Tuesday, October 23, 2018

मुलँ रूज - ७१

दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. दुपारी चार वाजल्यानंतर एक एक करून लोक यायला लागले. थोड्या वेळाने समीक्षक मंडळी आली. आपण कोणाच्या गावचे नाहीत असे वरवर भासवीत पण आपले महत्त्व नजरेत भरू देण्याची एकही संधी न सोडता ते वावरत होते. एखाद्या जनरलने जवानांची पाहाणी करावी तशा रुबाबात ते हातात छत्री अडकवून सगळ्या कॅनव्हाससमोरून फिरत होते. मधेच थांबून मान वाकडी करून, थोडे मागेपुढे सरकून बारकाईने निरीक्षण करीत हातातल्या वहीत काहीतरी खरडत होते. साडेपाच वाजेपर्यंत सगळा हॉल गर्दीने फुलून गेला. कसलाही गाजावाजा केला नव्हता तरी सांगोवांगी झालेल्या प्रसिद्धीने खूप गर्दी झाली. मॉरीसची सारखी खालीवर धावपळ चालू होती. सगळ्यांशी मोठ्या तत्परतेने तो दोन शब्द बोलत होता.
थोड्या वेळाने काउंट इसाक कामोंदो व किंग मिलान ऑफ सर्बिया असे दोघे जण आले. लोकांनी अदबीने त्यांना वाट करून दिली. मॉरीस त्यांच्याबरोबर फिरत त्यांना मोठ्या उत्साहाने माहिती पुरवत होता. राजेसाहेब एका पेंटिंगसमोर किंचित थांबले. ते विदूषकाचा पेहराव केलेल्या बाईचे पेंटिंग होते.
‘‘इथल्या एका सर्कशीत काम करते. काय तौलनिक रचना आहे पाहा. शिवाय रंगांचे संतुलन.’’
‘‘केवढ्याला?’’ काउंटने विचारले.
‘‘सहा हजार फ्रँक.’’
‘‘काय सहा हजार. लोत्रेक अजून लहान आहे.’’
‘‘रफाएलसुद्धा एकेकाळी लहान होता साहेब.’’ मॉरीस हेन्रीचा एक जिवलग मित्र होता तसाच एक जाणकार विक्रेताही.
‘‘मागच्या वर्षी देगा मी सहा हजारात घेतला.’’
‘‘आणि एका वर्षात त्याची किंमत दुप्पट झाली. मस्य तुमची अभिरुची आणि व्यापारी दृष्टी यांचे कौतुक करायला हवे. या दोघांचा मेळ क्वचितच जमतो.’’
संध्याकाळी सात वाजल्यानंतर मॉरीसला जरा फुरसत मिळाल्यावर तो खाली तळघरात गेला. हेन्री हातात ग्लास घेऊन जेन ॲव्हरीलशी गप्पा मारत होता. मॉरीसला पाहून तो म्हणाला,
‘‘काय कामोंदोसाहेब आले की नाही शेवटी?’’
‘‘नुसते आले असं नाही तर तुझं ते शा-तु-काओचे पेंटिंग घेऊन गेले. सहा हजार फ्रँक आले, आहेस कुठे? राजेसाहेबांनी पण एक पेंटिंग घेतलं. तू आता नुसता पोस्टर आर्टिस्ट राहिला नाहीस. महाशय तुम्ही आता पेंटर झालायत. पुढचा शो लंडनमध्ये करू. पुढच्या वर्षी न्यूयॉर्क. खरा पैसा तिकडेच आहे. अमेरिकेत.’’
(काउंट कामोंदोने घेतलेले शा-तु-काओ हे पेंटिंग सध्या लूव्हरमध्ये आहे, तर दुसरे पेंटिंग किंग मिलान ऑफ सर्बियाच्या खाजगी संग्रहात आहे असा उल्लेख ज्वाय्यांच्या कॅटलॉगमध्ये सापडतो. पण त्यानंतर झालेल्या बऱ्याच हस्तांतरामुळे सध्या कोणाकडे आहे त्याचा पत्ता लागत नाही.)
तेवढ्यात वरती बेल वाजली. इतक्या उशिरा कोण आले असावे असा विचार करीत मॉरीसने दार उघडले. देगा व्हिसलरला घेऊन आला होता.
‘‘तुम्ही यायला बराच उशीर केलात. सगळे गेले.’’
‘‘म्हणूनच आम्ही उशिरा आलोय. लोत्रेक कुठे आहेत?’’ देगाने विचारले.
देगा आपल्या प्रदर्शनाला आला याचा हेन्रीला अतिशय आनंद झाला. जेव्हा हेन्री खालून वर आला तेव्हा देगा आणि व्हिसलर दोघेही एका मोठ्या कॅनव्हास मुलँ रूजसमोर उभे होते.
(दोन स्त्रिया आणि एक पुरुष एका टेबलाभोवती बसले आहेत असे हे पेंटिंग सध्या आर्ट इन्स्टिट्युट ऑफ शिकागोमध्ये आहे.)
‘‘या बाईचा चेहरा तू हिरव्या रंगात का रंगवलायस?’’ देगास लांबूनच ओरडला. जवळ जात तो म्हणाला, ‘‘मला माहितेय तू हिरवा रंग का वापरलास ते आणि तुझं बरोबर आहे. आता समीक्षक मंडळी काय म्हणतात ते बघ.’’
पुढे वाकून कॅनव्हासला अगदी नाक चिकटेल इतक्या जवळ जात व्हिसलर म्हणाला, ‘‘केस बाकी झकास काढलेयस हां. अगदी माझ्या गर्ल इन व्हाईटची आठवण येते. ही कलाकुसर आहे हे जरी खरं असलं तरी, ती कलाकुसर अशा सफाईने केलीयस की ती कलाकुसर आहे हे बघणाऱ्याला कळणारही नाही. हे मात्र अगदी अप्रतिम. मागच्या वर्षी तू लंडनमध्ये असताना मी तुला काय सांगितलं होतं आठवतंय?’’
‘‘ए जिमी. तुझी बकबक पुरे कर. सध्या आपण लंडनमध्ये नाही पॅरीसमध्ये आहोत आणि येथे आपण लोत्रेकचे प्रदर्शन बघायला आलो आहोत. हेन्री, चल तुझी बाकीची पेंटिंग दाखव बरं.’’ देगा म्हणाला. नंतर एक तासभर त्या दोघांनी खाली तळघरात ठेवलेली हेन्रीची वेश्यांच्या जीवनावरची पेंटिंग पाहिली.
‘‘तुझं वय काय आहे हेन्री?’’ देगासने विचारले.
‘‘बत्तीस.’’
‘‘तू माझ्यापेक्षा बत्तीस वर्षांनी लहान आहेस. तुला आता जेवढी अक्कल आहे तेवढी अक्कल आम्हाला यायला खूप उशीर लागला आणि अक्कल आली तरी तुझ्या एवढी आम्हाला आली नाही. तुला आठवतंय दहाएक वर्षांपूर्वी मी तुला सांगितलं होतं की या जगात आजपर्यंत फार तर पन्नास-साठ चित्रकार होऊन गेले असतील की ज्यांच्याकडे जगाला देण्यासारखं काही होतं आणि ते त्यांनी दिलं. इतिहास तुला त्यांच्या पंत्तीत नेऊन बसवेल.’’ असे बोलून देगास व्हिसलरबरोबर निघून गेला.

(शा-तू-काओ – तुलूझ लोत्रेक – तैलरंग, कॅनव्हास – १८९५ – लुव्हर, पॅरीस)

No comments:

Post a Comment