Wednesday, October 24, 2018

मुलँ रूज - ७३

ल फ्लूर ब्लांमधील हेन्रीचा दिवस कोनॅकचे घुटके घेत घेत पेंटिंग करण्यात जायचा. रात्री शहरात भटकंती नाही तर तिथल्याच एखाद्या मुलीबरोबर शय्यासोबत. हेन्रीची त्या मुलींना एवढी सवय झाली होती की त्या त्यांचे नित्याचे व्यवहार आंघोळ करणे, कपडे बदलणे, वेणीफणी, मेकअप वगैरे त्याच्यासमोर अगदी निःसंकोचपणे करीत. हेन्रीशी त्या मनमोकळेपणाने गप्पा मारीत. यातूनच हेन्रीला या पुरातन व्यवसायातील अनेक गुपिते कळून आली. एखाद्या धार्मिक मठात जसा आध्यात्मिक सुखाचा शोध घेतला जातो तसा ल फ्लूर ब्लांमध्ये वैषयिक सुखांच्या विविध परिमाणांचा शोध लागला.
(लोत्रेकने वेश्यांच्या समलिंगी कामजीवनावर बरीच अभ्यासचित्रे काढली आहेत. या विषयावरील त्याचे द किसहे पेंटिंग लूवरमध्ये आहे.)

एके दिवशी सकाळी ॲड्रीन नावाची एक मुलगी स्फुंदत स्फुंदत त्याला म्हणाली, ‘‘काल मी एक पाप केले. आता मी माझ्या शोशूला तोंड कसे दाखवू? मी कुत्रीच्या लायकीची आहे.’’
त्याला सुरुवातीला काही कळेना. असा कोणता अप्रामाणिकपणा तिच्या हातून घडला असेल. पण नंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. काल रात्री गिऱ्हाईकाकडून तिची नकळत संभोगतृप्ती झाली होती. तिच्या दृष्टीने ही प्रियकराशी केलेली एक प्रकारची प्रतारणाच होती. खास वेश्यांचे असे वेगळेच विश्व होते. तेथील नियम, नैतिक संकल्पना, विचार, संस्कृती सारे काही त्यांच्या जीवनशैलीशी बद्ध होते. त्यातील सुसंगती त्यांच्या निकट सहवासात राहिल्यामुळे त्याला उमगली.
महिन्यातून एका सोमवारी सगळ्या मुलींची वैद्यकीय तपासणी होई. डॉक्टरला एक खोली दिली जायची आणि मुली बाहेर रांग लावून उभ्या राहायच्या. सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीचे दडपण असायचे. त्या वैद्यकीय तपासणीच्या नाट्यामधील केविलवाणा तणाव त्याने आपल्या पेंटिंगमध्ये अचूक पकडला.

(मेडिकल इन्स्पेक्शन – तुलूझ लोत्रेक – तैलरंग, कार्डबोर्ड ऑन वुड, ८३.५x६१.५ सेमी, १८९४)  नॅशनल गॅलेरी ऑफ आर्ट्स, वॉशिंग्टन डीसी
हेन्री जेव्हा ल प्लुर ब्लां सोडून जायला निघाला तेव्हा मादाम पोतीएरों, तिचा नवरा अलेक्सांद्र व तेथील मुली या सगळ्यांच्या अगदी जिवावर आले. हेन्रीने मोठ्या जड अंतःकरणाने त्यांचा निरोप घेतला. जाण्यापूर्वी शेवटचा प्याला घेण्यासाठी म्हणून अलेक्सांद्र हेन्रीला घेऊन कॅफेत गेला. त्याच्याबरोबर त्याचे आणखी दोन मित्र होते. ते तिघेही वयाच्या पन्नाशीच्या जवळपास होते. डोळ्यांखालील त्वचा लोंबू लागली होती. व्यवसायातल्या ओढगस्तीमुळे कपाळावर आठ्यांचे जाळे आले होते. या वयात तारुण्यातील जोम ओसरला होता. तरी एकेकाळचा मर्दानी देखणेपणा लपत नव्हता. कॅफेत त्यांनी पत्त्यांचा डाव टाकला. नेहमीप्रमाणे मॉरीस जिंकला.
‘‘तू नशीबवान आहेस बुवा.’’
‘‘पत्त्यात जे नशीब साथ देतं तशी साथ धंद्यात मिळाली तर किती बरं होईल. आजच्या तपासणीत माझी दोन कबुतरं सापडली. आता दर वेळी नवीन पोरी आणायच्या कोठून?’’
‘‘या आजकालच्या पोरी मोठ्या डँबीस असतात. पहिल्यासारख्या सीध्यासाध्या पोरी आता कितीही शोधल्या तरी मिळणार नाहीत. तो व्हिक्टर ह्युगो मेला तेव्हा माझ्या पोरी काय रडल्या म्हणून सांगू? नाही तर या स्वतःला समाजवादी समजणाऱ्या कालच्या पोरी. त्यांचे नखरे पाहून घ्यावेत. आपली देशभत्ती दाखवायला ढुंगणाला तिरंगासुद्धा गुंडाळून फिरतील.’’
नंतर धंद्यातील नेहमीची रडगाणी सुरू झाली. ‘‘तुम्हाला काय सांगू मस्य तुलूझ. आता स्पर्धा किती वाढलीय. पहिल्यासारखं राहिलं नाहीय. आजकाल शहरातून जोडधंदा म्हणून बऱ्याच संसारी स्त्रियासुद्धा वेश्या व्यवसाय करू लागल्यायत. शिवाय रस्त्यावर दिव्याच्या खांबाखाली उभे राहून अनधिकृत धंदा करणाऱ्या मुली आहेत त्या वेगळ्याच. पोलिसांनासुद्धा आता पूर्वीसारखी नुसती दारू देऊन भागत नाही. त्यांना रोख पैसे हवे असतात.’’
‘‘आम्ही किती कष्टाने पैश्याला पैसा जोडून पैसे मिळवलेयत. धंद्याला सुरुवात केली तेव्हा फक्त बायको आणि जोडीला मेव्हणी होती. माझ्या बायको अगदी साधी आहे. मी पुरे म्हणून सांगीतलं, तरी एक शेवटचा म्हणून नवीन गिऱ्हाईक घ्यायची. तिचं माझ्यावर केवढं प्रेम होतं म्हणून सांगू? अशी बाई बायको म्हणून मिळायला फार मोठं भाग्य लागतं.’’

No comments:

Post a Comment