीण. वृद्धत्वाने अकाली घाला घातलेली स्त्री. तारुण्य व सौंदर्य चिरकाळ टिकत नसते. त्याचा विनाश हा अटळ असतो हे सृष्टीच्या विलयाचे तत्त्व आहे. पण त्या विलयातदेखील एवढे भयंकर क्रौर्य कोणाच्या वाटेला येऊ नये. हे विलयाचे तत्त्व थोडा काळ का होइना थांबविण्याचे सामर्थ्य फक्त चित्रकलेतच आहे. त्यामुळेच जीवनापेक्षा कला ही श्रेष्ठ समजली जाते.
‘‘मला आता गेलं पाहिजे. मला अजून खूप थोटकं गोळा करायचीयत. त्याशिवाय मला आजचं जेवण मिळणार नाही. एका किलोचे फक्त साडेतीन फ्रँक मिळतात. पूर्वी चार मिळायचे तेव्हा जरा लवकर जेवायला मिळायचं. सगळीकडे महागाई वाढत चाललीय. आणि इकडे मात्र उलटंच. काय करणार? दिवस मोठे कठीण होत चाललेत. पण जगण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. ड्रिंकबद्दल थँक्स.’’
हेन्रीने खिशातून एक नोट काढली व तिच्या हातात सरकवीत तो म्हणाला, ‘‘प्लीज. याचे आभार मानू नका.’’
तिने निर्विकार नजरेने त्या नोटेकडे पाहिले व म्हणाली, ‘‘तेसुद्धा तुमच्यासारखेच मोठ्या मनाचे आणि दयाळू होते.’’
ती आपली फाटकी शाल सारखी करून निघून गेली. हेन्री आता बिस्ट्रोमध्ये एकटाच राहिला होता. त्याने पुढ्यातील ॲबसिंथ संपविली. त्याच्या कानातील गुणगुण वाढली. पोटाचे स्नायू आक्रसू लागले. त्याचा चेहरा वेदनेने पिळवटून गेला.
त्याच्यासमोरचा रिकामा ग्लास छताला टांगलेल्या दिव्याच्या प्रकाशात चमकत जणू त्याच्याकडे पाहून कुचेष्टेने हसत होता.
काही गोष्टी रडतात, काही हसतात, त्याला वाटले.
हा ग्लास, एक यमदूत, आपल्याकडे बघून हसतोय. कारण पिण्यासाठी त्यात दारू शिल्लक राहिलेली नाही.
‘‘तू एक विष आहेस. ॲबसिंथ.’’ हेन्री मोठ्याने ओरडला, ‘‘मी तुझ्यावर थुंकतो.’’
जड झालेल्या जिभेने तोंडातील लाळ कशीबशी गोळा करून हेन्री त्या ग्लासावर थुंकला व उलट्या हाताच्या फटकाऱ्याने ग्लास फरशीवर भिरकावून दिला.
(ऑलिंपिया – एदुआर्द मॅाने – तैलरंग, कॅनव्हास, १३०x९० सेमी, १८६३ म्युसे द ओर्से,पॅरीस)

No comments:

Post a Comment