Thursday, October 18, 2018

मुलँ रूज - ५८

मारी गाव भटकायला गेल्यावर दिवसभर तो मोकळाच असायचा. बऱ्याच दिवसांत भेट न झाल्यामुळे एक दिवस मॉरीस येऊन त्याच्या प्रकृतीची चौकशी करून गेला. स्वतः हेन्री एकदा आईला भेटून आला. वेळ घालवण्यासाठी तो दुपारी कॅफेत नाही तर एखाद्या मित्राच्या घरी किंवा स्टुडिओत जाऊन बसे. जॉर्ज सुराकडे जाऊन तो त्याचे बिंदूचित्राचे काम तासन्‌तास बघत राही. आर्ट डीलरकडे जाऊन जपानी प्रिंटचे कॅटलॉग उगाच चाळत बसे. त्याच्या अशा या निरुद्देश भेटींचा मित्रांनाही ताप होई. मुलँ रूजमध्ये असाच एकदा रिकामटेकडा बसला असता झिडलरने त्याला पोस्टरच्या प्रगतीवरून झापले. अष्टौप्रहर मारीचा ध्यास घेतल्याने त्याचे एका उडाणटप्पू प्रेमवीरात रूपांतर झाले होते.
एके दिवशी मारी मोठ्या खुशीत म्हणाली, ‘‘आज किनई सगळे नातेवाईक, मित्रमंडळी आमच्या घरी जमले होते बहिणीला भेटायला. त्या वेळी मी सगळ्यांना तुमच्याबद्दल सांगत होते. हा स्टुडिओ, इथल्या मऊ मऊ गाद्या, हा बाथ टब, तुमची पेंटिंग. पण कोणाचाही विश्वासच बसेना. आपण सगळ्यांना एकदा इकडे बोलावून पार्टी देऊया का? माझ्या बहिणीला पण तुम्हाला एकदा भेटायचंय. माझा एक चुलतभाऊ आहे. तो गिटार छान वाजवतो, त्यालाही बोलवू या. खूप मजा येईल.’’
हेन्रीच्या ठाम विरोधामुळे ती पार्टी झाली नाही. त्या दिवशी रात्री ती स्टुडिओत खूप उशिराने परतली ती बरोबर गुत्त्याचा वास घेऊन, ॲकॉर्डियनच्या धूनवरील एक लोकप्रिय गाणे गुणगुणत. तिची पावले त्या गाण्यावरील नृत्याच्या ठेक्यात पडत होती. कुठे गेली होतीस दिवसभर, असे विचारण्याचा अवकाश की तुम्हाला काय करायच्यात नसत्या पंचायती म्हणून ती गरजणार. नाही विचारले तर त्याला जळवण्यासाठी मुद्दाम एखादी गोष्ट रंगवून सांगणार. उदाहरणार्थ, आज वाटेत एकाने डोळा मारला. काय चिकना होता तो दिसायला. मी त्याच्याकडे बघून हसले तर त्याने मला धक्का मारून कुल्ल्यावर चिमटा काढला. गेले होते त्याच्याबरोबर दोन घटका. त्याच्याकडे तुमच्यासारखे पैसे नव्हते पण काय मज्जा आली म्हणून सांगू.
एकदा तिने सहानुभूतीचा खोटा आव आणून मानभावीपणाने विचारले, ‘‘तुमचे पाय हे असे कसे हो?’’
‘‘मी लहानपणी जिन्यावरून पडलो होतो हे मी तुला मी पूर्वी सांगितलंय.’’
‘‘पण त्याने एवढं काय झालं व्हायला. दुसरी कुणी मुलं पडत नाहीत काय लहानपणी. पण तुमच्यासारखी कोणी जन्माची फेंगडी होत नाहीत.’’
‘‘या कुबड्या तुम्ही लहानपणापासून वापरायचा का हो?’’
‘‘किती वेळा काढशील हा विषय. गप्प बस एकदाची नाही तर चालती हो.’’
‘‘तुमचं कोणाबरोबर जमणं कठीणच आहे. प्रेमाने नुसती विचारपूस केली तर एवढं संतापायला काय झालं? मी एकदा खरंच गेले ना की मग कोणीही विचारायलासुद्धा येणार नाही. बघा जायची बात काढली तर कसा चेहरा पडलाय ते. जरा आरशात पहा तोंड आपलं.’’
‘‘आता दहा फ्रँकमध्ये नाही जमायचं मला. वीस पाहिजेत.’’
पुढल्या आठवड्यात विसाचे तीस झाले. पुढच्या महिन्यात तिसाचे पन्नास.
हेन्री चिडतो म्हणून मारी मुद्दाम होऊन उशिरा येई. वर त्याला जळवण्यासाठी मित्राबरोबर फिरायला गेल्याच्या थापा मारी. अशा रीतीने त्याला छळण्यात तिला मनापासून आनंद होई. ती कोणाबरोबर झोपेना. शेवटी ती एक वेश्या आहे, असे म्हणून हेन्री स्वतःची समजूत घालायचा प्रयत्न करी.
पण अति झाले नि शेवटी त्याचा संयम सुटला. दररोज संध्याकाळी दारू पिऊन त्यांची भांडणे होऊ लागली. शब्दाला शब्द, उत्तराला प्रत्युत्तर, अपमानाला प्रतिअपमान अशा चढत्या क्रमाने होणाऱ्या भांडणाचा शेवट अर्थहीन, नीरस अशा शरीरसंबंधाने होई. मनाने व शरिराने मलूल होऊन तिच्या सहवासाचा पुरता उबग येऊन शेवटी कधीतरी तो निद्रेच्या अधीन होई.
हेन्रीला मारीविषयी एकाच वेळी प्रेम व प्रचंड घृणा वाटत असे. जेव्हा ती नसे तेव्हा तो अगदी बेचैन होऊन जाई. दिवस कसाबसा निघून जाई पण संध्याकाळ खायला उठे. त्याने कॅफेत जाणे सोडून दिले. रस्त्यावरील गर्दी व आवाज त्याला सहन होईनासे झाले. स्टुडिओच्या बाहेर पडणे जवळ जवळ बंदच झाले. दिवसभर कोनॅक पीत कोचावर बसून असे. हळूहळू जसा दारूचा अंमल डोक्यावर होऊ लागे तशी मारीची प्रतिमा डोळ्यांसमोरून अंधूक होऊ लागे व तो निष्क्रियतेने ग्रासलेल्या रिकामपणात स्वतःला हरवून जाई.
अशाच एका निवांत दुपारी मॉरीसने त्याला गाठले. इतस्ततः अस्ताव्यस्त पडलेला पसारा पाहून तो म्हणाला, ‘‘कामात खूप बुडून गेलेला दिसतोयस. मला माहितेय काम करण्याची तुझी क्षमता आम्हा सर्वांपेक्षा खूप जास्त आहे. थोड्या विश्रांतीची शरीराला गरज असते हे लक्षात असू दे.’’
‘‘कशाला उगाच माझ्या पाठीला लागतोयस. इतक्या दिवसांनी कशी काय फुरसत मिळाली बुवा. आज काय रविवार नाही की कसली सुट्टीही नाही. तुझं ते ल फिगारो अजून चालू आहे की तू त्यांना राम राम ठोकलायस?’’
‘‘माझ्या कशाला उगाच फिरक्या घेतोयस? बऱ्याच दिवसांत महाशयांचं दर्शन नाही म्हणून मुद्दाम होऊन अर्धा दिवस सुटी घेऊन आलोय तुला भेटायला.’’
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मॉरीसने मुद्याला हात घातला.
‘‘काय तुझी ही अवस्था करून घेतलीयस. तुला झालंय तरी काय?’’
‘‘काही नाही. ठीक आहे मी.’’
‘‘माझ्याकडे थापा चालणार नाहीत. तुझं काहीतरी बिनसलंय नक्कीच. काय ते मोकळेपणाने सांग.’’
‘‘दुसऱ्याच्या गोष्टीत नाक कशाला खुपसतोस तू? तुझं काम आटप आणि टळ इथून.’’
‘‘तुला काय झालंय याचा शहानिशा केल्याशिवाय मी काही आज इथून जाणार नाही.’’
मॉरीस त्याच्या जवळ गेला व हळुवार आवाजात म्हणाला, ‘‘हेन्री, कोणाकडे तरी तू तुझं मन मोकळं केलंस तर बरं होईल. बाटलीला बूच लावून बंद करून किती दिवस चालेल? मन मोकळं करायला माझ्याशिवाय दुसरं कोण इथे जवळ आहे? आपण मानलेले भाऊ भाऊ आहोत. विसरलास?’’
‘‘ठीक आहे. तू तयार आहेस तर ऐक. मला एक पोरगी भेटलीय. मारी तिचं नाव.ती रस्त्यावरची एक भटकभवानी आहे. मूर्ख, खोटारडी, अप्पलपोटी अन्‌ पक्की डँबीस!’’ त्याने सिगरेटचा एक खोल झुरका घेतला व पुढे म्हणाला, ‘‘तिच्याशिवाय जगणं मला मुष्कील झालंय. बस्स एवढंच. झालं समाधान?’’
‘‘तू तिच्या प्रेमात पडलायस की काय?’’
‘‘प्रेम! हँ.’’ त्याच्या हसण्यात कडवटपणा होता,‘‘मी प्रेमाविषयी चकार शब्दसुद्धा काढलेला नाही. मी एवढंच म्हणालो की, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. प्रेमाविषयी चर्चा करणं म्हणजे कालापव्यय आहे. प्रेम या एकाच शब्दातून शेकडो अर्थ ध्वनित होतात. देवावरचं प्रेम, आईवरचं प्रेम, रेम्ब्रांदवर तुमचं प्रेम असू शकतं, एवढंच नव्हे तर घरातल्या कुत्र्यावरसुद्धा प्रेम बसू शकतं. पण मारीवर प्रेम म्हणशील तर अशक्यच. चंद्रप्रकाशात तिचा हात हातात घ्यावा, तिच्यावर एखादं सुनीत लिहावं असं मला कधी वाटलं नाही. मला ती आवडते याचा अर्थ म्हणजे तिचे ओठ, तिची टपोरी स्तनाग्रं, तिच्या लुसलुशीत शरीराबरोबर केलेली शय्यासोबत. यापलीकडे काहीही नाही. तिचा मी जेवढा तिरस्कार करतो तेवढा मी आयुष्यात कोणाचाही केला नसेल. ज्या क्षणी आमची पहिली गाठ पडली त्या क्षणापासून तिने जे जे काही केलं त्यामुळे मला मनस्तापाशिवाय काहीही मिळालं नाहीय.’’
‘‘तिचा मूर्खपणा, असंस्कृतपणा, लोभी वृत्ती व रोमारोमांतून जाणवणाऱ्या लासवट वासनेचा विखार.’’ तो जसेजसे तिच्याविषयी बोलू लागला तसतसे त्याला मोकळे वाटू लागले. त्याने त्याला मारीची पहिली भेट, पाटूने त्याला दिलेला सल्ला वगैरे सर्व हकिकत सविस्तर सांगितली.
‘‘ही बाई एकाच वेळी मला हवीही आहे आणि नकोही. हे कसं काय ते काही मला सांगता येणार नाही. कदाचित द्वेषभावना हीच सर्वात मोठी कामोत्तेजक प्रेरणा ठरत असावी. भांडणात एकमेकांची उणी काढून, शाब्दिक बोचकाऱ्यांनी एकमेकांना ओरबाडून, संताप शिगेला पोचलेला असताना केलेल्या शृंगारात काही और आनंद असला पाहिजे यार.’’
त्याची नजर खोलीच्या छताकडे होती. तो पुढे म्हणाला, ‘‘या प्रकारच्या समागमाने कामवासना तात्पुरती जरी शमली तरी त्यातून ना समाधान मिळते ना मनःशांती. भोगूनही अतृप्तच राहायला होते.’’ त्याने सिगरेटचा खोल झुरका घेतला. पेल्यात कोनॅक ओतली व म्हणाला, ‘‘कदाचित ही अतृप्ती माणसाला हळूहळू पण अटळपणे विनाशाकडे घेऊन जात असावी.’’
त्याने कोनॅक एका घोटात संपविली. मद्याचा घोट त्याच्या घशातून खाली उतरेपर्यंत मॉरीसने वाट पाहिली व म्हणाला, ‘‘मला एक सांग. असे काय मोठे आकर्षण तिच्या ठायी आहे की ज्याचा मोह तुला टाळता येत नाही?’’
हेन्री खिन्नपणे हसला, ‘‘मला वाटलंच होतं की तू नेमका हाच प्रश्न विचारशील. मीही हाच प्रश्न स्वतःला हजारो वेळा विचारलाय. पण अजूनही मला त्याचे पटेल असं उत्तर सापडायचंय. प्रत्येकाला वाटत असतं की आपण अगदी नॉर्मल आहोत म्हणून. पण वेळ आली की याच नॉर्मल माणसाचे रूपांतर बलात्कारी, परपीडक, समसंभोगी अशा माणसात होऊ शकतं. काम हा विषय विलक्षण गूढ आहे. एखाद्या महासागरासारखा. जेवढं खोलात जावं तेवढं थोडं. तळाशी गडद अंधकार आणि राक्षसी प्राण्यांचा वावर.’’
‘‘मारीचं एवढं विलक्षण आकर्षण का? मला नाही सांगता येत. चौदाव्या वर्षापासून ती इतक्या जणांबरोबर झोपली असेल. पण मी सोडून इतर कोणीही तिच्यात एवढा गुंतला नसेल. आता पुढची गंमत बघ. मी तिच्यामागे तर ती एका मवाल्याच्या मागे हात धुऊन लागलेली आणि त्याचा डोळा फक्त हिच्या पैशांवर. हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही मला तिचं आकर्षण का टाळता येऊ नये? सुरुवातीला वाटायचं की तिच्या मोहक रूपामुळे असं होत असेल. एका कमनीय बांध्याच्या तरुणीच्या कंबरेभोवती हात टाकून आपण रस्त्यातून चालताना किती बरं वाटायचं म्हणून सांगू? नंतर वाटायचं हे आकर्षण तिच्या रतिक्रीडेतील नैपुण्यात असेल किंवा तिच्या व्यक्तिमत्वात पदोपदी असलल्या लैंगिक आव्हानात. किंवा तिच्या लासवट सौंदर्यात, नसानसांत भिनलेल्या वैषयिकतेमुळे असेल.’’
‘‘मी काय बोलतोय त्यात तुला काही अर्थ वाटतोय का?’’ हेन्रीने मधेच थांबून अंदाज घेतला. मॉरीस त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता हे पाहून तो पुढे म्हणाला, ‘‘तिच्या वर्तनात एक अलिप्त कोरडेपणा आहे. ती ज्या नजरेने बघते त्याने अंगाची कशी लाही लाही होते म्हणून सांगू? तुला ते कळणं कठीण आहे. कारण तू माझ्यासारखा बुटका नाहीस. स्त्रियांची अशी नजर तुझ्या वाट्याला आली नसेल आणि येणारही नाही. मॉरीस, कामवासनेपेक्षा अधिक गुंतागुंतीची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आत्मभान. एखाद्या क्षुद्र किडामकोड्याकडे पाहावं तशा नजरेने ती माझ्याकडे बघते. माणसाच्या वेषातला एक दाढीदीक्षित बेंगरूळ प्राणी. तिच्या नजरेतल्या त्या उपहासाने माझ्या मस्तकात संतापाची तिडीक जाते. तुला त्या गिर्यारोहकाची गोष्ट माहितीय का? त्याने सातव्या प्रयत्नांत आल्प्समधील अत्युच्च शिखर सर केलं. त्याला लोकांनी विचारलं, एवढा जीव धोक्यात घालून दरवर्षी वारंवार प्रयत्न करण्यामागची तुमची प्रेरणा कोणती? तर तो काय म्हणाला माहितेय? तो भोसडीचा पर्वत माझ्याकडे पाहून हसत होता म्हणूनच मी दरवर्षी येत राहिलो. मलासुद्धा अगदी तसंच वाटतंय. साली दीड दमडीची रांड ती काय. तिने मला अगदी किड्यामुंगीपेक्षाही कमी लेखावे? ती अशी बघायला लागली की वाटतं एकदा ही आपल्या तावडीत सापडली, की मग तिला अंगाखाली रगडून हवं तसं कुस्करायला हवं.’’
दोन मित्रांच्या गप्पागोष्टीत संध्याकाळ केव्हा झाली ते कळले नाही. खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाच्या पॅलेटवर मावळत्या सूर्याचे रंग एकमेकात मिसळून गेले होते.
‘‘सध्या आमची अवस्था पिंजऱ्यात सापडलेल्या दोन उंदरांसारखी झालीय. एकमेकांना बोचकारणं, चावे घेणं, एकमेकांचा सतत पाणउतारा करणं आणि शक्य झालं तर जमेल तेवढा समागम, याशिवाय दुसरं काही नाही. तिला तिच्या सगळ्या गोतावळ्याला एकदा इकडे आणायचंय, दिवसाला पन्नास फ्रँक देणारा श्रीमंत, कुरूप, फेंगडा, बुटका माणूस दाखवायला. ती येता-जाता काहीतरी निमित्ताने माझ्या व्यंगाचा उल्लेख करायची संधी शोधत असते. मी सतत तिचा प्रचंड तिरस्कार करीत असतो. माझी कुरूपता तिच्यावर लादून तिच्या देहाचा उपभोग घेतो. स्त्रीचा घोर अपमान म्हणजे तिच्या मनाविरुद्ध केलेला संभोग. मनातील राग, द्वेष या भावनांचा निचरा करण्याची ही किती छान पद्धत आहे.’’ हेन्री उपरोधाने हसून कडवटपणे म्हणाला.
‘‘पुढे काय करायचं ठरवलंयस?’’ मोरीसने सहानुभूतीने विचारले.
‘‘काही नाही.’’ हेन्रीने विमनस्कपणे खांदे उडवले, ‘‘कदाचित एके दिवशी ती मला सोडून जाईल व सगळा गुंता आपोआपच सुटेल किंवा तिला घालवून देण्याचा मला धीर होईल.’’
‘‘हे माझ्या कमाईचे पैसे आहेत हां. मी काय पण करीन. तुम्ही कोण विचारणार मला?’’
एखाद्या कुत्रीसारखी भुंकत मारी हेन्रीच्या अंगावर गेली. ‘‘बँकेत ठिवलेले सगळे पैसे मी त्याला देऊन टाकलेयत. माझं प्रेम आहे त्याच्यावर. मी काय पण करीन त्याच्यासाठी. आता मी त्याच्याकडेच चाललेय कायमची. तुमचं खत्रूड तोंड बघत जन्मभर कोण बसणाराय इथं.’’ ती धाड धाड जिना उतरत खाली गेली. जाताना ती मुद्दाम मोठ्या आवाजात गाणे म्हणत होती.
त्या दिवशी त्याने सहजच तिचे पासबुक पाहिले होते. त्यात तिने सर्व पैसे काढून घेतल्याची नोंद होती. ती पाहताच त्याचे माथे भडकले व त्याने तात्काळ तिला चालती व्हायला सांगितले त्याला आता दोन आठवडे होत आले. आता त्याचा राग निवळला होता. क्षणोक्षणी त्याला तिची आठवण यायची. तिची खरोखरच हकालपट्टी केल्याबद्दल त्याला स्वतःलाच शाबासकी द्यावी असे वाटायचे, पण ते तेवढ्यापुरतेच. अशा शाबासकीने शरीराची भूक थोडीच भागणार होती? तिचे लहानसे स्तन, त्याचे पौरुष सामावून घेणाऱ्या तिच्या मांड्या. आठवणीने तो रात्र रात्र तळमळून काढी. तिच्या शोधात त्याने सॅबोस्टोपलचे सर्व गल्लीबोळ धुंडाळले. प्रत्येक गुत्त्यात तो डोकावला. दर संध्याकाळी दारू पीत तिची वाट पाहताना जिन्यावर पावलांचा आवाज येताच त्याच्या जिवाची घालमेल होई. शेवटी त्याची जवळ जवळ खात्री झाली की ती काही आता परत येत नाही.

No comments:

Post a Comment