Sunday, October 14, 2018

मुलँ रूज - ४९

जेवण जसे होत आले तशा गप्पाही कमी होत गेल्या. मित्रांना निरोप द्यायला म्हणून देगा त्यांच्याबरोबर बाहेर पडला. जानेवारी महिन्यातील थंडीने कुडकुडणारी रात्र होती. पण मैत्रीच्या उबेपुढे थंडीचे ते काय! पिस्सारोला निरोप देऊन झाल्यावर ते दोघे दिहोच्या घराच्या दिशेने गेले. त्याच्या घराच्या जिन्यातच पियानोची सुरावट त्यांना ऐकू आली. दिहोने दरवाजा उघडताच त्यांना पाहून त्याला आनंदाचा सुखद धक्का बसला. आत दिहोची बहीण क्लेमाँतीन पियानोवर बसली होती. त्या भावंडांनी त्या दोघांचे मनःपूर्वक स्वागत केले.
‘‘थोडी कॉफी घेऊ या. संगीताचा आस्वाद घेताना कॉफी किंवा बीअर बरोबर असेल तर मजा काही औरच. वॅग्नर ऑपेराची तालीम चालू असताना एक पिंपभर बीअर संपवीत असे. आम्ही त्याच्याबरोबर शंभरएक तरी तालमी केल्या असतील. प्रीमियरच्या वेळी अंडी मिळाली ती गोष्ट वेगळी.’’ एक डोळा मिचकावीत दिहो तिथे उपस्थित असलेल्यांना म्हणाला.
क्लेमाँतीन कॉफी घेऊन आली. कॉफी पिता पिता दिहो म्हणाला, ‘‘आता त्याची आणखी वाट पाहण्यात अर्थ नाही. तो एक तर विसरला असावा किंवा पत्ता सापडला नसेल.’’
क्लेमॉँतीन पियानो स्टुलावर जाऊन बसली व म्हणाली, ‘‘मोझार्टच्या सोनाटापासून सुरुवात करते.’’
तेवढ्यात दरवाजा खटखटवण्याचा आवाज आला. एक पांढऱ्या केसांचा इसम दरवाजात उभा होता. ‘‘सॉरी. तुझ्याकडून लिहून घेतलेल्या पत्त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण तो कागदच हरवला. शेवटी आठवणीला ताण देत कसाबसा येऊन पोचलो. अडुसष्टाव्या वर्षीसुद्धा स्मरणशक्ती थोडी फार शिल्लक आहे म्हणायची.’’
त्याचा हात धरून क्लेमाँतीनने त्याला सर्वांसमोर आणले व म्हणाली, ‘‘कदाचित सगळ्यांची प्रत्यक्ष ओळख नसली तरी यांचे नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. मस्य सेझार फ्रँक.’’
सेझार फ्रँकच्या उपस्थितीतील ती मैफल रात्री खूप उशिरापर्यंत चालली. क्लेमाँतीनच्या आग्रहावरून त्याने पियानोवर एक सुरावट वाजवायला घेतली. योगायोग असा की ती सुरावट होती डेनिसने त्या संध्याकाळी वाजवलेली प्रील्यूड. ती सुरू होताच हेन्री दचकला. हेन्री ज्या घटनेच्या क्लेशकारक स्मृती विसरला होता त्या पुन्हा चाळवल्या गेल्या. आपले शारीरिक व्यंग व कुरूप चेहरा यामुळे कोणत्याही मुलीच्या प्रेमाला आपण कधीही पात्र ठरू शकणार नाही ही जाणीव उफाळून वर आली. मनक्षोभाने अस्वस्थ झाल्याने त्याने ऐन रंगात आलेल्या मैफलीतून काढता पाय घेतला. तो निघाला तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते. एवढ्या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर कोणीही नव्हते. एखादी बग्गी मिळेल या आशेत त्याने लॉजच्या दिशेने पाय ओढत चालायला सुरुवात केली. वाटेत एक बिस्ट्रो उघडा दिसलेला पाहून हेन्री आत शिरला. मनक्षोभामुळे आलेले औदासीन्य व शारीरिक थकवा यांनी तो पार गळून गेला होता. खुर्चीत बसून त्याने थोडा दम घेतला. आतील वातावरण थोडे उबदार होते. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. खिडकीच्या तावदानात त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. पलीकडे मिणमिणत्या प्रकाशातील निर्मनुष्य रस्ता. काही क्षण तो स्वतःची ओळख विसरला, स्थळकाळाचे संदर्भ हरवले.
थोड्या वेळाने त्याचे लक्ष दुसऱ्या कोपऱ्यातल्या एका टेबलाकडे गेले. त्या टेबलावर एक तरुण मुलगी शरीराचे मुटकुळे करून निवांत झोपली होती. समोर एक वाईनची रिकामी बाटली, कपडे अस्ताव्यस्त, हॅट जमिनीवर पडलेली. तिचा श्वासोच्छ्‌वास एखाद्या लहान मुलासारखा संथ लयीत चालू होता. तेवढ्यात बिस्ट्रोचा मालक त्या मुलीजवळ आला. त्याने तिचे बखोट पकडून तिला गदागदा हलवून उभे केले. ‘‘ए कुत्तरडे, आपल्या बापाचं घर समजलीस काय टेबलावर झोपायला? चल उठ आणि चालायला लाग. नाहीतर गांडीवर लाथ मारून घालवून देईन.’’ त्याने उलट्या हाताने तिला एक थप्पड मारली. ‘‘साली रांड कुठली. आज कोण ठोक्या भेटला नाही वाटतं.’’
हा प्रसंग इतक्या थंडपणे घडला की त्यातील क्रौर्य हेन्रीच्या लक्षात यायला थोडा वेळ लागला. बास्टर्ड. सन ऑफ अ बीच.त्याने जिभेवर आलेल्या शिव्या मुकाट्याने आतल्या आत गिळल्या. त्याला वाटले की तो उंच व तगडा असता तर त्या जनावराला तिथल्या तिथे धडा शिकवता आला असता. पण त्याला आलेला राग एका विलक्षण ऊर्मीच्या उन्मेषाने निवाल्यासारखा झाला. तो त्या दुर्दैवी मुलीचे टक लावून निरीक्षण करीत होता. तिने पाय खुर्चीवर ओढून घेतले. पाय जास्तच मुडपून घेतल्याने गुडघे जवळपास गालाला टेकले होते. एवढी थप्पड खाऊनही तिच्या डोळ्यांवरची धुंद झापड उडाली नव्हती. तिच्या भावशून्य नजरेचा रोख समोरच्या रिकाम्या बाटलीकडे होता. तिचा चेहऱ्यावरून तिला दारूचे व्यसन असावे असा संशय येत होता. त्या क्षणी तिच्या रूपाने माणसाची दैन्यावस्थाच समोर बसली आहे असे वाटत होते.
त्याने खिशातून एक पेन्सिल व एक कागद बाहेर काढला व टेबलावर पसरला. फक्त एक मिनिटभर तरी अशी स्थिर रहा. तो पुटपुटला. त्याची पेन्सिल विलक्षण झपाट्याने कागदावर झरझर फिरू लागली. काही क्षणात चित्राने आकार घेतला. माणूसपण पुसलेला चेहरा, चुरगळलेले कपडे, विखुरलेले केस, समोरच्या बाटलीवर खिळलेले बिलोरी डोळे व शून्यात हरवलेली नजर... मुर्तीमंत दुःखाचे दर्शन घडविणारे हे दृश्य नजरेसमोरून जाण्यापूर्वी समोरच्या कागदावर उतरवता येतील तेवढे तपशील त्याने उतरवून घेतले आणि राहिलेले सर्व तपशील आपल्या स्मृतिपटलावर नोंदवून ठेवले. तिच्या शरीराची थोडी हालचाल झाली. पापण्या जड होऊन मिटल्या गेल्या व बदकन आवाज करून तिच्या देहाचे गाठोडे टेबलावर पडले व ती गाढ झोपी गेली.
(या स्केचच्या आधारे लोत्रेकने केलेले गल-द-ब्वा या नावाचे पेंटिंग प्रसिद्ध आहे.)
हेन्रीने बिस्ट्रोच्या मालकाला तिला सकाळपर्यंत काही त्रास न देण्यास सांगितले व तिच्यासाठी कांद्याचे सूप, पाव व वाईनची बाटली मागवली. वाईन आणि पाव तिच्यासमोर ठेवलेला त्याने पाहिला व तो तिथून निघाला. बाहेर थंडी होती. त्याने आपल्या कोटाची कॉलर वर ओढून घेतली. वर आकाशात वादळी ढगात गुरफुटून गेलेला हिवाळ्यातला निस्तेज चंद्र होता. एखादी बग्गी, घोडागाडी दिसते का म्हणून त्याने मोठ्या आशेने गल्लीच्या दुसऱ्या टोकाकडे पाहिले. दिवसा नेहमी गजबजलेला असणारा तो रस्ता उत्तररात्री दिव्यांच्या अंधूक प्रकाशात भकास वाटत होता. थोडे भराभर चालले तर अर्ध्या तासात मादाम ल्युबेतच्या लॉजवर पोहोचून मऊ उबदार बिछान्यात शिरता येईल या कल्पनेने तो सुखावला व त्याने चालण्याची गती थोडी वाढवली.


(गल-द-ब्वा – द हँगओव्हर – पोर्ट्रेट ऑफ सुझान व्हेलदाँ – तैलरंग आणि शाई,
कॅनव्हास – ४५x५३ सेमी – १८८८ – फॉग आर्ट म्युझियम, मॅसॅच्युसेटस.)


(पॅरीसमधील भटकंतीत लोत्रेक नेहमी आपले स्केचबुक आपल्या बरोबर ठेवत असे. रस्ते, नाईट क्लब, बाजार, वेश्यागृह, सर्कस, नाट्यगृह ठिकाण कोणतेही असो, थंडी, वारा पाऊस, दिवस, रात्र लोत्रेक केव्हाही स्केच करताना दिसे. या स्केचीस वरून त्याने पेंटींग केली आहेत. ग्राफिक कलेला आवश्यक असलेल्या जोरकस रेषेची त्याला उपजत देणगी होती. असाच एका झटपट केलेल्या स्केचवरून स्टुडियेत गेल्यावर सुझान व्हेलदाँ या चित्रकार मैत्रीणीला घेऊन त्याने त्या स्केचच्या आधारे एक पेंटींग केले. चारकोल आणि पेन्सिल या माध्यमातून येणारा परिणाम त्याने ब्रशचा पेन्सिलसारखा वापर करून साधला आहे. ब्रशच्या अर्धचंद्राकृती फटकाऱ्यातून त्याने चित्रप्रसंगातील उस्फुर्ततेला धक्का न लावता त्यातील निष्ठूरतेला उठाव दिला आहे.)

No comments:

Post a Comment