Tuesday, February 9, 2016

शेवटचं पत्र

माझे मित्र सतीश काळसेकर यांना लिहीलेलं पत्र.
8 फेब्रुवारी 2016. मुक्काम ... लॉस एंजेलिस.
प्रिय मित्रा,

येथे आल्यावरची आजची पहिली पायपीट. कौशिक बरोबर नसल्यामुळे आमच्या आम्हीच केलेली. तू पत्र लिहायला बजावून सांगितलं असल्याने सर्वप्स्ट ऑफिस शोधणं आवश्यक होतं. आयटीच्या क्षेत्रातील नव्या तंत्र युगाच्या अघाडीवर असलेल्या कॅलिफोर्नियात पोस्ट ऑफिस असेल न्स्की नाही याची शंका होती. म्हणून गुगल मॅपवर पोस्ट ऑफिस कुठे आहे ते नीट बघून घेतले आणि बाहेर पडलो. आश्चर्य म्हणजे आसपास दोन तीन पोस्ट ऑफिस होती त्यामुळे फारशी पायपीट करावी लागणार नव्हती. रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. मोबाईल, गुगल मॅप, ट्रान्स्लेटर वगैरे सोई नव्हत्या तेव्हा लोक कसे काय नव्या शहरात फिरत असतील असा विचार आला. हु एन सॅंग, अल बैरूनी वगैरे लोकांना कोणी रस्ता दाखवला असेल. त्यांनी कोणत्या भाषेच संवाद साधला असेल.
लंडनमध्ये पोस्ट ऑफिस कौशिकच्या घरासमोरच होतं. पण त्या पोस्ट ऑफिसच्या अर्ध्या जागेत किराणा मालाचं दुकान थाटलेलं होतं. एरोग्रॅम मागितला तर तो बंद होऊन कित्येक वर्ष लोटली तुम्ही कोणत्या गावचे, तुम्हाला अजून माहित नाही असे भाव त्या काऊंटर पलीकडच्या चेहे-यावर दिसले होते त्याची आठवण झाली. इथे एरोग्रॅम हा शब्द तरी त्यांनी ऐकला असेल का या शंकेची पाल मनात चुकचुकत होती. पण पोस्टमास्तर माझ्या सारखाच साठी उलटलेला. त्याने एरोग्रॅम बंद झाल्याचं सांगून त्याऐवडी योग्य किंमतीचं तिकीट चिकटवून एक पाकिटच माझ्या हातात दिलं. फक्त एक डॉलर तेहतीस सेंट एवढी रक्कम क्रेडिट कार्ड न वापरता प्रत्यक्ष रोखीने कशी चुकती करायची ते हा मोठा प्रश्न होता. पण सुदैवाने नाणी पाडण्याची हु एन सँगच्या काळापासून चालू असलेली पद्धत अजून तरी बंद झालेली नसल्याने सुटे पैसे देत घेत व्यवहार रोखीने पूर्ण झाल्याचं समाधना दोघांच्याही चेहे-यावर होते. तार बंद व्हायला शंभर वर्षं लागली, एरोग्रॅमला पन्नास वर्ष. पोस्ट कार्ड फक्त आपल्या देशातच उरलं असावं. स्टॅंप बंद व्हायच्या मार्गावर असावेत. उरलेच तर फक्त संग्राहकांपुरते उरतील.

पोस्ट ऑफिसवरून घरी जाताना वाटेत Dave’s Old Book Stall हे जुन्या व दुर्मिळ पुस्तकांचं गुगल मॅपवर दिसलेलं दुकान सापडलं. किंडल आणि ई-बुक्सच्या जमान्यात पुस्तकांचं दुकान, ते सुद्धा जुन्या व दुर्मिळ. पुस्तकांच्या दुकानांच्या यादीत Borders चं नाव अजूनही असलं तरी जसं मृत व्यक्तिचा उल्लेख करताना नावामागे कै. किंवा Late अशी उपाधी लावतात तसं Borders च्या नावापुढे Defunct असं बिरूद लावलं होतं.  Barnes & Nobles अजून तगून आहेत. तसंच हेही असावं. दुकानाच्या दरवाजाबाहेरच एक डॉलर किंमतीच्या पुस्तकांचा स्टँड मांडलेला होता. त्यातील Fifty Shades of Grey & Memoires of a Geisha ही दोन पुस्तकं उचलली. बाकी डॅन ब्राऊन, सिडनी शेल्डन, मिल्स अँड बून वगैरे बरीच होती. दुकान फारसं मोठं नव्हतं. सगळी पुस्तकं विषयवार लेखकांच्या नावानीशी शेल्फवर नीट लावून ठेवलेली होती. कौशिकसाठी Story of Painting & Preble’s Art forms  ही दोन पुस्तकं घेतली. व्हिज्युअल आर्ट विषयी त्याची जाणिव अधिक विकसित व्हावी म्हणून. व्हिवीयनसाठी CHINA History in Art घेतलं. अमेरीकन आर्टच्या इतिहासातून अमेरीकेचा इतिहास अधिक चांगला समजायला कशी मदत होते ते माधव आचवलांनी जसं उलगडून दाखवलं आहे तसं या पुस्तकातून तिला तिने न पाहिलेल्या तिच्या मायदेशाची ओळख होईल अशी आशा करूया.

आता या क्षणी अहमदाबादचे गुजराती फुलके अबोटाबादच्या पाकिस्तानी लोणच्याला लावून खात आहे. संध्याकाळचे शीतल वारे वाहत आहेत. स्वच्छ उन पडलं आहे. लॉस एंजेलीस सुंदर शहर आहे असं जे ऐकत होतं तसंच ते आहे. कदाचित त्यामुळे कौशिकने इथे स्थायिक व्हायचं ठरवलं असावं. सुंदर, सुखद हवामान, उत्तम पायाभूत सोई, शिवाय सुरक्षित जीवन. नैरोबीची आठवण झाली. सुरक्षा सोडली तर बाकी सगळं तसंच होतं. थोडं तरी सुरक्षित वाटलं असतं तर कदाचित तेथून परत आलोच नसतो. वर्षातील बारा महिने सुंदर हवामान, घरा पासून पाच मिनीटांवर सार्वजनीक वाचनालय, थोडं पुढे गेलं की बार्नस अँड नोबेल, डेव्हज ओल्ड बुक स्टॉल, पंधरा मिनीटांवर  निळाशार समुद्र, सुर्यास्ताला साक्षी ठेवून घेतलेले सांग्रियाचे घुटके जगायला आणखी काय हवं असतं.

पत्र लिहायला लेखणी हातात घेतली पण लॅपटॉपवर लिहायची एवढी सवय झालीय की कागद पेनाने नीट लिहीताच येईना. पण लेखी पत्र लिहून पोस्टात टाकण्याची अट असल्यामुळे पहिल्यांदा फेसबुकवर टाकून नंतर कागदावर कॉपी-पेस्ट करावं लागलं. एकूण पत्र लिहून पोस्टात टाकण्याची अट व्याप न ठरता माझे डोळे उघडणारी झाली.

नव्यायुगातील ई-मेल, ई-बुक्स, गुगल, किंडल वगैरे तंत्रज्ञानचा जेथे आरंभ झाला त्या कॅलिफोर्नियात पुस्तकांची दुकानं, वाचनालय आणि पोस्ट ऑफिस यांची संस्कृती जोपर्यंत टिकून आहे तो पर्यंत तुझ्यासारख्या पुस्तकं, मित्र आणि एकूण जगण्यावर नितांत प्रेम करणा-या मित्राला स्वत:च्या हाताने कागदावर लिहिलेलं पत्र शेवटचं ठरणार नाही याची खात्री वाटते.

प्रकृतीची काळजी घे, विद्या वैनींना नमस्कार,

जय

http://www.davesoldebookshop.com/