Saturday, September 29, 2018

मुलँ रूज - १२


ऑक्टोबरमध्ये हेन्रीने प्रोफेसर कोर्मोनच्या वर्गात नाव घातले. हे हेन्रीचे कलाशिक्षणाचे दुसरे वर्ष होते. दररोज सकाळी तो आपल्या आईच्या घरातून मोंमार्त्रमध्ये जाण्यासाठी घोडागाडीतून निघायचा. पण ॲतलिएच्या वाटेवर थोडे अलीकडेच उतरायचा. आपली गाडी, गणवेशधारी गाडीवान कोणाच्या नजरेला पडू नये म्हणून ही काळजी. ठीक नऊ वाजता वर्गात शिरल्याबरोबर सर्वजण आपापल्या इझलकडे जाऊन कामाला सुरुवात करीत. व्हीनस, डायना, लेडा किंवा त्या आठवड्याची जी देवता असे तिच्या पुतळ्यावरून काम चालू होई. कित्येक वेळा प्रत्यक्ष मॉडेल असायची. मुले वर्गात येऊ लागली की मॉडेलची बाई एक एक करून सर्व कपडे उतरवायला सुरुवात करी. मॉडेलचा हळूहळू अनावृत्त होणारा देह बघून नव्याने आलेली मुले सुरुवातीला थोडी उत्तेजित व्हायची. पण एकदा का ती संपूर्ण नग्न होऊन आपल्या स्टुलावर जाऊन बसली की लगेच मुले डोळे बारीक करून, अंगठ्याने, पेन्सिलने माप घेत समोरचा कॅनव्हास पुरा करायच्या मागे लागत.
आठवड्यातून एकदा प्रोफेसर महाशय येत. ते बऱ्याच देशी-परदेशी अकादमी व म्युझियमच्या सल्लागार मंडळांवरचे सन्माननीय सदस्य होते. त्यांच्याकडे नेहमी बरेच काम असे. बँका, नगरपालिका, चर्च वगैरेंसाठी म्युरल, समाजातल्या बड्या धेंडांची पोर्ट्रेटस्‌ वगैरे. थोडक्यात ते एक प्रथितयश चित्रकार होते. पण वर्गातल्या मुलांच्या दृष्टीने सर्वांत महत्वाची बाब म्हणजे सॅलूनच्या निवड समितीवरचे ते एक ज्युरी होते. वर्गात ते दोन-तीन फेऱ्या मारत. प्रत्येकाच्या इझलकडे जाऊन पाचएक मिनिट डोळे किलकिले करून बघत. मग आपल्या नागरी, अतिशय हळुवार आवाजात सौम्यपणे पण किंचित आढ्यतेने काही सूचना करत. ब्रशने एक-दोन फटकारे मारून दाखवीत. प्रोफेसरांच्या अशा या फेऱ्यांमधून हेन्रीला लवकरच मोठा बोध झाला तो असा की सुंदर गोष्टींची सुंदर सुंदर चित्र काढणे हीच कलेतील सर्वात महत्वाची बाब आहे. रंगकाम अगदी हलक्या हाताने ब्रशने घोटून घोटून गुळगुळीत केले पाहिजे. चित्ररचना त्रिकोणात्मकच असली पाहिजे.
पोर्ट्रेट, मेझ अमिस, माझ्या मित्रांने, खास करून स्त्रियांचं पोर्ट्रेट म्हणजे,” प्रोफेसर कोर्मोन म्हणाले, “चित्रकलेचा सर्वोच्च आविष्कार. त्यासाठी केवढं कौशल्य, केवढी मेहनत लागते याची कल्पना नसेल तुम्हाला. बरं नुसत्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर एक वेळ दुसऱ्या कोणाचं पोर्ट्रेट जमेल पण स्त्रीचं. शक्यच नाही. कोणत्याही स्त्रीचं पोर्ट्रेट करायला कौशल्य आणि मेहनतीच्या जोडीला अंतःदृष्टीची आवश्यकता असते. आता असं पहा. पोर्ट्रेट करून घ्यायला आलेल्या स्त्रिया बहुधा प्रौढत्वाकडे झुकलेल्या असतात. कारण तेवढी ऐपत येईपर्यंत तारुण्य ओसरू लागलेलं असतं. या वयात साधारणतः आपण आहोत त्यापेक्षा जास्त सुंदर विशेषतः तरुण दिसावं अशी अपेक्षा असते. आपल्या सध्याच्या वयापेक्षा दहा पंधरा वर्षांनी लहान. यामुळे चित्रकाराला पोर्ट्रेट काढायला म्हणून आपल्याकडे आलेल्या स्त्रीच्या स्वत:च्या सौंदर्याबद्दल नक्की काय कल्पना आहेत हे प्रथम जाणून घेतलं पाहिजे.
एकदा हे नक्की केलं की मग कुठे नाक थोडं सरळ करा, चेहऱ्यावर थोडा गुलाबी रंग फासा, डोळे थोडे मोठे करा, कांतीचा रंग अगदी घासूनपुसून नितळ गुळगुळीत करा. मान थोडीशी लांब, खांदे गोल, हात नाजूक करा. या वयात स्त्रिया थोड्या सुटायला लागलेल्या असतात. स्केच करतानाच जरा काळजी घेतली की झालं. स्तनांची उभारी थोडी वाढवायची तर कटिप्रदेश थोडा कृश करायचा. चेहऱ्यावरची एकही सुरकुती, एखादा डाग, चामखीळ तर चुकूनही चित्रात दिसता कामा नये. छबी रंगवण्यापेक्षा जास्त मेहनत घ्यायची ती कपडे व दागदागिने रंगवताना. अंगठी, ब्रेसलेट, ब्रूच वगैरे हिरेजडित दागिन्यांवर जेवढं जास्त लक्ष पुरवावं तेवढं कमीच. मग पाहा तुमचा चित्रविषय कसा खूश होईल तो. स्त्रियांची स्तुती करायला मुळीच मागे-पुढे बघू नका. मग पाहातच रहा पैशांचा कसा वर्षाव होतो ते तुमच्यावर. मानसन्मानांचे ते काय. ते तर पैश्यापाठोपाठ चालत येतातच.
कोणी थोडे जरी वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली किंवा कोणाच्या कामात तिळमात्र जरी स्वतंत्र बाणा दिसू कागला तर लगेच प्रोफेसरांचे इतका वेळचे सौजन्य, संयम संपून त्यांचे खरे रूप दिसू लागे.
तुमच्या अशा कामाने कलेचा उपमर्द होतोय, हे तुमच्या लक्षात येत नाहीसं दिसतंय. तुमची चित्रं अजून सॅलूनमध्ये लागायचीयत. निवड समितीवर कोण कोण आहेत ठाऊक आहे ना.
हेन्रीचे निसर्गदत्त कलागुण कलेच्या दृष्टीने नुसते कुचकामीच नव्हेत तर घातकही आहेत. ही प्रवृत्ती वेळीच निपटून टाकली तरच तुमची प्रगती होईल हे पुन्हा एकदा हेन्रीला बजावून सांगण्यात आले. बिचारा मुकाट्याने आपल्या प्रायमरी शॅडोज्‌ रॉ अंबरने रंगवायचा, ब्रशचा फटकारा दिसू नये म्हणून घोटून घोटून गुळगुळीत करायचा. इतका की एक-दोनदा खुद्द कोर्मोनने त्याची पाठ थोपटली.
हे पाहा. निसर्गदत्त गुणवत्ता काय सगळ्यांनाच लाभते असं नाही. पण त्याची भरपाई चिकाटीने करता येते. ती तुमच्यात भरपूर आहे. माझ्या सूचनाबरहुकूम काम करत राहिलात तर एक दिवस तुम्हाला पेंटिंग बऱ्यापैकी जमू लागेलही. अंगी गुणवत्ता नाही म्हणून असे निराश होऊ नका. लक्षात ठेवा. अशीच ढोर मेहनत करत राहिलात तर एखाद्या दिवशी त्या परमेश्वराला तुमची दया येईल आणि कोणी सांगावं कदाचित तुमचं एखादं चित्र सॅलूनच्या वार्षिक प्रदर्शनासाठी निवडलंही जाईल.कोर्मोनच्या अशा शब्दांनी हेन्रीला धन्यता वाटे आणि धीर येई.

(फोटो - प्रोफेसर कोर्मोनच्या स्टुडियोत हेन्री तुलूझ लोत्रेक)



No comments:

Post a Comment