Sunday, October 7, 2018

मुलँ रूज - ३१

डेनिस हेन्रीला पोर्ट्रेटसाठी पोज द्यायला लागल्यानंतर त्या दोघांत अधिक जवळीक निर्माण  व्हायला लागली. दोघांनी आपापल्या जीवनातल्या बारीकसारीक घटना एकमेकांना सांगितल्या. आपल्या मनाचे कप्पे एकमेकांजवळ उघडे केले. या जवळिकीचा अर्थ लावताना हेन्रीच्या मनात चलबिचल होऊ लागली. डेनिस एवढी आपुलकी दाखवतेय त्या अर्थी आपण तिला नक्कीच आवडत असलो पाहिजे. पण तिला लग्नाची मागणी घालायला त्याला धीर होत नव्हता. ब्रासेरीमधल्या त्या वेश्येचे शब्द अजून त्याच्या कानात घुमत होते. तू खुजा आहेस, दिसायला कुरूप आहेस. पण तरी काय झाले? काही मुली जाणूनबुजून असल्या व्यंगाकडे दुर्लक्ष करतात. युद्ध संपल्यावर नाही का रणभूमीवर लढताना अपंगत्व आलेल्या वीरांशी लग्न करण्याची लाट येते. कोणी सांगावे डेनिससुद्धा अशा निःस्वार्थी मुलींत मोडणारी एक असेल. शारीरिक सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला महत्त्व देणारी.
डेनिसच्या साध्या साध्या वागण्यात काहीतरी अर्थ काढण्याचा हेन्रीला नंतर कित्येक दिवस चाळाच लागला. तिच्या प्रेमात पडल्यामुळे तो सारासार बुद्धी गमावून बसला होता. मग अगदी क्षुल्लक गोष्टींचा आपल्याला हवा तो अर्थ लावून तो मोकळा व्हायचा. तिला तो आवडत असे. अगदी मनापासून आवडत असे ही गोष्ट खरी होती. लोत्रेकांचे इतिहासप्रसिद्ध घराणे, त्यांना मिळणारे मानमरातब, त्यांची अफाट संपत्ती. शिवाय हेन्रीच्या हातातली कला वगैरे सगळ्या गोष्टींनी ती प्रभावित झाली होती. पण ते तेवढ्यापुरतेच होते. डोक्यात प्रेमज्वर चढल्यामुळे हेन्रीच्या हे सगळे लक्षात येणे शक्य नव्हते.
डेनिसला मागणी घालण्यासाठी हेन्री संधी शोधत होता. एखाद्या दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यासारखा. तिच्या मनात काहीच नसल्याने ती बेसावध होती. हेन्रीच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने सगळे जण जमले होते. त्याचे चित्त अगोदरच थाऱ्यावर नव्हते. तेवढ्यात डेनिस अजाणतेपणाने त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. तिच्या शरीराची धग त्याला जाणवली. त्याच्या हातातला शँपेनचा ग्लास थरथरू लागला. तिने शांतपणे विचारले, ‘‘मी ती प्रील्यूड वाजवू का. पहिल्या दिवशी वाजवलेली.’’
तिने पियानो वाजवायला सुरुवात केली. हेन्री तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिचे वादन संपल्यावर तिने हेन्रीकडे वळून पाहिले. त्याने ग्लासातली शँपेन एका घोटात संपवली व लगबगीने तिच्या जवळ जाऊन तिला विचारले,
‘‘प्लीज. वर स्टुडिओत जाऊ या का जरा.’’
‘‘आता! या वेळी?’’ तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
‘‘होय. माझं खूप महत्वाचे काम आहे.’’
त्याच्या घशाला कोरड पडली होती. छाती धडधडत होती. तो तिला घेऊन वर स्टुडिओत गेला.
‘‘काय दाखवणार आहात मला?’’ तिने विचारले.
‘‘जरा बस इथे.’’
ती मुकाट्याने कोचावर बसली. हेन्री तिच्या शेजारी जाऊन बसला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्याचे ओठ थरथरत होते. दिव्याच्या मंद प्रकाशात त्याचा कुरूपपणा अधिकच उठून दिसत होता. त्याच्या रूपात झालेल्या या बदलामुळे ती थोडी घाबरली.
‘‘तुला ही गोष्ट विचित्र का वाटतेय? माझ्यातल्या शारीरिक व्यंगामुळेच ना?’’
मनातल्या खळबळीमुळे बोलताना नकळत त्याच्या हाताची पकड घट्ट होत गेली. तिचा हात दुखू लागला. इतका की कळ मस्तकात गेली. होणाऱ्या वेदनेने तिची भीड, भीती दूर पळाली. तिने आपल्या हाताला जोराचा हिसडा दिला आणि त्याच्या अंगावर ती ओरडली,
‘‘होय. पहिला माझा हात सोडा.’’
त्याने एका झटक्यात तिला आपल्या जवळ ओढून तिच्या ओठांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. एक क्षणभर काळाची गती स्थिर झाल्यासारखी वाटली. ओठांचा ओलसरपणा, स्तनांची उष्णता, तिचे आक्रसणारे शरीर, त्याच्या मांसात रुतणारी तिची नखे. सर्व काही फक्त एक क्षणभरच. दुसऱ्या क्षणी तिने आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला. धावत ती दरवाजाकडे गेली. तेथे थांबून किंचाळत ती म्हणाली,
‘‘हलकटा. तुझ्याएवढा नीच मी आयुष्यात पाहिला नव्हता. लक्षात ठेव. कोणतीही अव्यंग मुलगी जीव गेला तरी तुझ्यासारख्या बुटक्या, फेंगाड्या आणि कुरूप मुलाशी लग्न करायला तयार होणार नाही.’’
जिन्यावर दाणदाण पाय आपटत ती निघून गेली. त्याचे डोके सुन्न झाले. थोड्या वेळात तो भानावर आला. काय घडले असावे याचा आईला सुगावा लागला असावा. अजून ती वर कशी आली नाही याचे त्याला आश्चर्य वाटले. आता खाली जाऊन आपण होऊन तिला तोंड दाखवणे भाग होते. त्याने काठी उचलली व मोठ्या कष्टाने एक एक पाऊल टाकत खाली गेला. सर्वजण परत गेले होते. आई फायरप्लेसच्या बाजूला एकटीच बसली होती. तो शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसला. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही.
‘‘मी तोंडघशी पडणार आहे याची तुम्हाला जर अगोदरपासून कल्पना होती तर जरा सावध करायचंत मला.’’ हेन्री आईची नजर टाळत शेकोटीतल्या लाकडांकडे बघत म्हणाला.
थोडा वेळ तसाच गेला. शेकोटीतल्या विस्तवातली लाकडे तडतडत होती.
‘‘असं काहीतरी घडेल असं मला आत कुठेतरी वाटत होतं. पण आशा फार वेडी असते. वाटलं होतं डेनिस इतर मुलींपेक्षा कदाचित वेगळी असेल. पण मी स्वतःला फसवत होतो. ममा, तुम्हाला कल्पना येणार नाही की कुरूप व्यक्ति स्वतःला कशी फसवत असते ती. अशा फसवणुकीने ती स्वतःच्या कुरूपतेला, व्यंगाला झाकत असते. या कल्पनारंजनामुळे थोडा वेळ का होईना तिला आपल्या कुरूपतेचा, व्यंगाचा विसर पडतो.’’
‘‘रिरी, माँ पेतीत, माझ्या राजा, प्लीज असं बोलू नका. काळजाला घरं पडतात.’’
‘‘पण ममा, सत्य परिस्थिती नाकारून काय होणार आहे? तुम्हाला ठाऊक नसेल. मी मोंमार्त्रमध्ये होतो तेव्हा एक-दोनदा ब्रासेरी मोंतेमध्ये गेलो होतो. कशाला ठाऊक आहे? स्त्रीसुखासाठी. दोन्ही वेळा माझ्याबरोबर यायला कोणीही तयार झालं नाही. दीडदमडीच्या वेश्यांनीसुद्धा मला नकार दिला. माझ्या अशा रूपामुळे. रोज रात्रभर मी तळमळत असतो. स्त्रीचे विचार मनातून काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मनात ते येतच राहतात. अगदी वेड लागण्याची पाळी येते.’’
‘‘तुम्हाला ह्या सत्य परिस्थितीची कल्पना यावी म्हणून मुद्दाम होऊन हे सगळं सांगतोय.’’ आईकडे बघत तो पुढे म्हणाला, ‘‘मी मोंमार्त्रमध्ये परत राहायला जायचं ठरवलंय. तिकडेच माझ्या मनाला थोडी शांतता लाभेल. आजच्यासारखा प्रसंग कुठेही येऊ शकला असता. सॅन रेमो, फ्लॉरेन्स कुठेही. आज नाहीतर उद्या सहा महिन्यांनी केव्हाही. डेनिस फक्त निमित्त झाली. मी तिकडे राहिलो तर माझ्यापासून किमान तुम्हाला त्रास होणार नाही. आज झाला तसा.’’
‘‘तुम्हाला तिकडे अगदी एकटं वाटेल.’’ तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.
त्याने काठी घेतली आणि तो उठून आईजवळ गेला.
‘‘प्लीज ममा, तुम्ही रडू नका. आपल्याला मन थोडं घट्ट करायला हवं. तसा मी अधूनमधून भेटायला येत जाईन.’’
एवढे बोलून हेन्री आपल्या झोपण्याच्या खोलीकडे जायला निघाला. आई त्याच्याकडे अश्रू भरल्या नजरेने बघत होती. काठी टेकत टेकत पाय ओढत चाललेली त्याची पाठमोरी आकृती मोठी करुणास्पद दिसत होती. डोळ्यांत दाटलेल्या अश्रूंनी तिची नजर अंधूक झाली. तिने पापण्या घट्ट मिटून घेतल्या. अश्रू गालांवरून घळघळा ओघळू लागले. आपल्या मुलाला कठोर नियतीपासून जपण्याचा आजवर तिने आपल्यापरीने खूप प्रयत्न केला होता. पण आता प्रार्थना करण्यापलीकडे तिच्या हातात काहीच राहिले नव्हते. शेकोटीतल्या विझत जाणाऱ्या विस्तवाच्या ठिणग्यांकडे विषण्णपणे पाहता पाहता ती पुटपुटत प्रार्थना करत होती.

No comments:

Post a Comment