Thursday, October 25, 2018

मुलँ रूज - ७५

हेन्रीला कॅफे ल रिशच्या दरवाजात पाहताच जेनने ओरडून त्याला हाक मारली. जेनच्या शेजारी मिरीयम बसली होती.  हेन्रीने मिरीयमकडे पाहिले. या वेळीसुद्धा तिने काळी वस्त्रे परिधान केली होती. हेन्रीने तिला वाकून अभिवादन केले. जेनबरोबर तिचा नवा प्रियकर जॉर्ज होता. जेनला लेखक, कवी, चित्रकार वगैरे कलावंतांबद्दल मनापासून आत्मीयता वाटत असे. त्यामुळे तिच्या मित्रपरिवारात अशी मंडळी भरपूर असत. ती बऱ्यापैकी पैसे कमवीत असल्याने ती गरजू कलावंतांना तिच्या परीने काही ना काही मदत करीत असे. जॉर्ज हा एक होतकरू आणि तरुण लेखक होता. त्यातच तो निष्कांचनही असल्यामुळे जेनची कणव आणि त्यापोटी बसलेले प्रेम याचे गिऱ्हाईक झाला होता.
‘‘जॉर्ज एक कादंबरी लिहितोय. जॉर्ज, या दोघांना सांग तुझी कथाकल्पना.’’ जेन उत्साहाने म्हणाली. ‘‘त्याचं काय आहे. कथानक मत्सरावर आधारलेलं आहे. दोस्तोयवस्कीच्या शैलीत.’’ असे म्हणून जॉर्जऐवजी जेनच मध्यवर्ती कल्पना सांगू लागली. सांगण्याच्या भरात तिने उलटसुलट इतक्या गोष्टींचे पाल्हाळ लावले की त्यातून कथावस्तू नेमकी काय आहे याचा बोध होणे कठीणच होते. त्यात तिचे स्वतःचे मत, संपादकांचा सल्ला, टीकाकारांची टिपण्णी अशा अनेक गोष्टींची सरमिळ करून एवढे लांबण लावले की आपण बोलावलेल्या पाहुण्यांना ती विसरून गेली तेव्हा मिरीयमने हळूच हेन्रीला विचारले,
‘‘तुम्ही सध्या कोणते नवीन पोस्टर करताय?’’
‘‘जेनचे करतोय.’’
‘‘पोर्ट्रेट आणि पोस्टर यात काय कठीण असतं?’’ असे विचारून तिने संभाषणाचा धागा पकडला.
‘‘दोन्ही प्रकार मूलतः भिन्न आहेत. त्यामुळे तशी तुलना करणं अप्रस्तुत ठरेल. पण एक लक्षात ठेवा की, पोस्टर वरवर पाहायला सोपे वाटले तरी तो सोपेपणा त्या पोस्टरमध्ये उतरेपर्यंत ते खूपच कठीण वाटते. पोस्टरनिर्मितीची एकूण प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते.’’
‘‘तुमचे सर्वात आवडते पोस्टर कोणते?’’
‘‘अर्थात माझे पहिले पोस्टर. मुलँ रूज.’’
‘‘मला आठवतंय. त्यात एक टांग वर करून कॅनकॅन नाचणारी एक मुलगी दाखवली होती. काय गाजलं होतं त्या वेळी.’’
‘‘बऱ्याच जणांना ते अश्लील वाटलं होतं.’’
‘‘पण त्या विरोधामुळेच तर तुम्हाला प्रसिद्धी मिळाली.’’
‘‘तो नंतरचा भाग झाला. पण त्या वेळी मला त्याचा खूप त्रास झाला.’’
‘‘मुलँ रूजसाठी किती दिवस लागले होते?’’
‘‘सात-आठ महिने, पण त्या वेळी लिथोग्राफीमधला ओ का ठो मला मला माहीत नव्हता.’’
‘‘लिथोग्राफी म्हणजे काय?’’
तो किलकिलत्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा मूक भाव पाहून ती पुढे म्हणाली, ‘‘मला खरंच जाणून घ्यायचंय.’’
‘‘ठीक आहे. माझी अगदी खात्री आहे की तुम्हाला अगदी मनापासून या विषयात रस आहे. लिथोग्राफीच नव्हे तर एट्‌रूस्कन पॉटरीमध्ये सुद्धा तुम्हाला तेवढाच रस असेल. मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटतंय. आयुष्यभर पुरतील एवढे विषय तुमच्याजवळ आहेत.’’ हेन्री किंचित उपहासाने म्हणाला.
‘‘तुमचा विश्वास बसत नाही त्याला मी काय करू? मला या सगळ्या विषयांत खरंच रस असतो. इतिहास, समाजशास्त्र, साहित्य, कला आपल्याभोवती घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन झाले पाहिजे अशी उत्सुकता मला असते.’’ हेन्रीच्या उपहासाने ती थोडी चिडून म्हणाली. हेन्रीने लिथोग्राफीची तपशीलवार माहिती सांगायला सुरुवात केल्यावर तिची नाराजी मावळली. एक सुंदर मुलगी आपले बोलणे मन लावून ऐकतेय हे पाहून हेन्री मोहरून गेला. तिचा निरोप घेण्याच्या निमित्ताने हेन्रीने तिला तिच्या घरापर्यंत सोबत केली. निरोप घेताना दुसऱ्या दिवशी भेटण्याचे तिने आपण होऊन सुचविले.
मिरीयमने त्याच्यावर जादू केली. तिची वाट पाहण्यात, तिला भेटण्यात, गप्पागोष्टी करीत तिच्या सहवासात जास्तीतजास्त वेळ घालवण्यात त्याला अतीव समाधान मिळत असे. त्यामुळे त्याच्या मद्यपानाचे प्रमाणही कमी झाले. त्याच्या चेहऱ्यावर थोडा तजेला दिसू लागला. मिरीयमला सगळ्या विषयात गती होती. बऱ्याच वेळा दोघांची मते अगदी विरुद्ध टोकाची असत, पण त्याने उलट संभाषणातील रंगत वाढत असे.
एकदा कर्नल व्हेंदोमविषयी बोलता बोलता हेन्री म्हणाला, ‘‘स्वतःचा पुतळा स्वतःच्या हयातीत उभारण्याएवढा निर्लज्ज उद्धटपणा दुसरा नसेल. पण लोकांना असेच लोक जास्त आवडतात. लोकशाही सरकार ही कल्पना म्हणून कितीही योग्य असली तरी जनतेचे खरं प्रेम हुकूमशहांवर जास्त असतं. हुकूमशहा जेवढा वाईट तेवढा अधिक लाडका.’’
‘‘तुम्हाला पटत नाहीसं दिसतंय. हे बघा. नेपोलीयनचेच उदाहरण घ्या. त्याच्या कारकिर्दीत फ्रान्सचा सत्यानाश झाला. त्याच्या पूर्वीच्या सगळ्या राजवटीत मिळून जेवढे लोक मारले गेले नसतील तेवढे याच्या एकट्याच्या राजवटीत मारले गेले. पण बघा. अवघं पॅरीस शहर जणू त्याचं स्मारक झालंय. आता या कर्नल व्हेंदोमचं ताजं उदाहरण आपल्यासमोर आहे. मी एक राजसत्तावादी आहे त्यामुळे असेल कदाचित मला तो मुळीच आवडत नाही. त्याची अगदी शिसारी येते.’’
‘‘मस्य हेन्री, वेश्यांच्या आणि समाजातील तळागाळाच्या लोकांच्या जीवनाकडे अत्यंत सहानुभूतीने पाहणारा, आपल्या कलेतून त्यांच्या दुःखाला वाचा फोडणारा चित्रकार अशी प्रसिद्धी असलेले तुम्ही आणि राजसत्तावादी.’’
‘‘त्यात आश्चर्य कसलं. सरळच आहे. उद्या एखाद्या कार्डिनलला तुम्ही पोपच्या बाजूचे आहात का म्हणून विचाराल?’’
‘‘आता तुम्ही त्या थेरड्या राजांची बाजू घेणार आहात की काय?’’
‘‘हे बघा, ते थेरडे नव्हते. पंधरावा लुई गादीवर आला तेव्हा अवघ्या पाच वर्षांचा होता.’’
‘‘थेरडे नसतील एकवेळ. पण नादान होते त्याचं काय.’’
‘‘ते नादानसुद्धा नव्हते आणि जरी त्यांनी नादानपणा केला असला तर तो नादानपणा एखाद्या कारकून, शेतकरी, कामगार, पाद्री वगैरे सामान्य लोक करतात त्यापेक्षा काही जास्त नव्हता. चौदावा लुई तर माणूस म्हणून अगदी सज्जन होता हे त्याचे विरोधकसुद्धा मान्य करतात.’’
‘‘ते खरं असलं तरी राजपरिवारातील इतरांचे काय? ते जसे काही सद्‌गुणांचे पुतळेच होते नाही. त्यांच्याइतकी उद्दाम आणि नालायक माणसं शोधून मिळणार नाहीत.’’
‘‘उद्दाम होते ते त्यांचे नोकरचाकर. उलट उमराव लोकांच्या हृदयात आपल्या रयतेविषयी ममत्वच असे. एखाददुसरा अपवाद असेल, नाही असं नाही. पण हे नोकर मात्र एकजात उद्धट आणि हलकट असत. आपल्या मालकासमोर अगदी मान खाली घालून उभे राहतात. पण संधी मिळताच रयतेला मालकाच्या नावाने झोडपून काढायला कमी करत नाहीत. आमच्या म्हाताऱ्या जोसेफएवढा मूर्ख व उद्दाम माणूस दुसरा शोधून सापडणार नाही.’’
‘‘तुमच्या पेंटिंगवरून तुमची मतं अशी असतील असं वाटत नाही. पीएर टँग्वीशी असलेली तुमची मैत्री आणि तुमचे चित्रविषय यावरून मला वाटायचं की तुम्ही समाजवाद्यांच्या बाजूचे आहात.’’
‘‘तुम्ही म्हणताय ते एका अर्थी खरंय. वैचारीक दृष्ट्या समाजवादी मला जवळचे वाटतात. येणारा काळ त्यांचाच असेल. जे आतून भावतं तेच कलेतून प्रकट व्हायला हवं. नाही तर ती स्वतःशीच केलेली प्रतारणा ठरेल. आजकाल उमराववर्गाला काळ्या रंगात रंगवायची फॅशन झालीय. मला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की उमराव आज दाखवले जातात तेवढे काही काळेकुट्ट नव्हते. चला, जास्त बोलत राहिलो तर नाटकाला उशीर होईल.’’
त्या दिवशी त्यांनी मोलीयरचे नाटक पाहिले. रात्री जेवण झाल्यावर हेन्री मिरीयमबरोबर तिच्या घरापर्यंत गप्पा मारत गेला. पाऊस पडल्यामुळे थंडी थोडी जास्तच होती. तिने त्याला घरात बोलाविले. तो शेकोटीसमोरच्या कोचावर बसला. तिने शेकोटीत लाकडे सारली. काही वेळ दोघेही मूकपणे शेकोटीतील विस्तवाकडे पाहत होते. बाहेरील पावसाची रिपरिप व शेकोटीतील लाकडांची तडतड याशिवाय दुसरा कोणताही आवाज ऐकू येत नव्हता.
‘‘हेन्री. त्या ड्रेफ्युज प्रकरणाची तुम्हाला कितपत माहिती आहे?’’
हेन्रीने तिच्याकडे पाहिले. विस्तवाच्या नारंगी प्रकाशाने तिचा चेहरा उजळला होता.
‘‘ड्रेफ्युज ॲल्सेशियन आहे. माझा मित्र मॉरीस तुम्हाला ठाऊक आहे? त्याच्याच गावचा. मोठेपणी तो सैन्यात गेला. आपल्या हुशारीच्या जोरावर कॅप्टनच्या हुद्द्यापर्यंत वर चढला. चार वर्षांपूर्वी एकाएकी त्याला राजद्रोहाच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तडकाफडकी खटला भरून आरोप शाबीत झाल्याचे जाहीर करण्यात आले व त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली. न केलेल्या गुन्ह्यासाठी सजा भोगत तो सध्या डेव्हिल्स आयलंडवर खितपत पडलाय.’’
‘‘कशावरून तुम्ही म्हणता की तो निर्दोष आहे म्हणून. सगळे जग म्हणते की तो दोषी आहे.’’
‘‘तेवढे एकच कारण पुरे आहे त्याचे निर्दोषीपण सिद्ध करायला.’’ हेन्री उपहासाने हसत म्हणाला, ‘‘दुसरेही काही महत्वाचे मुद्दे आहेत.’’
मग त्याने ड्रेफ्युजवरचा आरोप त्याने लिहिलेल्या ज्या पत्रावरून सिद्ध केला गेला त्या पत्राच्या हस्ताक्षराविषयी असलेले तज्ज्ञांचे मतभेद, गुप्तपणे झटपट निकालात काढलेल्या खटल्याची पद्धत, खोटी कागदपत्रे, खोट्या साक्षी, ड्रेफ्युजचे ज्यू असणे वगैरे सगळ्या गोष्टी तिला सविस्तरपणे सांगितल्या.
‘‘पण आपल्या सुदैवाने फ्रान्समध्ये प्रामाणिकपणा, न्याय व सत्याची चाड असलेले थोडे लोक अजून शिल्लक आहेत. त्यांनी धैर्याने हे प्रकरण उकरून काढून धसाला नेण्याचे ठरवलंय. तसं काम सोपं नाहीय. ड्रेफ्युज ज्यू असल्याने तुमची ती सर्वसामान्य जनता त्याच्यावर देशद्रोहीपणाचा शिक्का मारून केव्हाच मोकळी झाली आहे. डावे, उजवे, समाजवादी, प्रजासत्ताकवादी, ज्यूद्वेष्टे, मानवतावादी, चर्च वगैरे सर्व गटांनी या प्रकरणात आपापल्या राजकारणाच्या सोयीनुसार भूमिका न घेता केवळ सत्याची बाजू घेण्याचं ठरवलं तरच ड्रेफ्युजला न्याय मिळणे शक्य होईल.’’
‘‘फॉर ड्रेफ्युज.’’ असे म्हणून त्याने हातातील पेला उंचावला व शेवटचा घोट घेत रिकामा केला. रविवारचा सुंदर दिवस संपल्याची हुरहुर लागली होती. परत भेटण्याचं ठरवून त्याने मोठ्या जड अंतःकरणाने निरोप घेतला.

No comments:

Post a Comment