Saturday, October 13, 2018

मुलँ रूज - ४४

उद्‌घाटनानंतर मुलँ रूज हे हेन्रीचे जणू दुसरे निवासस्थान बनले. तेथील प्रत्येकजण त्याला ओळखत असे. तिथे त्याची एखाद्या खास पाहुण्यासारखी बडदास्त राखली जाई. तेथील नियम त्याला लागू नसत. तिथे तो आपल्या मर्जीचा राजा होता. तिथे खाण्याचे पदार्थ फारसे मिळत नसत. पण खास हेन्रीसाठी लहान-सहान मेजवान्यांची व्यवस्था केली जाई. सगळ्या नर्तिकांचा तो लाडका होता. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या मोकळेपणाने त्याला सांगत. प्रेमप्रकरणात त्याचा सल्ला घेतला जाई. भांडणात त्याला आपल्या बाजूला ओढण्यात आपापसात अहमहमिका लागे. बारटेंडर सारा अधूनमधून मद्यपानाच्या दुष्परिणामांवर त्याला व्याख्यान झोडे.
एकूण १८८९ चा वसंत ऋतू मोठा बहारदार ठरला. पॅरीसवासीयांना आयफेल टॉवरप्रमाणे परदेशी प्रवासी रोज रोज बघायची सवय झाली आणि मोंमार्त्रच्या रहिवाशांना मुलँ रूजच्या फिरत्या चक्राची.
वसंत ऋतू संपता संपता एक्स्पोझिशनचे सूप वाजले. पहिल्या हिमवर्षावानंतर शाँ द मार्सवरील स्वप्ननगरी ओस पडली. वैभवाचा आभास निर्माण करणाऱ्या राजवाड्यांच्या कमानींवरील नक्षीकामाचे प्लॅस्टर उखडून गळून पडले आणि आतल्या बोडक्या लाकडी चौकटी उघड्या पडल्या. जगाच्या कानाकोपऱ्यांतून गोळा केलेले वन्य जमातींचे तांडे महासागरातील बेटे, आप्रिकेतील वाळवंटे आणि सदाहरित जंगले यातील आपल्या मूळ वसतिस्थानाकडे डुचमळणाऱ्या जहाजातून रवाना झाली. आपल्या जागेवर उरला तो फक्त आयफेल टॉवर. शाँ द मार्सच्या ओस पडलेल्या मैदानावर आकाशाला गवसणी घालणारा तो उंच टॉवर सर्कशीचा गाशा गुंडाळताना चुकून मागे राहिल्यामुळे गोंधळलेल्या जिराफासारखा केविलवाणा दिसू लागला.
वर्ष संपता संपता हेन्रीला २१ रू द कुलँकूर या पत्त्यावर आलेले एक पत्र मादाम ल्युबेतने त्याच्या हातात ठेवले. पत्रावरील स्टॅम्प परदेशी दिसत होते. त्यामुळे काळजीत पडलेल्या मादाम ल्युबेतने भीत भीतच विचारले, ‘‘सगळे सुखरूप आहेत ना?’’
‘‘ओह! आनंदाची बातमी,’’ हेन्री चीत्कारला, ‘‘अर्टिस्ट्‌स सोसायटीने मला येत्या जानेवारीत ब्रुसेल्समधील प्रदर्शनात भाग घेण्याचे निमंत्रण दिलंय.’’
‘‘नुसती पेंटिंग पाठवून चालणार नाही का? अगदी स्वतःच जायला हवं का?’’ मादाम ल्युबेतने काळजीच्या सुरात विचारले.
‘‘असं काय विचारता मादाम? हे निमंत्रण म्हणजे एक मोठा बहुमान आहे.’’
‘‘हं! इतक्या लांबून पॅरीसहून ब्रुसेल्सला जायचं म्हणजे बहुमानापेक्षा त्यात त्रासच जास्त.’’ मादाम ल्युबेत मोठ्या फणकाऱ्याने म्हणाली, ‘‘अर्थात कुठेही जायचं असेल तर तुमचे तुम्ही मुखत्यार आहातच. अगदी चीनला जा की आप्रिकेत. मी कोण विचारणारी?’’ तिच्या थुलथुलीत चेहऱ्यामुळे तिच्या अंतःकरणातील खळबळ दिसून येत नव्हती. मिनिटभरात तिचा फणकारा शांत झाला. तिचे डोळे पाण्याने भरून आले. कापऱ्या आवाजात ती म्हणाली, ‘‘तिकडे तुम्हाला काही दुखलंखुपलं तर कोण बघणार आहे? त्या बल्गेरियन लोकांपैकी कोण येणार आहे का तुमच्या मदतीला?’’
ब्रुसेल्स हे पॅरीसपासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे. तेथील लोकांना बेल्जियन म्हणतात. बल्गेरियन नव्हे. तिथे फ्रेंच भाषाच बोलली जाते आणि जगातील उत्कृष्ट डॉक्टर तिथे उपलब्ध आहेत. हे सगळे तिला समजवायला हेन्रीला खूप प्रयास पडला.
‘‘काही काळजी करू नका. माझ्याबरोबर माझा मित्रसुद्धा असणार आहे. मस्य सुरा. तो उंचेला तरुण. एकदा आला होता आपल्याकडे. आठवतोय?’’

No comments:

Post a Comment