Friday, October 26, 2018

मुलँ रूज - ७९

पॅरीसला परतल्यानंतर हेन्री आणि मिरीयम जरी एकमेकांना अधूनमधून भेटत होते तरी त्यातील उत्कटता आता संपली होती. कितीही प्रयत्न केला तरी गप्पांमध्ये पहिल्यासारखा रंग भरत नसे. बदललेल्या संदर्भामुळे एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवे. गप्पांचा ओघ मधेच आटून जाई. अवघडलेले हसू, बोलायचे म्हणून उगाचच सुरू केलेले संभाषण. इतक्या दिवसांच्या सहज सुंदर मैत्रीत अंतर पडले. मिरीयमला घेऊन सार्वजनिक ठिकाणी जायला हेन्रीला खूप आवडत असे. पण आता त्याला गर्दीचा तिटकारा वाटू लागला. एखाद्या देखण्या पुरुषाने तिच्याकडे नुसता कटाक्ष टाकला तरी त्याला कसेतरी वाटू लागे. पार्टी, समारंभांना तिला घेऊन जाणे तो टाळू लागला. कोणीतरी तिला आपल्यापासून हिरावून घेईल अशी त्याला भीती वाटे.
तिच्याशी बोलताना प्रेमाचा उल्लेख करण्याचे तो कटाक्षाने टाळत होता. तरीही तो आतून प्रेम करतच होता. हे प्रेम एकतर्फीच राहणार आहे हे ठाऊक असल्याने त्यात तो झुरू लागला. त्यात भर पडली मत्सराग्नीची. या सर्वांचा कोंडमारा त्याला असह्य होऊ लागला. या विचित्र मानसिक अवस्थेत त्याचे निरुद्देश भटकणे आणि दारू पिणे पहिल्यासारखे चालू झाले.
अशा रीतीने शरद ऋतू जवळ जवळ संपत आला. सकाळी सकाळीच मादाम ल्युबेतने उशाशी ठेवलेल्या सुंदर पुष्पगुच्छामुळे त्याच्या लक्षात आले की आज त्याचा वाढदिवस आहे. दिवसभर त्याने आळसात लोळून काढला. त्याला भयंकर उदासवाणे वाटत होते. संध्याकाळी त्याला भेटायला मिरीयम आली. त्याच्या चित्तवृत्ती आनंदाने फुलून आल्या. तो तिला ल तूर दार्ज्यांमध्ये जेवायला घेऊन गेला. त्याने आग्रह करून शँपेन मागविली. जेवण झाल्यावर ती त्याला घरी घेऊन गेली. जेवणानंतर ती दोघे शेकोटीसमोर शेकत बसले असताना ती त्याला म्हणाली,
‘‘आज मी तुमच्यासाठी एक गोष्ट आणलीय.’’ असे म्हणून तिने मोरोक्कन कातडी बांधणीचे एक सुरेख पुस्तक त्याच्या हातात दिले. ल आंतोलोजी द एस्तँप जॅपोनेज.पुस्तकावर सोनेरी अक्षरात हेन्रीचे नाव लिहिलेले होते. त्याने पुस्तकावरून हात फिरवला. ते एक अतिशय महागडे पुस्तक होते. त्याचे डोळे भरून आले. त्याच्या गळ्यात आवंढा आला. भावनावेगाने तो गलबलून गेला.
‘‘तुम्ही... एवढं... नको होतं.’’ त्याच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले.
‘‘तुम्हाला काय द्यावं याचा खूप विचार केला. शेवटी आठवलं. तुम्ही एकदा या जपानी चित्रांविषयी तोंड भरून बोलत होतास. खूप शोधलं आणि एके ठिकाणी हे पुस्तक दिसलं. कसं आहे? आवडलं?’’
‘‘कशाला एवढा खर्च केलात? खूप महागडं आहे हे. मीसुद्धा विकत घेताना विचार केला असता. साधे हातरुमाल दिले असते तरी चाललं असतं. थँक यू मिरीयम. थँक यू व्हेरी मच.’’ त्याला राहावले नाही. तो जवळ जवळ रडतच होता. त्याने आपले दुःख तिच्यासमोर उघड केले. तिचे मतपरिवर्तन करण्याचा पुन्हा एकवार प्रयत्न करून पाहिला. पण ती तिच्या भूमिकेला चिकटून राहिली. मिरीयम एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे ह्या सत्याचा स्वीकार करणे त्याला खूप जड गेले.
मिसिया नातानसोनला अधूनमधून मेजवानी देण्याची हौस होती. मेजवानीला ती पॅरीसमधील प्रसिद्ध व्यक्तींना बोलावीत असे. अशा एका मेजवानीला जाताना हेन्री मिरीयमला बरोबर घेऊन गेला. त्याने नाताळात दिलेला किमती पेहेराव तिने चढवला होता. त्या रात्री ती खूप सुंदर दिसत होती. त्याला ब्राह्मच्या संगीत महोत्सवाला तो तिला घेऊन गेला होता त्याची आठवण झाली. पण त्या वेळचे मैत्रीचे सहज सुंदर नाते आता संपले होते. घोडागाडीत ती शेजारी बसली असली तरी खूप दूर असल्यासारखी वाटत होती. ओझरता स्पर्श, तिरका कटाक्ष, किंचित स्मित, एखादा शब्द, सगळी मौज केव्हाच उडून गेली होती. काहीतरी ओढूनताणून संभाषणात जेन आणण्याचा दोघांचाही प्रयत्न चालू होता.
‘‘आजच्या मेजवानीला मस्य क्लेमेन्सो आणि झोला येणार आहेत काय?’’
‘‘बहुतेक येतील असं वाटतंय. जर त्या ड्रेफ्युस प्रकरणात अडकले नाहीत तर.’’
‘‘काल आमच्या दुकानात एक बाई मला विचारत होती तू ज्यू आहेस का म्हणून. मी होय म्हणून सांगितलं तर तिने मॅनेजरकडे तक्रार केली की मला दुकानात ठेवले तर ती पुन्हा दुकानाची पायरी चढणार नाही म्हणून. जणू काही मीच लष्करी गुपिते जर्मनांना विकली होती.’’
‘‘ड्रेफ्युसनेसुद्धा त्याच्यावर जो आरोप ठेवण्यात आलाय ती लष्करी गुपिते जर्मनांना विकलेली नाहीत. लष्करी महत्वाचे काही कागदपत्रं गहाळ झाली होती. या जनरलना स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी तोबडतोब कोणाला तरी पकडणे आवश्यक होते. ड्रेफ्युसला केवळ तो ज्यू असल्याने यात गुंतविले आहे. खरा गुन्हेगार शोधण्यापेक्षा ते सोपे होते. एकदा ड्रेफ्युसला दोषी ठरवायचेच हा निश्चय झाल्यावर त्याप्रमाणे खोटे पुरावे आणि साक्षी गोळा करून त्याला झटपट जन्मठेप ठोठावून मोकळे झाले. पण तो निर्दोष आहे. खटला निःपक्षपातीपणे चालवला तर त्या साक्षी व पुरावे टिकणार नाहीत. पण तो ज्यू असल्याने त्याचा वाली कोणी नाहीय. पण तू चिंता करू नकोस. लवकरच सुटेल तो. या देशात अजूनही सज्जन व प्रामाणिक माणसे शिल्लक आहेत.’’
मेजवानीवर ड्रेफ्युस प्रकरणाची सावली पडली होती. सगळे जण शांत होते. एमिल झोला खालच्या पण ठाम आवाजात निवेदन वाचून दाखवीत होता. सर्वजण गंभीरपणे ऐकत होते. झोलाचे निवेदन वाचून झाल्यावर एवढी शांतता पसरली की स्त्रियांच्या वस्त्राची सळसळ ऐकू यावी. वातावरणातील ताण सैल करण्यासाठी क्लेमेन्सो मिसीयाला म्हणाला, ‘‘उद्या हे भाषण प्रसिद्ध झाल्यावर तुमच्या पाहुण्यांच्या यादीतून दोघांची नावे तुला गाळावी लागतील. तुमच्या पुढच्या मेजवानीतील आमच्या वाटेची कोंबडी तुरुंगातच पाठवून दे.’’
‘‘आता राजकारण पुरे झालं. जेवणाच्या टेबलावर तरी कोणीही त्या ड्रेफ्युसचा विषय काढू नका.’’
जेवताना हेन्रीच्या शेजारी ज्युल्स ड्युप्रे हा फ्रान्समधील एक श्रीमंत असामी बसला होता. तो हेन्रीला म्हणाला,
‘‘तुम्हाला त्या कॅलेताचे प्रकरण माहीत आहे ना? तो मोंमार्त्रमधील वेश्यांचा दलाल. एका पोरीचा खून करून पळून गेला होता तो. त्या घटनेचा वर्तमानपत्रातून खूप गाजावाजा झाला होता. आठवतंय?’’
‘‘मला चांगलं आठवतंय. ब्रुअँटने त्यावर एक हृदयद्रावक गीतसुद्धा रचले होते.’’
‘‘गेल्या महिन्यात त्या खुन्याला मार्सेलीसला पकडलं. त्या खटल्यात त्याला मृत्युदंड ठोठावला आहे. बहुधा शिक्षा कायम करून येत्या महिन्यात त्याचा पॅरीसमध्ये शिरच्छेद करण्यात येईल. आमच्या मासिकात या विषयावर एक लेखमाला सुरू आहे. यासाठी मला तुमच्याकडून रेखाटने करून हवीयत.’’
‘‘दोन महिन्यांनी माझे एक प्रदर्शन लंडनला आहे. त्यामुळे मी सध्या मासिकांसाठी रेखाटने करण्याचं बंद केलंय.’’
‘‘किमान शेवटच्या लेखासाठी तरी मला तुमच्याकडून चित्र काढून हवंय. विशेषतः गिलोटीनखाली शिरच्छेद होत असतानाच्या प्रसंगाचे. तुम्ही सोडून दुसरं कोणी हे काम करू शकेल असं मला वाटत नाही.’’
शेजारी बसलेली मिरीयम व मॉरीस त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. मॉरीस म्हणाला, ‘‘भीतीने थरथर कापणाऱ्या माणसाला गिलोटीनकडे नेतायत, तो त्या गिलोटीनच्या जड पात्याकडे, अवतीभोवती जमलेल्या प्रचंड गर्दीकडे भिरभिरत्या नजरेने बघतोय. थोड्याच वेळात त्याचे मुंडके धडावेगळे होऊन त्या समोरच्या वेताच्या टोपलीत पडणार आहे या कल्पनेने त्याचा चेहेरा भयभीत झालाय. विचार कर चित्रकाराच्या दृष्टीने किती आव्हानात्मक विषय आहे.’’
‘‘होय. मॉरीसचं म्हणणं खरं आहे. अशी संधी पुन्हा मिळणं कठीण आहे. वाटल्यास तुझं लंडनला जाण्याचं पुढे ढकल.’’ मिरीयम म्हणाली.
‘‘लिओनार्दो द व्हिन्सी देहान्ताच्या शिक्षेच्या प्रसंगी कटाक्षाने गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरच्या भावांचे चित्रण करायला जात असे. सिस्टीन चॅपेलच्या लास्ट जजमेंटचे उदाहरण घे. भयकंपित झालेल्या त्या माणसाच्या चेहऱ्याचं चित्रण मायकेल अँजेलोने किती विलक्षण प्रभावीपणे केले आहे. आपण नरकात खितपत पडणार आहोत हे त्या माणसाला नुकतंच कळलंय. त्याच्या चेहऱ्याचा अर्धा भाग प्रकाशात तर अर्धा काळोखात. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून बघणाऱ्याचे रक्त गोठून जाते.’’ मोरीस म्हणाला.
‘‘मागच्या पिढीतल्या गोयाच्या कलोससचे उदाहरण घे. बंदुकीच्या नळीसमोर उभ्या असणाऱ्या त्या अभागी कैद्याचा भयकंपित चेहरा. तूच तर मला ते दाखवलं होतस.’’ मिरीयम म्हणाली.
‘‘मी काही स्वतःला दा व्हिन्सी किंवा मायकेल अँजेलो समजत नाही.’’ हेन्री म्हणाला.
‘‘पण प्रयत्न करून पाहिला हरकत नाही.’’ मॉरीस पाठ सोडायला तयार नव्हता. शेवटी मोठ्या मिनतवारीनंतर हेन्री तयार झाला. तो मार्च महिना होता. हेन्री पहाटे लवकर उठून देहदंडाची शिक्षा बघायला गेला. नीट दिसावे म्हणून हेन्री अगदी जवळ जाऊन उभा राहिला. आपल्या स्केचबुकात त्याने त्या प्रसंगाची अनेक स्केच केली. कॅलेताचे भादरलेले डोके, भयाकुल चेहेरा. भीतीने त्याचे पाय लटपटत असल्याने त्याला गिलोटीनकडे फरफटत नेले व लाकडी चौकटीवर दाबून बांधले. पाद्र्याची प्रार्थना संपताच तुरुंगाधिकाऱ्याने इशारा केला. फाशी देणाऱ्याने खटका ओढताच लखलखत्या धारेचे प्रचंड पोलादी पाते झर्रकन खाली आले. खटकन आवाज झाला आणि तुळतुळीत तासलेले कॅलेताचे डोके क्षणार्धात धडावेगळे होऊन समोरच्या वेताच्या टोपलीत पडले. मस्तकविहीन मानेतून रक्ताच्या चिळकांड्या भळभळ उडू लागल्या. पाद्री छातीवर क्रूसाची खूण करीत प्रार्थना पुटपुटतोय. हेन्री विलक्षण झपाट्याने स्केच करीत होता.
त्यानंतर आठवडाभराच्या अथक परिश्रमानंतर लिथोग्राफिक स्टोन तयार झाला. शिरच्छेदाचा प्रसंग व मासिकाची जाहिरात. नुकत्याच छापलेल्या शाईचा वास येत असलेले पोस्टर दोन हातात लांब धरून मिरीयम म्हणाली, ‘‘प्रसंग भयंकर आहे खरा. पण तुझं काम फारच छान झालंय. ग्रेट.’’
‘‘मस्य हेन्री, तुम्ही खरे महान कलाकार आहात.’’ ज्युल्स ड्युप्रे म्हणाला, ‘‘आता तुम्ही लंडनला जायला मोकळे झालात.’’

No comments:

Post a Comment