Tuesday, October 2, 2018

मुलँ रूज - २१

नाताळची सुटी संपली. हेन्री परत इकॅरसच्या कामाला लागला. ॲतलिए, ओग्युस्तिना, ल एलीसचे रहाटगाडगे परत चालू झाले. एकदा वर्गात डायना ॲट बाथ हे चित्र रेखाटताना तो नेहमीप्रमाणे मॉडेल मारियाच्या नग्न देहाकडे टक लावून पाहत होता.
(मारियाचे लोत्रेकने केलेले स्टडी पेंटिंग स्टॉकहोम म्युझियममध्ये आहे)
पण त्या दिवशी त्याचे पेंटिंगकडे लक्ष लागेना. त्याला काहीतरी वेगळेच वाटू लागले. मध्यभागी फुरफुरणारा स्टोव्ह, लाकडासारखी ताठ बसलेली मारिया, पेपर वाचत बसलेले मस्य कॉर्मेन, आपापल्या इझलवर मान खाली घालून काम करत असलेली मुले. म्हटले तर सगळ्या गोष्टी अगदी नेहमीसारख्या होत्या. कदाचित त्या दिवशी सकाळपासून त्या सगळ्यांचे संदर्भ पार बदलून गेले होते.
हेन्री अतिशय बुद्धिमान होता. त्याच्या हातात कला होती. मायकेल अँजेलो, एल ग्रेको, हाल्से, व्हेलाक्वेझ वगैरे महान कलाकारांच्या गाजलेल्या चित्रांच्या अभ्यासपूर्ण नकला त्याने केल्या होत्या. गेल्या तीन वर्षांत कलेकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन चांगलाच विकसित झाला होता. कलेतील महानता म्हणजे काय याची प्रगल्भ जाण त्याला होती. सुंदर गोष्टींचे नुसते सुंदर चित्रण म्हणजे कला नव्हे हे त्याला समजले होते. आणि इथे या कला शिक्षणाच्या वर्गात न्युडचे चित्रण कसे आखीव-रेखीव, गुळगुळीत करायचे हे त्याच्या गळी उतरवले जात होते. व्यक्तिचित्रण करण्याचे नियम कवायतीच्या शिस्तीसारखे कडक होते आणि त्यात न्युडची शिस्त तर फारच कडक. न्युडचा विषय असलेली स्त्री अगदी सुरेख बांधेसूद दिसायला हवी. तिच्या स्तनांनी बघणाऱ्याचे कुतूहल चाळवले गेले पाहिजे. जांघा अगदी स्वच्छ दाखवायच्या. तेथे केस दाखवून चालणार नाही. योनी शक्यतो वस्त्राच्या मागे लपलेली किंवा हाताने झाकलेली असावी. तितीॲनच्या व्हीनससारखी. योनी दाखवायचीच झाली तर ती अनाघ्रत वाटायला हवी. मग ती मॉडेल कशी का असेना.
नॉम दे दियू. च्यायला. कुठे गेला तो भिकारडा रॉ अँबर. हा इकॅरस कधी संपणार आहे देव जाणे. इकॅरसच्या कामाला त्याने सुरुवात केली तेव्हाच पुढे त्याला कंटाळा येणार आहे याची कल्पना होती. मग आजच हा सगळा उपद्‌व्याप टाकून पळून जाऊन सरळ आईच्या कुशीत तोंड खुपसून रडावे असे का वाटत आहे?
आदल्या रात्री त्याच्या स्वप्नात ज्युली आली होती. रॅचोची नवी मैत्रीण. कोचावर पहुडलेला तिचा नग्न देह एका बाजूने अँबर तर दुसऱ्या बाजूने मिडनाइट ब्ल्यू रंगात न्हाऊन गेला होता. तिची रानटी स्ट्रॉबेरीसारखी रेडिश पर्पल रंगाची टचटचीत स्तनाग्रे उठून दिसत होती. त्याने तिला हलकेच स्पर्श केला. तिची अंगकांती फाइन ग्रेनच्या कॅनव्हासच्या पोताप्रमाणे होती. नकळत त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकले गेले. श्वासात श्वास मिसळला. देहातून वीज सळसळली. तिच्या मांड्या विलग झाल्या. त्याचा देह तिच्या देहात शिरण्यासाठी धडपडू लागला. सुखाच्या स्पंदनांची एक तीव्र लाट सर्व देह व्यापून उरली.
रात्री स्वप्नात आलेली ज्युली दिवसासुद्धा त्याच्या नजरेसमोर तरळत असायची. त्याच्या देहाला स्वप्नपूर्तीची आस लागून राहिली. दिवस-रात्र तो तळमळत असायचा. मोंमार्त्रमध्ये असा सहवास मिळणे मुळीच अप्राप्य नव्हते. मुली तर पैशाला पासरी पडल्या होत्या. थोडीशी खुशामत, एखादी सुंदरशी भेट, चांगल्या हॉटेलमध्ये मस्तपैकी पुख्खा, नाही तर चक्क पैसे. रोख पैसे कोणाला नको होते? तसे पाहिले तर काम खूप सोपे होते.

No comments:

Post a Comment