Friday, October 26, 2018

मुलँ रूज - ७७

पुढच्या रविवारी हेन्री मिरीयमला घेऊन सॅलून द इंडिपेंडन्सच्या प्रदर्शनाला गेला. प्रदर्शनाला आलेल्या परिचितांशी ओळख करून देताना अभिमानाने त्याची छाती फुगली. भिंतीवर दाटीवाटीने लावलेले कॅनव्हास बघून हेन्री म्हणाला, ‘‘चित्रकारांना उपाशीपोटी का राहावं लागतं ते आता तुमच्या लक्षात येईल. खरेदी करण्याच्या वस्तूंच्या यादीत पेंटिंगला सर्वांत तळाची जागा मिळते. पण पेंटिंगचे उत्पादन बघा केवढं विपुल आहे ते. आता काय भाव मिळेल या पेंटिंग्जना. कॅनव्हास, रंग व ब्रश यात घातलेले पैसे सुटले तरी खूप म्हणायचं. चित्रकला पेशा म्हणून पत्करणारे लोक एक तर मूर्ख तरी असतात किंवा अत्यंत प्रतिभावान तरी. नाही तर माझ्यासारखे दुसरा काही पर्याय नसल्याने नाइलाजाने या पेशाकडे वळलेले.’’
प्रदर्शन बघून रू द पतीत शाँवर परत येताना हेन्रीने तिला इंडिपेंडंट आर्टिस्ट्‌सच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या बैठकीतील किस्से रंगवून सांगितले. बोलता बोलता विषय जॉर्ज सुरा व व्हिन्सेंट व्हॅन गॉगवर आला.
‘‘दोघांच्या व्यक्तिमत्वात, शैलीत तसा जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण ते दोघेही आपल्या परीने फार मोठे होते. त्यांच्या कलेचे महत्त्व जगाला कळण्यासाठी कदाचित आणखी पन्नास वर्षे जावी लागतील. विशेषतः व्हिन्सेंटची आणि तुमची ओळख व्हायला पाहिजे होती. तुम्हाला तो आवडला असता. तुमच्यासारखाच तोही प्रजासत्ताकवादी होता. नादान राजांचा आणि त्यांच्या नालायक उमरावांचा नायनाट करण्यावरून तुम्हा दोघांचं एकमत झालं असतं. कोणी सांगावं तो तुमच्या प्रेमातही पडला असता. बिचारा! आयुष्याच्या अंतापर्यंत तो प्रेमाचा भुकेला होता. काहींच्या नशिबात प्रेम नसतं हे त्याला वेळीच कळलं असतं तर कदाचित आत्मनाशाला प्रवृत्त झाला नसता.’’
दर संध्याकाळी तो तिला प्लेस व्हेंदोम येथे भेटायचा. एके दिवशी तो तिला घेऊन व्हेलोद्रोमवर सायकलींच्या शर्यती बघायला घेऊन गेला. तेथे त्याने तिची झिमरमॅनशी ओळख करून दिली. दुसऱ्या आठवड्यात तिच्या आग्रहावरून तो तिला बुलेव्हार द कॅपूसिनच्या तळघरातल्या सॅलून इंडियनमधील सिनेमॅटोग्राफिक पाहिला घेऊन गेला. चित्रपटाचा खेळ बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. पडद्यावरून धावत अंगावर येणारी आगगाडी पाहून प्रेक्षक भीतीने किंचाळत, घाबरून खुर्चीवरून उठून पळून जात. काही तर मूर्छितसुद्धा होत.
रविवारी सकाळी कित्येक वेळा ती त्याच्या स्टुडिओवर जाई व त्याचे पेंटिंगचे काम बघत बसे. नाही तर मादाम ल्युबेतशी गप्पा मारीत बसे. त्यांची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली तशी हेन्रीने आपल्या भावजीवनातील सगळ्या गोष्टी एक एक करून तिला सांगितल्या. डेनीस आणि नंतर मारी शार्लेत. एके दिवशी मिरीयमनेसुद्धा तिचे हृदय त्याच्याकडे उघड केले.
मिरियमचे वडील पोलंडवरून त्यांच्या लहानपणी पॅरीसमध्ये आले होते. सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या एका पेढीवर ते काम करीत. त्यात त्यांना जेमतेम पोटापुरते मिळत असे. ते सतत आजारी असत आणि जे पैसे मिळत ते त्यांच्या औषधपाण्यात संपून जायचे. लहानपणच्या गरिबीमुळे शाळेत जाण्याची फारशी संधी तिला कधी मिळाली नव्हती. वयाच्या तेराव्या वर्षी तिचे वडील वारल्यानंतर परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आणि तिची शाळा कायमची सुटली. आई दिवसभर कपड्यांच्या दुकानात मान मोडेस्तोवर काम करी. मिरियम घरी बसून काजेबटणांचे काम करून तिला आपल्यापरीने हातभार लावी. जेवायला उकडलेले बटाटे आणि कोमट पाण्यात भिजवलेला पाव. वर घरमालक कधी हाकलून देईल याची सतत टांगती तलवार. रविवार नाही की सुटीचा दिवसही नाही. सीन नदीकाठची सहल, होडीतून नदीत फेरफटका, घोडदौड अशा चैनी तर सोडाच, पण बरोबरीच्या मुलांबरोबर सार्वजनिक बागेत साधी लपाछपी खेळायलासुद्धा तिला कधी मिळाले नव्हते.
‘‘मी सोळा वर्षांची असताना आमच्याच गल्लीत राहाणारा आंद्रे नावाचा एक तरुण मला खूप आवडायचा. मी त्याच्या प्रेमात पडले होते म्हणाना. तो आमच्याच धर्माचा होता. एका कारखान्यात फोरमन म्हणून नोकरीला होता. आई गेल्यानंतर त्याने मला मागणी घातली होती. पण मीच त्याला नाही म्हटलं.’’ मिरीयम शेकोटीतल्या विस्तवाकडे टक लावून बघत होती. तिचा आवाज कोरडा होता.
‘‘तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं तर नाही का म्हटलंत?’’
‘‘कारण तो आमच्यासारखाच गरीब, दरिद्री होता म्हणून. तो बुद्धिमान होता. कष्टाळू होता. दिसायलाही देखणा होता. माझे वडीलसुद्धा बुद्धिमान, कष्टाळू आणि देखणे होते. तरीही माझ्या आईला कसे हलाखीमध्ये दिवस कंठावे लागले ते मी पाहिलं होतं. वडील तापाने फणफणले असता अंगावर घालायला उबदार पांघरूण नव्हतं, शेकोटीत जाळायला लाकडं नव्हती. एक दिवस त्यांचा खोकून खोकून प्राण गेला. कारण औषधं आणायला आमच्याकडे पैसे नव्हते. त्या दिवशी मी ठरवलं की दरिद्री म्हणून जन्माला आले असले तरी दरिद्री म्हणून मरायचं नाही. आंद्रेला नाही म्हटल्यावर मी त्याला पुन्हा भेटलेही नाही. न जाणो चुकून भावनेच्या भरात तोंडून होकार गेला तर.’’

No comments:

Post a Comment