Friday, October 19, 2018

मुलँ रूज - ६०

लॉजवर परतल्यावर हेन्रीला मारीशिवाय चैन पडेनासे झाले. रात्र रात्र तिचा सुकुमार देह त्याच्या नजरेसमोरून हलत नसे. शेवटी एके दिवशी तो तिचा पत्ता शोधत सॅबॅस्टोपलच्या एका गुत्त्याच्या समोर येऊन उभा राहिला. हेन्रीशी अत्यंत उद्धटपणे वागणारी मारी तिथे बेबेरसमोर अगदी गरीब गायीसारखी बसली होती. तो तिला कशावरून तरी रागे भरत होता. बोलता बोलता त्याने तिच्यावर हात उगारला. तेवढ्यात हेन्रीचा गाडीवान तिला हेन्रीचा निरोप सांगायला आला आणि थोडक्यात ती बचावली.
‘‘ओह! तुम्ही आलात होय.’’ मोठ्या फणकाऱ्यात ती म्हणाली, ‘‘आता काय पायजे तुम्हाला?’’
‘‘मारी! माझं चुकलं. मी तुला परत बोलवायला आलोय.’’ नशिबाने हेन्री अंधारात उभा असल्याने त्याचा पडलेला चेहरा तिला दिसण्याची शक्यता नव्हती. त्यातल्या त्यात तेवढेच समाधान.
‘‘मला गरज नाही आता. माझं ठीक चाललंय इकडे. लई श्रीमंत लोक माझ्या पाठी लागले आहेत. ते माझ्याशी प्रेमाने वागतात. तुमच्यासारखं अंगावर ओरडत नाहीत.’’
‘‘मी तुला वचन देतो. मी परत तुझ्या अंगावर ओरडणार नाही.’’
‘‘आणखी एक गोष्ट. आता मला पन्नास नाही शंभर पाहिजेत. बघा. परवडत असेल तर येते.’’ ती जिंकली होती आणि तिच्या विजयाची खंडणी वसूल करीत होती.
तो गाडीत खाली मान घालून हातातल्या काठीवर भार देऊन बसला होता. कामवासनेने माणसाचे किती अधःपतन होऊ शकते त्याचा विचार करीत. पाच मिनिटांत ती धावत आली. गाडीत चढता चढता मागे वळून दरवाजात उभ्या असलेल्या तिच्या याराकडे तिने एक कटाक्ष टाकला व हात उंचावून उडते चुंबन घेतले.
गाडी रू कलँकूरच्या दिशेने धावू लागली. ती हेन्रीला अगदी बिलगून बसली होती. दोन्ही हातांनी हेन्रीचा चेहरा आपल्याकडे ओढून त्याचे चुंबन घेत ती म्हणाली,
‘‘मला ठाऊक होतं की तुम्ही परत मला बोलवायला येणार ते. माझाही जीव लागत नव्हता तुमच्याबिगर.’’
तिच्या मऊ लुसलुशीत वक्षस्थळांचा स्पर्श त्याला सुखावत होता. तिचे ओठ त्याच्या ओठांवर होते तर हात जांघेत. ती खोटे बोलत असली तरी त्याने काय मोठा फरक पडणार होता?
‘‘बेबेर मला म्हणाला की, मी तुमच्याशी जे वागले ते बरोबर नाही. मी तुमची माफी मागायला पाहिजे.’’
बेबेर आणखी काय म्हणाला असेल ते तिने न सांगताही त्याच्या लक्षात आले. रोज शंभर फ्रँक देणारा बकरा मोठ्या नशिबाने मिळाला आहे तो हातचा सोडू नकोस. जमेल तेवढा कापून घे. त्याने तिच्याकडे पाहिले. शिष्टपणे मान उडवणे, नापसंतीने ओठ मुरडणे, तिच्या वागण्यातला सगळा नखरा नाहीसा झाला होता. एका मारकुट्या नाठाळ गायीचे रूपांतर मारूनमुटकून का होईना पण एका गरीब गायीत झाले होते. ही गाय एका कसायावर भाळली होती. त्याच्या हातात आपले दावे देऊन ती त्याच्या इशाऱ्यांवर फिरत होती, पण तिचा मूळचा नाठाळपणा काही गेला नव्हता.
‘‘ठीक आहे. माफी मागायची तशी गरज नाहीय. झालं गेलं विसरून जा. बेबेरने विचारलं तर सांग मी माफ केलंय म्हणून.’’
मादाम ल्युबेतच्या लॉजवर आल्यावर परत पहिला पाढा सुरू झाला, पण या खेपेला मारीमध्ये एक महत्वाचा फरक पडला होता. ती अगदी बेबेरच्या आज्ञेत असल्यासारखी वागत होती. एके दिवशी सकाळी तिने आपण होऊन पोज द्यायची तयारी दाखवली.
‘‘तुमाला पायजे असेल तेव्हा मी सगळे कपडे काढूनसुद्धा उभी राहीन.’’ हे सगळे नाटक बेबेरने पढवून दिल्याप्रमाणे वठत होते, पण त्यातला खोटेपणा लपत नव्हता. तिने झटकन आपले कपडे उतरवले व ती नग्न झाली.
‘‘बघा. माझं अंग कसं नितळ आहे ते. कुठे एक डाग नाही की पुळी. बघा तर हात लावून कसं मऊशार आहे ते.’’
तिने त्याचा हात हातात घेतला व आपल्या मांडीवर ठेवला. क्षणभर दोन मांड्यांत दाबून धरून मग वर उचलून छातीवर ठेवला.
‘‘बघा माझी थानं कशी घट्ट आहेत ती.’’
त्याने हळूच आपला हात सोडवून घेतला व म्हणाला, ‘‘फार छान आहेत तुझे स्तन, पण आता तुला उशीर होत असेल नाही? तुझी जायची वेळ झाली.’’
‘‘पोज द्यायचे वेगळे पैसे मी घेणार नाही. शंभर फ्रँकमध्ये सगळं. दिवसातून कितीही वेळा मला पोज द्यायला सांगा, नाही तर शेजेला घ्या. मी कशालाही नाही म्हणणार नाही.’’
‘‘फार आभारी आहे तुझा. पण आता चटकन कपडे घाल आणि जा पाहू एकदाची. पोजचं पुन्हा कधीतरी फुरसतीने बघू.’’
दुसऱ्या दिवशी तिने सकाळी लवकर उठून सगळा स्टुडिओ झाडून साफ करून ठेवला. पूर्वीचा तिरसटपणा कुठे आणि आताची ही खुशामतखोरी कुठे? तिने त्याच्या पेंटिंगची तारीफ करायला सुरुवात केल्यावर मात्र या सगळ्या नाटकाची तालीम काल बेबेरच्या दिग्दर्शनाखाली झाली असणार याची खात्री पटली. त्या बुटक्याच्या पेंटिंगची स्तुती कर. चांगले म्हणायला तुझे काय जातेय? दिवसाकाठी शंभर फ्रँक हाती पडले की काम झाले!
दोन दिवसांनी नाटकाचा पुढचा अंक सुरू झाला.
‘‘मी तुम्हाला सांगितलं होतं ना की एका माणसावर माझे प्रेम आहे म्हणून. तो एकदम नालायक निघाला. काल त्याचं नि माझं लई कडाक्याचं भांडण झालं. मी त्याचं तोंडसुद्धा बघणार नाही अशी शप्पत घेतलीय. आता मी तुमच्याबरोबरच कायमचं राहायचं ठरवलंय. तुमच्यासारखा जंटलमन मिळायला मोठं नशीब लागतं.’’ बेबेर दिग्दर्शित नाटकाचा दुसरा अंक.
अशा तऱ्हेने ती खऱ्या अर्थाने त्याची रखेली झाली. त्याला हवी होती तशी ती चोवीस तास त्याच्याबरोबर राहू लागली. दिवसा घरकाम, स्वैंपाक, धुणी-भांडी, झाडलोट, संध्याकाळी त्याच्याबरोबर फिरायला, रात्री शेजेला. स्वतःला नाकारत जगण्याच्या तिच्या या शक्तीचे त्याला आश्चर्य वाटायचे. कशासाठी म्हणून या वेश्या एवढी तडजोड करीत असतील? ती सतत त्याच्याबरोबर असल्याने आपल्या निर्बुद्ध प्रश्नांनी त्याला भंडावून सोडी. कधी कधी ती स्वतःत हरवून गेल्यासारखी शून्यात नजर लावून बसे. त्या वेळी ती बेबेरचा विचार करीत असणार हे त्याला सहज कळून येई.
तिच्या वर्तनातील या बदलाचा परिणाम त्यांच्या लैंगिक जीवनावर झाला. त्यांच्या संबंधांतील खरी लज्जत परस्परांविषयी वाटणाऱ्या तिरस्कारात होती. आता तिचे रूपांतर आपल्या गिऱ्हाइकाची मर्जी सांभाळण्यात सदैव दक्ष असणाऱ्या वारांगनेत झाले होते. रतिक्लांत अवस्थेतील सुस्कारे वगैरेची अगदी छान नक्कल करणाऱ्या चतुर वारांगनेत.
‘‘मला अगदी दमवलंत हो.’’
‘‘आता तू झोप पाहू. खूप उशीर झालाय.’’
‘‘माझं तुमच्यावर खरंखुरं प्रेम आहे. तुमचं आहे का माझ्यावर?’’
‘‘तू मला आवडतेस.’’
‘‘नाही तसं नाही. प्रेम आहे का तुमचं माझ्यावर?’’
‘‘प्रेम. या शब्दाचे बरेच अर्थ होतात.’’
‘‘मी तुम्हाला सुख देते की नाही? तुमच्या घरातली सगळी कामं करते. तुमच्याशी चांगलं वागते. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमच्याबरोबर झोपते. अशी दुसरी कुणी भेटली होती का तुमाला यापूर्वी?’’
‘‘नाही बाई तूच पहिली. आता उजाडायला झालंय. थोडं झोपू या आता.’’
थोड्याच दिवसांत त्याच्या लक्षात आले की त्याची तिच्याविषयीची वासना हळूहळू कमी होत चाललीय. अशा निर्बुद्ध मूर्ख वेश्येची त्याला एका परीने दया वाटायची. तिच्यातील मूळचा तिखटपणा जाऊन आता उरले होते ते फक्त बुळबुळीत लांगुलचालन. वरवर दिसणाऱ्या सौजन्यामागे भावनांचा अभाव होता. जसजशी तिच्याविषयी वाटणारी ओढ कमी होत गेली तसतसा त्याच्या वागण्यात त्रयस्थपणा येऊ लागला. पण त्याच्या सहृदय स्वभावामुळे तिला वाटायचे की तो तिच्या पार मुठीत आहे. त्यालाही तिचा हिरमोड होऊ द्यायचा नव्हता. पण खरे पाहता तो आता पार कंटाळला होता. हे संबंध जितक्या लवकर संपतील तेवढे त्याला हवे होते, पण कसे तर अगदी शांतपणे एखादे पिकलेले फळ झाडावरून गळून खाली पडावे तेवढ्या नैसर्गिक रीतीने अलगद, कसलाही आवाज न करता.
ॲझम्पशन डेच्या निमित्ताने त्याने तिला कानातल्या रिंगची एक जोडी घेऊन दिली.
‘‘तुला आठवतंय. आपण पहिल्यांदा भेटलो त्या रात्री तू मला म्हणाली होतीस की तुझ्याकडे पूर्वी कानातली होती, पण नंतर ती हरवली.’’
‘‘पण ती तर खोटी होती.’’
‘‘ही खऱ्या सोन्याची आहेत. वेळ पडल्यास तुला गहाण ठेवता येतील.’’
‘‘तुम्ही एवढ्या प्रेमाने दिलीयत. एक वेळ उपाशी राहीन, पण कधीही गहाण ठेवणार नाही.’’
त्याला खात्री होती की बेबेर काही फार दिवस तिच्याकडे ती कानातली टिकू देणार नाही. पण त्याचे त्याला आता काही वाटत नव्हते. हे संबंध आता शक्य तितक्या लवकर आणि शक्य तेवढ्या समजूतदारपणे कसे संपवता येतील याचा तो विचार करू लागला.

No comments:

Post a Comment