Thursday, October 4, 2018

मुलँ रूज - २५


वर्ष जवळ जवळ संपत आले होते. तरीही हेन्रीच्या मित्रांचे कला आणि स्त्रिया या विषयांवरून अहमहमिकेने एकमेकांशी वाद घालणे काही संपत नव्हते. एवढ्या तेवढ्यावरून एकमेकांना आव्हान देणे, तोंडावर थुंकायची भाषा हे सगळे वरवरचे होते. पाइपचा झुरका मारत आपला खंबीर स्वभाव आणि कणखर पौरुषाच्या कितीही वल्गना केल्या तरी भविष्याच्या कल्पनेने सर्वजण आतून हादरले होते. ॲतेलीएच्या सुरुवातीच्या दिवसांत चित्रकारांच्या भवितव्याबद्दल असलेल्या रोमँटिक कल्पनांना देगाने मागच्या वर्षी जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. पण आता ॲतेलीएतील शिक्षण संपता संपता त्याचे उद्‌गार आठवले की पोटात गोळा उठत होता.
त्यांनि वरून कितीही आव आणला तरी त्यांची बोहेमिअन जीवनशैली वरवरचीच होती. आतून ते सगळे खरे तर सर्वसामान्यांसारखे डरपोक होते. दुपारी ओग्युस्तिनामध्ये टवाळक्या करीत भोजन, संध्याकाळी नुव्हेलीत बीअरपान आणि नंतर ल एलीसमध्ये रात्रभर हैदोस हा दिनक्रम आयुष्यभर चालणे शक्य नव्हते. कॉर्मेनच्या वर्गात डायना किंवा पहुडलेली व्हीनस कॅनव्हासवर कितीही घोटून घोटून रंगवली तरी सॅलूनमध्ये पेंटिंग लागेल याचा काही भरवसा नव्हता. जरी एखादे वेळेस लागले तरीही त्याने दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत काही दूर होणार नव्हती.
ॲतेलीएच्या वाटेवर एका बिस्ट्रोमध्ये बसून हेन्रीचा सकाळचा नाश्ता शांतपणे चालला होता. बाहेर रू फोंतेनमधला दिवस सुरू होत होता. ढकलगाडीवरच्या विक्रेत्यांचा ओरडा, घोडागाडी हाकताना गाडीवानांनी वाटेतल्या लोकांना घातलेल्या हाका, बायकांची कोळीणींशी चाललेली घासाघीस, जुन्या कपड्यांच्या व्यापाऱ्यांच्या आरोळ्या, चिनी दुरुस्ती कामगारांचा घंटानाद, खिडक्यांना काचेचे तावदान बसवून देणाऱ्याची तारस्वरातली लकेर या सर्वांमुळे वातावरणात एक जिवंतपणा आला होता. धारवाला एक पाय रस्त्याच्या कडेच्या गटारात तर एक फुटपाथवर असे उभे राहून सावकाश धार लावत उभा होता. मुले बाजूला उभे राहून उडणाऱ्या ठिणग्या बघण्यात गुंग होती. हेन्रीला रेम्ब्रांदचे एखादे इचिंगच जिवंत झाल्यासारखे वाटले.
त्या वर्षी हिवाळ्यात हेन्री आणि व्हिन्सेंटची चांगली गट्टी जमली. हेन्रीने व्हिन्सेंट ॲबसिंथचा पेला पुढ्यात घेऊन बसलाय असे एक पोर्ट्रेट केले.
(हे पेस्टलमधील पोर्ट्रेट सध्या ॲमस्टरडॅम म्युझियममध्ये आहे)
या काळात हेन्रीने व्हिन्सेंटला अगदी जवळून पाहिले. व्हिन्सेंटला आत्मनाशाविषयी सुप्त आकर्षण होते. त्याची राजकीय मते तो मोठ्या आग्रहाने मांडे. त्याच्या अंतर्मनात अखंड खळबळ चालू असे. त्यात गूढवाद, सतत मद्यपान, जडलेला उपदंशाचा विकार अशा गोष्टींनी भर पडे. त्याच्यात असलेला असामान्य प्रतिभावंत त्या वेळी जागृत होत होता. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे की काय प्रचंड मानसिक उद्रेक होई आणि त्यामुळे की काय एरवी सौम्य असलेल्या त्याच्या वागणुकीत विलक्षण बदल घडून येई. एखाद्या धबधब्यासारखे हास्य, राक्षसी उत्साह व अस्वस्थ करणारी शांतता, काही सांगता येत नसे.
त्या दोघांच्या स्वभावात खूप फरक होता. त्यामुळे साध्या साध्या गोष्टींवरून त्यांचे खटके उडत. वादविवाद करता करता क्षणात हमरीतुमरीवर येत. पण अशा भांडणातून मैत्री पक्की होत गेली.
‘‘आपण एक सहकारी वसाहत वसवू या. सर्व कलाकारांना एकत्र घेऊन.’’ एकदा उत्साहाच्या भरात व्हिन्सेंट म्हणाला.
‘‘असा वेडपटपणा तुला सुचतो तरी कसा?’’ हेन्री जमिनीवर होता, ‘‘अरे दोन आर्टिस्ट कधी स्वप्नात तरी एकत्र राहू शकतील का? कधी राहिलेच तर दुसऱ्या दिवशी पॅलेट नाइफने एकमेकांचे गळे कापतील.’’
एके दिवशी व्हिन्सेंटने जाहीर केले, ‘‘आज मला प्रकाशाचा किरण दिसला. मी पॉइंटॅलिस्ट व्हायचं ठरवलंय.’’
‘‘पॉइंटॅलिस्ट?’’ हेन्री म्हणाला, ‘‘कालपर्यंत तू इंप्रेशनिस्ट होतास. रेन्वा आणि मॉने तुझे आदर्श होते. विसरलास एवढ्यात.’’
‘‘काल रात्री बिस्ट्रोमध्ये जेवताना जॉर्ज सुरा भेटला. जेवता जेवता त्याने मला त्याचं पॉइंटॅलिझमच शास्त्र समजावून सांगितलं. याने चित्रकलेतले आजचे बहुतेक प्रश्न सुटतील. काय अफलातून कल्पना आहे म्हणून सांगू. थोडंसं प्रकाशाचे वक्रीभवन, पृथक्करण, प्रिन्सिपल ऑफ कलर डॉमिनन्स, विविध तरंग लांबीच्या प्रकाशकिरणांचा नेत्रपटलावर होणारा परिणाम, यांचा थोडाफार अभ्यास केला की काम झालं.’’
‘‘अभ्यास तसा चार दिवसांत संपेल. नंतर ते बारीक बारीक ठिपके काढत एक कॅनव्हास पुरा व्हायला एक वर्षं लागेल त्याचं काय. हे असलं किचकट काम जमेल तुला. पॉइंटॅलिझमने प्रश्न सुटलाय तो एकट्या सुराचा. बाकी कोणीही त्या वाटेला फिरकलेला नाही.’’
कधीतरी राजकीय मतांवरून खडाजंगी उडे.
‘‘प्रत्येक जागृत व्यक्तिला राजकीय मत असलंच पाहिजे. आणि जर तो कलाकार असेल तर त्याने आपलं मत आपल्या कलेतून ठामपणे जगापुढे मांडलं पाहिजे.’’ व्हिन्सेंट.
‘‘म्हणजे तुझ्यासारख्या आदर्शवाद्याने आपली सगळी चित्रं गुलाबी, झुळझुळीत रंगातच रंगवायला हवीत. तुझ्या त्या मिलेटसारखी. तू त्याच्या पेंटिंगची नक्कल करतोस तितपत ठीक आहे. पण नशीब तुझ्या स्वतःच्या चित्रांवर त्याचा प्रभाव मुळीच नाहीय. उदाहरणार्थ, तुझे पोटॅटो इटर्स घे. अगदी अस्सल आहेत. त्या शेतकऱ्यांचा गलिच्छपणा, भूक, दारिद्र्य, दुःख, दैन्य सर्व काही त्या कॅनव्हासच्या प्रत्येक इंचाइंचातून जाणवतोय. वर टांगलेल्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात त्यांचे किडलेले दात दिसतायत. जवळ गेलं तर त्यांच्या श्वासाची दुर्गंधी येईल अशी भीती वाटते.’’
‘‘शेतकऱ्यांच्या वाटेला दुःख आणि दारिद्र्य नेहमीचंच. पूर्वीच्या काळी तर फारच असायचं. राजे लोक तेव्हा त्यांचे उभे पीक जबरदस्तीने कापून न्यायचे.’’
‘‘कुठे वाचलंस हे?’’
‘‘कुठे कुठे वाचलं त्याचे पुरावे काही आता आठवत नाहीयेत. पण ही सत्य परिस्थिती आहे.’’
‘‘मुळीच नाही. या सगळ्या थापा आहेत. नॉम दे दियू! पुरावे शोधायला विद्यापीठातील वाचनालये फिरायची गरज नाही. एकदा लुव्हरला जा आणि ब्रुघेल, हाल्से, तिनिअर्स यांच्या पेंटिंगमधले शेतकरी कसे दिसतात ते नीट बघ आणि मला येऊन सांग. उपाशी शेतकरी शोधून सापडणार नाही तुला. सगळेजण कसे गुबगुबीत दिसतात. कारण त्या काळी बहुतेक शेतकरी खाऊन-पिऊन सुखी असायचे. दिवसभराची कष्टाची कामं आटोपली की सगळेजण विसाव्याला संध्याकाळी एखाद्या मोठ्या झाडाखाली एकत्र जमत आणि नाचत-गात जेवणावर आडवा हात मारत. बसल्या बैठकीला बॅरलभर वाईन नाहीतर साइडर संपे. त्यांच्या बायका नीट बघ, कशा माजलेल्या कोंबडीसारख्या गलेलठ्ठ दिसतात त्या. त्यांच्या ब्लाऊजमधून खाली लोंबणाऱ्या स्तनांकडे पाहून त्यांनी एक वेळ तरी उपास काढलाय यावर कोणाचा विश्वास बसेल.’’
‘‘सगळे खाऊन-पिऊन सुखी होते तर शेतकऱ्यांनी बंड का केलं.’’
‘‘शेतकऱ्यांनी बंड केलं ही एक मोठी थाप आहे. उलट शेतकरी बंडाच्या विरोधात होते. जिवात जीव असेतो त्यांनी बंडाला विरोधच केला. त्यांच्या आजच्या दुर्दशेला तुझे प्रजासत्ताकवादी क्रांतिकारकच कारणीभूत आहेत. सक्तीच्या लष्करभरतीचा शोध त्यांनीच लावला. अरे राजा हा प्रजेचा पालक असतो. शेतकऱ्याला त्याच्या जमिनीपासून दूर करण्याची त्याची अशी छाती झाली नसती.’’ मोंमार्त्रमध्ये राजेशाहीची बाजू घेऊन बोलणारा हेन्री एकटाच असावा. त्यामुळे या विषयाची दुसरी बाजू कोणी ऐकलीही नव्हती.
‘‘असले फुकट वाद घालण्यापेक्षा चल नुव्हेलीत जाऊ या. आज मला पत्ते खेळण्याची सुरसुरी आलीय. आज सकाळपासून नशीब जोरदार असावं असं वाटतंय.’’
पॅरीसला आल्यावर व्हिन्सेंटच्या जुन्या अस्वस्थपणाने पुन्हा डोके वर काढले. ॲतेलीएमधल्या तोचतोचपणाला तो लवकरच कंटाळला. कधीतरी दांडी मारून तो इझल घेऊन मोंमार्त्रच्या एखाद्या चौकात नाहीतर चक्क घरी बसे. एखाद्या चिखलाने बरबटलेल्या बुटाचे नाहीतर जुन्या पुस्तकाचे असले काहीतरी वस्तुचित्र काढी. एकदा अचानक दोन-तीन दिवस काही न सांगता तो गायब झाला. परतला तेव्हा त्याचा अवतार अगदी बघण्यासारखा झालेला होता. नखशिखांत भिजलेला, केस विस्कटलेले, पाय चिखलाने बरबटलेले. हेन्रीने विचारले तर म्हणाला,
 ‘‘रान पाहायला गेलो होतो. शहरी हवेत मला अगदी घुसमटल्यासारखं होतं.’’
‘‘रानात हिंडायला ठीक आहे पण झोपलास कुठे? आणि पावसात काय केलंस.’’
‘‘झोपायला मिळते शेतातली एखादी झोपडी नाहीतर आहे आपलं सीन नदीकाठचं एखादं बाकडं. आणि पावसाचं काय घेऊन बसलायस. आम्ही डच लोक पावसाला मुळीच घाबरत नाही हे तुला ठाऊक नाही वाटतं.’’
त्याने लाजत लाजत काही कॅनव्हास हेन्रीच्या पुढ्यात ठेवले. काम विलक्षण झपाट्यात केलेले दिसत होते. एका कॅनव्हासवर फार तर तीन-चार तास खर्च केले असतील. पिस्सारो, दलाक्रुवा, सुरा यांच्या शैलीची कशीतरी नक्कल केली होती. नक्कल म्हणावी तर बरोबर उतरली नव्हती. पण नक्कल करतानासुद्धा त्यात व्हिन्सेंटचा स्वतःचा ठसा होता. हेन्रीच्या मनात आलं की ह्या भणंग वाटणाऱ्या डच माणसात काही वेगळंच पाणी दिसतंय. हा आपला मार्ग शोधण्यात यशस्वी झाला तर चित्रकलेच्या इतिहासात याची कायमची नोंद घेतली जाईल.
एकदा अचानक व्हिन्सेंट आपला पोर्टफोलिओे काखोटीला मारून हेन्रीच्या स्टुडिओत येऊन दाखल झाला. गळ्यात एक चपटी बाटली अडकवलेली होती. त्यातल्या रमचा एक घुटका घेत तो म्हणाला, ‘‘मला ॲनाटॉमी शिकायचीय. ॲनाटॉमी चांगली आल्याशिवाय आर्टिस्ट बनणं कठीण आहे.’’
मग बराच वेळ स्टर्नोक्लेईडो मॅसेटॉईड, लॅटिसिमस डॉर्सी वगैरे लॅटिन शब्दांच्या जंजाळात गुरफटल्यावर वैतागून त्याने हातातील चारकोल स्टिक कोपऱ्यात भिरकावून दिली.
‘‘माझ्या टाळक्यात हे काहीएक शिरत नाही. नवीन काही शिकण्याच्या दृष्टीने माझं वय झालंय हेच खरं. त्यापेक्षा तू माझ्याकडे चल. मी तुला स्टॉकव्हिश पाजतो. कधी चाखलीयस?’’
तेथून ते दोघे व्हॅन गॉग भावंडांच्या खोलीवर गेले. तेथे मोठा भाऊ तेओ व्हॅन गॉग होता. त्याच्याबरोबर इंडिपेंडन्सचा एक बोलघेवडा मित्र आला होता. दोघा भावांनी मिळून एक खास डच खाद्यप्रकार बनवला. बरोबर प्यायला स्टॉकव्हिश ह्या डच दारूची बाटली होती. मग गप्पागोष्टी करीत जेवायला सुरुवात झाली. तेओेने आपल्या मित्राची ओळख करून दिली. तेओे त्याच्या गॅलेरीतून त्याची चित्रे खपवण्याचा प्रयत्न करणार होता. लोकप्रिय नावांबरोबर मधेच एखादा या नव्या चित्रकाराचा कॅनव्हास.
‘‘तुझा प्रयत्न स्तुत्य आहे. पण सांभाळून. मालकाच्या लक्षात आलं तर याचे सगळे कॅनव्हास तो शोधून फेकून देईल. नाही तर तुला तरी हाकलून देईल.’’
मग स्टॉकव्हिशची बाटली संपेपर्यंत जोरजोरात चर्चा झाली. टीकाकार, कलासमीक्षक, अकादमीचे सभासद, कलावस्तूंचे विक्रेते, आर्ट गॅलरींचे मालक यांपैकी कोणालाही खऱ्या कलेची जाण नाहीय. कदर करणे तर दूरच, उलट सर्वांनी मिळून नव कलाकारांविरुद्ध कट केलाय. सर्वांनी एकत्र येऊन हा कट हाणून पाडण्याच्या निश्चयाने त्या दिवसाच्या चर्चेची सांगता झाली.

(पोर्टेट ऑफ व्हिन्सेंट व्हॅन गॉग – तुलूझ लोत्रेक – पेस्टल, कार्डबोर्ड – ५४x४५ सेमी - १८८७,
व्हॅन गॉग म्युझियम, अमस्टरडॅम)



(हार्वेस्टर्स मील – पीटर ब्रुघेल द यंगर, ऑईल ऑन पॅनेल, ७३x१०४ सेमी, १६६३,
मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स, न्यु यॉर्क)

No comments:

Post a Comment